दक्षिणायन कसले करता ? आता उत्तरायण हवे !

लेखक-संदीप सारंग

२९/३० जानेवारीला दक्षिणायन या चळवळीच्या वतीने वर्धा आणि नागपूर येथे समास – २०१८ या नावाचे अभियान संपन्न झाले. सत्य, अहिंसा आणि संविधान सुरक्षा हे या अभियानाचे ब्रीद आहे. भारतीय लोकशाहीपुढील आव्हाने कोणती यावर विचारविनिमय करणे, भारताची प्राचीन सांस्कृतिक विविधता, सत्य, अहिंसा तसेच स्वातंत्र्य, समता, बंधुता या संविधानातील मूल्यांची नव्या पिढीमध्ये जागृती करणे हे या अभियानाचे प्रयोजन आहे. या अभियानात विख्यात भाषातज्ज्ञ गणेशदेवी, महात्मा गांधीचे नातू राजमोहन गांधी, बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर, ज्येष्ठ गांधीवादी चंद्रशेखर धर्माधिकारी, ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे आणि डाव्या, पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीतील शेकडो मान्यवर सहभागी झाले होते. या सर्व लोकांबद्दल मला व्यक्तिशः आदर असला तरी ते एकत्रितपणे करत असलेला हा कार्यक्रम फार वरवरचा आहे हे प्रकर्षाने जाणवते आहे. प्रस्तुत लेख लिहायला प्रवृत्त झालो ते त्यामुळेच!

या अभियानाचा उद्देश उदात्त असला आणि त्यादृष्टीने चोख वातावरणनिर्मिती करण्यात आलेली असली तरी त्यातून आत्मसमाधानाखेरीज अन्य काही निपजेल असे वाटत नाही. किंबहुना तशी सूतरामदेखील शक्यता नाही. नागपूरच्या गुलाबी थंडीत छान शालीबिली लपेटून मोदी, संघ, भाजप हे सगळे कित्ती कित्ती वाईट आहेत असे उसासून बोलण्यासाठी आणि क्रांतीच्या झिणझिण्या येण्यासाठी मस्त गेट – टुगेदर झाले असेल, याच्या पलिकडे त्याची विशेष उपलब्धी नसेल!  एकूण कार्यक्रमाचा तपशीलच भोंगळ धारणांवर आधारीत असल्यावर आणखी दुसरे काय होणार ?

या अभियानातल्या निम्म्यापेक्षा अधिक लोकांची धर्मसंस्कृती वैदिक आहे आणि भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला बहाल केलेल्या श्रध्दा – विश्वास – उपासनास्वातंत्र्याला अनुसरुन त्यांचा तो सांविधानिक अधिकार मान्य केलाच पाहिजे. माझे म्हणणे इतकेच आहे की, हे लोक वैदिक संस्कृतीचा त्यांच्या जीवनाला असणारा पायाभूत आधार न नाकारता सत्याचा, अहिंसेचा आणि संविधानपुरस्कृत समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, बुध्दिवाद इत्यादी तत्वांचा नैतिकदृष्ट्या आग्रह धरु शकतात काय ?  वैदिक संस्कृती हे या देशाच्या सामाजिक – धार्मिक – सांस्कृतिक जीवनातले ठार असत्य आहे. हे ठार असत्य ठार हिंसकही आहे आणि ते कायम समतेचा, बंधुत्वाचा, न्यायाचा, बुध्दिवादाचा गळा घोटत आलेले आहे. हे विषमतावादी कर्मविपाकवादी हिंसक असत्य ज्यांच्या जगण्याचा धार्मिक – सांस्कृतिक  मुलाधार आहे ते सत्याचे आणि अहिंसेचे संरक्षण कसे करणार आहेत ? तमाम भारतीय जनता वैदिकांच्या होकायंत्रानुसार आपले धार्मिक – सांस्कृतिक जीवन हाकारत असताना नागपूरात जमणारे हे मूठभर पुरोगामी कुणाच्या सहाय्याने, कुणाला बरोबर घेऊन ही लढाई लढणार आहेत ? वैदिक विचारधारा बहुसंख्य भारतीय जनतेचा धार्मिक – सांस्कृतिक – वैचारिक परिपोष करत असताना या जनतेकडून स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, बुध्दिप्रामाण्य, विवेक या संविधानपुरस्कृत मूल्यांचा मनःपूर्वक स्वीकार होईल असे खरोखरच या अभियानातील लोकांना वाटते आहे काय ? त्यांना तसे  वाटत असेल तर ते ठार भाबडे आहेत, असेच म्हटले पाहिजे.

