मानवी मनाच्या एकाकीपणाचे विश्लेषण कुठपर्यंत करता येऊ शकेल, याची कल्पना यावरून करता यावी. माणसे तुटली, दूर गेली वा या जगातून गेली की; मागे राहिलेल्यांना हे एकाकीपण येते, हे खरे आहे. परंतु, ती सोबत असतानाही ते कधी कधी आतून जाणवत असते, तेव्हा त्याची कारणे मग अन्यत्रच शोधावी लागतात. ती तत्त्वज्ञानापासून विज्ञानापर्यंत आणि मानसिकतेपासून ज्ञानक्षेत्रापर्यंत पाहताही येतात. अडचण हीच की, एवढी ओढाताण आपण सहसा करीत नाही. तत्त्वज्ञांची व संशोधकांची गोष्ट वेगळी आणि सामान्य विचार करणाऱ्या साध्या माणसांची गोष्ट व क्षमताही वेगळी… खरे तर आइन्स्टाईन आणि बुद्धानंतर काही नावे या लिखाणात येऊ नयेत. पण विषयाचा आवाका पाहता, तीही येथे आणणे आवश्यक आहे.
……………………………………………………
आपण धर्मांनी तुटलो आहोत. जाती-पोटजातींनी, पंथोपपंथांनी वेगळे आहोत. भाषा वेगळ्या, संस्कृती निराळ्या, जीवनपद्धतीत सारखेपण नाही. मात्र परंपरांनी व इतिहासाने आपल्याला एकत्र राखले. कधी जुन्या राजांनी, कधी मोगलांनी, कधी इंग्रजांनी, तर कधी स्वातंत्र्यलढ्याने. धर्म होता, त्याचे उच्चारण होते; पण त्यावरचा अधिकार मूठभरांचा होता. त्यांचा हक्क मात्र साऱ्यांवर होता. राजे त्यावर रागवायचे आणि समाज राजांच्या अधीन असायचा. आज यातले फारसे काही पूर्वीसारखे राहिले नाही. धर्मांचा धाक गेला, राजे राहिले नाहीत. जाती-पोटजातींनी माणसे बांधून ठेवणे थांबविले आहे आणि भाषा व प्रदेशांच्या मर्यादा नव्या पिढ्यांनी कधीच पार केल्या आहेत. कुटुंब राहिले आहे आणि ते टिकेल, पण त्यातली बांधिलकी पातळ व त्याचे असणेही आता वयोमानापरत्वे बदलले आणि निसरडे झाले आहे. माणसेही पूर्वीसारखी एकमेकांना धरून नाहीत. जीवाभावाचे मैत्र, पती-पत्नीचे प्रेम, नात्यासाठीचा त्याग हे सारे कथानकाचे विषय झाले आहेत. अशा जगात जगावे लागत असताना एकाकीपण येईल. जुन्या आठवणी राहतील, त्यांचा दिलासा असेल; पण या आठवणींचा काळ कितीसा? पुन्हा वर्तमानात यावेच लागते आणि वर्तमान… ते तर असे सारे मागे टाकून एकटेच पुढे जाणारे व नेणारे. नाती असतात, आत्मीयता नसते. सोबत असते, जिव्हाळा नसतो. माणसे असतात, पण मित्र नसतात. मग आपले आपल्याशीच मैत्र आणि नाते. त्यावरच समाधान. जाती-धर्माचे खरे-खोटे असणे समजते. असण्यातली अनास्थाही कळते. मग उरते काय? मी आणि मी फक्त!
