गोष्टीवेल्हाळ नानीची नात : म्होनबेनी एजुंग (नागालँड)

साभार – साप्ताहिक साधना

-हिनाकौसर खान -पिंजार, पुणे

 म्होनबेनीची ही कथा इथंच संपत नाही. तिच्या या साहसावर सिनेमादेखील  आला आहे. मुंबई येथील पटकथालेखक व दिग्दर्शक आकाशदित्य लामा यांनी तिच्यावर सिनेमा केला आहे. आजी आणि म्होनबेनीचं नातं, प्रेम आणि साहस उलगडवणाऱ्या या सिनेमाचं नाव ‘नानी तेरी मोरनी’ असं आहे. आकाशदित्य लामा यांनी हा संपूर्ण सिनेमा नागालँडच्या निसर्गात आणि तिथल्या स्थानिक कलाकारांसह बनवला आहे.

……………………….

ईशान्य भारताच्या अगदी शेवटच्या टोकाला असणारं एक डोंगराळ राज्य. घनटाट जंगलं, चमचमत्या निळ्या पाण्याचे प्रवाह आणि डोंगरघाटांनी वेढलेलं हे राज्य निसर्गानं समृद्ध आहे. इतका समृद्ध निसर्ग आहे म्हटल्यावर इथं वनस्पती आणि प्राणीसुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारचे आढळतात. इथली माणसं खूप साधी आणि निसर्गावर भरभरून प्रेम करणारी आहेत. निसर्गाच्या अशा अद्‌भुत सौंदर्यानं आणि आदिवासी संस्कृतीनं नटलेल्या या राज्याचं नाव आहे नागालँड. आपल्या देशातलं चिमुकलं राज्य.

या राज्यातल्याच एका छोट्या मुलीची ही साहसकथा आहे. म्होनबेनी एजुंग असं या साहसी मुलीचं नाव! अवघ्या आठव्या वर्षी या मुलीनं दाखवलेलं प्रसंगावधान आणि शौर्य यामुळे नुसत्या नागालँडलाच नाही, तर संपूर्ण देशाला तिचा अभिमान वाटला.

शाळेला सुट्ट्या लागल्या की, काही मुला-मुलींना आपापल्या गावी आजोबांच्या गावी जायचं असतं. कधी एकदा त्यांच्याकडं जाता येईल, असं त्यांना होतं. आजीच्या सुरकुतल्या हातांच्या स्पर्शाच्या उबेत बसून राहावंसं वाटतं. आपल्याला पाहून तिला होणारा आनंद, तिच्या हातचं साधंसुधं पण चविष्ट जेवण आणि रात्री तिच्या कुशीत शिरून गोष्ट ऐकण्याची मजा- या सगळ्याचीच ओढ लागलेली असते. म्होनबेनी एजुंगचंदेखील असंच झालं. तिलासुद्धा आजीच्या गावी जाऊन खूप मज्जा करायची होती. पण एकदा ती आजोळी गेली, तेव्हा तिथं वेगळंच काही तरी आक्रीत घडलं.

जानेवारी 2014 ची गोष्ट. म्होनबेनीच्या हिवाळी सुट्ट्या सुरू होत्या. आपल्या देशाच्या उत्तरेकडे- ईशान्येकडे डिसेंबर-जानेवारीमध्ये कडाक्याची थंडी असते. तिथलं तापमान उणे अंशांपर्यंत घसरते. काही वेळा बर्फही पडतो. त्यामुळं तिथलं संपूर्ण जनजीवनच विस्कळीत होऊन जातंं. घराबाहेर निघूच शकत नाहीत, अशी परिस्थिती होते. अशा वेळी शाळाही बंद असतात. म्हणूनच उत्तरेकडे कडाक्याच्या थंडीत शाळांना ‘हिवाळी’ सुट्ट्याच दिल्या जातात. तर तिसरीत शिकणाऱ्या म्होनबेनीलाही अशाच हिवाळी सुट्ट्या लागल्या होत्या. आणि सुट्टी मिळताच तिला आजीच्या गावी जायचं होतं. तिनं तसा धोशा आपल्या आई-बाबांकडे लावला. म्होनबेनीचे वडील नागालँडच्या होमगार्ड विभागात हवालदार आहेत. त्यांनी तिला तिच्या आजीकडं पाठवलं.

