-विजय चोरमारे
शरद पवार हे देशाच्या राजकारणात सक्रीय असलेले सर्वात बुजूर्ग नेते आहेत. त्यांच्या समकालीन असलेला एकही नेता आज राष्ट्रीय पातळीवर सक्रीय नाही. त्याचमुळे देशाच्या पातळीवर कोणत्याही महत्त्वाच्या विषयावेळी पवार यांचे नाव प्राधान्याने पुढे येत असते. राजकारणापलीकडे सर्व पक्षांमधील नेत्यांशी असलेले व्यक्तिगत जिव्हाळ्याचे संबंध ही बाब पवारांच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक व्यापक बनवणारी ठरते. असा नेता जेव्हा आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतो तेव्हा त्यासंदर्भात विविध दृष्टिकोनातून विश्लेषण होणे किंवा प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक आहे. पवार यांच्या घोषणेनंतर ज्या प्रतिक्रिया उटमल्या आहेत किंवा राष्ट्रीय पातळीवरील प्रसारमाध्यमांनी त्याची दखल घेतली आहे, त्यावरून त्यांचे महत्त्व अधोरेखित होते. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही काळामध्ये अनेक नाट्यमय घटना-घडामोडी घडताहेत. भविष्यातील काही घटनांकडे महाराष्ट्राचे आणि देशाचेही लक्ष लागून राहिले आहे. अशा पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपद सोडण्याची घोषणा केल्यामुळे त्याचे विविध अंगांनी विश्लेषण होणे स्वाभाविक आहे. परंतु हे विश्लेषण फक्त राजकीय परिप्रेक्ष्यातच होत असल्यामुळे ते परिपूर्ण ठरत नाही.
शरद पवार यांचे वय आहे ८३ वर्षे. राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपेल तेव्हा ते ८६ वर्षांचे असतील आणि त्यानंतर ते राजकारणातून अधिकृतपणे निवृत्त होतील, असे आताच्या घडामोडींवरून दिसते. पक्षाध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा करण्यासंदर्भात जारी केलेल्या पत्रकात त्यांनी उल्लेख केल्यानुसार त्यांची राजकीय कारकीर्द एक मे १९६० रोजी सुरू झाली. याचा अर्थ गेली ६३ वर्षे ते राजकारणात सक्रीय आहेत. त्यातही पुन्हा अन्य नेत्यांची राजकारणातील सक्रीयता आणि शरद पवार यांची सक्रीयता यात जमीन अस्मानाचे अंतर असते. तुलनेसाठी कोणत्याही नेत्याचे उदाहरण घेतले तरी शरद पवार यांच्याप्रमाणे पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि देशपातळीवर काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत भ्रमंती करणारा दुसरा नेता आढळणार नाही. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांचे सहा महिन्यांपूर्वी निधन झाले. गेल्याच आठवड्यात शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाशसिंह बादल यांचे निधन झाले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी शरद पवार त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिले होते. दिल्लीच्या राजकारणात दीर्घकाळ ज्यांच्याशी संवाद राहिला अशा नेत्यांची साथ सुटत असताना त्यांच्या मनात ज्या भावना निर्माण झाल्या असतील, त्याची कल्पना करणेही कठीण आहे. आता दिल्लीच्या राजकारणात पवार यांच्या बरोबरीचे कुणी उरलेले नाही, अशावेळी त्यांचा जीव दिल्लीत गुदमरत नसेलच असे नाही. पक्षाध्यक्षपदावरून बाजूला होत असले तरी ते राजकारणातून बाहेर जात नाहीत. त्यांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत आणखी तीन वर्षे आहे. तोपर्यंत त्यांची नाळ दिल्लीच्या राजकारणाशी राहणारच आहे. राष्ट्रीय पातळीवरील चर्चा, घडामोडींमध्य ते सक्रीय राहणारच आहेत. परंतु पक्षाध्यक्षपदामुळे येणारा अतिरिक्त ताण आता त्यांना नकोसा वाटत असल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. त्याचमुळे राजकारण वजा करून पवारांच्या निर्णयाकडे पाहिले तर त्याचा अर्थ अधिक स्वच्छपणे समोर येईल.
