परमसुंदरी… फुलझडी- ‘मीमी’

-सीमा बक्षी ,अकोला

“कुणीतरी येणार येणार ग” किंवा “ये सपना तेरा होगा” आणि “तभी तो चंचल है तेरे नैना” अशा प्रकारच्या शब्दांचा आधार घेऊन गर्भवती नायिकेच्या मनातील भावना आतापर्यंत अनेक गीतकारांनी विविधांगानी पडद्यावर उमटवल्या आहेत. अभिजित भट्टाचार्यांनी मात्र ‘मीमी’ या चित्रपटातून एक वेगळीच शब्दांची किमया साधली आहे. सरोगेटेड गर्भवती नायिका पडद्यावर मैत्रिणीसोबत नृत्य, दंगा-मस्ती करते आणि पार्श्वभूमीवर शिल्पा रावचा दमदार आवाज ए आर रेहमानच्या संगीत रचनेसह घुमतो आणि गर्भवतीचे मूड स्विंगज् बरोबर पकडतो.

फुलझड़ियों
अरी फुलझड़ियों
कसम से हुआ रे
हाल तेरा अटपटा II

 शेयर बाज़ार की तरह क्यूँ
पारा यह तेरा चढ़ता उतरता है
कभी तू ईमली को तरसती है
तो कभी दिल मिर्च पे मरता है II

पारो है देवदास की तू
फुलझड़ियों
और कभी चंद्रमुखी तू II

आजपर्यंत बऱ्याच खान, कुमार किंवा रोशन मंडळींनी कितीतरी चित्रपटांद्वारे त्यांना नायिकांची गरज नाही हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला पण “जमाना बदल गया अब” हे साधरण:ता २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डर्टी पिक्चर’ मधून विद्या बालनने सिद्ध केले. याशिवाय तापसी पन्नो हिने ‘थप्पड’द्वारे, श्रीदेवीने ‘मॉम’मध्ये, भूमी पेडणेकरने ‘दम लगाके हैशा… तर राधिका आपटेने तिच्या समर्थ अभिनयाने पेललेला ‘पार्चड’, ‘छपाक’ मधील दीपिका पादुकोन…. कितीतरी मोठी यादी आहे यामध्ये ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ मधील रत्ना पाठकला विसरून चालणार नाही.

आता लक्ष्मण उटेकर ह्यांनी कृती सेनान ह्या  त्यांच्या नायिकेला  सशक्तपणे पडद्यावर सादर करून वरील नामवंत नायिकांच्या मांदियाळीत तिला स्थान प्राप्त करून दिले आहे.  हे ‘पानिपत’ या चित्रपटानंतर ‘मीमी’ मधील तिच्या दमदार व्यक्तिरेखेने दर्शविले आहे.  कृतीच्या व्यक्तिरेखेचे नाव आहे मीमी! राजस्थानी ग्रामीण पार्श्वभूमी या चित्रपटाला लाभली आहे. मीमीला मुंबईला जाऊन हिरोईन व्हायचे आहे. तिच्या संघर्षात तिच्या कुटुंबाचा सुद्धा तेवढाच भावनिक सहभाग आहे.

चित्रपटाची कथा सरोगसीभोवती फिरताना दिसत आहे. एक काळ होता जेव्हा भारतात सरोगेसी हा व्यवसाय झाल्यासारखी स्थिती होती . ‘मीमी’ चित्रपटात हाच मुद्दा दिग्दर्शकाने उचलून धरला आहे. याआधी मराठीमध्ये चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचं नाव होतं ‘मला आई व्हायचं आहे’…  ‘मला आई व्हायचं आहे’ चित्रपट पूर्णपणे भावनिक होता. पण ‘मीमी’ चित्रपटात मनोरंजनाची मेजवानी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

राजस्थानी कुटुंबात वाढलेल्या मीमीला मुंबईला जाऊन हिरोईन होण्यासाठी पोर्टफोलिओ तयार करायचा आहे. त्यासाठी जी रक्कम लागणार आहे  ती आवाक्याबाहेर असल्याने ती आर्थिक तजवीज करण्याची धडपड करते आणि हीच ती वेळ….हाच तो क्षण असल्यासारखा टॅक्सी ड्रायव्हर भानू जणू काही अल्लादिनचा जीन बनून येतो.  मीमीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी भानूचा मार्ग वास्तविक या अल्लड, स्वप्नाळू , स्वच्छंदी कुमारीकेसाठी केवळ अवघडच नव्हे तर दुष्कर असतो. त्यांच्यातील एवढ्या गंभीर विषयावरची चर्चा काहीशी अशी होते…

