नर्गिस: चंदेरी पडद्याला पडलेलं ‘राज’वर्खी स्वप्न!

(साभार : दैनिक ‘महाराष्ट्र दिनमान’)

-मिथिला सुभाष

*****

या लेखातली नर्गिस तुम्ही सिनेमात पाहिलेली नाही. मला पडद्यामागच्या नर्गिसने कायम भुरळ घातली आहे. तीच आहे यात. सुरुवात करूया तब्बल तीसेक वर्षापूर्वीच्या घटनेनं. नूतनचं निधन झालं होतं, अंत्ययात्रेसाठी जमलेली मंडळी ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमधून बाणगंगेवर जायला निघाली होती. सगळे आपापल्या गाडीत. सुनील दत्तच्या गाडीत मुंबईतले तीन मान्यवर पत्रकार बसले होते. गाडी सुरु झाल्यावर थोड्या वेळाने एक बंगलीवजा घर दिसलं. सुनील दत्तने गाडी थांबवली. त्या घराकडे पाहत ते म्हणाले, “वह मकान देख रहे हैं? मैं अपने माता-पिता और भाईयों के साथ उसी मकान में किराये से रहता था. नर्गिस जी को ब्याहकर इसी मकान में लाया था!” हे सांगतांना दत्त साहेबांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या. नर्गिसच्या मृत्यूनंतर दहा वर्षांनीही दत्त साहेब तिच्या आठवणीने हल्लक झाले होते.

कालच्या तीन तारखेला नर्गिसची पुण्यतिथी होती. काही माणसं आपल्या झळाळत्या भूतकाळात, अनेक वर्ष काहीही न करता राहतात. पण मागचा झगमगाट मागच्या पांथस्थांसाठी ठेऊन, स्वत: पुढची वाट उजळायला निघतात ती खरी माणसं! अशी माणसं आपल्या हयातीतच ‘किंवदंती’ बनतात, इतिहास घडवतात. नर्गिस त्यातलीच एक!

नर्गिसचं खरं नाव फातिमा रशीद. ती ‘बेबी रानी’ नावाने बालकलाकार म्हणून सिनेमात कामं करायची. तिच्या वयाच्या तेराव्या वर्षी मेहबूब खान यांनी तिला ‘नर्गिस’ हे नाव देऊन ‘तक़दीर’ सिनेमात नायिका म्हणून झळकावलं. ‘राजम्यासारख्या दाताची नायिका’ म्हणून तिच्यावर टीका झाली. ही गोष्ट १९४३ ची. त्यानंतर, आपल्या मुलीवर नाच-गाणं करून जगण्याची वेळ येऊ नये म्हणून जद्दनबाईंनी तिला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं. पण ती १९४७ मधे परत आली आणि ’४८ मधे राज कपूरने तिला ‘आग’साठी अनुबंधित केलं. तिच्या नशिबी ‘कोठ्यावर’चं नाही, पण पडद्यावरचं ‘नाच-गाणं’च होतं!

‘आग’नंतर आपली स्वतंत्र टीम असावी असं राज कपूरला वाटलं आणि नर्गिसची रुजवात आर.के.मधे झाली. आर.के.च्या लोगोवर आणि आरकेच्या मनात तिचं स्थान निर्माण झालं. ती सलग सात वर्षं आरके’ची नायिका होती. ‘बॉबी’मधे दाखवलेली नायक-नायिकेची पहिली भेट ही राज-नर्गिसच्या पहिल्या भेटीवरून हुबेहूब घेतलेली आहे असं म्हणतात. चेहऱ्यावर कमालीची सालस ऋजुता आणि वागण्यात मदभरा उन्मुक्तपणा ही नर्गिसच्या व्यक्तिमत्त्वातली जीवघेणी किमया होती.. धगधगत्या प्रकाशरेषेच्या अलीकडचे आपणच जर इतके जांनिसार होत असू तर त्या रेषेच्या पलीकडच्या लोकांवर तिची किती जादू असेल याची कल्पना येते.