म्होनबेनीची आजी नागालँडच्या वोखा जिल्ह्यातल्या सानिस तालुक्यातल्या चुडी या गावी राहत होती. चुडी हे अगदी छोटंसं गाव. अवघी 170 घरं असलेलं, हजारेक लोकसंख्येचं गाव. चहुबाजूंनी शेती, डोंगर आणि दाट जंगल.  म्होनबेनीची ही आजी म्हणजे आईची आई. तिचं नाव रेन्थुंगलो जंगी. ती 78 वर्षांची होती. पण निसर्गाच्या कुशीत वाढल्यानं आजी या वयातही चांगलीच दणकट आणि चालती-फिरती होती. ती या वयातही जंगलातून सरसर चालत जायची. शेतीतली कामं करायची. नदीतलं पाणी उपसायची. जेवण तर इतकं चविष्ट बनवायची की, खाणाऱ्यानं स्वत:ची बोटं चाखत राहावीत.

आजी आपल्या गावी एकटीच राहत होती. म्होनबेनीचे आजोबा आता या जगात नव्हते. सुट्ट्यांच्या निमित्तानं म्होनबेनी जानेवारी 2014 मध्ये आजीकडे आली. आजीसोबत तिचा रोज नवा दिनक्रम असायचा. त्या दोघींचंच असं एक गूळपीठ होतं. दोघी सोबत असल्या की, जगाला विसरायच्या. आजी म्होनबेनीसाठी वेगवेगळे पदार्थ बनावायची, तिला सोबत घेऊन शेतावर जायची, गावात फेरफटका मारायची. अगदी शेजारच्या घरी जायचं म्हटलं तरी म्होनबेनी तिच्या मागं असायची. म्होनबेनीला रात्री झोपताना आजीकडून गोष्टी ऐकायला खूप आवडायचं. आजीसुद्धा लोककथा, परिकथा रंगवून-रंगवून  सांगायची. तसा तर नागालँडच्या संपूर्ण संस्कृतीवरच लोककथांचा प्रभाव आहे. लोककथांमध्ये बहुतांश वेळा मौखिक परंपरेतून चालत आलेल्या संस्कार-संस्कृतीच्या कथा असतात. साहसाच्या, बुद्धिचातुर्याच्या कथा असतात. दोघी जणी अशा कथांमध्ये गर्क व्हायच्या. त्या दोघींचा हा असा खास दिनक्रम चालायचा.

‘‘आज आपण नदीतले मासे पकडू आणि ताज्या माशांचं कालवण करू.’’ दि.24 जानेवारी 2014 च्या सकाळी आजीनं म्होनबेनीला सांगितलं.
‘‘मासे! वाह मला फार आवडतात. पण कुठल्या नदीतून आणायचे?’’
‘‘अनुन्गा नदी. त्या पाण्यातले मासे चवीला खूप छान लागतात. तुलादेखील ते मासे फार आवडतील. एकदा खाल्ल्यानंतर परत-परत माझ्या मागे लागशील.’’
‘‘नानी, पण ती नदी तर जंगलाच्या पलीकडं आहे. आपण त्या जंगलातून जायचं? मी जंगलात कधीच नाही गेले. वा! वा! मजा येईल.’’ म्होनबेनी खूश झाली.
म्होनबेनी आणि आजी दोघी नदीकडे जायला निघाल्या. जंगल घनदाट होतं. झाडंझुडपं एकमेकांत गुंतल्यानं भर दिवसाही जंगलात चांगलाच काळोख होता. पण आजीसाठी जंगल नवं नव्हतं. नदीपर्यंत जायचा रस्ता तिला चांगलाच पाठ होता. आजीच्या मागे-मागे चिमुरडी म्होनबेनीदेखील भरारभर चालत निघाली. दोघी जणी नदीच्या काठावर पोचल्या. थोडा वेळ त्यांनी विसावा घेतला.