पंकज त्रिपाठी : मां और बच्चों का रिस्ता न दुनिया का सबसे पवित्र का रिस्ता होता है….बच्चे को कोख में पालना दुनिया का सबसे महान काम होता है…मेरा बस चले ना तो मैं भी पल लूं…

कृती सेनन : और पैदा कहा से करोगे…पिछे से

पंकज त्रिपाठी : इसको बोलते हैं… सरोगेसी…

कृती सेनन: किसके जैसी

पंकज त्रिपाठी : पेट आपका और बच्चा उनका

भानू जेव्हा तिला डॉक्टरकडे घेऊन जातो तेव्हासुद्धा असेच विनोदी संवाद साधले आहेत.

कृती सेनन : मेरा फिगर तो खराब नहीं होगा ना?
पंकज त्रिपाठी: ….नहीं…
कृती सनोन : तू कर चुका है?
पंकज त्रिपाठी: ..नहीं…
डॉक्टर: शिल्पा शेट्टी का फिगर खराब हुआ क्या?

   पण ही चंचल, अवखळ युवती भविष्यातील दुष्परिणामांचा विशेष विचार न करता भानूने सांगितलेल्या विदेशी जोडप्याच्या  सरोगसीला होकार देते. नऊ महिन्यांचं गर्भारपण, आई , ममता या भावना तिच्यासाठी पूर्णपणे अनभिज्ञ आहे.  तिला त्यामध्ये एवढीच एक सोय वाटते की कोणत्याही परपुरुषाचा स्पर्शही न होऊ देता बाळाला जन्म द्यायचा आहे. पंकज त्रिपाठीच्या भाषेत सांगायचे तर, “खाद और बीज किसी और के बस मीमी को अपना किराये का खेत देना है” विदेशी जोडपं आणि मीमी यांमध्ये भानूच्या साक्षीने सगळे तोंडी तह-करार होतात. आपल्याकडे सरोगासिविषयी अजूनही स्पष्टता नाही आणि सरोगसी स्वीकारणाऱ्या ग्रामीण युवतींचे त्याविषयी असणारे अज्ञान हे अचूक टिपले आहे.

 एका मुस्लीम मैत्रिणीच्या मदतीने मीमी आपले  गर्भारपण जपत असते. एकदा का बाळंतपण झाले की सुटलो आपण !  मग आपण आणि आपली फिल्मी दुनिया एवढी तटस्थता तिच्यात असते  आणि अचानक या विदेशी जोडप्याला काही वैद्यकीय चाचण्यांतून कळते  की होणारं बाळ विकलांग आहे. त्यांचा अपेक्षाभंग होतो. आपण सरोगसी साठी निवडलेल्या हसऱ्या, प्रसन्न मुलीला दु:खाच्या गर्तेत लोटून हे जोडपं विदेशी निघून जातं. आणि इथेच खरा चित्रपट सुरु होतो. आतापर्यंत आपल्या मुस्लीम मैत्रिणीच्या मदतीने बुरखा ओढून तिच्या मोहल्ल्यात राहणारी मीमी बुरखा फेकून  आपले पोट सांभाळत सैरभैर फिरते… तिची उद्ध्वस्त मनःस्थिती बघवत नाही. आता तिला आई वडिलांकडे येण्याशिवाय पर्याय उरत नाही. या ठिकाणी सुद्धा गीतकाराचे शब्द आणि ए आर रेहमानचे संगीत यशस्वीपणे प्रेक्षकाच्या मनावर गरुड करतात…. नकळत गालावर अश्रू ओघळतात.

