गांधींचे वंशज कुठे आहेत ? काय करताहेत?

महात्मा गांधी आणि कस्तुरबा यांना हरिलाल, मणिलाल, रामदास आणि देवदास अशी चार मुले होती. यापलीकडे गांधीजींच्या वंशजांबद्दल अधिक माहिती आपणास नसते. गांधीजींचे नातू , पणतू , त्यांची मुलं आज कुठे असतात? काय करतात? याबद्दल सविस्तर माहिती देणारा हा ‘मीडिया वॉच- गांधी १५०’ विशेषांकातील लेख वाचायलाच हवा – संपादक 

…………………………………………………………………………..

-सोनल पारीख

असे म्हणतात की, पूर्वजांचे गुण त्यांच्या नंतरच्या पिढ्यांमध्ये उतरतात. हे खरे असले, तरीही काही पिढ्या या केवळ त्यांच्या पूर्वजांच्या पुण्याईवर जगत नाहीत, तर त्यांचे स्वतःचे असे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करतात आणि तेही पूर्वजांशी असलेली आपली नाळ जपून. यासाठी आपल्याला वटवृक्षाचे उदाहरण सांगता येईल. मुळच्या वृक्षाशी असलेला आपला संबंध कायम ठेवत वडाच्या फांद्या  जमिनीमध्ये रुतून नवीन वटवृक्ष बनून स्वतःचे असे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करतात. अशा वटवृक्ष आणि त्यांच्या फांद्यांत असणारा संबंध काही पूर्वज आणि त्यांच्या नंतरच्या पिढ्यांमध्ये आपल्याला आढळून येतो. अगदी  अशाच प्रकारच्या पिढ्यांत आपल्याला बा आणि बापू, म्हणजेच कस्तुरबा आणि मोहनदास गांधींच्या पिढीचे नाव खात्रीने घेता येईल. त्यांना हरिलाल, मणिलाल, रामदास आणि देवदास अशी चार मुले होती.

     महात्मा गांधी या नावाचे वलय फार मोठे असल्याने साहजिकच त्यांच्या नंतरच्या पिढ्यांनी काय केले किंवा आताची पिढी नेमकी कुठे आहे, काय करत आहे असे अनेक प्रश्न अनेकांच्या डोक्यात आले असतील. त्यासाठीच मोहनदास गांधी आणि कस्तुरबा यांच्या आतापर्यंतच्या वंशावळीची माहिती किंवा वंशवृक्ष या लेखामध्ये मांडला आहे. त्यासाठी बापू आणि बाच्या प्रत्येक मुलाची वंशावळ स्वतंत्रपणे पुढे दिलेली आहे.

     हरिलाल हा बापूंचा सर्वात मोठा मुलगा. त्याने सैन्यातील एखाद्या शिस्तबद्ध सैनिकाप्रमाणे बापूंच्या दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रहात सहभाग घेतला. बापूंशी मतभेद होईस्तोवर त्याला ‘छोटा गांधी’ म्हणून ओळखले जाई. हरिलालचा विवाह गुलाबशी झाला. गुलाबला चंचल किंवा चंची नावाने सुद्धा ओळखले जाई. हा विवाह बापूंच्या इच्छेविरुद्ध होता. हरिलाल आणि गुलाब यांना एकूण पाच अपत्ये. तीन मुलगे आणि दोन मुली. त्यांपैकी शांतिलाल याचा अर्भकावस्थेत आणि रसिक याचा तरुणपणीच मृत्यू  झाला. राहिले एक मुलगा आणि दोन मुली. त्यांची नावे अनुक्रमे कांतिलाल, रामिबेन आणि मनू.

     रामिबेन ही हिरालाल आणि गुलाब यांची धाकटी मुलगी. रामिबेनचा विवाह कुंवरजी पारीख यांच्यासोबत झाला. या जोडप्याला एकूण चार अपत्ये. एक मुलगा व तीन मुली. त्यांची नावे अनुक्रमे प्रबोध, अनसूया, नीलम आणि नवमलिका. त्यातील अनसूया ही सर्वात धाकटी. आता आपण अनसूया आणि तिच्यानंतरच्या पिढीची माहिती घेऊया.  अनसूयाबेन यांचा विवाह मोहन पारीख यांच्यासोबत झाला. या दाम्पत्याला एक मुलगा व एक मुलगी. मुलाचे नाव राहुल. त्याचा विवाह नीलिमा नावाच्या मुलीशी झाला आणि ते दोघे आता अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. त्यांना अनूप आणि अवनी अशी अपत्ये असून, दोघेही विवाहित आहेत आणि आपल्या आईवडिलांप्रमाणेच अमेरिकेत स्थायिक झाली आहेत. अनसूयाबेन व मोहन पारीख यांच्या मुलीचे नाव लेखावती. तिचा विवाह डॉ. नरेंद्र बालसुब्रह्मण्यम् यांच्याशी झाला. त्यांना अमल आणि देव अशी दोन अपत्ये असून अमन हा वकील, तर देव हा आय.टी. अभियंता आहे. दोघेही विवाहित असून सध्या अमेरिकेत राहतात.

