श्याम देशपांडे नावाचा  बुकमार्क…

प्रवीण बर्दापूरकर

प्रतिभावंत नाटककार आणि ललित लेखक महेश एलकुंचवार यांच्या ‘नेक्रोपोलीस’ या लेखात to join the majority हा शब्दप्रयोग वाचनात आला होता . ‘मरणे’ असा त्याचा अर्थ . या विश्वात हयात  असणाऱ्यांपेक्षा मृतांची ( मृतात्म्यांची म्हटल तरी चालेल ) संख्या जास्त असते म्हणून मरणाऱ्याने जिथे  बहुसंख्य आहेत त्या जगात  प्रवेश केला , असं मानलं जातं . याचा अर्थ ‘स्वामी’ श्याम देशपांडे खूप लोकांच्या सहवासात गेला  असून तिथेही तो ग्रंथ प्रसारचं काम आजवरच्या उत्साह , निष्ठा आणि निरलसपणे चालू ठेवेल यात शंका नाही ; अशी स्वत:च्या मनांची समजूत घातली म्हणून काही श्यामच्या मृत्यूचं समर्थन होणार नाही . कारण आजवरच्या माझ्या तरी साडे-सहापेक्षा जास्त दशकांच्या   जगण्यात इतका सज्जन तसंच  निरपेक्ष वृत्तीचा माणूस पाहण्यात आलेला नाही आणि आयुष्याच्या सांजपर्वातही असा दुसरा ‘स्वामी’ श्याम देशपांडे भेटणार नाही , ही जाणीव अखेरचा श्वास घेईपर्यंत मन कुरतडत राहील .

हा मजकूर प्रकाशित असताना श्याम देशपांडे याच्या निधनाला आठ दिवस झालेले असतील . श्याम कोण होता ? तर तो काही ख्यातकीर्त लेखक , कलावंत , गायक , गेला बाजार काळे धन जमा करुन दानशूर बनलेला धनवान किंवा बाजार राजकीय नेताही नव्हता तर , तो एक मध्यमवर्गीय सकाळच्या वरणाला संध्याकाळी फोडणी देऊन खाणारा , साधं , सरळ जीवन जगणारा पण , मनात कुणाच्याही विषयी द्वेष , आकस , सूडबुद्धी नसणारा , कुणाशीही स्पर्धा नसणारा आणि सामाजिक जाणिवांच्या बाबतीत एक हळवा माणूस होता ; हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं म्हणजे , तो अव्यभिचारी ग्रंथप्रेमी होता . ग्रंथप्रसार हा त्याचा ध्यास आणि वाचन संस्कृती वैपुल्याने फुलत जावी हा त्याचा श्वास होता . वाचन संस्कृतीच्या प्रसारासाठी श्याम एक सळसळती चळवळ झालेला होता ; त्यात तो आकंठ बुडालेला होता . खरंच  सांगा , इतकी सारी गुणवैशिष्ट्ये असणारा दुसरा कुणी माणूस पाहण्यात आहे

गेल्या चाळीसपेक्षा जास्त वर्षांचं आमचं मैत्र श्यामने १४ ऑगस्टला एकतर्फी संपुष्टात आणलं . माझ्याइतकीच त्याची माझी बेगम मंगलाशी मैत्री होती आणि तिच्या मृत्यूशी  सुरु असलेल्या प्रदीर्घ अशा प्रवासात आमच्या कुटुंबियाच्यापाठी श्याम मूकपणे व ठामपणे उभा होता . श्यामशी माझं नातं अजून एक आहे आणि ते आहे लेखनाचं . मी पत्रकारितेत आलो १९७७ साली . राजकीय वृत्तसंकलनाच्या क्षेत्रात आलो ते माधवराव गडकरींमुळे १९८४ साली आणि मग राजकीय वृत्तसंकलनाच्या त्या अवाढव्य उलाढालीत आकंठ बुडालो . मी त्या बाहेर यावं म्हणजे , बातमीच्या बाहेर यावं आणि अन्य लिखाण करावं यासाठी बेगम आणि श्याम यांनी ( वैताग यावा इतकं ) टुमणं लावलं . त्यासाठी क्वचित माझा त्रागाही सहन केला . या दोघांमुळे मी लिहिता झालो त्यालाही आता सुमारे दोन दशकं होतायेत . माझ्या लेखनाच्या निर्मितीचे सूत्रधार असलेले बेगम मंगला आणि श्याम हे दोघंही आता या जगात नाहीत… अर्थातच , श्याम माझ्या लेखनाचा कट्टर वाचक आणि सौम्य समीक्षक होता  . ‘xxxx नाही आवडलं रे’ अशा शब्दात तो त्याची नाराजी गंभीरपणे  व्यक्त करत असे  . मीही तेवढ्याच गंभीरपणे ऐकून घेतल्याचं दर्शवायचो  , मग श्यामला बरं वाटायचं  .