घरातली मुले लवकरच पंख फुटून उडायला लागतात. मग लांबवर कुठे तरी जातात. तिथून अधून-मधून आठवणींची पत्रे पाठवितात. घरात मग दोघेच. काय आणि किती बोलणार? तेच ते. त्याच त्या आठवणी काही काळ बऱ्या वाटतात. मग त्यातला आनंद निघून जातो. हळूहळू ते बोलणेही थांबते. मग काय? नुसतेच राहणे, जगणे आणि दिवस घालविणे… परवा अमेरिकेत राहणारी एक मुलगी आली. कुठलाशा औषधांच्या मोठ्या कंपनीत अधिकारी असलेली. ती तिथल्या गमती सांगत होती. नाकाला ऑक्सिजनचे टोप लावलेले म्हातारे त्यांच्या सरकत्या खुर्च्यांतून येतात. त्यांच्यासोबत तशाच वयाच्या स्त्रिया असतात. मग ते ओळख करून देतात- ‘मीट माय न्यू गर्लफ्रेण्ड.’ मग सगळे भोवती जमतात. थोड्या-फार गमती-जमती होतात अन् मग सारे पांगतात. पण हे ते तिकडे, इकडे हा विचारदेखील पापात सामील होणारा. ठेवेल तसे राहा, जमेल तसे जगा- यात कसले आले जिणे? आणि जगण्यातला आनंद? आला दिवस-गेला दिवस मोजायचा, एवढेच. अगदी म्हातारपण येण्याआधी पोक्त वयातही हे एकाकीपण येते. मग पुढे तर काय- फक्त देहाचे जगणे आणि त्याचेच व्याप.
यावर काही तोडगा, उपाय नसतो काय? की, नाहीच? माणसे, बायका भजनी मंडळे काढतात. खेड्या-पाड्यांत तर त्यातलेही फारसे काही नसते. अंधार होईपर्यंत मारुतीच्या पारावर बसायचे, तोंडाला येईल ते बोलत राहायचे आणि मग मुकाटपणे घरी जायचे. घरही काय- तेही मुकेच. वाचायचे म्हटले तर डोळ्यांची साथ नाही आणि ऐकायचे म्हटले तर त्यानेही कान किटलेले. झोप, पण तीही नीट येत नाही. कूस बदलत रात्र काढायची आणि केव्हा उजाडते याची वाट पाहायची. अलीकडे ते वृद्धाश्रम वगैरे झाले आहेत… पण त्यातही पुन्हा तेच- जे एकट्याने अनुभवायचे, ते तेच साऱ्यांसोबत जगायचे. मन म्हणून कुठे रमते आहे अशा वेळी? मग मनात येते एकाकीपण. हा शापच. पण त्यातून बाहेर पडावेसे मनात का येत नाही? संपवावे हे सारे, असे का वाटत नाही? कशाची ओढ असते? हे असे जगण्याची? की जगणे हेच जिणे आणि तेच तेवढे त्याचे प्रयोजन? विदेशातली माणसे गटागटांनी प्रवासाला निघतात. देशचे देश हिंडतात. त्यात अध्ययन हे प्रयोजन नसते. नुसतेच पाहणे, वेळ काढणेे, मुबलक असलेला पैसा वेळेवर खर्च करणे. पण त्यातले साध्य काय? तर ते फिरणे, पाहणे आणि वेळ घालविणे. आपल्या मध्यमवर्गीयांतही आता ही लाट आली आहे. त्यांना हवे ते दाखविणाऱ्या प्रवासी कंपन्या आहेत. यांचे पाहणे होते आणि एक चांगला व्यवसायही त्यातून निर्माण होतो. या प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे प्रयोजन सांगता येत नाही. एकदा एक वयस्क प्रवासी म्हणाले, ‘‘या कंपनीसोबतची माझी ही अठ्ठाविसावी सहल आहे.’’ ज्या देशांना त्यांनी भेटी दिल्या, त्यांची नावेही मग त्यांना आठवत नव्हती.
