केजरीवालांच्या यशामुळे बुद्धिवाद्यांना चपराक

                    

अफलातून प्रवासव्यवस्था परिवर्तन घडवून आणण्यासाठी निघालेल्या अरविंद केजरीवालांच्या आयुष्याचा प्रवास अफलातून आहे. १६ ऑगस्ट १९६८ मध्ये हरियाणाच्या हिस्सार येथे जन्मलेले केजरीवाल खरगपूर आयआयटीचे मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. शिक्षणानंतर काही काळ त्यांनी टाटा स्टीलमध्ये नोकरी केली. त्यानंतर भारतीय महसूल सेवेत निवड झाल्यानंतर आयकर खात्यात त्यांनी नोकरी केली. तेथे ते सहआयुक्तपदापर्यंत पोहोचले. मात्र प्रारंभापासून कार्यकर्त्याचा पिंड असल्याने नोकरीत असतानाही त्यांच्या चळवळी सुरूच होत्या. १९९९ साली त्यांनी परिवर्तन ही संस्था स्थापन केली होती. त्यानंतर काही काळातच माहिती अधिकार कायद्यासाठी सरकारी नोकरीला रामराम करून सामाजिक कार्यकर्त्या अरुणा रॉयसोबत त्यांनी काम सुरू केलं. त्याबद्दल त्यांना मॅगसेसे पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. 

 
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंसोबत लोकपालाच्या लढाईत सामील झाल्यापासून ते खर्‍या अर्थाने प्रकाशझोतात आले. दिल्लीतील प्रसिद्ध विधिज्ञ प्रशांत भूषण, माजी पोलीस आयुक्त किरण बेदी, समाजशास्त्रज्ञ योगेंद्र यादव, कवी व प्राध्यापक कुमार विश्‍वास, मनीष शिसोदिया, शाजिया इल्मी यांच्यासारखी अनेक ताकदीची माणसं त्यांनी चळवळीत आणि पुढे आम आदमी पार्टीत आणली. यांच्यापैकी कोणाचाही राजकारणाशी संबंध नव्हता. आपली चांगली नोकरी, व्यवसाय, करियर सोडून ही माणसं व्यवस्था परिवर्तन लढाईत उतरली आहेत. केजरीवालांच्या पत्नी सुनीता या शासकीय सेवेत आयकर विभागातच काम करतात. त्यांना दोन मुलं आहेत.२४ तास बातम्यांचा रतीब घालणार्‍या वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर आपलं पांडित्य पाजळणारे तज्ज्ञ विश्लेषक वा महाराष्ट्रातील ११ कोटी जनता आपले अग्रलेख वाचण्यासाठीच सकाळी उठते या गैरसमजुतीत वावरणार्‍या विद्वान संपादकांचं मत काहीही असो, रविवारी निकाल लागलेल्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे खरे हिरो हे अरविंद केजरीवाल हेच आहेत. राजस्थानात विक्रमी जागा मिळविणार्‍या वसुंधरा राजे व सतत तिसर्‍यांदा सत्ता खेचून आणण्यात यशस्वी ठरलेले शिवराजसिंह चौहान आणि रमणसिंह यांचं यश कौतुकास्पद असलं, तरी केजरीवालांची करामत ही केवळ अद्भुत आहे. अवघ्या काही महिन्यांच्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी घडवून आणलेल्या राजकीय भूकंपाची इतिहासात नोंद होणार आहे. निवडणुकीपूर्वी अनुल्लेखाने मारणार्‍या आणि हेटाळणी करणार्‍या सर्वपक्षीय नेत्यांनाच नव्हे, तर काँग्रेसच्या युवराजालाही केजरीवालांची नोंद घ्यावी लागली, यावरून त्यांच्या यशाचं महत्त्व लक्षात येतं. ‘आम आदमी पार्टीने आंदोलनाच्या माध्यमातून स्वत:ला सामान्य जनतेसोबत जोडून घेतलं, त्यांच्यापासून खूप काही शिकण्याजोगं आहे. आम्ही कल्पना येणार नाहीत, असे बदल काँग्रेसमध्ये करू,’ असे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींसारखं आता उशिराचं शहाणपण सर्वांना सुचत आहे. असो! मात्र केजरीवालांच्या यशाने एका गोष्टीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं. ते म्हणजे, या देशातील तथाकथित विद्वान, प्रस्थापित व तथाकथित पुरोगाम्यांनाही सामान्य जनतेच्या मनात काय आहे, हे कधीच कळत नाही. स्वातंत्र्यापूर्वी मिठाच्या सत्याग्रहाने वा असहकाराने कुठं स्वातंत्र्य मिळत असतं काय, असा महात्मा गांधींना सवाल करणारे आजच्या विद्वानांचे पूर्वसुरीच होते. या जमातीला आणीबाणीदरम्यानच्या जयप्रकाश नारायणांच्या जनआंदोलनाची भाषाही कळली नव्हती.

