धोनीच्या साक्षात्काराचा क्षण

-अविनाश दुधे

 

धोनी  क्रिकेटरपेक्षा  ‘योगी’च  अधिक भासायचा.

 कमालीचा स्थितप्रज्ञ. जय -पराजयात सारखाच अलिप्त.

 विजयाने तो उसळायचा नाही. पराभवाने खचायचा नाही.

 दोन्ही गोष्टी आयुष्याचा एक भाग असल्यासारखे त्याचं वागणं निर्लेप.

 अनेकदा तर याच्या मेंदूत एअर कंडिशनर फिट केलं आहे की काय, असं वाटावं एवढा थंड असायचा तो.

 

काल ‘आजतक’ वर राजदीप सरदेसाईने एक किस्सा सांगितला .

धोनीने अनेकदा शेवटच्या ओव्हरमध्ये १५-२० धावा काढून संघाला जिंकून दिलं होतं.

‘तुला शेवटच्या ओव्हरमध्ये एवढ्या धावा काढण्याचे टेन्शन येत नाही का?,’ असा प्रश्न राजदीपने एकदा त्याला केला.

त्यावर धोनीने खास त्याच्या style ने मंद स्मित करत उत्तर दिलं होतं .

खरगपूर रेल्वे स्टेशनला एकापाठोपाठ एक गाड्या पोहचल्यावर हजारो प्रवाशांचे तिकीट चेक करण्यापेक्षा हे सोपं आहे. (आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यापूर्वी धोनी रेल्वेत टीसी होता.)

आणि  तू माझ्या टेन्शनचा विचार करतोय .पण मी (धोनी) समोर आहे म्हटल्यावर समोरच्या बोलरलाही टेन्शन येईलच ना?

 

 आणीबाणीच्या प्रसंगात धोनीचं हे असं ‘कुल’ असणं, स्थितप्रज्ञ असणं हे त्याला एकाएकी साध्य झालं नसणारं, त्या ‘योगी’ अवस्थेपर्यंत पोहचण्यासाठी तसंच काहीतरी घडलं असणार, असे मला प्रकर्षाने वाटत होते .

अलीकडेच नामवंत क्रीडा पत्रकार सुनंदन लेलेच्या धोनीवरील Facebook live मध्ये याचं उत्तर मिळालं .

 क्रिकेट कारकिर्दीत सुरुवातीची दोन वर्ष अफाट लोकप्रियता मिळाल्यानंतर २००७ च्या वेस्ट इंडिजमधील वर्ल्ड कपमध्ये लाजीरवाण्या पद्धतीने भारतीय संघाला स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं.

त्यानंतर संपूर्ण संघ भारतात पोहचला . धोनी घरी रांचीला जाण्यासाठी दिल्ली विमानतळावर  विमानाची वाट पाहत होता .

त्याचवेळी वडिलांचा त्याला फोन आला . ‘तू येथे अजिबात येऊ नको . पाच हजारापेक्षा अधिक गर्दीने घराला घेराव घातला आहे . ते घाणेरडी शिवीगाळ करत आहे .  घराच्या कम्पाउंडला ते धडका मारत आहे . घर पेटविण्याची तयारी सुरु आहे’ .

हे ऐकून धोनी अंतर्बाह्य हादरला .

काही महिन्यापूर्वी जी माणसं आपल्याला डोक्यावर घेऊन नाचत होती , ती घर जाळायला निघाली आहे , हे  त्याच्यासाठी अविश्वसनीय होतं .

 मला वाटतं , धोनीसाठी तोच साक्षात्काराचा क्षण होता . तिथेच त्याला आयुष्य कसं असतं हे कळलं असावं.

त्यानंतर काही महिन्यातच भारताने टी- २० वर्ल्ड कप जिंकला . हा तोच वर्ल्ड कप, ज्यात धोनीने शेवटची ओव्हर जोगिंदर शर्माला देण्याचा जुगार खेळला होता.

वर्ल्ड कप जिंकून टीम भारतात आली . तीच गर्दी पुन्हा एकदा धोनीच्या घराभोवती जमा झाली . मात्र आता ती जल्लोष करत होती . धोनीचा जयजयकार करत होती .

त्याला डोक्यावर घेण्याची वाट पाहत होती .

घरातील मंडळी आणि मित्रपरिवारालाही धोनी कधी घरी येतो , याची उत्कट प्रतीक्षा  होती .

पण धोनी आला नाही . पुढेही आणखी १५-२० दिवस तो आला नाही .

लोकांचा उतू जाणारा उत्साह कमी झाल्यानंतर कोणालाही न सांगता एका रात्री तो गुपचूप पोहोचला आणि दोन दिवसांनंतर तसाच शांतपणे निघूनही गेला.

 या अनुभवानंतर मैदानावरचा धोनी हा संपूर्ण वेगळा माणूस होता.

कितीही मोठा विजय मिळविला, अगदी अटीतटीच्या सामना एकहाती खेचून आणला तरी तो अगदी लक्षात येईल एवढा शांत असायचा .

संपर्ण संघ जल्लोष करत असायचा . शाम्पेन उडवत असायचा .

हा मात्र एका कोपऱ्यात शांतपणे उभा असायचा . टीम फोटो काढून झाला की विजयी चषक कोणालातरी सोपवून तो शांतपणे ड्रेसिंग रूमकडे निघून जायचा .

पराभवातही त्याचं वागणं तसंच . अगदी हातातोंडाशी आलेल्या विजयाचं पराभवात रुपांतर झालं तरी आभाळ कोसळल्यासारखं तो कधीच वागायचा नाही .

रडायचा नाही . चडफडायचा नाही . भावेनचं अतिरेकी प्रदर्शन कधीच नसायचं .

‘इट्स अ पार्ट ऑफ गेम’ , म्हणत तेव्हाही तो शांतपणे निघून जायचा .

शनिवारी त्याने क्रिकेटचा निरोप घेताच आपल्या सर्वांना भरून आलं. तो मात्र ‘पल दो पल का शायर हूँ …पल दो पल मेरी कहाणी है …’ म्हणत शांतपणे बाजूला गेला.

कारण … कारण त्याला आयुष्य कळलं आहे.

Salute धोनी

(फोटो साभार :दैनिक ‘दिव्य मराठी’)

(लेखक ‘मीडिया वॉच’ नियतकालिक व वेब पोर्टलचे संपादक आहेत )

सोबतचा व्हिडीओ नक्की पाहा- खालील Blue लिंकवर क्लिक करा

MS Dhoni Retirement | Main Pal Do Pal Ka Shayar Hu |

https://www.youtube.com/watch?v=3CG-JE6bik8

 

Previous articleसत्यपाल महाराज यांच्याशी मुक्त संवाद
Next articleअंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या इतिहासाची मोडतोड
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here