या दुस-या दौ-याच्यावेळी जाणवेली बाब म्हणजे १९९० च्या आधी पंतप्रधानांसोबत होणारे पत्रकारांचे परदेश दौरे आणि मनमोहन सिंग यांच्यासोबत झालेला २०१३ मधील रशियाच्या दौ-याच्या स्वरुपात खूप बदल झालेले होते . १९९० पूर्वी संचार आणि संवाद वहनाचं तंत्र भारतात पुरेशा प्रमाणात पोहोचलेलं नव्हतं . इंटरनेट ( म्हणजे माहितीच्या महाजाला )चा स्फोटही भारतात व्हायचा होता . त्या काळात पंतप्रधानांच्या परदेश दौ-याची छायाचित्रे , त्यांच्या कार्यक्रमाचा ‘ऑंखो देखा हाल’ भारतात माध्यमांपर्यंत पोहोचवणं अतिशय कठीण होतं . कारण त्यावेळी आता लुप्त झालेल्या तारे (Telegram) व्यतिरिक्त अन्य पर्याय उपलब्ध नव्हते . पंतप्रधानांसोबत जाणारे पत्रकार काही वृत्तांत तारेने भारतात पाठवत आणि मायदेशी परतल्यावर त्या दौ-यावर आधारित वृत्त मालिका किंवा सविस्तर लेख लिहित . आता कुणाचा पटकन विश्वास बसणार नाही पण , अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होईपर्यंत आपल्या देशातले पंतप्रधान बसलेल्या विमानानं एकदा उड्डाण भरलं की ते कुणाशीही संपर्क साधू शकत नसत , अशी दयनीय परिस्थिती तेव्हा होती . अमेरिका , ब्रिटन , फ्रान्स , रशिया आदी अनेक राष्ट्राच्या प्रमुखांची विमानं सुरक्षा व्यवस्था आणि संदेश वहन या बाबतीत भारताच्या हजार पट पुढे तेव्हा होती आणि आताही आहेत .