प्रस्तुत लेखकाने १९८० च्या दशकातले काही महिने आसाम व अतिपूर्वेकडील भागात सुरू असलेल्या आंदोलनांची माहिती घ्यायला काढले. अरुणाचल (तेव्हाचा नेफा), मणिपूर, मिझोराम, मेघालय आणि त्रिपुरासह सारा आसामच त्यासाठी पालथा घातला. त्या वेळच्या आंदोलनाची तीव्रता लक्षात येत असतानाच दुसरी महत्त्वाची बाब समजत गेली. त्यातल्या प्रत्येक राज्याचेच नव्हे तर प्रदेशाचे, जिल्ह्याचे व त्यातल्या जमातींचे प्रश्न वेगळे होते आणि ते त्यांना त्यांच्या पद्धतीने सोडवून हवे होते. त्यांचे प्रश्नच नव्हे तर जीवनपद्धती, धारणा, खान-पानाचे व्यवहार आणि विवाहांचे विधीही वेगळे होते. त्यांच्यातील काहींमध्ये कायमस्वरूपाची वैरे व युद्धेही होती. दर दिवशी नवे प्रश्न दिसत होते. आसामचा प्रदेश भारताच्या इतर भागांना अवघ्या चाळीस किलोमीटर एवढ्या अरुंद भूभागाने जोडला आहे. तिकडचे लांबवरचे प्रश्न इकडच्यांंना ठाऊक नाहीत, हे त्या भेटीत जाणवले. त्या वेळी तिथले प्रश्न इकडच्यांना आपले वाटणार नाहीत, हेही मनात येत होते. देश एक आहे; पण भाषा, माणसे आणि जगणे? ते सारे वेगळे आहे. अगदी महाराष्ट्रातील किती जणांना गुजरात, कर्नाटक, तेलंगण वा केरळातले प्रश्न ठाऊक आहेत? आपल्याला आपला देश भूगोलाने कळतो की माणसांनी? काश्मीरवर प्रेम करणाऱ्यांनीही याचा विचार कधी तरी मनातून केला पाहिजे. आम्हाला तो प्रदेश हवा की त्यातली माणसे? हेच देशासंबंधीही. देश, धर्म, भाषा, संस्कृती, रीतीरिवाज हे सारे असे अपरिचित राहत असतील, तर माणसे जुळतील कशी? आणि त्यांचे एकाकीपण एकाच देशात राहूनही जाणार कसे? शिवाय माणूस आणि जमीन यांच्यातले नाते माणसामाणसांतील नात्यांहून वरचढ होत असेल, तर माणसांची नाती खरी नाहीच; मग खोटी ठरतात. माणसांना सहजपणे येणारे एकाकीपण या साऱ्यांच्या एकटेपणाशी जुळले असते काय?
देश व धर्मासारखाच आपला समाजही आता विटका, पातळ व विरळ होऊ लागला आहे. त्यातली एके काळची घट्ट नाती कधीचीच सैल झाली आहेत. जुन्या पिढ्यांविषयीचा आदर ओसरला आहे. पुढारी राजकारणातच तेवढे शिल्लक राहिले आहेत. जातींची व्यवस्था आता आरक्षणासारख्या व्यवस्थांनी मजबूत होताना दिसली, तरी जातीय ऐक्य व जात्याभिमान हेच आता टीकेचे व टवाळीचे विषय बनले आहेत. यात मग कुठली नाती असणार? कोणते संबंध टिकणार? आणि सामाजिक एकता वगैरे तरी राहणार कशी?