केजरीवालांनी जे यश मिळविलं त्याची बीजं ही दोन वर्षांपूर्वी अण्णा हजारेंच्या रामलीला मैदानावरील आंदोलनादरम्यानच रोवली गेली होती. त्या वेळी देशभर जे जबरदस्त वातावरण तयार झालं होतं, ते अजूनही प्रत्येकाच्या स्मरणात असेल. त्या वेळी पांढरपेशा मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीयांचं हे तथाकथित आंदोलनं आहेत, ही माणसं अराजकता निर्माण करीत आहेत, लोकशाहीची चौकट मोडायला निघाले आहेत, मेणबत्ती संप्रदायाचे हे लोक आहेत, अशी बरीच हेटाळणी झाली. टीव्हीवाल्यांनी आपला टीआरपी वाढविण्यासाठी हे आंदोलन उभं केलं, अशीही टीका झाली होती.आजही पुरोगामी, समाजवादी वतरुळातील माणसं केजरीवालांचं यश स्वीकारायला तयार नाही. हा केवळ दिल्लीपुरता चमत्कार आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. अण्णा-केजरीवालांसारख्या प्रवृत्तींमुळे लोकशाहीची चौकट धोक्यात येते, असा गळा ते काढतात. मात्र प्रस्थापित राजकीय पक्ष संसदेच्या सभागृहात लोकशाहीचे कपडे उतरवितात तेव्हा हे भीष्माचार्यासारखे मान खाली घालून गप्प असतात. त्यामुळे यांना किती गंभीरतेने घ्यायचं, हा प्रश्नच आहे. सामान्य माणसाच्या मनातील प्रक्षोभ देशातील बुद्धिवंतांना कधी कळत नाही, हाच येथील मोठा प्रॉब्लेम आहे. दोन वर्षांपूर्वी विद्यमान व्यवस्थेत धुमसणार्‍या लाखो सामान्य माणसांनी अण्णा हजारे नावाच्या ७४ वर्षांच्या एका महाराष्ट्रीयन वृद्धाला आपला नायक करून मुजोर सत्ताधार्‍यांना तेव्हा वाकायला भाग पाडलं होतं, (तेव्हा सरकारला लोकपाल विधेयकावरील चर्चेसाठी खास अधिवेशन बोलवावं लागलं होतं.) याचा अनेकांना विसर पडला आहे. कालांतराने अण्णा आपल्या प्रतिमेच्या प्रेमात पडले. त्यांचं आपल्या भूमिकेबद्दल भान सुटलं. त्यांच्या हट्टाग्रही स्वभावाने उचल खाल्ली. टीम अण्णांमधील काही उथळ सहकार्‍यांनीही हेकेखोरपणा केल्याने अण्णाचं आंदोलन मागे पडलं. मात्र आंदोलनाचे बारा वाजले तरी जनतेच्या मनातील धुसफुस संपली नव्हती. जनतेच्या त्या असंतोषाला वाट करून देण्याची गरज आहे, हे अरविंद केजरीवालांनी तेव्हा नेमकं ओळखलं होतं. मात्र त्या वेळी त्यांना खिजविण्यासाठी परिवर्तन करायचं असेल, तर राजकारणात येऊन यशस्वी होऊन दाखवा, असं आव्हान काँग्रेसवाल्यांनी त्यांना दिलं होतं. केजरीवालांनी ते गांभीर्याने स्वीकारून आम आदमी पार्टीची स्थापना केली. मात्र तेव्हाही, आता यांना चणे-फुटाण्याचे भाव कळतील, म्हणून पुन्हा एकदा हेटाळणी झाली होती.काल-परवा शीला दीक्षितांनी कोण हे केजरीवाल? म्हणत, तर नितीन गडकरींनी ‘चिल्लर पार्टी’ म्हणून त्यांची संभावना केली होती. मात्र हेटाळणी करणार्‍या सर्वांचे दात व जीभ केजरीवालांनी त्यांच्याच घशात लोटली आहे.

