नेहरूंचा विवाह

जवाहरलाल नेहरू विशेष लेखमाला – भाग ६

साभार – साप्ताहिक साधना

– सुरेश द्वादशीवार

यावेळी ब्रिटीशांनी तुर्कस्थानच्या खलिफाचे प्रशासकीय अधिकार काढून घेतले. त्यामुळे त्याच्या धार्मिक प्रभावालाही बाधा आली. हा प्रकार मुसलमान समाजाला डिवचणारा होता. गांधींना त्यांच्या संतापाला राष्ट्रीय वळण देऊन त्यांना स्वातंत्र्याच्या दिशेने वळविता येण्याची चिन्हे दिसत होती. नेहरूंना मात्र कोणत्याही धार्मिक बाबीत फारशी रुची नव्हती. त्यांनी खिलाफत चळवळीत भाग घेतला. त्यासाठी भाषणे केली. पण त्यातल्या धार्मिक बाज्ाूवर त्यांचा भर नव्हता. त्या चळवळीचे इंग्रजविरोधी रूप व इंग्रजांची सत्ता घालविण्याची त्यांची इच्छाच त्यांच्या भाषणातून प्रकट होत होती. स्वातंत्र्याची दिशाच त्यांना मोलाची वाटत होती. याच सुमारास अहिंसा व असहकार या गांधीजींच्या दोन सूत्रांवर चर्चा होऊन ती काँग्रेस व खिलाफत चळवळीचे नेते या दोहोंनीही डिसेंबर १९१९ मध्ये अधिकृतपणे मान्य केली.

धार्मिक कडवेपण हे देश व समाज या दोहोंसाठीही घातक असल्याचे व या दोहोतही दुरावाच नव्हे तर वैरभाव निर्माण करणारे असल्याचे नेहरूंना आरंभापासून वाटत होते. खिलाफतच्या निमित्ताने काँग्रेसमधील मुस्लिम नेत्यांचा वाढता प्रभाव त्यांना आवडणारा नव्हता. त्या प्रभावाचे अनिष्ट परिणाम तेव्हा पंजाबात दिसूही लागले होते. तेव्हाचा पंजाब (आज पाकिस्तानचा भाग बनलेला व आपला) मुस्लिम बहुसंख्येचा प्रांत होता. आपल्या बहुमताविषयीचे एक गर्विष्ठपण त्या समाजात तेव्हाही होते. त्यांच्यात व तेथील शीख समाजात वैर होते आणि हिंदू हे त्या दोहोंसाठी तिरस्काराचे विषय होते. या संदर्भात के.एम. पणिक्कर या आपल्या स्नेह्याला लिहिलेल्या पत्रात नेहरू म्हणतात, ‘पंजाबातील मुसलमानांना आपल्या बहुसंख्येचा गर्व असला तरी देशात आपण अल्पसंख्य असल्याची त्यांना धास्तीही आहे. शिखांना त्यांच्या धर्माचे  ताजेपण व श्रेष्ठपण एवढ्या उंचीचे वाटणारे की बाकीचे सारे त्यांच्या तुलनेत गौण ठरणारे. आणि हिंदू? आम्ही येथे अल्पसंख्य असलो तरी देशात बहुसंख्य आहोत ही त्यांची धारणा. या परस्परविरोधी धारणा शमल्या पाहिजेत, त्यांना खतपाणी घालण्याचे तेथील वृत्तपत्रांचे काम थांबविता आले तर ते थांबविले पाहिजे.’ मात्र तेथील वृत्तपत्रांनी पणिक्करांचे म्हणणे ऐकले नाही. त्याचे दुष्परिणाम पुढे फाळणीच्यावेळी जम्मूत झालेल्या मुसलमानांच्या व पंजाबात झालेल्या शीख व हिंदूंच्या कत्तलीत दिसले. मा. तारासिंगांचे खलिस्तानचे आंदोलनही याच पार्श्वभूूमीवर उभे झाले. हे भविष्य 1924 मध्येच पाहू शकणार्‍या नेहरूंच्या दूरदृष्टीचे अशावेळी आश्चर्य व कौतुक वाटल्याखेरीज राहात नाही… याच सुमारास अमेठीतील एका धार्मिक दंगलीविषयी नेहरूंनी गांधीजींना लिहिले ‘आदरणीय बापू, या दंगलीत मला मध्यस्थी करता येत नाही. इथल्या हिंदूंना मी त्यांची बाज्ाू घेईन असे वाटत नाही आणि नेमकी तीच भूमिका मुसलमानांचीही आहे. मात्र या दोन्ही बाज्ाू ठरवून व कमालीचे खोटे बोलणार्‍या आहेत हे मला स्पष्ट दिसत आहे.’