गेली ६३ वर्षे शरद पवार न थकता भ्रमंती करताहेत. बसताहेत. उठताहेत. चालताहेत. धावताहेत. ८३ वर्षांच्या माणसानं कितीदा उठावं बसावं, किती चालावं, एका जागी उभं राहून किती बोलावं, दिवसातून किती कार्यक्रमांना हजेरी लावावी, किती बैठका घ्यावात. कार्यकर्त्यांशी बोलावं. नियोजन करावं. सगळंच आश्चर्यचकित करणारं आहे. ही ऊर्जा येते कोठून असा प्रश्न महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला नेहमीच पडत आलाय. मागे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात चालता चालता पवारांच्या पायाला जखम झाली त्यामुळं स्टेजच्या पाय-या चढता-उतरताना त्यांना कुणाचातरी आधार घ्यावा लागायचा. प्रचाराच्या काळात झालेल्या जखमांनी दीर्घकाळ त्रास दिला. दोन्ही पायांच्या बोटांना जखमा झाल्यामुळे बँडेज गुंडाळून धावपळ करावी लागली. कॅन्सरशी त्यांनी दिलेला लढा तर अनेकांना प्रेरणादायी ठरणारा आहे. पवारांच्या शरीरावरच्या जखमा फोटोमधून दिसतात तरी. परंतु अविश्रांत राबणा-या या ८३ वर्षे वयाच्या म्हाता-याच्या मनावर जे घाव झालेत, त्यामुळं ज्या जखमा झाल्या आहेत, त्याचा विचार कधीच कुणी करताना दिसत नाही. माणूस केंद्रस्थानी ठेवून राजकारण-समाजकारण करणा-या पवारांच्यातल्या माणसाकडं, त्यांच्या दृश्य-अदृश्य वेदनांकडं पाहायला कुणाला सवड नाही. घरातल्या माणसांची दुखणी खुपणी बघणा-या, सगळ्यांची काळजी घेणा-या, त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी झटणा-या कर्त्या माणसाच्या मनाची अवस्था होते तशीच पवारांची होताना दिसते. शरद पवार हे केवळ राजकीय चाली खेळणारे यंत्रमानव आहेत अशा रितीनं सगळे त्यांच्याकडं पाहतात. शरद पवार हासुद्धा एक हाडामांसाचा माणूस आहे, हे सगळे विसरूनच गेले आहेत. त्यामुळे पक्षाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याच्या त्यांच्या निर्णयाकडे फक्त राजकीय दृष्टिकोनातून पाहणे त्यांच्यावर अन्याय करणारे आहे.
`लोक माझे सांगाती` या आत्मचरित्राच्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात पवार यांनी घोषणा केली. त्या समारंभात म्हणजे घोषणेआधी आणि घोषणेनंतरही त्यांच्याशेजारी सौ. प्रतिभाताई पवार खंबीरपणे बसलेल्या दिसल्या. त्या सगळ्या गर्दीत शरद पवार यांच्याकडे माणूस म्हणून पाहणा-या, माणूस म्हणून त्यांना आयुष्यभर समजून घेणा-या प्रतिभाताई एकट्याच होत्या, असे वाटत होते. कन्या सुप्रिया सुळे आणि पुतणे अजितदादा पवार यांच्यापुढेही त्यावेळी कार्यकर्त्यांना आवरण्याचा, त्यांची समजूत काढण्याचा प्राधान्याचा विषय होता. एकट्या प्रतिभाताईच होत्या, ज्या शरद पवार यांच्या निर्णयासोबत ठामपणे दिसत होत्या.
आणखी एक गोष्ट पुन्हा पुन्हा स्पष्ट करायला पाहिजे. ती म्हणजे शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राजकारणापलीकडे अनेक राजकीय, सामाजिक संस्थांशी ते संबंधित आहेत आणि संबंधित संस्थांच्या कामामध्ये अधिक लक्ष घालण्याची इच्छा त्यांनी प्रदर्शित केली आहे. याचाच अर्थ पक्षाच्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाले तरी सार्वजनिक व्यवहारात आणि पर्यायाने राजकारणातही त्यांना सक्रीय राहावेच लागणार आहे. कारण शरद पवार हा महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातील सामान्य माणसाचा शेवटचा आधार असतो. सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील लोकांनाही त्यांचाच आधार वाटतो. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना शरद सरकारच्या कामात ढवळाढवळ करताना कधी दिसले नाहीत. परंतु अगदी सामान्यातील सामान्य माणसंही आपले प्रश्न घेऊन कोणत्याही सत्तापदावर नसलेल्या शरद पवारांच्याडे येत होती. शरद पवार त्यांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करीत होते. महत्त्वाच्या प्रश्नांसंदर्भात संबंधित मंत्र्यांसोबत बैठक घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत होते. तीन पक्ष, त्यांचे मंत्री, आमदार असतानाही आपला प्रश्न शरद पवारच सोडवू शकतील, असे अनेकांना वाटत होते, यावरून शरद पवार यांचे महत्त्व लक्षात येऊ शकते. भविष्यातही शरद पवार यांना अशा जबाबदारीपासून वेगळे होता येणार नाही, हे तितकेच खरे आहे.
यापलीकडे जाऊन पवार निर्णय मागे घेणार का, तो मागे घेतला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुप्रिया सुळे येणार का, मग अजितदादा पवार यांची नवी भूमिका काय असणार, राष्ट्रवादी काँग्रेसची भविष्यातील वाटचाल कोणत्या छावणीतून होणार असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ शकतात. त्यांची उत्तरे यथावकाश मिळतीलच.
(लेखक नामवंत पत्रकार व राजकीय विश्लेषक आहेत)
9594999456