पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंदी महासागर अशा तीन सागरांच्या संगमावर वसलेले कन्याकुमारी आपल्याला नक्कीच वेगळा अनुभव देणारे आहे. सूर्योदय व सूर्यास्त दोन्ही पहायला मिळणारी किनारपट्टी दुसरीकडे कुठेही नाही. मात्र यासाठी आपली इच्छाशक्ती जोरदार असावी लागते. कारण येथे बऱ्याचदा आकाश ढगाळच असते. क्वचितच स्वच्छ आकाश पहायला मिळते. पहिल्यांदा मी गेलो तेव्हा अवकाळी पावसाच्या गडद छायेमुळे ढग दाटून आले होते, त्यामुळे दोन दिवसांच्या मुक्कामातही सूर्यदर्शन काही झाले नव्हते. पण त्यानंतर जेव्हा जेव्हा गेलो त्या प्रत्येक वेळी पहिली कसर भरून निघाली. मात्र या सूर्य दर्शनासाठी प्रत्येक वेळी खूपच कसरती कराव्या लागल्या आहेत. एकदा तर हॉटेलच्या टेरेसवर गर्दी झाल्याने कॅमेऱ्यात सूर्योदयाचा सीन शूट करण्यासाठी पाण्याची टाकी ठेवलेल्या हॉटेलच्या टोपीवर तेथे रोवलेल्या काचांची पर्वा न करता गेलो होतो. मनाजोगते शूटींग झाल्याने खूप आनंद झाला होता, पण तो आनंद फार काळ टिकला नाही .मेमरी कार्ड भरल्याने ते रिकामे करण्यासाठी म्हणून नेट कॅफेत गेलो ,तर तिथे त्यातील डेटा करप्ट झाला. ते पाहून मन इतके खट्टू झाले की अजूनही ती आठवण मनाला उदास करते कारण तेथून परतल्यावर तो डेटा रिकव्हर करण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण तो मिळाला नाही.
या मंदिराजवळच महात्मा गांधींचे स्मारक आहे. गांधींच्या अस्थी विसर्जनासाठी येथे आणल्या होत्या, त्यावेळी त्यांचा अस्थिकलश ज्या ठिकाणी ठेवण्यात आला होता तेथेच हे स्मारक 1956 साली बांधले आहे. या स्मारकाची रचना अशी केली आहे की 2 ऑक्टोबर ला गांधी जयंतीच्या दिवशी सूर्याची पहिली किरणे रक्षा ठेवलेल्या भागावर पडतील. या स्मारकाला ‘गांधी मंडपम’ म्हणतात.
येथे खोल समुद्रात दोन भव्य खडकांवर दोन भव्य स्मारके आहेत. त्यातील पहिले विवेकानंद रॉक मेमोरिअल होय. हे स्मारक दोन भागात विभागले आहे. एक भाग म्हणजे श्रीपाद मंडपम जेथे देवी कुमारी यांचे पदचिन्ह आहे. दुसरा भाग म्हणजे जेथे स्वामी विवेकानंद ध्यान धारणेसाठी बसायचे तो होय. हे स्मारक लाल दगडात बांधले आहे. स्मारकाचे प्रवेशद्वार अजिंठा वेरूळ लेण्यांची आठवण करून देते. या स्मारकामध्ये विवेकानंदांची ब्राँझ धातूमध्ये बनवलेली मूर्ती सजीवच वाटते. येथे जाण्यासाठी फेरीबोटी आहेत. गर्दी नसेल तर इथली शांतता मनाला वेगळ्याच जगात घेऊन जाते आणि विवेकानंदांनी ध्यान धारणेसाठी ही जागा का निवडली हे लक्षात येते. पर्यटकांनी गजबजलेले हे ठिकाण चुकवू नये असेच आहे.
या स्मारकापासून जवळच दुसऱ्या एका मोठ्या खडकावर तमीळ संतकवी तिरुवल्लूवर यांची 133 फूट उंचीची मूर्ती आहे. किनाऱ्यावरूनच ती आपले लक्ष वेधून घेते. तिरुवल्लूवर यांची तुलना महान तत्वज्ञ सॉक्रेटिस, रुसो इ. बरोबर केली जाते. तिरुवल्लूवर यांनी सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी तमिळ भाषेत तिरुकरुल नावाचा ग्रंथ लिहिला आहे. यामध्ये अत्यंत सोप्या भाषेत जीवनोपयोगी गोष्टी सांगितल्या आहेत. 133 अध्याय या ग्रंथात आहेत. त्यामुळेच त्यांच्या पुतळ्याची उंचीही 133 फूट आहे. शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेल्या या पुतळ्याकडे आपल्याला नेहमी जाता येत नाही. समुद्राचे पाणी कमी झाले की तेथील खडक उघडे पडतात त्यामुळे अशावेळी तिथे फेरीबोटी जात नाहीत . मला त्या स्मारकाला भेट देण्याची संधी अजून तरी मिळाली नाही. 2004 साली आलेल्या त्सुनामीच्या लाटा या स्मारकालाही धडकल्या होत्या. शांत, प्रसन्न, आश्वासक भाव असलेला चेहरा लांबूनही मनाला भावतो.