श्यामच्या अविश्वसनीय  मृत्यूची बातमी आल्यावर सहाजिकच मन सैरभैर झालं , अगदी नकळत अश्रू अनावर झाले . हे दोस्तयार डॉ . मिलिंद देशपांडे चांगलं ओळखून होता. म्हणूनच  १४ ऑगस्टची संध्याकाळ आणि रात्र मी एकटं राहू नये असा त्याचा स्वाभाविक आग्रह होता . मी त्याला म्हटलं , ‘अशात , हा सांजवेळीचा एकांतही सवयीचा झाला आहे . कारण मी एकटा नसतो . बेगम असो का श्याम त्यांच्यासह जगणाऱ्याची लय बिघडवणाऱ्या अनेकांच्या अनेक जीवाभावाच्या आठवणी सोबतीला असतात . कविवर्य ग्रेस यांच्या शैलीत सांगायचं तर ‘छिनाल संध्याकाळी गतकातर आठवणींचे पेटलेले मंद  दिवे शोकांच्या उदासीवर मंद फुंकर घालतात .

श्याम विषयी गेल्याच वर्षी एक मजकूर २० ऑक्टोबर २०१९ रोजी मी  लिहिला होता . त्यात आमच्या मैत्री पर्वाबद्दल आलेलं आहे . तो आणि हा मजकूर वाचल्यावर ‘स्वामी श्यामराव देशपांडे , ‘राजहंस’वाले सद्गुणांचा पुतळा होता , असं मी म्हणतोय असा गैरसमज कृपया कुणीही करुन घेऊ नये . तो माणसासारखा माणूस होता . उतावीळ होणं ,  ओंजळीतला दिवा विझू नये इतक्या कटाक्षानं  प्रकृतीची काळजी घेणं , हा त्याचा स्थायीभाव झालेला होता . त्याला समोरच्याचा अनेकदा राग येई . तो अनेकदा ( नाहक ) अस्वस्थही होत असे . पाच-साडेपाच वर्षांपूर्वी एका ओल्या गच्च संध्याकाळी गप्पा मारत असताना मित्र वर्तुळातील एकाने हेटाळणीयुक्त ‘पुस्तकविक्या’ अशा केलेल्या उल्लेखामुळे श्याम खूप व्यथित झाला होता ; हे सांगताना त्यांचे डोळे त्याच्या नकळत  गद्दार झालेले होते . खरं तर , शब्दांवरच्या अकृत्रिम प्रेमामुळे त्यानं  चांगली नोकरी सोडून जाणीवपूर्वक पुस्तक विक्रेत्याचा मार्ग निवडला होता . श्यामच्या डोळ्यांत आलेले अश्रू अंगावर शहारा उमटवणारे होते , पण दोन दिवसांनी त्याच  मित्राला हवं ते पुस्तक मिळवून देण्यासाठी श्यामची धडपड पाहिली आणि श्याम किती , सज्जन , निरागस , अनाकस वृत्तीचा माणूस आहे याची खात्री पटली , अशी माणसं दुर्मीळच  !

श्याम  लोकशाहीवादी होता . सामाजिक समतेवर त्याची श्रद्धा होती तरी त्याच्याभोवती विविध जाती-उपजाती-पोटजाती-पोटपोट जाती , धर्म आणि राजकीय विचाराचे लोक जमा झालेले होते . ही मांदियाळी हे श्यामच्या आजवरच्या ग्रंथ असोशीच्या व्रताला आलेलं फळं होतं . इतकं चांगल राहाणं आपल्याला काही जमणार नाही . म्हणूनच कोणतीही औपचारिकता , विधी , अवडंबर , पदमोह नसलेला मित्रांच्या हृदयातला , श्याम देशपांडे हा ‘स्वामी’ होता . त्याचं हे स्थान त्याच्या मित्रांच्या मनात अबाधित राहील .

पुस्तकात वाचनाची खूण म्हणून एक बुकमार्क ठेवलेला असतो . स्वामी उपाख्य श्याम उपाख्य श्यामराव देशपांडे , ‘राजहंस’वाले , औरंगाबादकर हा एक दोस्त म्हणून माझ्या जगण्यातला बुकमार्क आहे !

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)
९८२२० ५५७९९

…………………………………………………………………………………………

प्रवीण बर्दापूरकर  यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –प्रवीण बर्दापूरकर – type करा आणि Search वर क्लिक करा.