     प्रबोधभाई यांच्या पत्नीचे नाव माधवी असून त्यांना सोनल आणि डॉ. पराग अशी दोन अपत्ये असून, दोघेही विवाहित आहेत. सोनल लेखिका-वक्ता असून तिचा विवाह डॉ. भारत पारीख यांच्याशी झाला आहे. ते बेंगलुरूमध्ये राहतात. सोनल आणि डॉ. भारत यांना डॉ. रचना नावाची मुलगी असून ती विवाहित आहे आणि दिल्लीला राहते. तसेच गौरव नावाचा मुलगा आय. टी. अभियंता असून विवाहित आहे. त्याला एक मुलगी आहे. तो सध्या बेंगलुरू येथे राहतो. पराग हा विवाहित असून त्याच्या पत्नीचे नाव पूजा आहे. ते मोरबी मध्ये राहतात. त्यांना दर्शन आणि प्राची नावाची दोन अपत्ये असून, दर्शन हा औषधशास्त्राचा अभ्यास करत आहे, तर प्राची अभियंता असून विवाहित आहे.

     नीलम हे रामिबेन आणि कुंवरजी यांचे तिसरे अपत्य. नीलमबेन या शिक्षिका होत्या आणि नंतर दंग येथील आदिवासी विद्यालयाच्या त्या प्राचार्य होत्या. त्यांनी बापू आणि हरिलाल तसेच बापूंच्या चार सुना यांच्यातील कौटुंबिक संबंधावर बरीच पुस्तके लिहिली आहेत. आता त्या पती योगेंद्र पारीख यांच्यासमवेत नवसारी येथे राहतात. योगेंद्र पारीख हे जमीन तसेच शेतकरी हक्क कायद्यासाठी लढत असून, दंग येथील आदिवासींमध्ये ते काम करतात. त्यांनी ओरिसा येथे NRDE नावाची संघटना स्थापन केली आहे. नीलमबेन यांचा मुलगा डॉ समीर विवाहित असून त्यांच्या पत्नीचे नाव रागिणी आहे. समीर हे नेत्रशल्यचिकित्सक असून नवसारीमध्ये त्यांचे स्वतःचे डोळ्यांचे हॉस्पिटल आहे. समीरची दोन्ही मुले अनुक्रमे सिद्धार्थ आणि पार्थ औषधशास्त्राचा अभ्यास करत आहेत, तर मुलगी गोपी दंतशल्यचिकित्सक आहे.

     रामिबेन व कुंवरजी यांचे शेवटचे अपत्य म्हणजे नवमलिका. त्यांच्या पतीचे नाव व्रजलाल असून त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. त्यांची नावे अनुक्रमे रवी, पारुल आणि मनीषा अशी आहेत. त्यांपैकी पारुल या फिजिओथेरपिस्ट असून पती निमेश यांच्यासोबत कॅनडामध्ये राहतात. त्यांना अनेरी आणि सार्थक अशी दोन अपत्ये असून अनेरी ही इंग्लंडमध्ये काम करते, तर सार्थक हा कनिकाशी विवाहबद्ध असून ते कॅनडामध्ये राहतात. मनीषा यासुद्धा फिजिओथेरपिस्ट असून पती राजेशसोबत नागपूर येथे राहतात. मनीषा आणि राजेश यांचा पुत्र दक्ष हा अभियंता असून, मुलगी मिली औषधशास्त्राचा अभ्यास करीत आहे. तसेच नवमलिका व व्रजलाल यांचा मुलगा रवी हा संगणक अभियंता असून, शीतल नावाच्या मुलीसोबत त्याचा विवाह झाला आहे. त्यांची दोन मुले म्हणजेच नील आणि आकाश सध्या शाळेत शिकत आहेत.

