विश्वासाहर्तेचा मुद्दा संपादकांच्या आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या पत्रकारांच्या सुमार आणि बाजारु वृत्तीचा आहे . पत्रकारितेचे परंपरागत निकष आणि मूल्य खुंटीवर टांगून व्यवस्थापन म्हणजे मालकाला हवं तसं प्रकाशन/प्रक्षेपणाचं धोरण ठरवणं म्हणजे पत्रकारिता झाली आहे . त्यामुळे माध्यमांत बहुसंख्येनं सुमारांची मांदियाळी जमलेली असून पत्रकारितेचा तोल गेला आहे . पूर्वी संपादक अग्रलेख लिहित आता त्यांच्याकडून हवे तसे अग्रलेख लिहून घेतले जातात . पूर्ण लांबीचा अग्रलेख लिहिण्याची क्षमता असणारे संपादक फारच कमी उरले आहेत . अग्रलेख परखड मतप्रदर्शन राहिलेले नसून ‘कथन’ झालेले आहेत . अग्रलेख परत घेण्याचा विक्रमी नीचांक आपल्याच मराठी पत्रकारितेत घडला आहे , इतकं हे अवमूल्यन घनगर्द आहे . व्यवस्थापन म्हणजे मालकाला , न विचारता लिहिलेला अग्रलेख ( त्या संपादकाला न विचारता ) मध्यरात्री काढून टाकण्याचा आणि त्याजागी दुसराच मजकूर टाकण्याची एक ( किस्सा नव्हे तर ) हकिकत मला अवगत आहे ( कारण समाविष्ट केला गेलेला मजकूर माझ्या सदराचा होता !) . बहुसंख्य संपादक कुणा न कुणा राजकारण्याचे प्रवक्ते असल्यासारखे लेखन आणि भाषणं करतांना दिसतात . संपादक नावाच्या संस्थेच्या अवमूल्यनानं इतका निम्न तळ गाठला असल्याचा अनुभव गेल्या चार दशकात कधीच आलेला नव्हता . अशा परिस्थितीत ही संपादक मंडळी मूल्यानिष्ठतेचे आदर्श त्यांच्या सहकाऱ्यांना देतील कसे आणि निर्भीड पत्रकार निर्माण होतील कसे , हा खरा कळीचा मुद्दा आहे .
उत्तम लेख.स्पष्ट शब्दात चपराक
ठेवू हा शब्द तुम्ही ठेऊ असा कसा लिहिता ?
समतोल आणि समर्पक लेखन