शिव्यांचे शिरपेच आणि आरोपांची बिरुदं…

– प्रसन्न जोशी

‘एबीपी माझा’चे उस्मानाबाद प्रतिनिधी आणि माझा मित्र राहुल कुलकर्णी यांच्याबाबीत काल झालेला प्रकार सगळ्यांसमोर आहे. त्यांची बातमी आणि त्यावर ‘एपीबी माझा’चे संपादक राजीव खांडेकर यांनी मुद्देसूद दिलेले स्पष्टीकरण आपण पाहिले असेल किंवा अजूनही पाहू शकता. मी त्या सर्व मुद्यांशी सहमत असल्यानं त्यांची पुनरावृत्ती करत नाहीय.

मला वाईट वाटतंय ते नंतर सुरू झालेल्या अजेंडा सेटिंग हेव्या-दाव्यांचं, बड्या पत्रकारांच्या कोतेपणाचं आणि समाज म्हणून असणाऱ्या आपल्या इयत्तेचं. तुम्हाला ‘एपीबी माझा’, राहुल कुलकर्णी कदाचित आवडत नसतीलही पण म्हणून ‘एपीबी माझा’ला ठोका, राहुलला शिव्या घाला… हे करण्याचं रॅशनल काय? कुठेतरी लिहिलं होतं…राहुल उस्मानाबादमधून जगाच्या बातम्या देतो! केवळ दिल्ली हे लोकेशन असल्यानं जसं राष्ट्रीय होता येतं, लंडन-न्यूयॉर्कच्या ऑफिस असल्यानं जशी एखादी वृत्तसंस्था जगाच्या बातम्या देत, आपापला अजेंडा समोर आणते (त्यांचे बातमीदार जगभरात असतात, पण त्यांचा वर्ल्ड व्यू हा त्या देशाचं सॉफ्ट पॉवर पॉलिटिक्स असतं), मुंबई-पुण्याचं असल्यानं जसं महाराष्ट्राचं शहाणपण वागवता येतं अशा नॅरटिव्हला पर्याय म्हणून मग दक्षिणेत मुख्यालय असलेला ‘हिंदू’ पेपर असतो, ‘अल जजीरा’ नवा दृष्टीकोन जगासमोर ठेवतो आणि मग कुणी उस्मानाबादचा राहुल कुलकर्णी(सुद्धा) मेनस्ट्रीम मीडियात मोठा होतो. आता ही साखळी आणखी मागे न्यायची असते. राहुल कुलकर्णी, मी व्यक्तिश: आणि ‘एपीबी माझा’च्या असंख्य आजी-माजी पत्रकारांना आमचे संपादक राजीव खांडेकरांनी उभं केलं.

हे करताना त्यांचा इगो कधी आडवा आला नाही. आमच्या परोक्ष राजीव खांडेकरांनी किती वार आमच्यापर्यंत पोहोचूच दिले नाहीत त्याची गणना नाही. या अशा संस्थेला आणि संपादकांना बोल लावणारेही कधीकाळी याच मांडवातून गेले, राहुलच्या निमित्तानं चॅनेल आणि संपादकांवर ही मंडळी निरर्गल तोंड धुवून घेतायत (जसं हात धुवून घेणं हा वाकप्रचार आहे तसंच). यातील एक गोंडस-हसऱ्या पत्रकारानं तर माझे व संपादकांचे मोबोईल क्रमांक अ.भा. ट्रोल परिषदेच्या कार्यकर्त्यांना पुरवले होते. असो. आज राहुलला उघड शिव्या घालणाऱ्यांपेक्षा अशांची घृणा मला अधिक वाटते. गळे काढणं आणि मतप्रदर्शन करणं यातला फरक सध्या एका बड्या पत्रकाराला समजत नसल्यानं त्यांनी ‘एपीबी माझा’ व राजीव खांडेकर, राहुल यांना प्रचंड टार्गेट केलंय. त्यांना शक्य असतं तर त्यांनी स्वत:चाच एक सदस्यीय आयोग नेमून आम्हाला सुळावर चढवलंही असतं. आपल्या ग्रामीण पत्रकाराची ‘रामनाथ गोएंका पुरस्कारा’साठी निवड झालेली स्टोरी दाबणारे, जेव्हा खांडेकरांना आणि ग्रामीण पत्रकार हे बिरुद अभिमानानं लावणाऱ्या राहुलवर खाऊ की गिळू पद्धतीनं मॅक्स फुत्कार सोडतात, तेव्हा ही बातमी दिली नसती तरी हा माणूस असाच वागणारा आहे याची खात्री पटते. आणखी एका ‘सर्कल’मधल्या पत्रकारानं तर ‘खांडेकरांनी राजीनामा द्यावा’ वगैरे हास्यास्पद, बालिश मागणी केलीय. अरे बाबा, अशा कसोटीच्या प्रसंगी संपादकानं खिंड लढवायची की राजीनामे द्यायचे? म्हणजे बातमी चुकीची, वांद्र्यांत गर्दी या बातमीमुळेच झाली वगैरे तुम्ही ठरवून टाकलंत देखिल? वर हे लोक्स अभिव्यक्ती, डिसेंट वगैरेच्या नावानं गळे काढणार!