आपल्याला समाज ‘जैसे थे’ अवस्थेत ठेवायचा आहे की त्यात आमुलाग्र परिवर्तन घडवून आणायचे आहे हे या मंडळीनी एकदा काय ते ठरवावे. एकत्र जमणारच आहेत तर तिथे हा विचार त्यांनी प्राधान्याने करावा. हा विचार करत असताना त्यांच्या लक्षात येईल की, गांधी आणि आंबेडकरांची कृत्रिम मोट बांधणे कसे अवघड आहे! कारण गांधी म्हणजे समाज ‘जैसे थे’ अवस्थेत ठेवणे आणि आंबेडकर म्हणजे आमुलाग्र समाजपरिवर्तन करणे!  यातले त्यांना नेमके काय हवे आहे ? गांधींनी सत्य – अहिंसेचा आग्रह जरुर धरला होता, परंतु सत्य आणि अहिंसा ही वैदिक संस्कृतीची नव्हे, तर बौध्द संस्कृतीची देण आहे हे त्यांनी कधीही स्पष्ट केले नाही. याचाच अर्थ, त्यांनी सत्य सांगितलेच नाही. त्यांनी या तत्वांचा पुरस्कार करताना वैदिक चौकट सोडली नाही. त्यामुळे नंतरच्या काळात ही तत्त्वे वैदिक संस्कृतीतून उगम – विकास पावलेली आहेत, ही अंधश्रध्दा वाढत राहिली. प्रत्यक्षात वैदिक संस्कृतीत या तत्वांना बिलकुल थारा नव्हता आणि नाही. वैदिकांनी कायमच या मूल्यांना कडवा / जीवघेणा विरोध केला, हा इतिहास आहे.

दक्षिणायन करणारे लोक या गोष्टींचा गंभीरपणे विचार करत नाहीत असे दिसते. सत्य जपले पाहिजे असे ते कळवळून म्हणत आहेत, परंतु मुळात सत्य म्हणजे काय ( किंवा असत्य म्हणजे काय ) याबद्दल त्यांनी (गांधींसारखे ) बेरकी मौन बाळगले आहे. विविधतेच्या मोकळ्या रानाचा पुरेपूर फायदा उठवत या देशातला सर्वात धूर्त असत्यवादी प्रवाह सर्व क्षेत्रात हात धुवून घेत असताना  आणि बेमुर्वतखोरपणे सर्वांच्या उरावर बसला असताना त्याला ‘तू असत्य आहेस’ हे कुणी सांगणार आहे की नाही ? त्याला हिंमतीने नाकारण्याची भूमिका कुणी घेणार आहे की नाही ? Annihilation of Caste करू पाहणा-या बाबासाहेब आंबेडकरांच्या घणाघाती चळवळीचा द्वंद्वात्मक परिणाम म्हणून आयुष्याच्या उत्तरार्धात आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार करणारे महात्मा गांधी आंतरजातीय विवाहावर सर्वंकष बंदी लादणा-या धार्मिक अधिष्ठानाबाबत मात्र अखेरपर्यंत चकार शब्द बोलले नाहीत! मग ते आयुष्यभर कोणत्या सत्याचा आग्रह धरत होते?