खरं तर नर्गिसचा प्रवेश राजच्या जीवनात झाला तेव्हा राज विवाहित होता. हेमावती नावाच्या एका सुमार नटीशी त्याचं प्रकरण सुरु होतं.. म्हणून पापाजींनी त्याचं लग्न लावलं. (या हेमावतीशी नंतर सप्रूने लग्न केलं.) पण लग्नानंतरही राजच्या सवयी बदलल्या नाहीत. क्रिएटिव्ह माणसाच्या लैंगिक भावना तेजाळ असतात असं न.चिं.केळकर एकदा म्हणाले होते. राज तर टोकाचा क्रिएटिव्ह होता! नर्गिस-राज प्रकरण जेव्हा फार पुढे गेलं तेव्हा कपूर कुटुंबातल्या ज्येष्ठ मंडळींची एक बैठक बोलावली गेली. यात अर्थातच राज, त्याची पत्नी कृष्णा आणि नर्गिस होते. त्या काळात पापा पृथ्वीराज यांचं नाव पृथ्वी थिएटरमधल्या एका अभिनेत्रीशी जोडलं गेलं होतं. (हिची मुलगी अंजू महेंद्रू!) सदर बैठकीत पापाजींनी असा तोडगा दिला की राजने पंधरा दिवस कृष्णाकडे आणि पंधरा दिवस नर्गिसकडे राहावं. सासऱ्यासमोर कधीही तोंड उघडून न बोलणारी कृष्णा म्हणाली, “यही पापाजी भी करें, अगर मम्मीजी को ये मंजूर होगा तो मुझे भी मंजूर है!” बैठक बरखास्त झाली. त्यानंतरही दोघांनी लग्न करायचंच असं ठरवलं. पण ‘द्विभार्याप्रतिबंधक’ कायदा आड आला. त्या काळात नर्गिसने मुंबई स्टेटचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांची भेट घेऊन, ‘आम्हाला या कायद्यातून सवलत द्या,’ अशी विनंती केली होती. अर्थात ती नाही मिळाली.

नर्गिस गृहिणीच्या कुशलतेनं ‘आरके’चा व्याप सांभाळत होती. आरके स्टुडीओची जागा मूळची जद्दनबाईची होती. राज कपूरने ती ‘एक आणा वारावर’ खरेदी केली होती. पण नर्गिसने जेव्हा आरके’च्या संसाराला वाहूनच घेतलं तेव्हा मात्र जद्दनबाई नाराज झाली. हीच नाराजी उरात ठेऊन जद्दनबाईचा इंतेकाल झाला. त्यानंतर नर्गिसला रोखणार कुणी नव्हतं. तिला धड मानधन मिळत नव्हतं, तिचे सिनेमातले कपडे ती शिवायची, पण आपण या कंपनीच्या यजमानीण आहोत असं समजून ती सारं मनापासून करत होती. राजला विचारल्याशिवाय एकही निर्णय घेत नव्हती. याच सुमारास के.आसिफने तिला ‘मुगले आझम’बद्दल विचारलं होतं. पण त्यात दिलीप कुमार आहे म्हणून राजने नकार दिला. मुगले आझम मधुबालाचा झाला. पण नर्गिसने एका शब्दाने तक्रार केली नाही. तिच्यासाठी राजच्या इच्छेपेक्षा मोठं काहीच नव्हतं. बाई अशीच असते, सरळ तर सूत नाहीतर भूत!

त्याच सुमारास तिला दिवस गेले. ती बाळंतपणासाठी परदेशात गेली. झालेली मुलगी आपल्या ‘बेट्टी कपाडिया’ या मैत्रिणीकडे सांभाळायला दिली आणि परत आली. (मुलीच्या बाबतीतला तुमचा अंदाज शंभर टक्के बरोबर आहे!) तोपर्यंत नर्गिसला आरके’मधलं तिचं दिखाऊ, बेगडी रूप जाणवायला लागलं होतं. काळ जाता-जाता तिला शहाणं करत होता.. तिच्या कानावर अनेकदा आलं होतं की, “तवायफों की लडकियों से शादी नहीं की जाती,” असं राज म्हणतो. त्यातच मुगले-आझमच्या यशाने तिच्या जखमेवर मीठ चोळलं.. परदेशातून परत आल्यावर नर्गिसने राजकडे हा विषय काढला. दोघांत जे काही वाद, चर्चा, भांडण झालं असेल ते झालं आणि नर्गिसने तुकडा पाडला! ती आरके’मधून बाहेर पडली.

पुन्हा एकदा मेहबूब खान यांनीच तिला हात दिला. ‘मदर इंडिया’च्या निर्माणाची सुरुवात झाली. त्याच दरम्यान राजने ‘जागते रहो’ बनवला. पूर्ण सिनेमा झाल्यावर तो पाहिला. नर्गिसशिवाय आरके’चा सिनेमा? नर्गिसशिवाय?? त्याने नर्गिसला फोन केला. तिला जुन्या नात्याचा वास्ता दिला, विनंती केली आणि ‘जागते रहो’मधे शेवटचं, अवीट गोडीचं गाणं आलं. रात्रभर तहानलेला राज एका बागेत येतो.. प्रसन्न सकाळ झालेली आहे आणि एक मुलगी झाडांना पाणी देत गाणं गातेय, ‘जागो मोहन प्यारे!’ आणि..