खिलाफतचे पुढारी प्रसंगी कडवी धार्मिक भाषणे देत. ती नेहरू व काँग्रेस या दोहोंनाही बोचणारी असत. पण काँग्रेस व त्या पक्षाचे हिंदू असणे या बाबी या कडवेपणावर मात करतील असा गांधींचा तेव्हाचा पवित्रा असे. 1920 च्या 28 मे ला खिलाफत संघटनेने आपल्या स्वतंत्र ठरावाद्वारे असहकाराच्या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. 30 मे रोजी काँग्रेसच्या बनारसला झालेल्या बैठकीत त्याला संमती देऊन लिगच्या कलकत्त्याच्या सप्टेंबरमध्ये झालेल्या कलकत्त्याच्या अधिवेशनात त्याला सक्रिय स्वरूप देण्याचे ठरले. दरम्यान काँग्रेसने सार्‍या देशाला ६ ते १३ एप्रिल या काळात जालियनवाला बागेतील हत्याकांडाचा निषेध सप्ताह पाळण्याचे आदेश दिले.

१ ऑगस्ट १९२०  ला टिळकांचा मृत्यू झाला त्यावेळी सिंध प्रांताच्या दौर्‍यावर असलेले गांधीजी आणि नेहरू हे त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहायला मुंबईत हजर झाले. ‘माझा सर्वात मोठा व सर्वाधिक शक्तिशाली पाठीराखा मी गमावला’ हे त्यावेळचे गांधींचे उद्गार होते. यापुढचा त्यांचा प्रवास आपल्या आंदोलनाची दिशा एकट्याने ठरविण्याचा व एकाकीपणे शोधण्याचा होता. यावेळपर्यंत सारी काँग्रेस व तिचे सर्व वरिष्ठ नेते गांधीजींच्या मागे आले होते. त्यात जवाहरलालांसोबत सरदार पटेलही होते.

‘माझे वडील आणि गांधी यांचा माझ्यावर जसा प्रभाव होता तसा एक हळुवार प्रभाव माझ्या पत्नीचा, कमलाचा माझ्या मनावर होता आणि आहे’. कमला नेहरूंच्या मृत्यूनंतर १९३८ मध्ये जॉन गुंथरला लिहिलेल्या पत्रात नेहरूंनी हे लिहिले आहे.

कमला नेहरूंचे मूळचे आडनावही कौलच. त्यांचे घराणे काश्मिरातून येऊन दिल्लीला स्थायिक झाले होते. त्यांच्या वडिलांचा व्यवसाय होता. कमला नेहरूंना त्यांच्या वयाच्या १३ व्या वर्षी मोतीलालजींनी पाहिले आणि त्या त्यांना मनापासून आवडल्या. पुढे नेहरूंच्या आईने त्यांना एका लग्नात पाहिले आणि हिलाच आपली सून करून घेण्याचे त्यांनी मनाने ठरविले. कमलादेवी सुस्वरूप होत्या. उंच, सडपातळ, गौरवर्णी आणि नेहरूंच्या देखणेपणाला शोभणार्‍या. त्यांचा स्वभावही जवाहरलालांसारखा स्वतंत्र बाण्याचा आणि निर्धाराचा. संवेदनशील आणि स्वाभिमानी. काहीशा भावनाशीलतेने निर्णय घेण्याचा. त्या नेहरूंसारख्या औपचारिक शिक्षण घेतलेल्या नव्हत्या. त्यामुळे खूपदा त्यांचे वागणे-बोलणे घरातल्यांना चमत्कारिक वाटायचे. त्यांच्या आवडी-निवडी ठाम होत्या. मात्र त्याचवेळी त्या सहृदयही होत्या. आपल्याला न आवडणार्‍यांबाबत त्या दूरस्थ असत. मात्र जवळच्यांना त्या त्यांच्या वाटायच्या. आपली मते कोणाला आवडो व न आवडो त्या बेधडकपणे सांगायच्या… त्यांचा प्रेमविवाह नव्हता. आई-वडिलांनी पुढाकार घेऊन ठरविलेला रीतसर भारतीय विवाह होता.

