खाजगी कंपनी अवकाशात पाठवणार अंतराळवीर

-अमित जोशी

अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात एक खाजगी कंपनी अवकाशात पाठवणार अंतराळवीर.

सध्याच्या कोरोनो व्हायरसच्या संकटात या बातमीचे महत्व अत्यंत दुय्यम आहे यात शंका नाही. मात्र ही घटना भविष्यातील अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलांची नांदी ठरणार आहे. म्हणनू त्याची नोंद घेणे आवश्यक आहे. अवकाश तंत्रज्ञानात सक्रीय असलेली खाजगी कंपनी अवकाशात अंतराळवीर पाठविण्याच्या घटनेने काय फरक पडणार आहे ? चला …समजून घेऊया.

 क्षणभर असं गृहीत धरा की आपल्या देशातील अंतराळवीर आपण ‘इस्त्रो’ (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) द्वारे नव्हे  तर रिलायन्स,टाटा, महिंद्रा , इन्फोसिस अशा एखाद्या खाजगी कंपनीच्या माध्यमातून अवकाशात पाठविण्याचे ठरविले तर काय होईल?

अमेरिकत सध्या तेच सुरु आहे.

एकतर अवकाश तंत्रज्ञान हा अत्यंत महागडा विभाग. हा विभाग देशाच्या दळणवळण, संदेशवहन, इंटरनेट, टेलिमेडिसिन अशा अनेक विभागांशी जरी संबंधित असला तरी संरक्षण क्षेत्राशी थेट संबंधित असल्यानं हा विभाग थेट संबंधित सरकारच्या ताब्यात असतो. म्हणूनच अमेरिका, रशिया या प्रमुख देशांनी अवकाश तंत्रज्ञान विभाग सुरुवातीपासून स्वतःच्या ताब्यात ठेवत दमदार पावले टाकली.

अर्थात जसा जसा व्याप वाढत गेला तसा अमेरिकेने खाजगी कंपन्यांना यात प्रवेश करण्याची परवानगी दिली . रॉकेट्स – उपग्रह वाहून नेणाऱ्या प्रक्षेपकांच्या निर्मितीचे कामे, उपग्रह निर्मितीची कामे, अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक तांत्रिक गोष्टी… अशी कामे खाजगी कंपन्यांना सोपविण्यास अनेक वर्षांपूर्वीच सुरुवात झाली.  अमेरिकेतील कंपन्यांकडे असलेली व्यावसायिक वृत्ती, प्रशिक्षित मनुष्यबळ यामुळे नासाचे काम बरेसचे हलके झाले. असं असलं तरी अवकाशात अंतराळवीर पाठवणे ही अत्यंत खर्चिक, क्लिष्ट तंत्रज्ञान असलेली गोष्ट असल्यानं अंतराळवीर अकाशात पाठण्याचे शिवधनुष्य हे अमरिकेतील एकही खाजगी कंपनी आजपर्यंत पेलू शकली नाही. पूर्वीचा सोव्हिएत रशिया आणि आता रशिया या देशात कम्युनिस्ट दृष्टीकोनामुळे अवकाश विभागात खाजगी कंपनीचा शिरकाव झाला नाही. तशी कुठलीही कंपनी त्या देशांत उभी राहू शकली नाही. चीनकडेही हाच प्रकार आहे. तेव्हा चीन काय किंवा रशिया काय, अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रावर मुख्य नियंत्रण हे तिथल्या सरकारचेच राहीले आहे. युरोपियन देश, जपान हे कितीही प्रगत असले आणि विविध उपग्रहांचे प्रक्षेपण आणि अवकाश मोहिमा राबवू शकत असले तरी या देशांना अंतराळवीर अवकाशात पाठवणे स्वबळावर शक्य झालेलं नाही.

आतापर्यंत अमेरिका,रशिया आणि चीन या तीन देशांनीच त्यांचे ( किंवा सामूहिक अवकाश मोहिमांसाठी इतर देशांचे सुद्धा ) एकूण ३०० पेक्षा जास्त अंतराळवीर स्वबळावर अवकाशात पाठवले आहेत. आता भारतही या स्पर्धेत उतरला आहे. ‘गगनयान’ मोहिमेअंतर्गत आपणही  २०२२ पर्यंत स्वबळावर देशाचा अंतराळवीर अवकाशात धाडण्याच्या मोहीमेवर काम करतो आहे. अर्थात भारतात ‘इस्त्रो’च्या माध्यमातूनच ही मोहीम आखली गेली आहे.