अखेर नर्गिसनं राजला ‘पाणी पाजलं!’

‘जागते रहो’ गाजला, तिथे ‘मदर इंडिया’नेही इतिहास घडवला! दोन्ही चित्रपटांना ‘कार्लो वी वारी’ इथं पुरस्कार जाहीर झाला. तो घ्यायला जातांना दोघांची विमानतळावर भेट झाली. ती शेवटची. … शेवटची? नाही, त्यानंतर दोघं डिम्पलच्या लग्नात भेटले. होय, होय, बेट्टी कपाडियाची मुलगी डिम्पलच्याच लग्नात! आणि मग ऋषी कपूरच्या लग्नात.

राज कपूरचं नर्गिसवर प्रेमच नव्हतं असं नाही म्हणता येत. फक्त ते कितपत होतं आणि त्याची प्रत काय होती, हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. नर्गिस राजशी कायावाचामने एकनिष्ठ राहिली. तिचं प्रेम उच्च प्रतीचं होतं हे तिनं सिद्ध केलं. पण राजने तिचा वापर केला, तिचे वेळोवेळी अपमान केले. आणि हे जेव्हा नर्गिसच्या लक्षात आलं तेव्हा तिनं त्याच्याकडे पाठ फिरवली. त्यानंतर तिनं ‘मदर इडिया’केला. स्वत:ला सिद्ध केलं. ‘राज कपूरशिवाय नर्गिसला अस्तित्व नाही, या समजावर करकरीत लाल फुली ओढली आणि चंदेरी दुनियेला रामराम केला!

नर्गिस मधुबालासारखी अप्रतिम देखणी किंवा मीनाकुमारीसारखी भावप्रवण अभिनेत्री नव्हती. पण तिच्यात ऋजुता होती, ग्रेस होती, ती शिक्षित होती, ती सफाई तिच्या वागण्यात होती, तिचं ‘लीपिंग’ इतकं देखणं होतं की त्यानंतर तसं ‘बोलणारी’ अभिनेत्री हिंदी पडद्याला मिळाली नाही. ती अत्यंत साधी होती. चारचौघींसारखं लग्न करून संसार थाटावा हे तिचं स्वप्न होतं. म्हणूनच तिचं राज कपूरशी लग्न व्हावं म्हणून तिनं जंग-जंग पछाडलं.. पण तो तिच्यामागे तिला ‘तवायफ की बेटी’ म्हणत राहिला. अशा मुलींशी लग्न करायचं नसतं, त्यांना ‘पदरी बाळगायचं असतं’ असं म्हणत राहिला. त्याला सोडून जाण्याचा निर्णय घेतल्यावर ‘मदर इंडिया’ आला.. तो तिचा शेवटचा चित्रपट ठरला. (‘रात और दिन’चा करार त्यापूर्वीच झाला होता.) मदर इंडियाच्या चित्रिकरणादरम्यान लागलेल्या आगीतून दत्त साहेबांनी तिला वाचवलं आणि तिनं त्यांच्याशी लग्न केलं. “उस आग में पुरानी नर्गिस जल गई. दत्त साहेबने जिसे बचाया वो नर्गिस दत्त है” असं ती म्हणायची. चित्रपट कारकीर्दीनंतर नर्गिसने महबूब नसरुल्ला आणि जोहरा अलीयावरजंग या दोन बिनीच्या महिला समाजसेविकांसोबत समाजसेवेचं काम सुरु केलं. ती काही वर्षं ‘इम्पा’ची अध्यक्षा होती. भारत सरकारने तिला ‘पद्मश्री’ दिली, राज्य सभेचं सन्माननीय सदस्यत्व बहाल केलं. ती उत्तम वक्ता होती. राज्यसभेतली तिची काही भाषणं गाजली. सत्यजित रे आपल्या सिनेमांतून भारतातल्या दारिद्रयाचं प्रदर्शन करतात म्हणून तिनं त्यांच्यावर घणाघाती टीका केली होती.