१९१६ च्या मार्च महिन्यात वसंत पंचमीच्या मुहूर्तावर त्यांचा विवाह दोन्ही घराण्यांना साजेसा धुमधडाक्यात साजरा झाला. मोतीलालजींनी तेव्हा गांधींचा मार्ग पूर्णपणे स्वीकारला नव्हता. त्यामुळे घरातले ऐश्वर्य कायम होते. चांदीची भांडी, सुवर्णाचे अलंकार याशिवाय घोड्यांनी भरलेले तबेले, लहान मुलांसाठी तट्टू. शिवाय घराच्या आवारात पोहण्याचा विस्तीर्ण तलाव असे सारे होते. मोतीलालजी त्यांच्या आतिथ्यशीलतेसाठी प्रसिद्ध होते. अशा संपन्न कुटुंबात कमला नेहरूंनी सून म्हणून प्रवेश केला तेव्हा त्या सतरा वर्षांच्या होत्या. त्यांच्या लग्नानंतरची पहिली पाच वर्षे सुखात व काहीशा आनंदात गेली. नंतर नेहरूंनी स्वातंत्र्यासाठी तुरुंगाचाच रस्ता धरला. दोघांचाही स्वभाव संवेदनशील असल्याने त्यांच्यात मतभेद व्हायचे. चांगली भांडणेही व्हायची. दोघांच्या आयुष्यांची पार्श्वभूमी वेगळी असल्याने त्यांना परस्परांशी जुळवून घ्यायलाही काही काळ जावा लागला. ‘मात्र याच काळात तिने मला मनाने बळकटही केले’ असे नेहरूंचे म्हणणे. त्यांनी कमला नेहरूंची तुलना रवींद्रनाथ टागोरांच्या ‘चित्रा’ या नायिकेशी केली आहे. ही चित्रा म्हणते ‘मी चित्रा आहे. मी दैवी नाही म्हणून पूजनीय नाही. मात्र मी कुणाच्या अनुकंपेचाही विषय नाही. मला दुर्लक्षून चालणार नाही. संकटांच्या आणि आव्हानांच्या वेळी मला आपल्या जबाबदारीत सहभागी करून घेणार्‍यांना मी माझ्या सार्‍या सामर्थ्यानिशी साथ देईन’.. मात्र ही जाण नेहरूंना १९३० च्या सुमारास आली. त्यावेळी कमलादेवी नेहरूंच्या खांद्याला खांदा लावून सत्याग्रहात आणि इतर आंदोलनात सहभागी होत होत्या.

त्यांच्या विवाहानंतर २१  महिन्यांनी १९१७ च्या नोव्हेंबरात त्यांच्या एकुलत्या एका कन्येचा इंदिरा गांधींचा जन्म झाला. त्याचवेळी कमला नेहरूंना क्षयाची बाधा असल्याचेही निदान झाले… नेहरूंच्या धाकट्या बहिणीने, कृष्णा हाथीसिंग यांनी या संदर्भात नेहरूंच्या चरित्रात केलेली एक नोंद महत्त्वाची आहे. आई आणि पत्नी या दोघींच्याही आजाराचा नेहरूंवर झालेला परिणाम खोलवरचा होता. शरीराचे स्वास्थ्य आणि त्यासाठी करावी लागणारी व्यायामाची साधना त्यांनी तात्काळ सुरू केली. त्याचवेळी आजारी माणसांच्या सुश्रुषेचे व्रतही त्यांनी आत्मीयतेने स्वीकारले. आजारी माणसाच्या खोलीत नर्स असावी तर नेहरूंसारखी. त्यांच्या सेवेला सुमार नव्हता आणि परिश्रमांना कडा नव्हत्या.