समाजासारखीच अवस्था कुटुंबांचीही आहे. शिक्षित व शहरी कुटुंबे स्वतः मुलांना पाळणाघरात सोडतात. पुढे शाळेत जुंपतात, जमलेच तर त्यांची होस्टेलात परस्पर व्यवस्था करतात. मग मुलेच पाहुण्यासारखी घरी येतात. त्यांना घरची व घरच्यांना त्यांची फारशी माहितीही नसते. त्यांच्या संगती, सवंगडी चांगले की वाईट, हे कळायचे राहते. परिणामी, मुले स्वतंत्र वाढतात. त्यांच्यावर आई-वडिलांचे नियंत्रण नसते. पूर्वीची आस्थाही मग फारशी राहत नाही. अशी कुटुंबे, असे समाज व असे देश व्यक्तीचे एकाकीपण कायम करील की संपवू शकेल? आपण या घरात, गावात व देशातही एकटेच आहोत- अशीच जाणीव या स्थितीत अधिक वाढेल की नाही? एक गोष्ट मात्र चांगली. माणसे एकटी व एकाकी झाली की, त्यांचे लढाऊपण संपते. समाजातील हाणामाऱ्या व दंगे कमी होतात. मात्र या दंग्यांत व हाणामारीतच ज्यांचे हितसंबंध गुंतले असतात, ते त्याही स्थितीत माणसे जमवितात. कधी नवी प्रलोभने दाखवून, तर कधी देऊन. देशातल्या दंगलीत सहभागी झालेल्यांचे परस्परांशी काही नाते नसते. ते कशासाठी व कोणामुळे एकत्र आले आहेत, हेही त्यांच्यातील अनेकांना सांगता येत नाही. मग ते समूहांचे नव्हे, तर गर्दीचे भाग होतात. मग गर्दींची भांडणे, त्यांच्या हाणामाऱ्या आणि त्यांच्याच दंगली. राजकीय पक्ष या नावाची संस्था या साऱ्या गोष्टी घडविण्यात तरबेज असते. ती इतिहास राबवते, धर्म आणते, धोरणे सांगते आणि न समजणारी तत्त्वज्ञाने बोलते. हे समजून, तर कधी न समजताच हे सांगणारे आपले म्हणून गर्दी कामाला लागते. एकाकीपण हे गर्दीचे, समूहाचे व संघटनांचे विघटन करणारेच प्रकरण आहे. त्यामुळे त्या संस्थांना तर्क नको, तो संघटनांना नको आणि पक्षांना तर नकोच नको.
हे व्यक्तीबाबत वा समाजाबाबतच तेवढे खरे नाही. भौतिक जगातही या एकाकीपणाचे अस्तित्व आहे. अल्बर्ट आइन्स्टाईनने मांडलेल्या प्रकाशाच्या सिद्धांतात तो म्हणतो, ‘प्रकाश हा एक सलग वा एकजीव प्रवाह नसतो. तो अब्जावधी प्रकाशकणांचा पुंज असतो.’ त्या कणांना तो क्वांटा म्हणतो. हे कण आणि वेग मिळून प्रकाशाचा प्रवास होतो व जग दीप्तिमान होते. प्रकाशाचे कण एकत्र नसतील, तर ती त्यांचे एकाकीपण सांगणारीच अवस्था असते. हीच गोष्ट जलतत्त्वाबाबतही त्याने खरी असल्याचे सांगितले. पाण्याचे अतिसूक्ष्म कण (मॉलेक्युल्स) स्वतंत्रपणे फिरणारे, राहणारे व एकमेकांजवळ वावरणारे असतात. मात्र ते एकजीव नसतात. प्रकाश आणि पाणी एकजीव नसतील, तर त्यांचे तसे असणे समजून घेणे अवघड आहे. माणसांबाबतही ते खरे आहे. त्यांचे एकाकीपणही समाजाच्या व समूहांच्या संदर्भातच समजून घ्यावे लागते. गौतम बुद्धाचा कालविषयक विचारही असाच आहे. काळ ही अखंड बाब नसून ते स्वतंत्र क्षणाक्षणांनी जोडलेले पण सलग दिसणारे वास्तव आहे, असे तो म्हणतो. प्रकाशतत्त्व, जलतत्त्व व कालतत्त्व जर एकजीव नसेल; तर मानवी जीवनालाही तेच लागू होत असेल काय? हा प्रश्न पुन्हा मानवी पातळीवरून वेगळा न्यायचा नसला तरी प्रकाश, जल व काळ हेही मानवी जीवनाला लगडलेले आणि ते व्यापणारे सत्यच आहे की नाही?
