खरं तर , बहुसंख्य वेळा या राजद्रोहाच्या ( म्हणजे ‘इन्साइनमेंट टू डिसअॅफेक्शन अक्ट ( १२४ ए , )’ ) हत्याराचा वापर प्रशासनच परस्पर कसं करुन टाकतं आणि आपण ‘राजनिष्ठ’ आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न पोलीस अधिकारी कसा करतात याचा एक स्वानुभव सांगतो . ही घटना घडली तेव्हा ‘लोकसत्ता’च्या नागपुरातून प्रकाशित होणाऱ्या विदर्भ आवृत्तीची सूत्रं मी नुकतीच हाती घेतलेली होती . नागपुरात तत्कालीन पोलीस आयुक्त एस . पी . एस . यादव ते आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त दलबीर भारती या दोघांमध्ये जोरदार शीतयुद्ध सुरु होतं आणि त्याच्या संदर्भातली एक बातमी आमचा तेव्हाचा ज्येष्ठ वार्ताहर मनोज जोशी यानं दिली . अर्थात या संदर्भात त्याने मला पूर्वकल्पना दिलेली होती . मनोज हा ज्येष्ठ पत्रकार शिवाय त्याला कायद्याची चांगली जाणीव होती कारण तो न्यायालयीन वृत्तसंकलन करायचा . शिवाय त्याची भाषाही चांगली ; थोडक्यात त्याची कॉपीही चांगली होती . तरी ‘बातमी काळजीपूर्वक लिही . कारण एक एस. पी . एस . यादव हे कठोर अधिकारी आहेत . औरंगाबादला असताना त्यांनी एक बड्या धेंडाचं डोनेशन प्रकरण कसं सापळा रचून पकडलं होतं आणि ते किती गाजलं होतं’ , अशी त्यांची माहिती मी त्याला दिली .
मात्र ज्येष्ठ पत्रकार विनोद दुवा यांच्या प्रकरणामध्ये काय घडलं होतं हे आपण जाणून घेतलं पाहिजे . विनोद दुवा यांनी एका व्हिडिओद्वारे केलेल्या विश्लेषणात , दहशतवादी हल्ल्यांमध्ये बळी पडलेल्यांच्या सैनिकांच्या हौतात्म्याचा प्रचार करुन केंद्रातील पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप निवडणुकीत मतं मिळवण्याचा प्रयत्न कसा करत आहे , अशा आशयाचं प्रतिपादन केलेलं होतं . त्याचा राग हिमाचल प्रदेशातल्या एका भाजपाच्या स्थानिक नेत्याला आला आणि त्यानी ‘इन्साइनमेंट टू डिसअफेक्शन अॅक्ट , १२४ए’ म्हणजे राजद्रोहाच्या आरोपाखाली विनोद दुवा यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली . राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये भाजपाचं सरकार होतं तेव्हा पोलिसांनी ‘तत्परते’नं गुन्हा दाखल केला ; असा बाटगेपणा दाखवायला पोलिसांना नेहमीच आवडतं . पुढे विनोद दुवा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं . सर्वोच्च न्यायालयाने मात्र या संदर्भामध्ये अतिशय न्याय्य भूमिका घेतली . ही भूमिका गंभीर आणि प्रामाणिक पत्रकारितेला मोठा दिलासा देणारी आहे . ‘सरकारवर केलेली टीका म्हणजे देशावर केलेली टीका नाही आणि तो राजद्रोह तर मुळीच नाही’ , असा निर्वाळा न्यायमूर्तीद्वय ललित आणि सरण यांच्या खंडपीठाने स्पष्टपणे दिला , हे अतिशय महत्त्वाचं आहे .