म्होनबेनी तर नदी पाहून खूश झाली होती. आजी मात्र तिला ‘पाण्याजवळ जाऊ नकोस, तिथल्या निसरड्या दगडांवर पाय ठेवू नकोस; घसरशील, लांबच राहा’- अशा सूचना देत होती. म्होनबेनीदेखील आजीच्या सूचनांनुसार वागत होती. कातळावर जितकं पाणी आलं होतं, त्याच डोहापाशी ती खेळत बसली.

तेवढ्या वेळात आजीनं मासे पकडले. चालून-चालून त्या दमल्या होत्या आणि भुकेल्याही झाल्या होत्या. नदीकिनारीच त्यांनी मासे शिजवायचं ठरवलं. आजीनं माशाच्या पोटातली घाण स्वच्छ केली. मासे पुन्हा स्वच्छ धुण्यासाठी ती नदीपाशी गेली. खाली वाकून ती मासे धूत असताना अचानक तिच्या हृदयात जोराची कळ आली. काहीही कळायच्या आत आजी नदीत पडली.

म्होनबेनी दुरून आजीच्या हालचाली पाहतच होती. आजी नदीत पडल्याचं दिसताच ती घाबरली. ती धावत किनाऱ्यापाशी पोचली. आजीला हात देऊन तिला नदीच्या बाहेर खेचू लागली. आजीकडून म्हणावा तसा प्रतिसाद नव्हता. ती ओढत होती. आजी कळवळत होती.  एकीकडे आजीची अवस्था पाहून तिच्या डोळ्यांना धारा लागल्या. दुसरीकडं आपल्याशिवाय या जंगलात आता कुणीच नाही, हेही तिला ठाऊक होतं. तिनं प्रयत्नांची शिकस्त केली आणि आजीला पाच-साडेपाच फूट पाण्यातून बाहेर खेचण्यात यश मिळवलं. मग तिनं जरा सुस्कारा सोडला. पण तिच्या लगेच लक्षात आलं की, आजीला अजूनही कसला तरी त्रास होतोय. आजीनं डोळे मोठे केलेले. छाती धरलेली!

‘‘नानी, काय होतंय? नदीत कशी पडलीस?’’ म्होनबेनीने रडत-रडत विचारलं. त्या वेळेस खरं तर आजीच्या छातीत दुखत होतं. तिला हृदयविकाराचा झटका आला होता. तिची शुद्ध हळूहळू हरपायला लागली होती.

‘‘नानीऽ नानीऽऽ’’ म्होनबेनी आजीला हलवून जागं ठेवायचा प्रयत्न करू लागली. पण उपयोग झाला नाही. थोड्याच वेळात ती बेशुद्ध झाली. म्होनबेनी गडबडली. त्या घनदाट जंगलात ती कुणालाही हाक मारू शकत नव्हती. तिच्या मदतीला कुणीही येऊ शकणार नव्हतं. आजीचे प्राण वाचवायचे असतील, तर तिला गावातूनच मदत मिळवावी लागणार होती. प्रसंगावधान दाखवत ती तिथून गावाच्या दिशेने धावत सुटली. जंगलातल्या काट्याकुट्याच्या रस्त्याला, काळोख्या वाटेला न घाबरता धावत सुटली. अधूनमधून धाप लागल्यावर क्षणभर थांबायची, ते तितकंच. पुन्हा नव्या अधिक वेगानं धावायला लागली. चार-पाच किलोमीटर धावून ती चुडी गावाच्या तोंडाशी पोचली.

