निरोगी चिकनची घरपोच सेवा….अमृता हॅचरीचा अफलातून प्रयोग

-संतोष अरसोड
…………………………………………….

  एखाद्या व्यवसायाला कल्पकतेची जोड दिली की तो व्यवसाय लोकांच्या मनात घर करतो. पाहता पाहता तो व्यवसाय घराघरात पोहोचतो. सुरुवातीला पशुखाद्य व्यवसाय, त्यानंतर हॅचरी व त्यानंतर पोल्ट्रीच्या करार व्यवसायात यश आल्यानंतर आता अमरावतीच्या अमृता हॅचरीने चिकनच्या घरपोच सेवेचा एक अनोखा व्यवसाय सुरू केला आहे. हे चिकन रेसिड्यू फ्री आहे. चिकनच्या व्यवसायातील ही कल्पकता अमरावतीकरांनी उचलून धरली आहे.स्वच्छ वातावरणातील हे चिकन घरपोच मिळत असल्याने चिकनच्या सेंटरवर जाताना होणारी कुचंबणा मात्र थांबली आहे. हा अभिनव प्रयोग सुरू केला आहे “पोल्ट्रीमन” डॉक्टर शरद भारसाकळे यांनी.
डॉक्टर शरद भारसाकळे हे दर्यापूर तालुक्यातील बेलोरा या गावचे. शेती मातीशी नाळ जोडलेला हा डॉक्टर मुळातच नोकरीत न रमणारा. एमव्हीएससीपर्यंतचे शिक्षण असल्याने ५० हजार रुपये महिन्याची नोकरी सहज लागलीअसती.मात्र आकाशाला गवसणी घालण्याची ताकत मनगटात असल्याने नोकरी करण्याचा विचार त्यांच्या मनात आला नाही . पोल्ट्री व्यवसायात करिअर करायचे व लोकांना रोजगार द्यायचा हे त्यांचे स्वप्न होते.त्यामुळे पोल्ट्री व्यवसायातील खाच-खळगे अवगत करण्यासाठी त्यांनी खोपोली येथे १५०० रुपये महिन्याने दोन वर्ष नोकरी केली आणि नवे स्वप्न घेऊन गावाची वाट धरली.
व्यवसायात उतरायचे हा निश्चय ठाम होता. सुरुवातीला पशुखाद्य व्यवसाय करण्याचा दृढ निश्चय झाला. त्यासाठी भांडवल मात्र फारसे जवळ नव्हते. यासाठी त्यांनी सहकारी बँकेचे पंधरा लाख रुपये कर्ज घेतले आणि सन १९९८ ला पशुखाद्य निर्मितीचा प्रकल्प सुरू केला. हा प्रकल्प म्हणजे त्यांचे एक विशाल स्वप्न होते. यासाठी लागणारी मेहनत करण्याची प्रवृत्ती  त्यांच्याजवळ होती. या प्रकल्पातून महिन्याला वीस टन  पशुखाद्य निर्मिती होऊ लागली. हा व्यवसाय अधिक लोकाभिमुख व्हावा म्हणून त्यांनी ग्राहक जोडून मी अभियान हाती घेतले.यासाठी त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली अन पाहता पाहता हा व्यवसाय विदर्भाची सीमारेषा ओलांडून मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये विस्तारित झाला. महिन्याला वीस टन वरून ही निर्मिती पंधराशे टनापर्यंत पोचली. “अमृता हॅचरीज अँड फुड” हे नाव आता सर्वदूर होऊ लागले. यामुळे अनेकांना रोजगार मिळू लागला.
पशुखाद्य निर्मितीच्या या व्यवसायात प्रचंड मेहनत घेतल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास शतगुणित झाला. स्वतःसह  इतरांना रोजगार मिळावा ही  डॉक्टर शरद भारसाकळे यांची तगमग होती. शेती व्यवसायाला पूरक असा कुक्कुटपालनाचा व्यवसाय विदर्भातील शेतकऱ्यांनी सुरु केला तर त्यांच्या आर्थिक उत्पन्नात अधिक भर पडेल या भावनेतून डॉक्टर भारसाकळे यांनी हॅचरी व ब्रीडर फार्म च्या व्यवसायात पदार्पण केले. यातूनच संपूर्ण विदर्भात पोल्ट्रीची करार पद्धती अधिक गतिमान झाली. लोणी टाकळी व बहादुरपूर येथे हे दोन व्यवसाय नव्याने उभे झालेत. सन २०१२ मध्ये या  हॅचरीतून महिन्याला जवळपास सहा लाख पिल्ले तयार होऊ लागली तर ब्रीडर फार्म मधून महिन्याला साडेतीन लाख अंडी उत्पादन होऊ लागले.
पिलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे डॉक्टर भारसाकळे यांनी विदर्भात पोल्ट्रीचे करार पद्धतीने जवळपास ३०० शेतकरी तयार केलेत.या शेतकऱ्यांना पिल्ले, खाद्य, औषधी व इतर मार्गदर्शनासह त्यांनी विक्री व्यवस्थापनाचे धडे दिले. १००० पिलांची बॅच शेतकऱ्यांना जवळपास वीस हजार रुपयांचा निव्वळ नफा देऊ लागली. यामुळे लोकांचा अमृता हॅचरीज वरचा विश्वास दृढ होऊ लागला. आज पोल्ट्री च्या व्यवसायात अमृता हॅचरीज ने आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे.व्यवसाय हा लोकाभिमुख केला की अनेकांच्या रोजगाराच्या वाटा प्रशस्त होतात हेच सूत्र स्वीकारून आता बचत गटांना हातभार लावण्याचा उपक्रम अमृता हॅचरीज ने हाती घेतला आहे. टाटा टाटा ट्रस्टने महिला सक्षमीकरणात अमृता हॅचरीज ला सोबत घेऊन आदिवासीबहुल धारणी तालुक्यात पोल्ट्री शेड उभारून दिले आहे. २० बाय ३२ चेच शेड महिला बचत गटांना देण्यात आलेले आहे. या बचत गटांना ५००  पिल्ले ,खाद्य ,औषधी व मार्गदर्शन अमृता हॅचरीज नित्यनेमाने करीत आहे. सोलर सिस्टम वर हे शेड उभारण्यात आले आहे.आदिवासी महिलांची श्रमा वरील निष्ठा पाहून या पुढचे एक पाऊल म्हणून अमृता हॅचरीज त्यांना चिकन शॉप च्या व्यवसायात उतरवणार आहे.या उपक्रमामुळे आदिवासीबहुल भागात अर्थक्रांतीच्या नव्या वाटा निर्माण करण्यात अमृता हॅचरीज ने पुढाकार घेतला असल्याचे बोलले जात आहे.व्यवसायामधील सातत्य आणि बाजारातील धोके ओळखून अमृता हॅचरीज व श्री कृपा पोल्ट्री फीड ने वाटचाल केल्यामुळे त्यांचा टर्नओव्हर वर्षाला १२५ कोटीच्या जवळपास पोहोचला आहे.
डॉक्टर शरद भारसाखळे हा अत्यंत कल्पक माणूस आहे.नोकरीपेक्षा व्यवसायामध्ये त्यांना प्रचंड रस असल्यामुळेच त्यांच्या वाट्याला हे यश आले आहे. परिश्रमाला कल्पकतेची जोड असली की यशाचे नवे मार्ग दिसतात यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. पशुखाद्य निर्मिती, हॅचरी, ब्रीडर फार्म यांच्या पुढे एक पाऊल टाकत  त्यांनी एक वर्षापूर्वी “घरपोच चिकन “हा नवीन व्यवसाय अमरावती शहरात सुरू केला. “अमृता हॅचरीज अँड फुड्स ” या नावाखाली ही घरपोच चिकन सेवा शहरात सुरू झाली आहे. खरं पाहिलं तर या पद्धतीने हा व्यवसाय करता येऊ शकतो, ही कल्पनाच मुळात भारी आहे. पण डॉक्टर भारसाकळे यांनी ती प्रत्यक्षात उतरवली. बडनेरा, निंभोरा आणि फ्रेजरपुरा या तीन ठिकाणावरून ही घरपोच चिकन सेवा देण्यात येते. या घरपोच चिकन सेवेचे एक खास वैशिष्ट्य आहे, ते असे की हे चिकन “रेसिड्यू फ्री “आहे. हे चिकन नैसर्गिक पद्धतीने तयार केलेले आहे त्यासाठी तीन वेगळे शेड उभारण्यात आले आहे.अँटीबायोटिक्सचा वापर न करता वाढ झालेल्या कोंबडीचे हे मास केवळ १६० रुपये किलोप्रमाणे लोकांना घरपोच देण्यात येते.बाजारातील चिकन आणि या ठिकाणी मिळणारे चिकन यात चवीचा फरक आहे असे डॉक्टर भारसाकळे सांगतात, कारण हे चिकन रेसिड्यू फ्री आहे.
एरवी बाजारातील चिकन सेंटर जवळ स्वच्छतेचा अभाव असतो. त्यात महिलावर्गाला जर चिकन आणावयाचे असेल तर त्या बाजारात जाऊ शकत नाही. नेमकी हीच गरज लक्षात घेऊन ही घरपोच चिकन सेवा सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तुम्ही फोन केल्यानंतर केवळ दीड तासात पॅकिंग करून तुम्हाला घरपोच चिकन पार्सल आणून देण्यात येते. सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत ही सेवा अविरत सुरू असते. ग्राहकांनी जशी ऑर्डर दिली तसेच चिकन पुरविण्यात येते बोनलेस, लेग पिस, विदाऊट कट तुम्ही म्हणाल तसे चिकन पुरविण्यात येते. हे चिकन रेसिड्यू फ्री असल्याने मोठ्या प्रमाणात प्रोटीन मिळते व त्यातून सुदृढ आरोग्य लाभते असा दावा त्यांनी केला आहे.अमरावतीसारख्या शहरात या अफलातून व्यवसायाने ग्राहकांची सोय तर झालीच पण अनेकांना मात्र रोजगारांच्या संधी सुद्धा उपलब्ध झाल्या आहेत. कदाचित विदर्भातील अशा प्रकारचा हा एकमेव व्यवसाय असावा.
(डॉक्टर शरद भारसाकळे 9370154554)

(घरपोच चिकनसाठी संपर्क-८९८३३९९०११/८९८३३९९०२२)

……………………………………………………………………………………………………………….
(लेखक मीडिया वॉच पब्लिकेशनचे कार्यकारी संपादक आहेत)
9623191923
Previous articleमोतीलाल आणि जवाहरलाल
Next articleभारतात परतल्यानंतर …
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.