देशात विविधता आणि व्यक्तिस्वातंत्र्य असले पाहिजे या मताशी असहमत व्हायचे काहीच कारण नाही. प्रत्येक नागरिकाला सर्व प्रकारची स्वातंत्र्ये उपभोगण्याचा घटनादत्त ( आणि निसर्गदत्तसुध्दा ) अधिकार आहेच! त्यामुळे हिंदुत्ववादी शक्तींच्या चिथावणीने आणि सहभागाने ज्या घटना घडत आहेत त्या निषेधार्हच आहेत, हे मान्यच आहे. त्यांचा सर्व पातळ्यांवर जोरदार मुकाबला केला पाहिजे, हेही मान्य आहे. परंतु इथे प्रश्न हिंदुत्ववाद्यांचा  नसून हिंदुत्ववादी नसलेले जे  तमाम हिंदू आहेत त्यांच्या विचार करण्याच्या पध्दतीविषयीचा आहे. हे सर्वजण विविधता आणि व्यक्तिस्वातंत्र्य याचा अर्थ काय घेतात, हा खरा प्रश्न आहे. इथे हे सांगितले पाहिजे की, हे तमाम हिंदू विविधता आणि व्यक्तिस्वातंत्र्य याचा स्थितिवादी अर्थ घेतात!  आणि हे फार भयावह आहे. हा एक प्रकारचा कर्मविपाक सिध्दांतच आहे. व्यक्तिस्वातंत्र्य, श्रध्दा – उपासनास्वातंत्र्य हवेच, परंतु त्यांचा अर्थ असा नव्हे की, व्यक्तीने जन्मप्राप्त श्रध्दा – अंधश्रध्दांशी जखडून बसावे आणि उन्नत मार्ग स्वीकारण्याचे कटाक्षाने टाळावे!  विविधता हवीच, परंतु त्याचा अर्थ असा नव्हे की, माणसाने परंपराप्राप्त प्राक्तनालाच पकडून रहावे आणि अंतर्बाह्य प्रबुध्द होणे नाकारावे!  विविधता आणि प्रबुध्दता यापैकी प्रबुध्दता अधिक महत्वाची आहे. आयुष्याचे सर्वोच्च बिंदूपर्यंत उन्नयन करुन घेणे हे प्रत्येकांचे उद्दिष्टय असले पाहिजे. त्यासाठी जे बदल करावे लागतील ते धीरोदात्तपणे करण्याची भूमिका असली पाहिजे. ही गतिशीलता आहे. देशातला प्रत्येकजण आपापल्या वाडवडिलांनी सोपविलेल्या परंपरा निष्ठेने, श्रध्देने, आत्मियतेने छानपैकी जोपासत आहे आणि या सगळ्यांना संविधान छान संरक्षण देत आहे हे चित्र अजिबात भूषणावह नाही. खरेतर, या मानसिकतेतच भारतीय समाजाच्या दारुण पराभवाची आणि पिढ्यानपिढ्यांच्या अधोगतीची बीजसूत्रे आहेत. त्यामुळे इतिहासक्रमात लोकांच्या बोकांडी बसलेल्या / बसविण्यात आलेल्या देवदेवता, श्रध्दा, अंधश्रध्दा, उपासना फेकून दिल्या तर काही बिघडणार नाही! माणसाला सर्वार्थाने स्वयंप्रज्ञ, संविधानसुसंगत करणारा बुध्द स्वीकारला तर भूकंपबिकंप होणार नाही!  गांधींना (आणि आज दक्षिणायन करणाऱ्यांना ) असल्या गोष्टी कळत नव्हत्या आणि कळत नाहीत. आधुनिक भारतात या सर्व गोष्टी महात्मा ज्योतिबा फुले यांना सर्वात प्रथम आणि व्यवस्थित समजल्या होत्या.  परंतु त्यांचे नाव मात्र हे दक्षिणायनवाले घेत नाहीत!  असे का ?  जोपर्यंत या मंडळींना महात्मा फुले कळणार नाहीत तोपर्यंत त्यांना सामाजिक परिवर्तनशास्त्राचे गमभनसुध्दा कळणार नाही!  महात्मा गांधींपेक्षा महात्मा फुले सर्वार्थाने श्रेष्ठ असून त्यांनी धरलेले आग्रह आज पुन्हा धरले तरच भविष्याच्या वाटा प्रकाशमान होऊ शकतील. अहोरात्र  ‘विविधता s s विविधता’ असा गजर करण्याने नव्हे! खरेतर स्री – पुरुष विषमतेचा अंत, वर्णअंत, वर्गअंत, जातीअंत हे सगळे विविधता नष्ट करण्याचेच प्रकार आहेत आणि ते प्रयत्नपूर्वक केलेच पाहिजेत.  खानपान, वेशभूषा, केशभूषा यांचे स्वातंत्र्य मान्यच आहे आणि त्यावर जे गदा आणतील त्यांना त्या त्या ठिकाणी, त्या त्या वेळी रोखावेच लागेल. परंतु हा तेवढ्यापुरता प्रासंगिक मामला झाला. प्रश्न मूल्यसंपन्न असा आधुनिक भारतीय समाज उभा करायचा असेल तर त्याच्या मनात  कोणत्या धारणा, प्रेरणा आणि जीवननिष्ठा पेरल्या-रुजविल्या  पाहिजेत हे स्पष्टपणे  सांगण्याचा आहे. गांधींना हे लक्षात आले नाही आणि आज गांधीवाद्यांचाही तोच problem आहे. गांधींना आणि गांधीवाद्यांना विविधता हवी आहे / होती, तर आंबेडकरांना प्रबुध्दता हवी होती. म्हणूनच गांधी आणि आंबेडकर यांचा समन्वय करण्याचा आटापिटा व्यर्थ ठरतो. किंबहुना हा आटापिटा तर्कदुष्ट आहे. समन्वयात व्यापक भूमिकेचा भास होतो, परंतु बहुतेक वेळा समन्वय म्हणजे दोन बाजूंपैकी जास्त स्ट्राँग बाजू संपविण्याची गोडगोजिरी आखणी असते!  समन्वयाचा आग्रह हा नेहमीच दुबळ्या बाजूकडून धरला जातो. जोपर्यंत महाराष्ट्रात भाजप दुर्बल होता आणि शिवसेना मजबूत होती तोपर्यंत भाजप युतीचा आग्रह करत असे. जसजसा भाजप प्रबळ होऊ लागला तसतसा तो युतीचा आग्रह धरेनासा झाला. स्वतंत्र राहून बुध्द त्रास देऊ शकतो याचे भान आल्याने तो आमचाच आहे असे म्हणून त्याला विष्णूचा अवतार करुन पचवून टाकण्याचा प्रयत्न गेली कित्येक शतके चालू आहे. स्वतंत्र राहून आंबेडकर अडचणीचे ठरु शकतात म्हणून आंबेडकरांना सोबत घेऊन त्यांचा विचार गिळंकृत करणे आणि गांधीविचारांचेच घोडे पुढे दामटणे यासाठी हा समन्वय या लोकांना हवा आहे. मला स्वतःला गांधी अप्रिय असण्याचे काहीच कारण नाही. गांधी मोठे नेते होते हे मला मान्यच आहे. त्यांनी स्वातंत्र्याची चळवळ ज्या मुत्सद्दीपणे चालवली त्यालाही सलामच केला पाहिजे. परंतु आता प्रश्न स्वतंत्र झालेला भारत कशाप्रकारे, कोणत्या मूल्यांवर अधिष्ठित करायचा हा आहे. स्वातंत्र्य , समता, बंधुता, न्याय, बुध्दिप्रामाण्य ही मूल्ये संविधानात अंतर्भूत केलेली असली आणि म्हणून संविधान ग्रेट असले तरी ते केवळ पुस्तक आहे हे विसरता कामा नये. आम जनतेच्या धारणांमध्ये संविधानाला पूरक असा मूलभूत बदल करण्यासाठी काय करावे लागेल यासंबधी क्रांतिकारी  निर्णय घेणे आता गरजेचे आहे. लाँग मार्च, मूक मोर्चे, अनेक महाविद्यालयात एकाचवेळी भाषणे, विविध भाषांमध्ये आदरांजली अशा प्रकारचे क्षणभर (किंवा दिवसभर ) रोमांचकारी वाटणारे उपक्रम राबवून संविधानाची सुरक्षा होत नसते आणि होऊ शकणार नाही. जनतेच्या संविधानसन्मुख जीवनधारणा आणि जीवननिष्ठा ही खरी संविधानाची सुरक्षा ठरणार आहे. बाबासाहेबांनी ही तजवीज १४ आँक्टोबर १९५६ रोजी केली. अशी तजवीज वर्ध्यात / नागपूरात जमणारे करणार आहेत काय ? तेवढे धाडस ते दाखवणार आहेत काय ?