     कांतिलाल हे हिरालाल आणि गुलाब यांचे दुसरे अपत्य. त्यांचा विवाह सरस्वती यांच्याशी झाला. कांतिलाल हे डॉक्टर होते आणि त्यांनी बिर्ला एन्टरप्राईज हिंद सायकल्स येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले. तसेच, वरळीमधील सेन्चुरी मिल्स लेबर कॉलनीत त्यांनी वैद्यकीय सेवा दिली. याठिकाणी त्यांनी लोकसेवा चॅरिटेबल ट्रस्टची मुंबई मधील टेक्स्टाईल मिलमध्ये काम करणार्‍या गरीब कामगारांसाठी स्थापना केली. ते परवानाधारक काळी-पिवळी टॅक्सी ड्रायव्हरसुद्धा होते आणि त्यांनी मुंबईत त्यांच्या अखेरपर्यंत त्यांनी काळी-पिवळी टॅक्सी चालवली. कांतिलाल यांना दोन मुले असून, त्यांची नावे डॉ. शांतिकुमार आणि प्रदीप अशी आहेत. त्यांपैकी शांतिकुमार यांचा सुसान या हृदयरोगतज्ज्ञाशी विवाह झाला. ते अमेरिकेतील राज्य कायदेमंडळात सदस्य होते. डॉ. शांतिकुमार यांना चार मुली असून त्यांची नावे अंजली, अंकिता, अलका आणि अ‍ॅन असून, चारही विवाहित आहेत व सध्या अमेरिकेत आहेत. कांतिलाल यांचे दुसरे अपत्य प्रदीप यांचा विवाह मंगलासोबत झाला. ते चार्टर्ड अकाऊंटंट असून अमेरिकेत राहतात. त्यांना प्रिया आणि मेधा नावाच्या दोन मुली असून त्या विवाहित आहेत व अमेरिकेत राहतात.

     मनू हे हिरालाल आणि गुलाब यांचे शेवटचे अपत्य. मनू यांचा विवाह सुरेंद्र मशरूवाला यांच्याशी झाला. मनुबेन यांना एकच मुलगी. तिचे नाव उर्मी. उर्मी या फिजीओथेरपिस्ट होत्या. त्यांचा विवाह आयआयएम अहमदाबाद मधील प्रो.भूपत देसाई यांच्याशी झाला. या दाम्पत्याला एक मृणाल नावाचा मुलगा आणि रेणू नावाची मुलगी आहे. मुलगा मृणाल हा निशा नावाच्या मुलीसोबत विवाहबद्ध असून, सिनेमॅटोग्राफर म्हणून काम करतो. दोघेही आता मुंबईत असतात. तसेच उर्मी यांची मुलगी रेणू हिचे Town Planning and Communities या विषयात पी. एचडी. झाले असून ती आता अहमदाबादमध्ये राहते.

         आता आपण मणिलाल गांधी यांच्या वंशावळीबाबत माहिती पाहू. मणिलाल गांधी हे बापूंचे दुसरे सुपुत्र. बापूंच्या दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रहाच्या वेळी ते तरुण होते. बापूंनी दक्षिण आफ्रिकेत त्यांचा पहिला आश्रम स्थापन केला होता. जेव्हा बापू आणि हरिलाल दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रहाचे नेतृत्व करताना कैद झाले, त्यावेळी मणिलाल यांनी त्यांचे लहान भावंड, तुरुंगवास भोगत असलेल्या सत्याग्रहींचे कुटुंब आणि आश्रम सांभाळले. बापू जेव्हा दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले, तेव्हा त्यांनी मणिलाल यांना दक्षिण आफ्रिकेतील फिनिक्स वसाहत सांभाळण्यासाठी आणि ‘इंडियन ओपिनियन’ या पत्राचे संपादन तसेच प्रकाशनाच्या जबाबदारीसाठी पाठवले. हे काम त्यांनी त्यांची पत्नी सुशीला समवेत अखेरच्या श्वासापर्यंत केले. ते बापूंनी भारतात केलेल्या सत्याग्रहात भाग घेण्यासाठी येत. जेव्हा मिठाचा कायदा मोडण्यासाठी बापूंनी साबरमती ते दांडी अशी पदयात्रा काढली, तेव्हा या पदयात्रेत सुरुवातीच्या 80 जणांत मणिलाल सुद्धा होते. धरासना येथील सत्याग्रहातील मणिलाल हे पहिले सत्याग्रही होते. मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळी पोलिसांनी त्यांना जखमी आणि बेशुद्ध होईपर्यंत अत्यंत निर्दयपणे मारहाण केली. त्यांनी त्यांचा दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषी  राजवटी विरुद्धचा अहिंसक लढा अखंडपणे सुरूच ठेवला आणि त्यावेळी त्यांना कित्येकदा तुरुंगवारी करावी लागली. त्यांच्या मृत्युनंतर त्यांचे कार्य पत्नी सुशीला यांनी सुरु ठेवले.