हाच काळ नेहरू घराण्याच्या त्यागपर्वाच्या आरंभाचाही होता. मोतीलालांनी क्रमाने गांधींचा मार्ग स्वीकारला होता. त्यासाठी प्रचंड उत्पन्न देणार्‍या वकिलीवर पाणी सोडले होते. घरातली गडीमाणसे गेली, तबेल्यातले घोडे गेले, सॅटीन आणि रेशमाची वस्त्रे गेली. सार्‍यांच्या अंगावर एकच एक जाडी भरडी खादी आली. स्वेच्छेने स्वीकारलेल्या या गरिबीशी मोतीलालांनी लवकर जुळवून घेतले. जवाहरलालांचे मन त्यांना याचसाठी आपला जन्म असल्याचे सांगणारे होते. त्यांच्या आईला स्वरूपराणींना मात्र हा बदल स्वीकारणे अवघड गेले. त्यासाठी त्या मनातून गांधीजींवर संतापल्याही होत्या. मात्र पुढे त्याही गांधीमार्गी झाल्या. सत्याग्रहात सहभागी झाल्या. आपल्या मुलींसोबत तुरुंगात गेल्या आणि गांधी-आंबेडकर यांच्यातील पुणे कराराच्या वेळी त्या दलित वस्तीतील सहभोजनातही सामील झाल्या.

याची सुरुवात एका चमत्कारिक वाटाव्या अशा योगायोगाने झाली. अफगाणिस्तानचा सुल्तान अमानुल्ला याचे ब्रिटीशांशी झालेले अल्पकालीन युद्ध १९१९ मध्येच संपले. त्याच्या अखेरच्या वाटाघाटींसाठी सुलतानाचे एक शिष्टमंडळ मसुरीला आले होते. त्यांच्या तेथील मुक्कामातच त्यांच्यातील तहाची बोलणी सुरू होती. नेमक्या याचवेळी जवाहरलाल आपल्या आईला व पत्नीला घेऊन मसुरीला आले. ज्या हॉटेलात ते शिष्टमंडळ थांबले होते त्यातच नेहरू कुटुंबाचाही मुक्काम होता. तहाची बोलणी करणार्‍या मंडळींशी त्यांचा साधा परिचयही नव्हता. परंतु संशयाने पछाडलेल्या ब्रिटीश सरकारला ‘अफगाण शिष्टमंडळाशी आपला कोणताही संबंध नाही’ असे प्रतिज्ञापत्र त्यांना लिहून मागितले. त्याला नेहरूंनी नकार दिला. तेव्हा सरकारने त्यांच्यावर हद्दपारीचा हुकूम बजावून मसुरी व तो सारा परिसर तात्काळ सोडायला सांगितला. नेहरूंनी त्या आदेशाचे पालन केले. पुढे गैरसमजातून घडलेल्या या प्रकारातील मध्यस्थी मोतीलालांनी केली व सरकारचा मनाईहुकूम रद्द झाला. नंतर जवाहरलाल मसुरीला परतले तेव्हा त्यांची लहानगी इंदिरा त्या अफगाण शिष्टमंडळासोबत खेळतानाच त्यांना दिसली.