गांधी – आंबेडकरांचे विचार परस्परांहून भिन्न स्वरुपाचे होते आणि त्या काळात त्यांच्या विचारांमध्ये दीर्घ टकराव झालेला होता. त्यातला कोणता विचार आज योग्य / कालसुसंगत आहे हे न ठरवता दोघेही फार महान होते, दोघेही एकाच विचाराचे होते असे म्हणत राहणे हा बनेलपणा आहे. वैदिक संस्कृतीत सांस्कृतिक भरणपोषण झालेल्या परंतु पुढे वैचारिक पातळीवर पुरोगामी झालेल्या नेत्यांना – कार्यकर्त्यांना – विचारवंतांना- संशोधकांना सर्व पुरोगामी व्यवहारावर आणि चळवळीवर कायम ब्राह्मणी विचारधारेचा वरचष्मा राहिला पाहिजे असेच कळत – नकळत वाटत असते. त्यासाठी त्यांना गांधींचे बोट धरणे अत्यंत आवश्यक आणि सोयीचे ठरते. जो माणूस ‘काय चांगले आणि काय वाईट’ हे नीट सांगत नाही असा कोणताही माणूस त्यांना आवडतो. कारण त्यातून ‘काय वाईट असल्यामुळे टाकून दिले पाहिजे आणि काय चांगले असल्यामुळे स्वीकारले पाहिजे’ याचा निर्भेळ उलगडाच होत नाही. नेमके हेच त्यांना हवे असते. कारण त्यामुळेच तर वैदिक वर्चस्व मागच्या पानावरुन बेमालूमपणे पुढे चालवता येते. गांधी त्यासाठीच त्यांना हवे असतात. या अभियानातही गांधी आणि आंबेडकर दोघांचेही फोटो आहेत, परंतु प्रत्यक्षात त्यांना फक्त गांधींचेच विचार पुढे रेटायचे आहेत आणि आंबेडकर नुसते दाखवायचे आहेत. नुसते गांधी घ्यावेत तर तेवढ्याने  या अभियानाची पुरोगामी प्रतिमा उभी राहू शकत नाही हे ध्यानात घेऊन त्यांच्या शेजारी आंबेडकर उभे करायचे आणि नंतर मात्र आंबेडकरांचे काहीच न स्वीकारता गांधींच्याच विचारांचा उच्चार करत रहायचे, असा हा डाव आहे. बाबासाहेबांचे नाव घेतलेच पाहिजे, दीक्षाभूमीवर कार्यक्रम केलाच पाहिजे, असा काही कुणाचा दंडक नाही किंवा तसा कुणी व्हीप वगैरे काढलेला नाही!  खरी गोष्ट ही आहे की, आंबेडकर टाळणे आता अवघड, किंबहुना अशक्य झालेले आहे. परंतु आंबेडकरांना नेता मानणे हे इथल्या पुरोगाम्यांच्या  वैदिक मानसिकतेला अजूनही जड जात आहे. म्हणूनच काहीही करायचे म्हटले की त्यांना आधी गांधी लागतात, आणि त्यानंतर जोडीला आंबेडकर! याबाबतीत मला मोदी आणि पुरोगामी या दोघांमध्ये फारसा फरक दिसत नाही. दोघेही बाबासाहेबांचे नाव उठताबसता घेतात, दोघेही दीक्षाभूमीवर उत्साहाने जातात…पुढे काय ?  तसे तर दीक्षाभूमीवर फेरीवालेसुध्दा चणे – फुटाणे विकायला जातात! त्याचा उपयोग काय ? बाबासाहेबांचे नाव जोरजोरात घेतच आहात, दीक्षाभूमीवर गाजावाजा करत जातच आहात तर त्याठिकाणी ६० वर्षापूर्वी त्यांनी  ‘सत्य – अहिंसा- समता- विवेक – प्रज्ञा- करुणा स्वीकारण्याची’ जी काही कृती केली त्याबद्दलची खरी / प्रामाणिक भूमिका जाहीर करणार आहात काय ?