     मणिलाल यांचा विवाह महाराष्ट्रातील अकोला शहरात राहणार्‍या मशरुवाला कुटुंबातील सुशीला यांच्याशी झाला. त्यांना एकूण एक मुलगा आणि दोन मुली अशी तीन अपत्ये होती. मणिलाल यांची ज्येष्ठ मुलगी म्हणजे सीता. त्यांचा विवाह शशिकांत धुपेलिया यांशी झाला. या दाम्पत्याला सुद्धा एक मुलगा आणि दोन मुली. त्यांची नावे अनुक्रमे सतीश, उमा आणि कीर्ती.

     सीता आणि शशिकांत यांचा मुलगा सतीश सेवानिवृत्त शिक्षक तसेच व्हीडिओ जर्नालिस्ट आणि प्रोड्यूसर म्हणून त्यांनी काम केले असून, आता डर्बन येथे पत्नी प्रतिभा यांच्यासमवेत राहतात. आता ते समाजसेवक म्हणून काम करतात. सतीश यांना मिशा आणि शशिका नावाच्या दोन मुली असून, त्यांपैकी मिशा ही केप टाऊनमधील विद्यापीठात शिकवते, तर शशिका तेथेच माहिती तंत्रज्ञान या विषयाची प्रोफेसर म्हणून काम करते. सतीश यांचा मुलगा कबीर जोहान्सबर्ग येथे बँकेत काम करतो.

     मशरुवाला दाम्पत्याची मुलगी उमा यांचा विवाह प्रो. राजेंद मिस्त्री यांच्याशी झाला. दोघेही केप टाऊन येथे भाषाशास्त्र विषयाचे प्रोफेसर आहेत. त्यांची मुलगी सपना तेथेच वकील म्हणून काम करते.

     सीता आणि शशिकांत यांचे अखेरचे अपत्य म्हणजे मुलगी डॉ. कीर्ती. दक्षिण आफ्रिका सरकारच्या शिक्षण विभागात काम करते. तिचा विवाह सुनील मेनन यांच्याशी झाला. सुनील यांचा स्वतःचा आय.टी. बिझनेस आहे. ते दोघेही मुलगी सुनीता हिच्यासमवेत जोहान्सबर्ग येथे राहतात. सुनीता जोहानसबर्ग येथेच पत्रकार म्हणून काम करते.

     मणिलाल यांचे दुसरे अपत्य म्हणजे अरुण गांधी. अरुण यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला. मणिलाल यांच्या निधनानंतर अरुण भारतात येऊन स्थायिक झाले. अरुण यांचा विवाह सुनंदा यांच्यासोबत झाला. त्यांनी Times Of India या इंग्रजी दैनिकात काम केले. मुंबईत असताना त्यांना अर्चना आणि तुषार अशी दोन अपत्ये झाली. 1987 च्या सुरुवातीला ते दोघे भारत, अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका या देशांतील काही घटकांना मिळणारी सापत्न वागणूक आणि भारतातील जातिव्यवस्था या विषयाच्या अभ्यासासाठी अमेरिकेत गेले. त्यावेळी त्यांना मिसिसिपी विद्यापीठाने सन्मानित केले.1991 मध्ये त्यांनी मेंफिस टेनेशी येथे एम. के. गांधी इन्स्टिट्यूट स्थापन केली. या इन्स्टिट्यूटकरिता महात्मा गांधी आणि मणिलाल व सुशीला यांच्यातील पत्रव्यवहार खुला करून त्यामार्फत निधी उभारल्याबद्दल त्यांच्यावर त्यावेळी टीका झाली होती. या इन्स्टिट्यूटचा मुख्य उद्देश अहिंसा या तत्वप्रणालीचा प्रचार करणे आणि या तत्वाचा उपयोग प्रतिरोध, न्याय, समाज तसेच राष्ट्रउभारणीसाठी प्रत्यक्षात कसा करावा हे सांगणे आहे. ही इन्स्टिट्यूट म्हणजे अहिंसा या तत्व अभ्यासक्रमाप्रमाणे शिकवणारी एखादी शैक्षणिक संस्था नाही, तर आजच्या काळात महात्मा गांधींप्रमाणे सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी अहिंसा या तत्वाचा कसा उपयोग करता येईल, हे सांगणारी संस्था आहे. ही इन्स्टिट्यूट अहिंसा या तत्वाच्या प्रसारासाठी काम करणार्‍या इतर संस्था तसेच वर्ग यांच्यासाठी अभ्याससाहित्य तसेच इतर उपयुक्त साहित्य तयार करण्यास तसेच या साहित्याचा पुरवठा करण्यासाठी मदत करते. या इन्स्टिट्यूटचा आणि अरुण गांधींचा त्यांच्या कार्यासाठी 2005 मध्ये न्यूयॉर्क येथील रॉचेस्टर विद्यापीठाने सन्मान केला. आता ही संस्था गरिबीमुळे गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत असलेल्या शहरातील तरुणांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावे म्हणून त्यांच्यासाठी काम करते. अरुण गांधी हे अहिंसा आणि शांतीच्या प्रसारासाठी जगभर फिरत असतात. त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे ते अहिंसा आणि शांतीची बीजे रोवत आहेत.’

