प्रश्न ABP चा नाही; ‘माझा’ आहे !

-अतुल विडूळकर

————

‘बांद्रा स्टेशनवरची गर्दी, राहुल कुळकर्णीची बातमी आणि एबीपी माझा’ याविषयी कालपासून खूप लिहिलं जातंय. ते स्वाभाविकच ! त्यामुळे कोण खरं-कोण खोटं, चूक कोण-बरोबर कोण आणि इतर बऱ्याच फॅक्ट आपल्यापुढे आल्या आहेत. अगदी ‘एबीपी माझा’चे संपादक राजीव खांडेकर यांनीही चॅनलची बाजू बाजू मांडली आहे. सरकारकडून देखील ती गर्दी का, कुणी जमवली, याची चौकशी सुरू झालेली आहे. त्यातून सत्य पुढे येईलच.

पण एखाद्या न्यूज चॅनलच्या पत्रकाराने केलेली ही चूक जशी पहिली नाही, तशी ती शेवटची देखील निश्चितच नाही. या घटनेमुळे उद्यापासून सारे चॅनल अत्यंत जबाबदारीने बातम्या देतील, किंवा अनावधानाने देखील संभ्रम निर्माण करणारी बातमी देणार नाहीत, अशी आशा बाळगणं धाडसाचं ठरेल.

चुकीच्या बातम्या देणं किंवा बातमी देण्याची घाई हा मुद्दा आजचा नाही. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचं जे live वार्तांकन सर्व न्यूज चॅनलने केलं होतं, त्याची केवढी किंमत देशाने मोजली होती, ते तुम्ही विसरले असाल तर कालच्या या प्रकरणाचं आयुष्य घटकाभरही नाही, हे लक्षात घ्यायला हवं. २६/११ दरम्यान आलेला अनुभव बघता तत्कालीन सरकारने माध्यमांवर विशेषतः इलेक्ट्रॉनिक चॅनल्सवर सेन्सॉरशिप लादण्याऐवजी त्यांनी स्वतःच आचारसंहिता ठरवून त्याचं पालन करावं, अशी सूचना केली होती. त्यानुसार विविध चॅनल्सने एकत्र येऊन तशी सुरुवात केली देखील. पण त्याचा फारसा परिणाम गेल्या १२ वर्षात दिसला नाही.

इलेक्ट्रॉनिक न्यूज चॅनल्सने स्वतःच आचारसंहिता ठरवावी, हे सरकारने सांगणं म्हणजे सरकारचा चॅनल्सच्या सारासार बुद्धीवर विश्वास होता असं नाही, तर माध्यमांना नियंत्रित करण्याचं धाडस किती महाग पडू शकते आणि सत्ता टिकविण्यासाठी तसं धाडस करायचं नसतं, एवढं शहाणपण कोणत्याही सरकारला असतं. ही बाब एकदा लक्षात घेतली की पुढल्या गोष्टी समजून घेणं नागरिक म्हणून आपल्याला सोपं जातं.

परंतु, कालच्या राहुल कुळकर्णी प्रकरणाच्या निमित्ताने एक वेगळा मुद्दा लक्षात यावा, अशी अपेक्षा आहे. मुळात प्रश्न एबीपीचा आणि इतर सर्वच भाषेतील न्यूज चॅनलचाही नाहीय. प्रश्न तुमचा-आमचा आहे. प्रेक्षक म्हणून तुमच्या-आमच्या मॅच्युरीटीचा आहे.

न्यूज चॅनल फक्त बातम्या देतात का ? तर नाही. न्यूज चॅनल बातम्या देतात, माहिती देतात, अफवाही देतात, आपलं मनोरंजन सुद्धा करतात… इंग्रजीत याला क्रमाने news, information, rumours, entertainment असं म्हणतात. आणि आपण केवळ प्रेक्षक आहोत का, तर ते पण नाही! आपण आहोत गिऱ्हाईक-कस्टमर ! आपण जे बातम्या व्यतिरिक्त बघतो ते असतं Infotainment ! म्हणजे माहिती अधिक मनोरंजन.

नावाला न्यूज चॅनल्स जरी असले तरी किती Non-News Content आपण त्या चॅनलवर बघत असतो, याचा विचार कधी आपल्याला शिवत नाही. इलेक्ट्रॉनिक न्यूज चॅनलचं व्यावसायिक अर्थकारण ‘टीआरपी’भोवती फिरत असतं. म्हणजे एखाद्या वृत्तपत्राच्या किती प्रति खपतात त्यावर जसं त्यांना मिळणाऱ्या जाहिराती अवलंबून असतात तसच इथंही असतं.

टीआरपी भोवती फिरणाऱ्या अर्थकारणाशिवाय आणखी एक अर्थकारण या क्षेत्रात आहे. न्यूज चॅनलचं हे दुसरं अर्थकारण बघितलं तर आपण उघडपणे प्रेक्षक, सुप्तपणे कस्टमर आहोत आणि गुप्तपणे मतदार आहोत. या दृष्टीने विचार केला की न्यूज चॅनल्सवर जे दिसतं त्याचा अर्थ लागतो. तुम्हाला कधी, काय, का, कसे दाखवायचे हे ते अर्थकारण ठरवत असतं.

अर्थकारण हे कारण आहे, राजकारण हा परिणाम !