मसुरीचा मुक्काम संपवून ते अलाहाबादला परतले तेव्हा यमुनेच्या काठावर अडीच ते तीनशे शेतकर्‍यांचा वर्ग अर्धपोटी व अर्धवस्त्रात येऊन थांबल्याचे त्यांना कळले. त्यांनी लागलीच आपल्या सहकार्‍यांसोबत तेथे जाऊन त्यांची भेट घेतली. ‘पिके नाहीत, खायला नाहीत, जमीनदाराने करापोटी घरे लुटली आहेत, स्त्रियांवर अत्याचार झाले आहेत आणि आम्हाला लाथाबुक्क्यांनी तुडविले गेले आहे. अशा निराश अवस्थेत आम्ही यमुनेला शरण आलो आहोत’ हा त्या गावकर्‍यांचा आक्रोश ऐकून नेहरू कळवळले. त्यांना धीर देत ते म्हणाले ‘तर मग मी तुमच्या गावाला येतो’. तसे ते गेलेही. तेथील शेतकर्‍यांची दूरवस्था पाहून द्रवण्याहून त्यांना आपल्याविषयी वाटलेल्या विश्वासाने ते अधिक सद्गदित झाले. ‘तुमची दु:खे मी दूर करीन’ असे आश्वासन देणारे भाषण त्या हतबल गावकर्‍यांसमोर देताना नेहरूंनाच त्यांच्या वक्तृत्वाचा सूर सापडला. तोवर सभेत बोलायला भिणारे नेहरू त्या सभेत मनापासून बोलले आणि आपण शहरी माणसांहूनही ग्रामीण माणसांशी त्यांच्या भाषेत जिव्हाळ्यानिशी बोलू शकतो याचा त्यांना साक्षात्कारच झाला. त्यांची यासंबंधी लिहिलेली एक नोंद येथे सांगण्याजोगी. ‘त्या क्षणी मला समजले, गांधींना शहरातल्या सुशिक्षित व उच्चभ्रू लोकांहूनही ही खेड्यातली माणसे राष्ट्रीय चळवळीशी का जोडून घ्यायची आहेत. त्यांच्या चंपारणचा लढाही त्याचसाठी होता. ते शेतकर्‍यांशी ज्या आत्मीयतेने बोलतात तिला तोड नसते.’ नेहरूंच्या वक्तृत्वाला फार मोठा दर्जा वा उंची नव्हती. मात्र त्यांच्या बोलण्यातले वैशिष्ट्य हे की सभेत जमलेल्या हजारो लोकांपैकी प्रत्येकाला ते त्याच्या एकट्याशी बोलत असल्याचे वाटावे… नेहरूंचा ग्रामीण जनतेशी, तिच्या प्रश्नांशी व दु:खांशी संबंध असा जुळला. सरंजामदार, जमीनदार व बड्या धनवंतांपासून मग ते मनानेच दूर गेले.

शेतकर्‍यांवर अन्याय लादण्यात तेव्हाच्या न्यायव्यवस्थेचा हात मोठा असल्याचेही यावेळी त्यांच्या लक्षात आले. त्यांचे न्यायालयात अडकलेले कज्जे वर्षानुवर्षे तसेच निकालावाचून रखडत आणि त्यांच्या नशीबातले तारखांचे फेरेही चुकत नसत. नेहरूंनी मग हे खटले कोर्टाबाहेर गावपंचायतीत सोडवायला सुरुवात केली. अशावेळी ते स्वत:ही हजर असत. या प्रयत्नांना मोठा प्रतिसाद मिळाला आणि शेतकर्‍यांना एका मोठ्या बंधनातून मुक्त करण्याचे समाधान नेहरूंनाही लाभले. त्यांचे खेड्यांचे दौरे वाढले. तेव्हा सरकारने त्यांच्यासोबत पोलीस द्यायला सुरुवात केली. पण नेहरूंच्या चालण्याचा वेग त्या पोलिसांना झेपत नव्हता. त्यातून नेहरू मैलोगणती पायी चालत. त्यांच्यासोबत उन्हातान्हातून जाणार्‍या एका तरुण पोलीस अधिकार्‍याला घेरी आल्याची व त्याची सुश्रुषा नेहरूंनाच करावी लागल्याची नोंद त्यांच्या चरित्रकारांनी केली आहे. नेहरूंचा पुढचा प्रयोग शेतकर्‍यांचे मोर्चे सरकारी कचेर्‍यांवर नेऊन त्यांच्या मागण्यांची तड लावण्याचा होता. अशाच एका जमावासोबत तुरुंगाला घेरा टाकून त्यात अकारण अडकवलेल्या अनेक शेतकर्‍यांची सुटका करायला त्यांनी सरकारला भाग पाडले. ती सार्‍यांचेच मनोबल उंचावणारी बाब होती. नेहरूंना स्वत:चा आणि स्वत:सोबतच खर्‍या भारताचा शोध लागत होता आणि हाच आपला भारत ही जाण त्यांच्यात भिनत होती.

(लेखक नामवंत विचारवंत , वक्ते व लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे संपादक आहेत)

9822471646

Previous articleअडवाणी नावाची महाशोकांतिका…
Next articleवाढदिवस
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.