अरुण यांची जेष्ठ कन्या अर्चना यांचा विवाह हरिकिशोर प्रसाद यांच्याशी झाला. अर्चना या ग्रंथपाल म्हणून निवृत्त झाल्या. ते दोघेही न्यूयॉर्क मधील रॉचेस्टर येथे राहतात. अर्चना-हरिकिशोर या दांपत्याला दोन मुले असून त्यातील मोठा मुलगा डॉ. परितोष याचा रॉचेस्टर मधील Strong Memorial Hospital मध्ये सिनीअर परिचारिका या पदावर काम करणार्‍या रेबेख हॅटरी यांच्यासोबत विवाह झाला असून, तोसुद्धा याच हॉस्पिटल मध्ये डॉक्टर म्हणून काम करतो. त्यांना एलिझाबेथ सुनंदिनी नावाची मुलगी, तर मायकेल किशोर व जोनास मोहनदास नावाची दोन मुले असून, ते तिघेही भावंड सध्या शाळेत शिकत आहेत.

     अर्चना यांचा दुसरा मुलगा अनिस प्रसाद हा फायनान्स मॅनेजर असून, तो डॉ. कामिला सिकोरा हिच्याशी विवाहबंधनात अडकला असून या दाम्पत्याला माया नावाची मुलगी आणि एलीयट नावाचा मुलगा असून, हे कुटुंब डेन्वर कोरॅलँडो येथे राहते.

     अरुण यांचा लहान मुलगा म्हणजे तुषार गांधी. त्यांचा विवाह सोनलसोबत झाला. तुषार गांधी यांचा जन्म मुंबई-कोलकाता रेल्वे प्रवासात झाला. त्यांनी मिठीबाई महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आहे. त्यांचे ‘लेट्स किल गांधी’ हे गांधी हत्या कटाचा सविस्तर वेध घेणारे पुस्तक अतिशय गाजले आहे. ते लेखक असण्यासोबतच उत्कृष्ट वक्ताही आहेत. महात्मा गांधी फाऊंडेशनचे ते व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांच्या पत्नी सोनल बँक ऑफ बडोदात काम करतात. हे दांपत्य मुंबईत राहते. त्यांना दोन अपत्ये असून मुलाचे नाव विवान, तर मुलीचे नाव कस्तुरी आहे. मुलगा वकील असून International Justice Mission साठी काम करतो. मुलगी कस्तुरी मुंबईतील सेंट झेवियर कॉलेजमध्ये र्झीलश्रळल झेश्रळलू  या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत असून, पर्यावरण संवर्धनासाठी काम करणार्‍या एका एनजीओ सोबत जुळलेली आहे.