मानवी मनाच्या एकाकीपणाचे विश्लेषण कुठपर्यंत करता येऊ शकेल याची कल्पना यावरून करता यावी. माणसे तुटली, दूर गेली वा या जगातून गेली की; मागे राहिलेल्यांना हे एकाकीपण येेते, हे खरे आहे. परंतु, ती सोबत असतानाही ते कधी कधी आतून जाणवत असते, तेव्हा त्याची कारणे अन्यत्रच मग शोधावी लागतात. ती तत्त्वज्ञानापासून विज्ञानापर्यंत आणि मानसिकतेपासून ज्ञानक्षेत्रापर्यंत पाहताही येतात. अडचण हीच की, एवढी ओढाताण आपण सहसा करीत नाही. तत्त्वज्ञांची व संशोधकांची गोष्ट वेगळी आणि सामान्य विचार करणाऱ्या साध्या माणसांची गोष्ट व क्षमताही वेगळी… खरे तर आइन्स्टाईन आणि बुद्धानंतर काही नावे या लिखाणात येऊ नयेत. पण विषयाचा आवाका पाहता, तीही येथे आणणे आवश्यक आहे.
आपल्या देशात ‘देव’माणसांची (गॉडमेन) जराही कमतरता नाही. त्यांचा शिष्यपरिवार जेवढा मोठा, तेवढीच त्यांची मिळकत व मालमत्ताही मोठी आहे. पंजाबातील एका पंथप्रमुखाची मालमत्ता तेराशे एकर जागेवर पसरली आहे. शिवाय त्याचा जमीन-जुमला देशाच्या बहुतेक सर्वच मोठ्या शहरांत आहे. दक्षिणेतील एक दिवंगत देवपुरुष काहीच करीत नव्हता. जादूटोण्यासारखे प्रयोगच तो बहुधा करायचा. त्याने हवेतून काढलेल्या हिरव्या खड्याच्या अंगठ्या मंत्र्यांच्या व पुढाऱ्यांच्या बोटांत दिसायच्या. ते झाले की, तो एका पलंगावर पहुडायचा आणि पांढऱ्या शुभ्र पोषाखातला त्याचा प्रचंड शिष्यसमुदाय वाद्यांसह त्याच्या आरत्या म्हणायचा. तो बाबाही हातवारे करून त्यांना आपली पसंती सांगायचा. ही माणसे अशी समाजात राहून समाजबाह्य का असतात? आसारामबापूची कथा इथे नकोच. त्याची जन्मठेप त्याला लखलाभ! दुसरे एक बाबा अध्यात्माच्या वाटेवरून व्यवसायाच्या महामार्गावर गेले. आता त्यांचा औषधी व्यापार अब्जावधींच्या घरात आहे आणि ते स्वतःही त्यांच्या जाहिरातीतून लोकांपुढे येण्यात धन्यता मानत आहेत.
