जुलूमशाहीची चाहूल येतेय- ज़रा आहिस्ता आहिस्ता…

-मुग्धा कर्णिक

आत्ताच बातमी आली- रॉबर्ट मुगाबे हा झिंबाब्वेचा हुकूमशहा मेला. त्याच्या स्वतःच्या दिमतीला असलेले फिफ्थ ब्रिगेड नावाचे खाजगी सैन्य उत्तर कोरियात प्रशिक्षित झाले होते. आणि त्यांनी आजवर दहा हजार खून केले. त्याच्या काळातल्या सर्व निवडणुका हिंसा, बदमाषी, आणि लबाडी यांच्याच आधारावर त्याने जिंकल्या. त्याने देशाची राज्यघटना स्वतःला अमर्याद अधिकार मिळावेत म्हणून वाटेल तशी बदलली. गेला एकदाचा.
असे अनेक हुकूमशहा जगात आजही बारक्याबारक्या देशांत आहेत. सुखेनैव जुलुमी सत्ता राबवत आहेत.
आणि काही मोठ्या देशांतही त्यांच्याशी स्पर्धा करणाऱ्या प्रवृत्ती असणारे नेते आहेत, इथे, तिथे, सारीकडे.
बारीकसारीक पण महत्त्वाच्या देशांतील हुकूमशहांची ही थोडक्यात माहिती. लक्षात घ्या.
सुदानचा ओमर अल बशीर हा राष्ट्राध्यक्ष. त्याने हाती घेतलेली वांशिक शुद्धीकरण मोहीम नागरी युद्धात परिवर्तित झाली आणि त्यात आजवर एकंदर ३ लाख माणसे मेली आहेत. त्याने घेतलेल्या निवडणुका वादग्रस्त असल्या तरीही तो त्यातून सुळ्ळकन् भक्कम मतांनी निवडून आला. मानवी हक्क वगैरे भाषा बोलणाऱ्या संघटनांना त्याने देशातून हाकलून लावले आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाने त्याच्यावर नऊ अब्ज डॉलर्सची संपत्ती देशाला चुना लावून गोळा केल्याचा आरोप ठेवला आहे.
आपले गुबगुबीत बाळ किम जॉन्ग म्हणजे उत्तर कोरियाचे अध्यक्षमोहोदय. त्यांनी त्यांच्या देशातील माध्यमांवर संपूर्ण कब्जा केला आहे. तिथल्या विरोधकांना सार्वजनिक मृत्यूदंड दिला जातो. प्रचंड मोठाल्या तुरुंगांसारख्या छावण्या तिथे राजकीय स्थैर्य राखायला मदत करतात. लोकांना मुलं व्हावीत की नाही याचेही हुकूम त्याच्या कार्यालयातून सुटतात आणि नको असलेल्यांना बळजबरी गर्भपात करावे लागतात.
सिरीयाचा बशर अलअसाद हा एक उमदा हुकूमशहा. एकदम जिगरबाज. सिरियात अरब क्रांती(स्प्रिंग)नंतर जी काही यादवी सुरू झाली त्यावर मात करण्यासाठी त्याने जे काही मदतकार्य(!) केले त्यात आजवर चार लाख लोक मृत्यूमुखी पडले. हजारो विरोधकांना गजाआड केले गेले. त्यांचा छळ, त्यांना ठार करणे याचे वार्तांकन होणे अशक्य होते. त्यातून सुटून बाहेर आलेल्यांनी सांगितले ते अगदी साधेच- कैद्यांना विजेचे धक्के देणे, बलात्कार करणे, नखे उपटून काढणे… वगैरे. यातले काही कैदी कोवळी मुले होती चुकून(!).
तुर्कस्तानचा पंतप्रधान एर्डोगान याच्या हाती अमर्याद सत्ता एकवटली आहे. त्याच्यावर आपल्या मर्जीतल्या लोकांच्या मदतीने अब्जावधी डॉलर्सचा भ्रष्टाचार केल्याचे आरोप होऊ लागताच त्याने सोशल मिडियावर बंदी आणली. त्याचे शासन लोकशाही पद्धतीने चालल्याचा मुलामा असला तरीही मुळात ते जुलमी एकाधिकारशाही पद्धतीनेच चालते.