     मणिलाल यांची लहान मुलगी इला. त्यांचा विवाह रामगोविंद मेवालाल यांच्याशी झाला. दोघेही सामाजिक आणि राजकीय बाबींमध्ये सक्रिय असून दक्षिण आफ्रिकेतील डर्बन शहरात राहतात. तरुण असताना त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषी राजवटीविरुद्धच्या लढ्यात सक्रिय सहभाग घेतला. त्या आफ्रिकेतील कम्युनिस्ट पक्षाच्या अधिकृत सदस्या होत्या. जेव्हा कम्युनिस्ट पक्ष आफ्रिकन काँग्रेसमध्ये विलीन झाला, तेव्हा त्या आफ्रिकन काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्या. त्यांच्या लढ्याचा परिणाम म्हणून त्यांना पती मेवालाल यांच्यासोबत नजरकैदेत ठेवले आणि त्यांच्यावर बंदी आणली. तो काळ 1977 ते 1982 असा तब्बल पाच वर्षांचा होता. त्यांच्या लढ्याला यश आल्यानंतर म्हणजेच आफ्रिका स्वतंत्र झाल्यानंतर 1994 ते 2003 असे 10 वर्ष त्या नेल्सन मंडेला यांच्या कार्यकाळात तेथील संसदेच्या सदस्या होत्या. यानंतर त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. पुढे त्यांनी शांतता आणि अहिंसा या दोन तत्त्वांचा प्रचार आणि प्रसारासाठी वाहून घेतले. स्थानिक फिनिक्स वसाहतीबाहेर राहणार्‍या गरीब समाजासाठी त्यांनी काम केले. आता त्या डर्बन मधील गांधी डेवलपमेंट ट्रस्टच्या प्रमुख आहेत. त्या फिनिक्स वसाहत सांभाळतात आणि तेथील विविध समाजाच्या हक्क आणि विकासासाठी सक्रीय असतात. भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या देखरेखीखाली स्थापन झालेल्या Peoples of Indian Origin (PIOs) च्या त्या सदस्या होत्या. भारत सरकारने त्यांच्या मानवतावादी  कार्याबद्दल त्यांना 2007 मध्ये पद्म पुरस्कार देऊन सन्मानित केले. आता या कामासोबत शांतता आणि अहिंसा या तत्वाला समर्पित ‘सत्याग्रह’ या नियतकालिकाचे  प्रकाशनात त्या लक्ष घालतात.

     इला यांना पाच अपत्ये असून त्यांपैकी दोन मुले आणि तीन मुली आहेत. मुलगा केदार आयटी उद्योजक असून, गांधी डेव्हलपमेंट ट्रस्टचा विश्वस्त आहे. त्याचा विवाह पेशाने शिक्षिका असणार्‍या निर्वाणा यांच्यासोबत झाला. इला यांच्या दुसर्‍या मुलाचा, म्हणजे कुशचा 1992 मध्ये खून झाला. इला यांची मुलगी आशा वकील असून, आफ्रिकेत लोकांच्या हक्कांसाठी चळवळ चालवते. ती प्रिटोरिया येथे राहते. ईला यांची दुसरी मुलगी आशिष यांचा मार्क यांच्याशी विवाह झाला असून, ते दोघे दक्षिण आफ्रिकेतील डर्बनमध्ये राहतात. त्यांची अपत्ये निखिल आणि मीरा, दोघेही सध्या विद्यार्थी आहेत. ईला यांची लहान मुलगी आरती जोहान्सबर्ग येथे राहून कॉर्पोरेट ट्रेनर आणि एचआर कन्सल्टंट म्हणून काम करते.

        …………………………………….

     आता बापूंचे तिसरे पुत्र रामदास गांधी यांच्या वंशावळीबद्दल जाणून घेऊया. बापूंचे तिसरे पुत्र रामदास गांधी यांनी सुद्धा त्यांच्या वडिलांनी केलेल्या प्रत्येक सत्याग्रहात भाग घेतला. काही कालावधीसाठी त्यांना बापूंनी दक्षिण आफ्रिकेतील फिनिक्स आश्रमाची व्यवस्था आणि ‘इंडियन ओपिनियन’ चे प्रकाशन, या दोन महत्वाच्या कामांसाठी पाठवले. 1930 साली मीठ उत्पादन आणि त्यावर लावलेला अनिर्बंध कर या ब्रिटिशांच्या एकाधिकारशाही विरुद्ध रामदास यांनी एकट्याने बारडोली ते भिमरड या पदयात्रेचे नेतृत्व केले. असे करतांना त्यांना अटक करण्यात आली.