अर्थात एका रात्रीत हे घडले नाही. पक्षीय राजकारणापासून आपल्याला दूर राहायचे आहे, असे सांगत अण्णांनी केजरीवालांकडे पाठ फिरविल्यानंतर केजरीवाल व त्यांच्या सहकार्‍यांनी गेली वर्षभर अफाट मेहनत घेतली. (केजरीवालांचं आजचं यश हे अण्णांच्याही अहंकाराला चपराक आहे.) दिल्लीतील प्रत्येक गल्लीबोळ त्यांनी छानून मारली. आम्हाला संधी दिल्यास आम्ही काय करू, हे प्रत्येक घरी त्यांनी लेखीस्वरूपात लोकांसमोर मांडलं. आम आदमी पार्टीजवळ भ्रष्टाचार निर्मूलनाशिवाय दुसरा कार्यक्रम नाही, अशी टीका करणार्‍यांनी त्यांचा जाहीरनामा जरा वाचायला पाहिजे. आम्ही प्रस्थापितांचं राजकारण करणार नाही. सामान्य माणसासोबत त्याच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी काम करू हाच अजेंडा घेऊन आम आदमीचे कार्यकर्ते फिरत होते. निवडणुकीत पैसे व दारूचा वापर नाही, प्रत्येक व्यवहार हा चेकने, आलेल्या व खर्च झालेल्या प्रत्येक पैशाचा हिशेब, सामूहिक निर्णयप्रक्रिया अशी अनेक वैशिष्ट्य त्यांनी लोकांसमोर मांडली. आम्हाला आपण निवडून दिल्यास आम्ही वाहनांवर लाल दिवा लावणार नाही. सरकारी बंगला घेणार नाही. कुठलीही सुरक्षा घेणार नाही, असे जनतेला अप्रूप वाटणारे अनेक मुद्दे त्यांनी लोकांसमोर मांडलेत. (अरविंद केजरीवालांनी निवडणूक निकालानंतरच्या पहिल्या मुलाखतीत आपण वा आम आदमीचा कुठलाही आमदार यापैकी कुठलीही सुविधा घेणार नाही, याचा पुनरुच्चार केलाय.) काँग्रेस व भाजपाच्या नेत्यांची मस्ती व रगेली पाहिलेल्या दिल्लीतील जनतेसाठी हे नवं होतं. आम आदमीच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीतील प्रत्येक मतदारसंघासाठी अँक्शन प्लान बनविला आहे. त्याची अंमलबजावणी कशी होईल, याचे वेळापत्रकही त्यांनी सोबत दिले होते. निवडणुकीअगोदरचे आठ-दहा महिने दिल्लीतील ज्वलंत मुद्दे त्यांनी हाती घेतले होते. वीज दरवाढ आणि वीज कनेक्शन कापण्याविरोधात त्यांनी रस्त्यावर उतरून लढाई केली. यादरम्यान डायबिटीस असतानाही त्यांनी आठ-दहा दिवस उपोषण केले. निर्भया बलात्कार प्रकरणानंतरही त्यांनी दिल्ली सरकारच्या कायदा व सुव्यस्थेचे असेच वाभाडे काढले होते.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्याविरुद्ध आपण निवडणूक लढवू, असे घोषित करून त्यांनी आपल्यातील जिगर दाखवून दिली होती. तीन वेळा दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिलेल्या व नवी दिल्ली या त्यांच्या मतदारसंघात भरपूर विकासकामे केलेल्या दीक्षितांविरुद्ध निवडणूक लढविण्याची केजरीवालांची घोषणा अनेकांना राजकीय आत्महत्याच वाटली होती. आम आदमी पार्टीला कशीबशी एक जागा मिळाली असती, पण केजरीवालांना शीला दीक्षितांविरुद्ध लढण्याची दुबरुद्धी सुचल्याने आता तीसुद्धा शक्यता नाही, असे सांगण्यात येत होते. मात्र दिल्लीतला भ्रष्टाचार आणि येथील सार्‍या दुरवस्थेला मुख्यमंत्री म्हणून जबाबदार ठरवीत त्यांच्याचविरुद्ध दंड थोपटण्याच्या केजरीवालांच्या हिमतीचं दिल्लीकरांना कौतुक होतं. ते कौतुक व्होटिंग मशीनमध्येही परावर्तित झालं. निगरगट्ट