नर्गिस आपल्या जीवनात बऱ्याच कारणांसाठी गाजली. आरके’मधे कोणतीच नायिका इतकी वर्षं टिकली नाही. तिशीच्या आसपास, रूप आणि कलात्मक परिपक्वतेच्या शिखरावर असतांना चित्रपटसृष्टी सोडणारी आणि पुन्हा तिथे वळूनही न पाहणारी नर्गिस ही पहिली अभिनेत्री. नर्गिसनंतर आरके’त आलेल्या प्रत्येक नायिकेसोबत राज कपूरने प्रेम प्रकरण केलं. ते पुन्हा कधीतरी. (खरं तर ते कधीच नाही. मी राज कपूरबद्दल लिहिणं शक्यच नाही!) नर्गिस मात्र दत्त साहेबांचा संसार करत राहिली. तिच्या शेवटच्या आजारात सुनील दत्तने आपल्या मिळकतीतली शेवटची पै देखील खर्च केली. पण नर्गिस गेली! मे महिना सुरु झाला की तिची आठवण येते. प्रियकरावरून जीव ओवाळून टाकण्याचा तिचा गुण राज कपूरने इस्तेमाल केला.. दत्त साहेबांनी तो गुण कलेजे से लावला.. त्याआधीच हा विलक्षण गुण देवाच्या दरबारी रुजू झाला होता, म्हणूनच तर तिच्या आजारपणात हॉस्पिटलला मंदिर समजून त्याभोवती रात्रभर प्रदक्षिणा करणारा नवरा तिला लाभला! हे स्त्री म्हणून तिला मिळालेलं यश! ही घटना ऐकली तेव्हा मला अल्लामा इक़्बाल यांचा तो प्रसिद्ध शे’र आठवला-

हज़ारों साल नर्गिस अपनी बेनूरी पे रोती है.

बड़ी मुश्किल से होता है चमन में दीदावर पैदा.

***************

ती मंगल पांडेची वारसदार होती!

*****

नर्गिसच्या वडलांचं नाव ‘उत्तमचंद मोहनचंद’ होतं. त्यांनी नर्गिसचं नाव ‘निर्मला’ ठेवलं होतं. दत्त साहेबांनी लग्नात हेच नाव तिला परत दिलं होतं. पण नर्गिसचा रक्तसंबंध आईच्या बाजूने थेट मंगल पांडे या पहिल्या स्वातंत्र्य सेनानीशी होता. मंगल पांडेची एका तवायफशी आशिक़ी होती. या संबंधातून एका मुलीचा जन्म झाला. मंगल पांडेची मुलगी! पण तिची आई तवायफ असल्यामुळे ती मुलगी, तिची मुलगी आणि तिचीही मुलगी तवायफच झाल्या. याच रक्त-परंपरेत जद्दनबाईंचा जन्म झाला.

फार कमी लोकांना हे माहित आहे. मी दस्तुरखुद्द सुनील दत्तसाहेबांच्या तोंडून याबद्दल ऐकलंय. ज्यांनी काही वर्षापूर्वी आलेला ‘मंगल पांडे’ हा सिनेमा पाहिलाय, त्यांना मंगल पांडेच्या ‘तवायफ कनेक्शन’बद्दल माहित असेल. त्यात रानी मुखर्जीने ही छोटी भूमिका केली होती!

*******

दिलीप कुमारला डावलून राजला निवडणारी नर्गिस

नर्गिस-राजची आशनाई के.आसिफ, मेहबूब खान आणि दिलीप कुमार या त्रिकुटाला पसंत नव्हती. जद्दनबाईंनी या तिघांना हाताशी घेऊन काहीतरी युक्ती करून नर्गिसला राजपासून सोडवण्याची विनंती केली. त्यानुसार के.आसिफ आणि मेहबूब खान या दोघांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दोघं बुजुर्ग असल्यामुळे नर्गिसने त्यांना तोंडावर काहीच उत्तर दिलं नाही. जाऊन हे राजला सांगितलं. राजने तिला एक युक्ती सुचवली. ती तिनं आसिफ-खान या दोघांना सांगितली. राज, दिलीप आणि हे दोघं नर्गिसच्या घरासमोर म्हणजे मरीन लाईन्स इथल्या ‘शॅटो मरीन’ इमारतीजवळ जमले. नर्गिसच्या हातात दिलीप कुमार आणि राज कपूर या दोघांच्या गाडीच्या चाव्या देण्यात आल्या. तिला सांगितलं, “या दोघांना तू हवी आहेस. तुला जो आवडतो त्याच्या गाडीत जाऊन बस.” नर्गिसने क्षणाचाही विलंब न लावता दिलीप कुमारच्या गाडीची चावी त्याच्या गाडीच्या बॉनेटवर ठेवली आणि ती राजच्या गाडीत जाऊन बसली. राज तिला घेऊन फुर्रर्र झाला!

हा ऐकिवात किस्सा आहे. खरं खोटं ते पाचजण आणि एक ईश्वर जाणो!

******************

(मिथिला सुभाष या नामवंत पटकथाकार व संवाद लेखिका आहेत)

[email protected]

मिथिला सुभाष यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात – मिथिला सुभाष– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleमोदींना हरवायची रीत मला ठाऊक आहे. ~ महुआ मोईत्रा
Next articleविशाखापट्टणम : पूर्वेकडील गोवा
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here