एरिट्रियाच्या कम्युनिस्ट एकपक्षीय राजवटीचा एकाधिकारशहा आफ्वेर्स्की १९९३पासून सत्तेवर आहे. मानवी अधिकाराचा पत्ताच नाही. कामगार गुलाम आहेत. शासकीय अधिकारी मनमानी छळ, बलात्कार यांचा वापर करून जनतेला टाचेखाली ठेवतात. गुन्हेगार ठरवले की ठार करण्यासाठी कुठल्याही न्यायप्रक्रियेची गरज नसते. दर वर्षी देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या हजारो लोकांना सीमेवरचे दल ठार करते.
गिनीचा हुकूमशहा तिओडोरो बासोगोने १९८७ला आपल्या काकाचा खून करून सत्ता ताब्यात घेतली. त्यानंतर त्याच्या देखरेखीत विरोधकांचा छळ, खून यांच्या सोबतीने त्याने स्वतःचे महात्म्य वाढवून घेतले. गेम ऑफ थ्रोन्समधला रॅमसे बोल्टनच हा. विरोधकांची जिवंतपणी कातडी सोलणे त्याला आवडते. आणि मग त्यांचे यकृत, मेंदू आणि आंडे तो खातो. तो सतत सर्वशक्तीमान देवाच्या संपर्कात असतो असे शासकीय रेडिओवरून सांगितले जाते. त्याच्या खात्यात सहा हजार लक्ष डॉलर्स इतकी रोकडा संपत्ती आहे.
अझरबैजानचा राजा इल्हाम अलियेव याचे घराणे गेली काही दशके सत्तेवर आहे. भ्रष्टाचार आणि जुलूम याच्या मदतीने या घराण्याने आपली तिजोरी भरली आहे. सध्या तो अध्यक्ष आणि त्याची बायको उपाध्यक्ष आहे. विरोधी राजकारणी, कार्यकर्ते, पत्रकार यांचा पोलिसांकरवी पद्धतशीर छळ केला जातो. मानसिक आणि शारीरिक.
बेलारूसचा लुकाशेन्को १९९४पासून खुर्चीत आहे. घटनेत दुरुस्ती करून त्याने स्वतःला तहहयात अध्यक्ष घोषित केले आहे. रशियन धोरणांची भलावण करतानाच तो हिटलरची स्तुती करत असतो. शिस्तीवर जबरदस्त पकड ठेवल्याबद्दल हिटलरचे कौतुक आहे त्याला. त्याचे पोलीस राजकीय विरोधकांना थेट बदडून काढतात. समलिंगी असण्यापेक्षा हुकूमशहा असणे फार चांगले असा त्याचा थोर संदेश आहे.
आता राहिला फिलिपाईन्सचा रॉड्रिगो डुटेर्टो… हा जरा आगळावेगळा शासक आहे. तो हुकूमशहा नाही तसा… पण तो स्वतःला मी दुष्कर्मांविरुद्ध हुकूमशहा आहे असे म्हणवतो. निवडून येण्यापूर्वीच त्याने सांगितले होते की माझी कारकीर्द रक्तबंबाळ असेल… मादक द्रव्यांविरुद्ध मी नरसंहार होलोकॉस्ट करणार असेही तो म्हणाला होता. आता त्याने पोलीस आणि मादकद्रव्यविरोधी स्वयंसेवक दल यांना आपले उदाहरण समोर ठेवायला सांगितले आहे. यातून सात हजार गुन्हेगार, आणि रस्त्यावर जगणारी अनाथ मुले ठार मारली गेली आहेच.
हुकूमशहा, एकाधिकारशहा यांच्या कारकीर्दींत एकहाती सत्ता दीर्घकाळ टिकून रहाते. त्यातून स्थैर्य येते- कशात? तर राजकीय विरोधकांचा निष्ठूर पाडाव, मूठभरांहाती संपत्ती एकवटणे या गोष्टींमध्ये. दुष्टतेचा निःपात करण्यासाठी एकचालकानुवर्तित्व आवश्यक आहे का याचा विचार आपण सर्वांनीच करायला हवा.
सध्या जगात नांदणारे हे काही जुलमी सत्ताधारी.
जरी आपल्या देशाचे नाव जुलूमशाही देशात आलेले नसले तरीही या काहींची कर्तृत्वे इथल्यांशी संगती लावून पाहायला हरकत नाही.
जुलूमशाहीची चाहूल येतेय- ज़रा आहिस्ता आहिस्ता…

-(मुग्धा कर्णिक या अभ्यासक व लेखिका आहेत)

Previous articleमेनस्ट्रीम और TV मीडिया का ज़्यादतर हिस्सा गटर हो गया है : रवीश कुमार
Next articleगणेशोत्सव : कांही ( अधार्मिक ) नोंदी 
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.