गावात शिरताच पहिल्यांदा दिसलेल्या माणसाला तिनं थोडक्यात हकिगत सांगितली. ‘‘अनुन्गा नदीवर, नानीला काही तरी झालंय. ती बोलत नाहीये, उठत नाहीये. तिला वाचवाऽ’’ ती रडत सांगू लागली. वेळ न दवडता गावकऱ्यांनी जंगलाचा रस्ता धरला. म्होनबेनीला एकानं आपल्या पाठीवर घेतलं. सायकलीवरून काही जण पुढं झाले. काही जण चालत येऊ लागले.

अनुन्गा नदीच्या काठावर अजूनही तिची आजी बेशुद्धावस्थेत पडलेली होती. कुणी तरी तिच्या चेहऱ्यावर पाणी मारून तिला उठवण्याचा प्रयत्न केला, पण काहीच उपयोग झाला नाही. परिस्थिती गंभीर आहे, हे गावकऱ्यांच्या लक्षात आलं, मग त्यांनी आजीला लगेच उचललं आणि झोळीत टाकून गावाकडे धाव घेतली. गावात येताच गाडी करून त्यांनी आजीला सानिस इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेलं. तपासणीत आजीला हृदयविकाराचा झटका आल्याचं उघड झालं. डॉक्टरांनी तत्काळ प्राथमिक उपचार केले. मात्र तिला मोठ्या दवाखान्यात नेण्याची गरज दिसत होती.

नागालँडमधील दिमापूर हे मोठं शहर आहे. या शहरातल्या सरकारी दवाखान्यात तिला उपचारासाठी आणले आणि काही दिवसांनी आजी बरीही झाली.
म्होनबेनीच्या प्रसंगावधानामुळं आजीचे प्राण वाचले. जंगलातून एकटं कसं जायचं, एखाद्या प्राण्यानं वाट अडवली तर, जंगलात रस्ता चुकलो तर- अशा कुठल्याच गोष्टींचा तिने बाऊ केला नव्हता. केवळ आपल्या आजीचे प्राण वाचवायचे, हीच गोष्ट मनाशी ठेवून ती पळत सुटली होती.

आजी बरी होऊन दवाखान्यातून घरी आली, तेव्हा गावकऱ्यांना म्होनबेनीचं खूप कौतुक वाटत होतं. त्यांनी जेव्हा तिला विचारलं की, ‘एवढीशी तू… जंगलातून एकटी धावताना तुला भीती नाही वाटली?’ त्यावर म्होनबेनी म्हणाली, ‘‘अजिबात नाही. मला नानी खूप आवडते. माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. त्या क्षणी तिला पाहून मला एकच गोष्ट कळत होती की, गावातून कुणाला तरी बोलवायला हवं. बस्स! मग पळाले. आणि मग आजीनंसुद्धा बरं झाल्यावर मला खूप प्रेम दिलं. माझे खूप लाड केले.’’

म्होनबेनीचं हे धाडस, आजीवर असलेलं प्रेम चुडी गावातल्या लोकांच्या कौतुकाचा विषय झाला. पण ते तिथंच गावापर्यंत राहिलं नाही. म्होनबेनीच्या साहसाची वार्ता थेट भारत सरकारपर्यंत पोहोचली. शासनाच्या इंडियन कौन्सिल फॉर चाइल्ड वेलफेअर या विभागाकडून योग्य प्रसंगावधान दाखविणाऱ्या धाडसी मुलांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दिला जातो.

म्होनबेनीनेदेखील प्रसंगावधान आणि धाडस दाखवलं होतं. त्यामुळे शासनाच्या वतीनं तिचा 2014 च्या राष्ट्रीय शौर्य पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. नवी दिल्ली इथं पुरस्कार प्रदान सोहळा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  हा पुरस्कार चिमुकलीनं स्वीकारला. हा गौरवसोहळा पाहताना म्होनबेनीच्या वडिलांना- एन लॉन्ग्टसुबेमो लोथा यांना- प्रचंड अभिमान वाटत होता. म्होनबेनीला पुरस्कारामध्ये मेडल, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम मिळाली. इतकंच नव्हे, तर तिच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्चही शासनाने उचलला. (म्होनबेनीला मोठेपणी इंजिनिअर व्हायचं आहे.) विशेष म्हणजे, 2014 च्या या पुरस्कारांसाठी 24 मुलांची निवड झालेली होती. त्यापैकी हा पुरस्कार घेणारी म्होनबेनी ही सर्वांत लहान वयाची म्हणजे अवघ्या आठ वर्षांची चिमुरडी ठरली.

