बाई असणं हा एक प्रिविलेज आहे!

-सानिया भालेराव

“Her soul is a kaliedoscope
Bursting with every shade and hue
But shift your gaze ever so slightly
And she’s something entirely new.”
― Erin Hanson

“बाई” ही पुरुषापेक्षा वेगळी असतेच. बाई असणं खरंतर हा एक प्रिविलेज आहे. यावरच्या चार ओळी.. जेंव्हा तिला उमगतील.. तेंव्हा उमजेल तिला हा प्रिविलेज.. कस ते सांगू? ती सुंदर आहे, ती नवीन जीव जन्माला घालू शकते, तिच्या रूपाने पुरुष मंत्रमुग्ध होतात, तिच्या मध्ये आईचं काळीज असतं, माया असते, ती देवीचं रूप आहे, दैत्यांचा नायनाट करू शकते असली तद्दन क्लिशेड आणि मिळमिळीत उत्तरं नाहीयेत याची. मग आहे काय.. तर तिचं नशीब बलवत्तर असेल तर लहानपणापासूनच हळूहळू तिला समजत जातं की आपण वेगळे आहोत मुलगा किंवा पुरुष नामक प्रजातीपासून. बारक्या बारक्या अनुभवातून ती शिकत जाते. फिदीफिदी हसायचं नाही पासून चारचौघात पाय फेंगाडून बसायचं नाही पर्यंत. मग तिच्या अंगवळणी पडत जातं हळूहळू. तिच्याही नकळत. पण जी दुर्दैवी असते तिला पार घोडी होईस्तोवर अक्कल येत नाही. आई बापाने मुक्तपणाच्या मॅड वातावरणात वाढवून तिच्यावर मोठ्ठा अन्याय केला आहे हे तिला एव्हाना माहित नसतं. शरीर भरलं तरी बावळटसारखं फुलपाखरांप्रमाणे मुक्तपणे उडतंच राहते ती. मग येतो कुणीतरी तिच्या सुंदर पंखांकडे आकर्षित होऊन. कधी कधी तिला आवडतं, कधी नाही आवडत. पण तिला माहित नसतं की तिला काय वाटतंय याने काहीही फरक पडणार नाहीये आता. ज्याला ओरबाडायचं असतं ते ओरबाडून तो होतो मोकळा. कधी पंखांचे रंग धूसर होतात, कधी पंख फाटतात, कधी गुदमरून जीव जातो तिचा. काही वेळेला असंही होतं कीं तिच्या रूपावर भाळून, तिला अलगद उचलून एका काचेच्या पेटीत ठेवल्या जातं. तिचं रक्षण व्हावं म्हणून. आता ती म्हणायला असते सुखरूप पण फुलपाखराचा जन्म काही बंदिस्त होण्यासाठी झाला असतो का? आयता कितीही फुलांचा रस मिळाला तरी मुक्तपणे उडूनतो रस गोळा करण्यात जी मजा आहे ती काचेच्या पेटीत अडकून राहण्यात असेल का? ओरबाडणं काय किंवा असं बंदिस्त करून ठेवणं काय.. ज्या फुलपाखराने मुक्त आकाश अनुभवलं आहे त्याला वास्तवाचा हा धक्का बसतो आणि खूपदा ते मग हताश होऊन जातं. लहान पणापासून टेम झालेल्या स्त्रिया मग तिला समज देतात आणि खूपदा ती सुद्धा निमूटपणे हा स्त्री असणं पचवायला शिकते.

पण हे असं असलं तरी मग प्रिविलेज आहे ते काय? तर ते हे.. की अगदी कोणत्याही क्षणी ती आतून कितीही विखुरलेली असली तरी कॅलिडोस्कोपमधल्या काचेच्या तुकड्यांप्रमाणे स्वतःला समेटून छानसा आकार देऊ शकते. रंग आणि रूप अंतर्बाह्य बदलू शकते. तिच्या जखमा, तिचे व्रण एखाद्या सुरेख दागिन्याप्रमाणे परिधान करू शकते. महिला दिन वगैरेची गरज तिला नाहीये आणि नाही फुटकळ शुभेच्छांची गरज आहे. गरज आहे ती फक्त तिला माणूस म्हणून बघण्याची. तुमच्यासारखीच एक असं समजण्याची. स्त्रीत्वाच्या या प्रवासात तिला जितके नितळ मनाचे पुरुष भेटतील तितकं तिच्यातलं फुलपाखरू भिरभिरत राहील.. वय आणि इतर चौकटी मोडत.. ती जेंव्हा मुक्त विचार करेल तेंव्हा तिला रोखणाऱ्या तिच्याच जमातीतल्या स्त्रिया नसतील, तेंव्हा सुद्धा ती मुक्त संचार करू शकेल. तुम्ही पुरुष, स्त्री असाल किंवा क्वीअर असाल.. तुमच्या वागण्याने त्या फुलपाखराच्या पंखावर ओरखडा तर पडत नाहीये ना याची खबरदारी घ्या. फुटलेल्या काचा गोळा करताना, तिच्या बोटातून रक्त आलं तर मलम लावा, वेळ पडल्यास स्वतःला इजा झाली थोडी तरी चालेल.. म्हणजे यातना काय असतात.. कदाचित थोडं तरी उमगू शकेल.. गोळा केलेल्या काचा कशा मांडायच्या हे तिला तिचं ठरवू द्या.. थोडा वेळ आणि खुप सारं प्रेम द्या.. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर असली ती.. तरी तिला साथ द्या.. चूक तुझीच आहे असं तिला जे ऐकवलं जातं.. त्यातून बाहेर येण्यासाठी वेळ द्या..

एकदा का तिने स्वतःचा पसारा आवरला की मग कसंही फिरवा, ती तिच्या फुटलेल्या काचांसकट नवनवीन आकार निर्माण करेल कारण तिच्यामध्ये जन्मतःच दोन एक्स क्रोमोझोमची ताकद आहे. मग तिची ती बदलणारी रूपं डोळेभरून पहात राहा. आता तिला ना फुटण्याची भीती आणि ना विखुरल्या जाण्याची. जग तिच्याकडे कसंही पाहो.. कोणत्याही नजरेने पाहो.. कोणत्याही अँगलने पाहो.. ती तिच्या तुकड्यांसकट फक्त सुंदर आणि सशक्त दिसत राहणार..

महत्वाची टीप: महिलादिनाच्या शुभेच्छा कृपया देऊ नका. समानता हवी असेल तर सगळ्यात आधी हे बेगडी वरवरचं बाईपण मिरवणं बंद केलं पाहिजे. त्यापेक्षा आपण आहोत त्या ठिकाणी हा बदल आणण्यासाठी काय करू शकतो/शकते असा विचार केल्यास आणि आपल्यापरीने विचारात आणि आचारात छोटे छोटे बदल केल्यास नक्कीच एक दिवस असा येईल की असा एखाद्या जेंडरचा दिवस सेलिब्रेट करण्याची गरजच उरणार नाही.

…………………………………………………………….

©(लेखिका संशोधिका असून पाणी प्रदूषण या विषयात त्या काम करतात . त्यांची स्वतःची या विषयात काम करणारी ‘इकोसोल’ नावाची कंपनी आहे . वेगवेगळ्या भाषेतील पुस्तकं वाचणे, चित्रपट बघणे व त्यावर लिहिणे ही त्यांची आवड आहे )
[email protected]

Previous articleयात कुठे आला जातीयवाद ?
Next articleजातींचे गॅंगवॉर
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.