– संजय आवटे
————————–
जातींच्या टोळ्या झाल्या आहेत आणि वरचेवर त्या जास्तीच आक्रमक होत चालल्या आहेत. आधुनिकीकरणानंतर, लोकशाही -भांडवली व्यवस्थेत जात संपेल, असं वाटलं होतं. पण, नव्या साधनसामग्रींनी जात अधिकच पुष्ट होत गेली. सोशल मीडियासारखं हत्यार मिळाल्यामुळं तर जात आणखी शक्तिशाली होत चालली आहे.
जातीचं वास्तव नाकारण्यात काही हशील नाही. जातीअंताच्या दिशेनं जायचं असलं तरी जातीअंत हे स्वप्नरंजन ठरावं, असं आजचं चित्र आहे. ज्या ‘ब्राह्मणी’ व्यवस्थेनं जात जन्माला घातली, त्यांना अचानकपणे ‘कशाला पाहिजे जात?’, ‘कुठे आहे जात?’ असे साक्षात्कार होऊ लागले आहेत.
पोरांच्या मुंजी वगैरे करतानाच, ‘जात संपली, मग आरक्षण कशाला’, असे गुणवत्तेचे आकस्मिक प्रश्न ब्राह्मणांना पडू लागले आहेत. जातीचा मजबूत फायदा आजवर घेतलेल्या आणि जातपितृव्यवस्थेचा किल्ला प्राणपणाने सांभाळलेल्या मराठ्यांना अचानकपणे शाहू- फुले – आंबेडकर आठवू लागलेत खरे, पण आंतरजातीय लग्नाला ते तयार नाहीत. बौद्धांना बाबासाहेब नावाचे चलनी नाणे मिळाले आहे. त्यांना ते सोडायचे नाही. बाकी जातींच्या आकांक्षांनाही धुमारे फुटले आहेत. ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर अशी सरळ विभागणी करण्याचा प्रयत्न होत असला, तरी ते खरे नाही. जातींची उतरंड अशी आहे की भेदाभेद सगळे प्रबळ असल्याने कैक छावण्या तयार झाल्या आहेत.
बलात्कारांनंतरच्या प्रतिक्रियांमध्ये बाईपेक्षाही जात कशी महत्त्वाची ठरते, हे भयंकर आपण पाहिले आहे!
तुम्ही पोलीस वा प्रशासनात वा विद्यापीठांत जा. जातींच्या टोळ्या हिंसक कशा होतात, हे मग समजेल. साहित्याच्या क्षेत्रात आधी ब्राह्मण आणि मग दलितांनीही ती स्पेस घेतल्यानंतर आता मराठा लेखकराव कसे एकवटलेत, हे तुम्हाला दिसेल. राजकारणावरची पकड टिकवून ठेवण्यात मराठ्यांना अद्यापही यश येत असले, तरी त्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न वेगवेगळे जातसमूह करताहेत. सिनेमा- मालिकांसारखे क्षेत्रही दलित लेखकांच्या सत्तरच्या दशकातील दलित साहित्याच्या लाटेसारखे नव्या जाणिवांच्या लोकांनी हातात घेतले आहे. पण, ती स्पेस आपल्याच ताब्यात राहावी, यासाठी प्रस्थापितांचा संघर्ष सुरू आहे. तुलनेने नवजात असणारे माहिती तंत्रज्ञानासारखे क्षेत्र ब्राह्मणांकडे आहे. आकडेवारी हेच सांगेल की, जगण्याच्या बहुतेक क्षेत्रांवर आजही ब्राह्मणांचा ताबा आहे.
यात सगळ्यात गंमत अशी आहे की, ‘जात’ सोडल्यानेच यापैकी प्रत्येकाला प्रगतीच्या आजच्या संधी मिळाल्या आहेत. ब्राह्मण मांसाहार करू लागले, दारू पिऊ लागले, समुद्र तर सर्वाधिक मोठ्या संख्येने ओलांडू लागले. चपलांपासून माहितीपर्यंत बरेच काही विकू लागले. ‘हाऊस किपिंग’चा धंदा करत संडास साफ करू लागले. पण, तरीही आपले ब्राह्मण असणे त्यांना सोडायचे नाही. ब्राह्मण ही ओळख नाकारायची नाही. सजातीय माणसांशी आपले नाते आहे, असे वाटणे त्यांचे बंद झालेले नाही.
जात, धर्म, नाकारणारी, समतेची वाट प्रशस्त करणारी लोकशाही आली. संविधान आले. भांडवलशाही आली. जागतिकीकरण आले. या सगळ्याचे लाभार्थी दलित जातींना व्हायचे आहे. सावकाशपणे ते होतही आहेत. पण, तरीही ब्राह्मणद्वेष मात्र त्यांना असा वाढवत न्यायचा आहे, की जसे दरम्यान काही घडलेच नाही. ओबीसींना सोईने कधी दलित जातींसोबत, तर कधी मराठ्यांसोबत, तर कधी ब्राह्मणांसोबत राहून आपली नवी टोळी सिद्ध करायची आहे.
मराठ्यांची पंचाईत अशी की, चौसोपी वाडे ओसाड झाले तरी त्यांना ती जातसत्ता सोडायची नाही. मुख्य म्हणजे, ब्राह्मणांनी (पेशव्यांप्रमाणेच) आपली राजेशाही हिरावून घेतल्याचा संताप त्यांना आहे. आणि, त्याचवेळी कालच्या गावकुसाबाहेरच्या लोकांनी आता गाव ताब्यात घेण्याची भाषा सुरू केली आहे, याचा त्यांना त्रास आहे. मग सोईने कधी आपण उच्च जातीचे, तर सोईने ब्राह्मणेतरांच्या लढाईत, असे त्यांचे दुभंगलेपण आहे.
या सगळ्याच टोळ्यांना त्यांचे हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी पारंपरिक टोळीत राहायचे आहे आणि त्याचवेळी आधुनिकीकरणाचे लाभ घेत टोळी परंपरेला झुगारायचेही आहे. या दांभिक, संधिसाधू, असुरक्षित लोकांनी माणसांना जातीच्या छळछावण्यांमध्ये डांबून टाकले आहे. आणि, आपापले हितसंबंध सांभाळण्याची हीच आश्वासक व्यवस्था आहे, असा त्यांचा समज आहे!
या जाती सगळे भेद सोडून ‘हिंदू’ म्हणून मात्र एकवटू शकतात, हे समजणा-या चलाखांनी राजकारणाचा ‘डिस्कोर्स’ कसा बदलला, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
यातला वाईट विनोद हा आहे की, या सगळ्या टोळ्या पुरूषी असूनही, स्त्रिया त्याच्या वाहक झाल्या आहेत. यापैकी कोणत्याही टोळीला स्त्रीचे काही देणेघेणे नाही. ती फक्त वाहक आहे. जमीन आहे!
‘कोरोना’ आमच्याकडे नाहीच, असे म्हणून चालत नाही. उपचारासाठी आजार आधी मान्य करावा लागतो. समजून घ्यावा लागतो. मग उपायांची दिशा लक्षात येते. टोळीयुद्धातून औषधाची कोणतीही गोळी मिळणार नाही, एवढे भान आता आले तरी पुरे.
(लेखक ‘दिव्य मराठी’चे महाराष्ट्राचे संपादक आहेत)