म्होनबेनीची ही कथा इथंच संपत नाही. या साहसावर 2018 मध्ये सिनेमादेखील आला आहे. मुंबई येथील पटकथालेखक व दिग्दर्शक आकाशदित्य लामा यांनी तिच्यावर सिनेमा केला आहे. आजी आणि म्होनबेनीचं नातं, प्रेम आणि साहस उलगडवणाऱ्या या सिनेमाचं नाव ‘नानी तेरी मोरनी’ असं आहे. आकाशदित्य लामा यांनी हा संपूर्ण सिनेमा नागालँडच्या निसर्गात आणि तिथल्या स्थानिक कलाकारांसह बनवला आहे. म्होनबेनीची भूमिका झिनोन निलो काथ या सहा वर्षांच्या मुलीनं केली आहे, तर आजीची भूमिका अवला या नागा अभिनेत्रीनं केली आहे. ‘चिल्ड्रेन फिल्म सोसायटी’ने चित्रपटाच्या निर्मितीचा खर्च उचलला.

‘नानी तेरी मोरनी’ या 45 मिनिटांच्या सिनेमात म्होनबेनीचं साहस हे मुख्य आकर्षण तर आहेच, पण या सिनेमानं आणखी एक इतिहास रचला. मुख्य प्रवाह- ज्याला आपण बॉलिवूड म्हणतो- तिथं पोहोचणारा हा पहिला नागामी भाषेतला सिनेमा ठरला. नागालँडच्या बाहेर प्रदर्शित होणारा हा पहिलाच सिनेमा आहे. गोव्याच्या इफ्फीमध्ये या सिनेमाचं पहिलं स्क्रीनिंग झालं. त्यानंतर नागालँडमधल्या शाळांमधूनही हा सिनेमा दाखवण्यात आला.

आजी आणि नातीचं नातं हे कायमच खूप घट्ट असतं. चित्रपटाच्या दिग्दर्शकानंही तोच धागा पकडून सिनेमा काढला आहे. आकाशदित्य लामा जेव्हा म्होेनबेनी आणि तिच्या आजीला भेटले, तेव्हा आजीनं सांगितलं की, म्होनबेनीला गोष्टी फार आवडतात. लामा यांना हा मुद्दा खूप महत्त्वाचा वाटला. त्यांच्या लक्षात आलं, म्होनबेनीच्या आजीनं तिला नागा भाषेतल्या लोककथा, परिकथा सांगितल्या होत्या. त्यातूनच तिच्या मनातली भीती कमी होत गेली, धाडसी वृत्ती बाणली आणि प्रसंगावधान कसं राखायचं याचं भानही तिला आलं असणार. आजी आणि म्होनबेनीच्या नात्यात गोष्ट-कथा असल्यामुळे त्या दोघींचं एक मस्त विश्व आकाराला आलं असणार, ज्यात त्या दोघी रमतात. त्यातूनच म्होनबेनीनंदेखील आजीला वाचवलं. हे लक्षात आल्यावर चित्रपटातून तिचं आणि तिच्या आजीचे हे विश्व मांडायची लामा यांना इच्छा झाली. कुटुंबातील नातेसंबंध आणि त्यातही आजी-आजोबा व नातवंडं यांच्यातील आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, संस्कार, सहजीवन इत्यादी चित्रपटाची कथा नागा लोककथा आणि आजीवर बेतलेला प्रसंग यावर आधारित आहे.

नागालँडच्या प्रेरक मुलीची कथा सांगणाऱ्या नागा भाषेतल्या आणि नागा कलाकारांसह बनवलेल्या या चित्रपटानं म्होनबेनीचं नाव जगभर नेलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here