     रामदास गांधी यांचा विवाह निर्मला (निमू) यांच्याशी झाला. रामदास व निर्मला यांना कान्हादास (कान्हा) नावाचा मुलगा आणि सुमित्रा व उषा नावाच्या दोन मुली होत्या. सुमित्रा यांनी आयएएस अधिकारी (तेव्हाचे आय सी एस) म्हणून प्रशासकीय सेवेत काम केले. त्यानंतर त्या राज्यसभा सदस्य म्हणून कार्य केले. तत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयींच्या कार्यकाळात संविधान पुनर्विलोकन समितीमध्ये त्यांनी आपले कर्तव्य बजावले. त्यांचा विवाह प्रो. गजानन कुलकर्णी यांच्यासमवेत झाला. गजानन कुलकर्णी हे आयआयएम अहमदाबाद मध्ये कार्यरत होते. आता ते सेवानिवृत्त झाले असून, बेंगलुरू मध्ये वास्तव्य करतात. सुमित्रा यांना रामचंद्र आणि श्रीकृष्ण नावाची दोन जुळी मुले असून त्यांचा विवाह झाला आहे. रामचंद्र हे पत्नी जुलिया व त्यांची मुले यांच्यासोबत अमेरिकेत राहतात. तर, श्रीकृष्ण यांचा विवाह निलुसोबत झाला असून त्यांची दोन मुले शिव व विष्णू विद्यार्थी आहेत. ते सर्व बेंगलुरूमध्येच राहतात. सुमित्रा यांची मुलगी सोनाली विवाहित असून जपानच्या मालकीच्या फानुक कंपनीत काम करते आणि बेंगलुरूमध्ये राहते.

     रामदास यांचा मुलगा कान्हादास (कान्हा) यांचे काही वर्षांपूवीच सुरतमध्ये असतांना निधन झाले. ते अमेरिकेतील ‘नासा’ या संस्थेत काम करत होते. ते खूप दशकांपासून पत्नी शिवलक्ष्मी यांच्यासोबत अमेरिकेत स्थायिक झाले होते.

     रामदास यांची लहान मुलगी उषा यांचे पती हरीश गोकानी हे टेक्स्टाईल उद्योजक आहेत, ते मुंबईत राहतात. उषा या मुंबईच्या गांधी स्मारक समितीसोबत जुळलेल्या होत्या. उषा आणि हरीश दाम्पत्याला दोन मुले असून त्यांची नावे आनंद आणि संजय आहेत. आनंद हा पेशाने मधुमेहतज्ज्ञ असून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये काम करतो. सध्या तो पत्नी तेजल मणियार हिच्यासोबत मुंबईत राहतो. या दाम्पत्याला करण व अर्जुन नावाची अपत्ये असून, करण हा लंडनमधील एका रेस्टॉरंटचा मालक आहे. तो स्वतः शेफसुद्धा आहे. तो सध्या पत्नी आणि मुलासोबत लंडनमध्ये वास्तव्य करतो. अर्जुन हा नेत्ररोगतज्ञ असून, आईवडिलांसोबत मुंबईत राहतो. उषा व हरीश यांचा दुसरा मुलगा संजय आयटी प्रोफेसर असून, पत्नी मोना, मुलगा अक्षय आणि मुलगी नताशा यांच्यासोबत कॅल्गरी, कॅनडा येथे स्थायिक झालेला आहे. अक्षय व नताशा सध्या आपले शिक्षण पूर्ण करत आहेत.

     ……………………………………….

     आता आपण मोहनदास गांधींचे सर्वात लहान सुपुत्र देवदास गांधी यांच्या वंशवृक्षाबद्दल जाणून घेऊ.

     देवदास गांधींबद्दल असे म्हटले जाते की, ते गांधीजींचा ‘आँखो का तारा’ होते. 1930 नंतर  पित्यासोबत पित्याची सावली बनून ते राहिलेत. जेव्हा वडील इंग्लंडमध्ये गोलमेज परिषदेसाठी गेले, तेव्हाही देवदास त्यांच्या सोबतच होते. आगाखान पॅलेस तुरुंगात जेव्हा कस्तुरबा गांधींचा मृत्यू झाला तेव्हा तेथे आणि बिर्ला हाउस येथे गांधींची हत्या झाली तेव्हा तेथे सर्वप्रथम पोचणारे देवदास गांधीच होते. त्यांनी ‘हिंदुस्तान टाईम्स’ या इंग्रजी वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक म्हणून काम पाहिले आहे.

     देवदास यांचा विवाह महात्माजींचे विश्वासू सहकारी चक्रवर्ती  राजगोपालाचारी म्हणजेच राजाजी यांची कन्या लक्ष्मी यांच्यासोबत झाला. देवदास यांना एकूण चार अपत्ये. तीन मुले आणि एक मुलगी. मुलांची नावे अनुक्रमे राजमोहन, रामचंद्र आणि गोपालकृष्ण तर एकुलत्या एका मुलीचे नाव तारा.