काँग्रेस व भाजपानेत्यांच्या विपरीत अगदी वेगळ्या पद्धतीचं राजकारण करत केजरीवालांनी हे यश खेचून आणलं आहे. अर्थात, हे सगळं एवढं सरळसोपं नव्हतं. या लढाईदरम्यान केजरीवालांना सरकारी यंत्रणेनं भरपूर त्रास दिला. त्यांच्यामागे आयकर खात्याची तपासणी लावण्यात आली. ते जेव्हा आयकर खात्यात नोकरी करत होते, तेव्हाच्या त्यांच्या कारभाराची चौकशी करण्यात आली. त्यांचे फोन टॅप करण्यात आले. ई-मेल अकाऊंट हॅक करण्यात आले. परदेशातील भारतीयांनी आम आदमी पार्टीला केलेल्या आर्थिक मदतीबद्दलही चौकशीचा ससेमिरा त्यांच्यामागे लावण्यात आला. शेवटी-शेवटी आम आदमीच्या पदाधिकार्‍यांविरुद्ध काही टीव्ही पत्रकारांना हाताशी धरून एक स्टिंग ऑपरेशनही राबविण्यात आलं. मात्र केजरीवाल सार्‍यांना पुरून उरले. पुढे काय होणार माहीत नाही, सामान्य माणसाच्या साथीनं व्यवस्था परिवर्तन घडविण्यात ते यशस्वी होतात की, विद्यमान व्यवस्था त्यांना प्रवाहपतित होण्यास भाग पाडते, हे पुढे कळेल. मात्र आज तरी त्यांनी इतिहास घडविला आहे. त्याबद्दल सार्‍यांनी त्यांना सलाम केला पाहिजे.
                                                       अफलातून प्रवास
व्यवस्था परिवर्तन घडवून आणण्यासाठी निघालेल्या अरविंद केजरीवालांच्या आयुष्याचा प्रवास अफलातून आहे. १६ ऑगस्ट १९६८ मध्ये हरियाणाच्या हिस्सार येथे जन्मलेले केजरीवाल खरगपूर आयआयटीचे मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. शिक्षणानंतर काही काळ त्यांनी टाटा स्टीलमध्ये नोकरी केली. त्यानंतर भारतीय महसूल सेवेत निवड झाल्यानंतर आयकर खात्यात त्यांनी नोकरी केली. तेथे ते सहआयुक्तपदापर्यंत पोहोचले. मात्र प्रारंभापासून कार्यकर्त्याचा पिंड असल्याने नोकरीत असतानाही त्यांच्या चळवळी सुरूच होत्या. १९९९ साली त्यांनी परिवर्तन ही संस्था स्थापन केली होती. त्यानंतर काही काळातच माहिती अधिकार कायद्यासाठी सरकारी नोकरीला रामराम करून सामाजिक कार्यकर्त्या अरुणा रॉयसोबत त्यांनी काम सुरू केलं. त्याबद्दल त्यांना मॅगसेसे पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंसोबत लोकपालाच्या लढाईत सामील झाल्यापासून ते खर्‍या अर्थाने प्रकाशझोतात आले. दिल्लीतील प्रसिद्ध विधिज्ञ प्रशांत भूषण, माजी पोलीस आयुक्त किरण बेदी, समाजशास्त्रज्ञ योगेंद्र यादव, कवी व प्राध्यापक कुमार विश्‍वास, मनीष शिसोदिया, शाजिया इल्मी यांच्यासारखी अनेक ताकदीची माणसं त्यांनी चळवळीत आणि पुढे आम आदमी पार्टीत आणली. यांच्यापैकी कोणाचाही राजकारणाशी संबंध नव्हता. आपली चांगली नोकरी, व्यवसाय, करियर सोडून ही माणसं व्यवस्था परिवर्तन लढाईत उतरली आहेत. केजरीवालांच्या पत्नी सुनीता या शासकीय सेवेत आयकर विभागातच काम करतात. त्यांना दोन मुलं आहेत.
(लेखक दैनिक ‘पुण्य नगरी’चे कार्यकारी संपादक आहेत)

भ्रमणध्वनी : ८८८८७४४७९६

Previous articleराहुलबाबांचं कौतुक आता खूप झालं!
Next articleविदर्भवाद्यांना केजरीवालांसारखी ताकद दाखवावी लागणार!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.