कौन समझे दर्द तेरे

कौन तुझको रिहाई दे

क्यु तेरी ख्वाहिशे खतम हुई

शौक तेरे दराजों में कैद हुए

आपल्या स्वप्नांना मूठमाती देणारी मीमी सरोगसी मात्र जीवापाड वाचवते आणि इथूनच चित्रपट प्रत्येक प्रसंगागणिक क्लायमेक्सपर्यंत दर्जेदार होत जातो.  या चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे संवाद लेखन. भावूक प्रसंगांना एक सुंदर विनोदी झालर लावल्याने बऱ्याच प्रसंगी सुखदुःखाच्या अश्रूंचा मिलाप होऊन मौल्यवान क्षण कॅमेऱ्यात पकडले जातात. पंकज त्रिपाठीचा अभिनय बघतांना तर असे वाटते की जणू काही ह्यांना डोळ्यसमोर ठेवूनच संवाद लेखन केले की काय ? मीमीच्या आई वडिलांसारखेच आपलेही असावे असे कोणालाही हेवा वाटावा , असे ते तिला पाठिंबा देत असतात. मनोज बहावा आणि सुप्रिया पाठक ह्यांनी आपल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. सई ताम्हनकरची भूमिका बघतांना राजेश  खन्नाचा संवाद आठवत राहतो “जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नही” तसेच भूमिका स्मरणात राहणारी असावी, लांब नसेल तरी चालेल. सई ताम्हणकर स्मरणात राहते. कृती सेनानचा तर  या चित्रपटातून कायापालट झालेला बघयला मिळतो “परमसुंदरी” या गाण्यातून कामुक आणि दर्जाहीन भावमुद्रा दर्शविणाऱ्या कृतीने बाळंत होतांना वेदनापूर्ण अभिनयाचे जे समर्थ प्रदर्शन केले आहे ते प्रेक्षकाच्या अंगावर काटा आणणारं आहे. उन्नीस-बीस असा उल्लेख असेल तर तिने इक्कीस आकडा गाठला आहे. मग त्रिपाठी साहेबांसामावेत एखादे दृश्य असो , सईबरोबर बुरखाधरी मीमीचा वावर असो किंवा मात्यापित्यासमोर चुरचुर झालेल्या स्वप्नांची मिरवणूक असो.

हं काही गोष्टी खटकतात, त्या म्हणजे नायिकेची भाषा कधी राजस्थानी ग्रामीण तर कधी हिंदी आहे शिवाय आई-वडील आपल्या मुलीला कधीच कोणत्याही प्रकारे समज देत नाहीत  तसेच एकाच गावात राहून मीमी गर्भवती आहे, याचा कुणालाच थांगपत्ता कसा लागत नाही.

मनोरंजनविश्वात सध्या एक तर जोरजोरात बोलून हसायला लावणारे विनोद आहेत किंवा पार्श्वभूमीला उगाच हसण्याचे आवाज टाकून बळेच हसायला लावणाऱ्या रीळ आहेत. पण असे अवास्तव काहीही न करता शब्दातून आणि अभिनयातून निर्माण होणारा विनोद हेच चित्रपटाचे बलस्थान आहे.

एक अल्लड, अवखळ मुलगी जेव्हा सरोगसीचा भार पेलण्याचा निर्णय घेते पण तिच्यातील धीरगंभीर, निर्णायक आई काय ठरवते ? जन्माला आलेलं बाळ खरंच विकलांग आहे का? ते विदेशी जोडपं परत येतं का? बाळ कुणाला मिळतं?  या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.

लक्ष्मण उटेकारांचं लेखन आणि दिग्दर्शन खिळवून ठेवणारं आहे. रोहन शंकरचे संवाद मनांत घर करून राहतात. आणि ए आर रेहमान नेहमीप्रमाणे उत्तssssमच!

ओटीटी वर चित्रपट बघितल्याने दिवाणखान्यातून शयनगृहाकडे जाताना मीमीचे स्वगत मनात रेंगाळते.

कभी ना कभी तुझे मंझिल की तरफ चलना छोडकर

गहरी सास भरकर बस कुद जाना चहिए

डर लगेगा तुझे

पंख फडफडाएगी

तुझे लगेगा तू कर नही पाएगी

पर उडने के अलावा कोई रास्ता नही होगा ना मेरी मीमी

तू उडना सिख जाएगी I

९३७०२६०५९१

 

 

Previous articleभाऊ…
Next articleश्याम देशपांडे नावाचा  बुकमार्क…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

2 COMMENTS

  1. सीमा बक्षी, अकोला यांनी “मीमी” चित्रपटाचे फार सुरेख रसग्रहण / विवेचन/विश्लेषण केलेले आहे. खुप आवडले. 🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here