     तारा यांनी ग्रामोद्योग मंडळाच्या माध्यमातून खादीसाठी स्वतःला समर्पित केले. त्या इंदोर येथील कस्तुरबा आश्रमाच्या विश्वस्त असून, दिल्लीच्या गांधी स्मृती समितीच्या उपसंचालक आहेत. त्या त्यांचा विवाह ज्योतीप्रसाद भट्टाचार्य यांच्यासोबत झाला. ज्योतीप्रसाद भट्टाचार्य हे वर्ल्ड फूड ऑर्गनायझेशन साठी काम करतात. तारा यांना विनायक नावाचा मुलगा, तर सुकन्या नावाची मुलगी आहे.  सुकन्या कस्तुरबा आश्रमासाठी काम करतात. त्यांचा विवाह विवेक भारतराम यांच्याशी झाला असून, त्यांना अक्षर आणि विदुर नावाची मुले आहेत. ते सर्व नवी दिल्लीमध्ये राहतात. तारा यांचा मुलगा विनायक व्यापारी पेढीचा मालक असून सध्या पत्नी ल्युसिया आणि मुली अ‍ॅन्ड्रिया तारा, अनुष्का लक्ष्मी आणि इंडिया अनन्या यांच्यासमवेत लंडनला राहतो.

     देवदास यांच्या मोठ्या मुलाचे नाव राजमोहन गांधी. राजमोहन हे इतिहासाचे प्रोफेसर असून, अत्यंत विद्वान असे इतिहासकार आहेत. त्यांनी आजोबा मोहनदास गांधी, लोहपुरुष सरदार पटेल, सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खान, राजाजी यांची अधिकृत चरित्रे लिहिली असून, पंजाबच्या इतिहासावर सुद्धा आपल्या लेखनातून प्रकाश टाकला आहे. राजमोहन हे पत्नी उषा यांच्यासोबत कधी भारतात, तर कधी अमेरिकेत वास्तव्य करतात. राजमोहन यांची मुलगी  सुप्रिया पर्शियन इतिहासाची प्रोफेसर असून, तिचा विवाह पर्शिअन – अमेरिकन प्रोफेसर त्राविस झादेह  यांच्यासोबत झाला. ते सध्या अमेरिकेतील याले येथे शिकवतात. त्यांना अनुश नावाचा मुलगा आहे. राजमोहन यांचा मुलगा देवदत्त  हा ह्युमन राईट्स लॉयर असून तो पत्नी सॅन्ड्रा सोबत अमेरिकेत काम करतो.

     देवदास यांच्या दुसर्‍या मुलाचे नाव रामचंद्र. रामचंद्र हे दिल्ली  विद्यापीठात तत्वज्ञानाचे प्रोफेसर होते. ते पत्नी इंदू चावला समवेत दिल्लीत राहतात. त्यांची मुलगी प्रो.लीला अमेरिकेतील विद्यापीठात अध्यापनाचे कार्य करते.

     गोपालकृष्ण हे रामदास यांचे सर्वात लहान सुपुत्र. त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत विविध सन्माननीय पदांवर काम केले. त्यांनी श्रीलंकेत निर्वासितांसाठी आयुक्त म्हणून, दक्षिण आफ्रिका आणि नॉर्वे येथे उच्चायुक्त म्हणून काम केले. ते इंग्लंडमधील नेहरू सेंटरचे संचालक होते. तसेच  पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून व काही काळ बिहारचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पहिले. ते मान्यताप्राप्त असे राजकीय समीक्षक सुद्धा होते. आता ते पत्नी तारा यांच्यासोबत चेन्नईत राहतात. त्यांना दिव्या आणि अमृता नावाच्या दोन मुली असून दिव्या चेन्नईमध्ये ‘द हिंदू’ या प्रसिद्ध दैनिकात पत्रकार म्हणून काम करते .अमृता छऊढत साठी काम करत असून ती पती व मुले यांच्यासोबत नवी दिल्लीमध्ये राहते.

(सोनल परीख या हरिलाल गांधींच्या पणती आहेत)

लेखातील सर्व फोटो तुषार गांधी यांच्या सौजन्याने

………………………..

(हा लेख ‘मीडिया वॉच’ च्या गांधी -150 विशेषांकातून घेण्यात आला आहे . विशेषांक Amazon च्या https://amzn.to/3D1EySk या लिंकवर विक्रीसाठी उपलब्ध आहे . किंमत केवळ -१५० रुपये)

Previous articleसंपूर्ण स्त्री खूप कमी लोकांना मिळते..!!
Next articleज्याचा त्याचा गांधी !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.