गोपीनाथ मुंडे यांनी राजकारण करताना पारंपरिक मतदारांसोबतच समाजातील बहुजन , दलित आणि अल्पसंख्याकांनाही सोबत घेतलं . समाजातले सत्तेपासून कायमच वंचित राहिलेले असे विविध गट एकत्र करुन पक्षाचा तोंडवळा बदलवून टाकण्यात मुंडेंना जे यश लाभलं आणि पक्ष विस्तारत गेला आणि त्यांचंही नेतृत्व उजळत गेलं . पंकजा मुंडे मात्र एका विशिष्ट जातीच्याच कळपात तर अडकून पडल्या नाहीत ना ? असा प्रश्न सहाजिकच त्या कार्यकर्त्यांच्या मनात आहेत . पंकजा मुंडे ज्यांचं नाव न घेता ज्यांचा उल्लेख ‘कौरव’ असा करतात त्यांच्या ( पक्षी : देवेंद्र फडणवीस ) नेतृत्वाभोवती पक्षातले केवळ ब्राह्मणच नव्हे तर बहुजन , मागासवर्गीय आणि मराठा नेत्यांचा गोतावळा जमलेला आहे . ( २०१९च्या विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयी १०५ पैकी तब्बल ३७ उमेदवार बहुजन , ३५ मराठा , १८ एस सी / एसटी आणि केवळ ७ ब्राह्मण तसंच अन्य उच्चवर्णीय आहेत ! ) आणि या गोतावळ्याची मोट या कथित ‘कौरवा’ने अशी काही घट्ट बांधली आहे की भारतीय जनता पक्ष विधानसभेतला सर्वांत मोठा पक्ष बनलेला आहे .