वेळोवेळी छावण्या बदललेले विचारवंतही तोंड सुख घेतायत. माझ्या एका सहकाऱ्याच्या पोस्टवर राहुलची जात काढण्याचे प्रयत्न त्यांनी केलेत. छाटछूट ट्रोल्सकडून जात काढली जाते तेव्हा त्याची दखलही घ्यावीशी वाटत नाही, मात्र महात्मा फुले, राजर्षी शाहु महाराज, डॉ. आंबेडकरांचे विचार यात हयात घालवलेल्या या माणसानं, बहुजन, शेतकरी वर्ग आणि ग्रामीण भागातच ज्यानं पत्रकारिता केलीय, ज्याचा सन्मान डॉ. बाबा आढाव यांच्या हातून होतो (हा उल्लेख यासाठी महत्वाचा की बाबा जातीचे पुरोगामी आणि पुरोगाम्यांच्या जाती ओळखूनही आहेत आणि तोंडावर सुनवायलाही कमी करत नाहीत) त्या राहुलचं मोल एका झटक्यात जातीनं करावं याचं वैषम्य वाटलं. या माणसाशी माझे व्यक्तिगत संबंध असून माझ्याकडेही ते इतकी वर्ष असंच पाहात आलेत का? अशी शंका उपस्थित होते.

बाकी ट्रोलिंग, ट्रोलर्स ‘एपीबी माझा’ला, राजीव खांडेकरांना, राहुलला किंवा मला नवे नाहीत. पत्रकाराच्या पेशात सत्काराच्या हार-तुरे, सन्मानाच्या-पुरस्कारांच्या स्मृतीचिन्हांपेक्षा मानसिक आणि कधी-कधी शारीरिकदृष्ट्या रक्तबंबाळ करणाऱ्या घावांचे सन्मान देखणे असतात.

‘अजातशत्रू म्हणजे गांडू’ असं प्रबोधनकार ठाकरे म्हणत, असा किस्सा एके ठिकाणी राज ठाकरे यांनी सांगितला होता. पत्रकारालाही ही व्याख्या लागू होते असं मला वाटतं. तेव्हा, शिव्यांचे शिरपेच आणि आरोपांची बिरूदं आम्हाला मिळत असतील, आमच्या मुळातही नसलेल्या कुसळाचं मुसळ करून बेताल आरोपांनी कुटत बसल्यानं कुणाला उखळ पांढरं होणारसं वाटत असेल तर त्यांना शुभेच्छा….आम्ही योग्य मार्गावर आहोत याचीच पोचपावती तुम्ही देताय, कारण….

…आम्ही अजातशत्रू नाही….आम्ही आहोत…. ‘एबीपी माझा’!

(लेखक ‘एबीपी माझा’ त वरिष्ठ निर्माता आहेत)

Previous articleजे चुकलं ते चुकलं आणि जे योग्य ते योग्य म्हणायची वेळ आलेली आहे
Next articleप्रश्न ABP चा नाही; ‘माझा’ आहे !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.