मात्र आता अमेरिका वेगळं पाऊल टाकत आहे. अत्यंत कल्पक असलेले, विविध कल्पना धडाक्यात राबवत यशस्वी करणाऱ्या अमेरिकेतील  ‘स्पेस एक्स’ या अंतराळ क्षेत्रात कार्यरत खाजगी कंपनीचे संस्थापक ‘ऐलॉन मस्क’ यांनी अंतराळवीर अवकाशात पाठण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. अर्थात यामध्ये काही तांत्रिक सहाय्य ‘नासा’ने केलं असलं तरी बहुतांश कामगिरी स्पेस एक्सनेच बजावली आहे. येत्या २७ मे ला स्पेस एक्सच्याच ‘फाल्कन ९’ या अतिविशाल रॉकेटच्या सहाय्याने, स्पेस एक्सनेच बनवलेली ‘ड्रॅगन २ ही अवकाश कुपी दोन अंतराळवीरांना घेऊन अवकाशात झेप घेणार आहे. काही तासांचा प्रवास करत ही कुपी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला जोडली जाईल. जोडल्यानंतर दोन अंतराळवीर अवकाश स्थानकात प्रवेश करतील, तिथे सुमारे ३ महिने राहील आणि मग तिच अवकाश कुपी अंतराळवीरांना घेऊन पृथ्वीवर परतेल.

थोडक्यात २७ मे हा अवकाश तंत्रज्ञान क्षेत्राच्या दृष्टीने एक ऐतिहासिक दिवस असेल. कारण एक खाजगी कंपनी स्वबळावर अंतराळवीरांना अवकाश सफर घडवून आणणार आहे.

२०२४ पासून मानव चंद्रावर  वस्ती करायला सुरुवात करेल, अशी जय्यत तयारी सध्या ‘नासा’ करत आहे. २०२४ पासून नासाच्या चंद्र आणि पृथ्वी दरम्यान नियमित वाऱ्या सुरु झालेल्या असतील. तेव्हा नासाचा अवकाशातील कामाचा पसारा वाढला असेल. म्हणूनच ‘स्पेस एक्स’ सारख्या कंपन्या भविष्यात अमेरिकेचा अवकाश क्षेत्रातील भार हलका करणार आहेत. ‘स्पेस एक्स’ पाठोपाठ ‘बोईंग’ कंपनीही पुढील काही महिन्यात अवकाशात अंतराळवीर पाठवण्याचा प्रयत्न करणार आहे.

 ‘स्पेस एक्स’च्या सारख्या खाजगी कंपनीच्याअवकाश तंत्रज्ञानातील विविध कामगिरींमुळे  भारतात इस्त्रोच्या गोटात चिंतेचे वातावरण तयार व्हायला सुरुवात झाली आहे. कारण भारत जगात सर्वात स्वस्तात उपग्रह अवकाशात पाठवतो. ‘स्पेस एक्स’ने याआधीच याबाबत अप्रत्यक्ष आव्हान द्यायला सुरुवात केली असतांना आता ही कंपनी अंतराळवीर पाठवण्यासाठीही सज्ज झाली आहे.

थोडक्यात अत्यंत महागड्य़ा, आव्हानात्मक, क्लिष्ट तंत्रज्ञान असलेल्या अवकाश मोहीमेत ‘स्पेस एक्स’ च्या रुपाने, खाजगी कंपनीचे ‘वामन’ रुपी महाकाय असं पाऊल पडणार आहे. म्हणून २७  मे ला होऊ घातलेली घडामोड ही लक्षवेधी ठरते.

(लेखक झी २४ तास या वृत्त वाहिनीत कार्यरत आहेत.अवकाश तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रातील घडामोडी हे त्यांचे  आवडते विषय आहेत)

98332 24281

( ‘स्पेस एक्स’  च्या या समानवी अवकाश मोहिमेचे ऐनिमेशन पहायला विसरु नका. https://www.youtube.com/watch?v=sZlzYzyREAI)

 

Previous articleलेनिन १५० : स्मरण-विस्मरण
Next articleपत्रकारांना करोनाचा झटका
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.