म्हणून जनतेचं राजकीयीकरण करणं हे अर्थकारणासाठी आवश्यक आहे. आपल्या आतल्या माणसाचा आधी प्रेक्षक करून, मग त्याला गिऱ्हाईक बनवून नन्तर त्याला politicise करणं हे कोणत्याही सत्ताधाऱ्यांची जीवनावश्यक बाब असते. त्यासाठी ‘माध्यम’ हेच माध्यम आहे.

असं करण्यासाठी जे जे काही लागतं ते सर्व ‘बातमी’ हे एक लेबल लावून दाखवलं जात असतं. त्याच्या आत थोडीशी News आणि बरचसं Opinion असतं. आपण त्यात भेद करायला शिकलं पाहिजे. आजच्या बदलत्या राजकीय संस्कृतीमध्ये या दोन्ही गोष्टी इतक्या एकमेकांत मिसळल्या आहेत की एखाद्या निव्वळ बातमीला सुद्धा एक विशिष्ट ‘अँगल’ असल्याचा आपल्याला भास येतो. दुर्दैव असं की बरेचदा हा भास खरा ठरतो. हे भास सातत्याने आपल्या डोक्यात साचत जातात आणि मग एखादा राहुल कुळकर्णी हाती लागला की मग ते भास संतापाच्या मार्गाने बाहेर पडतात.

न्यूज चॅनल्सचा धंदा बरा चालावा यासाठी आपण टीव्ही स्क्रीनपुढं असणं आवश्यक आहे. त्यासाठी बातम्या नसल्याच तर ‘सब से तेज’, ठरण्याच्या नादात स्वर्गात जाणाऱ्या पायऱ्या वगैरे तत्सम स्टोरीज ते आपल्याला दाखवतात. हिंदी न्यूज चॅनल्सचे गायपट्टयातले संपादक, कॉर्पोरेट मालक आणि  North Indian dominated राजकारण यांचा एक खास संबंध आहे.  हा संबंध आपल्याला कधी स्वर्गाच्या पायरीवर घेऊन जात असतो, तर कधी भारत-पाकिस्तान सीमेवर!  ही बाब ती स्टोरी बघताना आपल्या लक्षात येत नसते. आपण टीव्हीसमोर असावं किंवा आपल्यासमोर टीव्ही असावा, याचं जुगाड TRP साठी करावं लागतं.

आपण गिऱ्हाईक आहोत, हे मान्य केलं तरी एक प्रश्न उरतो. ‘टीआरपी’भोवती फिरणारं व्यावसायिक अर्थकारण आणि मालकांच्या विविध अदृश्य लाभाभोवती फिरणारं राजकारण यांच्या ‘युती’मध्ये गिऱ्हाईक म्हणून चांगलं ‘प्रॉडक्ट’ मिळण्याचा वाजवी अधिकार तर कधीच अनंतात विलीन झाला आहे, हे आपल्या लक्षातच येत नाही.

हे सारं अंगवळणी पडल्यानंतर एखाद्या वेळी कालच्यासारखी आपल्याला जाग येते. या निमित्ताने ‘फेसबुक-व्हाट्स अप’वर जे ‘moral policing’ बघायला मिळत आहे, ते तर अदभुत आहे. ते बघून ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ सिनेमात रेल्वे स्टेशनवर दत्त साहेबांचा खिसा कापणाऱ्या नवाजुद्दीन सिद्दीकीला लोक बडवतात आणि त्यावर दत्त साहेबांचे डायलॉग- हा सारा प्रसंग आठवतो.

राहुल कुळकर्णीच्या प्रकरणाने तुम्ही आम्ही अशीच भडास काढून घेत आहोत का, याचा विचार करूया !याचा अर्थ आपला राग, संताप अनाठायी आहे, असं अजिबात नाही. राग स्वाभाविक आहे. पण हा राग जर एक प्रेक्षक म्हणून येत असेल तर एखाद्या न्यूज चॅनलवर चुकीची बातमी-माहिती दाखवली असल्यास  त्या कंटेंटबाबत तक्रार करण्याची सोय आहे, आपण आजपर्यंत अशा किती तक्रारी केल्या आहेत ?

पण एकंदरीत व्यवस्था समजून न घेता ‘पत्रकार’ म्हणून तुमच्यासारखीच ‘नोकरी’ करणाऱ्या माणसाला लगेच गुन्हेगार तरी ठरवू नका. कारण, ही व्यवस्था नेमकी कशी काम करते, ते प्रेक्षक म्हणून तुम्हा-आम्हाला तर जाऊ द्या, पण खुद्द राहुल कुळकर्णीला देखील माहीत असेल की नाही, याबाबत शंकाच आहे.

व्यक्तीच्या निमित्ताने व्यवस्थेचा विचार करण्याची ही वेळ आहे. बातमी निर्माण करणारे (news creators)आणि बातमी देणारे (news casters) यांच्यामध्ये फरक असतो. तो फरक कधीतरी पुढे यावा, इतकंच !

(लेखक ‘मीडिया वॉच’ अनियतकालिक व वेब पोर्टलचे उपसंपादक आहेत)

84088 58561

 

 

:-

Previous articleशिव्यांचे शिरपेच आणि आरोपांची बिरुदं…
Next articleपत्रकारितेवर घोंगावणारं खरं संकट
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.