एक आणखी बाबा अंगावर एकही वस्त्र न घेता महिनोन्महिने मोठमोठ्या शहरांत मधुर प्रवचने करायचा. लोकही ती शांतपणे ऐकत त्याच्या नागवेपणाला नमस्कार करायचे. पण सर्वसंगपरित्याग केलेल्या या बाबाला प्रसिद्धीचा मोह होता. एका शहरात त्याची प्रवचने सुरू असताना त्याने ती सगळी कुठल्याशा प्रकाशवाहिनीवर टाकायला त्याच्या आयोजकांना सांगितले. त्यासाठी त्या आयोजकांना दहा लक्ष रुपये खर्च करावे लागले. त्यातले एक आयोजक प्रस्तुत लेखकाला म्हणाले, ‘या माणसाला कपडे नकोत, पण जाहिरात पाहिजे.’ आणखी एका बाबाने त्याचे ऐश्वर्य देशाला व जगाला दाखवायला थेट यमुना नासवली. त्यासाठी त्याला झालेला पाच कोटींचा दंड माफ करून घ्यायला त्याने सरकारदरबारी फेऱ्या मारल्या. त्याच्याही इस्टेटी साऱ्या देशात आहेत आणि एकेका इस्टेटीचे व्यवस्थापन सांभाळायला त्याने लष्करातून निवृत्त झालेली मेजरच्या दर्जाची माणसे नेमली आहेत. यातल्या अनेक बाबांना तरुण सेविकाही आहेत व असतात… ही माणसे समूहात असतात. ईश्वराशेजारी असल्याचे सांगतात. स्वतःत दंग असतात, मात्र मनातून एकाकीच असतात. त्यांचे दिखाऊपण पाहिले की, त्यांचे एकाकी असणे सहज लक्षात येते. त्यातले काही जण ते कबूल करतात, तर काहींच्या दुष्कृत्यांतून ते उघड होते.
बाबाच कशाला- नामवंत असणारे लेखक, कलावंत, पत्रकार, संपादक, पुढारी व सामाजिक संघटनांमध्ये वावरणारी जरा नामांकित माणसेही अशीच असतात. एका मोठ्या राष्ट्रीय संघटनेच्या ब्रह्मचर्य पाळणाऱ्या प्रमुखांनी आपल्या अनेक वयस्क अनुयायांना एक दिवस खासगीत बोलवून उपदेश केला. ते म्हणाले, ‘‘मला जमले, त्या विनोबाला जमले; म्हणून तुम्हालाही ते जमेल, या भ्रमात राहू नका. तुमची अवस्था मी पाहिली आहे. यापेक्षा लग्ने करा आणि शांत व्हा.’’ मग त्या काळात त्या संघटनेतल्या अनेक वरिष्ठांनी एकाच वर्षात लग्ने केल्याची कथा महाराष्ट्राला ठाऊक आहे.
माणसांच्या एकाकीपणाला प्रतिभेची व परिश्रमाची जोड असली तर; ज्याचे एकाकीपण जात नसेल, पण जगालाच त्याच्यावाचून एकाकीपण जाणवत असेल, असे प्रतिभाशाली एकटे जगात किती आणि कुठे कुठे झाले? तो सॉक्रेटिस म्हणे, उन्हातान्हात दिवसचे दिवस उभा राहायचा आणि स्वतःशीच विचार करायचा. तोही स्वतःचा नाही, तर जगाच्या हिताचा. ते सुखी व समाधानी, नीतिमान व सरळमार्गी कसे बनेल याचा. एकदा तर तो युद्धाच्या भूमीवर प्रेतांच्या गराड्यात तसाच विचार करीत उभा राहिला. त्याला वेळेचे आणि स्थळाचेही भान नव्हते. पण या एकट्या माणसाने ग्रीसला अजरामर केले. त्याला शिष्य होते, अनुयायी होते; पण त्यांचे तांडे घेऊन तो फिरायचा नाही. एकट्यातच त्यांच्याशी चर्चा करायचा. दारिद्र्य कायमचे सोबत होते, घर भांडणारे होते; पण त्याची जिज्ञासा ओसरत नव्हती.
स्वातंत्र्यासाठी सारे आयुष्य तुरुंगात काढणारी माणसे कशी जगत असतील? गांधी तेरा वर्षे, नेहरू आणि सरदार अकरा वर्षे, मौलाना दहा वर्षे आणि नेल्सन मंडेला… तो तर सत्तावीस वर्षे. सावरकर होते, त्यांची साथ त्यांच्या प्रतिभेने केली. स्वातंत्र्याच्या आकांक्षेने या साऱ्यांचे एकाकीपण घालविले, पण माणसांची आणि सहभागाची भूक कुठे भागविली?