जोपर्यंत १४ आँक्टोबर १९५६ रोजी बाबासाहेबांनी घेतलेली भूमिका घेतली जाणार नाही तोपर्यंत संविधानाशी आणि संविधानातील मूल्यांशी सुसंगत आणि सन्मुख होण्याच्या गप्पा पोकळ ठरत राहणार आहेत. जोपर्यंत या देशातल्या तमाम लोकांच्या जीवनधारणा संविधानातील मूल्यांच्या विरोधात उभ्या आहेत तोपर्यंत संविधानाची आणि सांविधानिक मूल्यांची ख-या अर्थाने सुरक्षा होऊ शकेल काय ? बहुसंख्य देशवासीय वैदिक संस्कृतीला श्रध्देने follow करत असताना स्वतःला परिवर्तनाचे शिलेदार म्हणविणारे वैदिकानुकरणात निर्णायक हस्तक्षेप न करता समतेचे, सत्य – प्रस्थापनेचे, अहिंसेचे, अंधश्रध्दा निर्मूलनाचे साध्य कसे काय साकार करु शकणार आहेत? रोज उठून संविधानाचा केवळ पोपटपंची जयजयकार करण्याने हे होणार आहे काय ? भारतीय समाजाच्या मूलभूत धारणांत बदल करण्यासाठी संविधाननामक ग्रंथावर इतकी भिस्त ठेवणे बरे नव्हे!  हा तर चक्क ग्रंथप्रामाण्यवाद झाला!

आता दिखाऊ दक्षिणायन नको. ठोस उत्तर शोधून ते निर्भयपणे स्वीकारणारे उन्नत उत्तरायण हवे आहे. ते करायचे नसेल आणि एक कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला  एवढ्यावरच समाधान मानायचे असेल तर मला यापेक्षा अधिक काही म्हणायचे नाही!

-संदीप सारंग