सौजन्य – लोकसत्ता
माजी पोपच्या तीस वर्षांतील अनेक प्रेमपत्रांची बातमी ‘बीबीसी’ने खुलेपणाने दिली.. त्यावर प्रतिक्रियेचे धाडस पोपनी दाखवले..
‘त्यात काय चुकले? एखाद्या धर्मगुरूने एखाद्या महिलेला आपले हृदय दिले – आणि ते तेथेच संपत असेल – तर त्यात काहीही चूक नाही. अखेर पोप हाही एक माणूसच आहे.. ’
‘तशीच दुसरी आज्ञा ही आहे : तू स्वत:वर जसं प्रेम करतोस तसंच प्रेम तुझ्या शेजाऱ्यावरही कर, याच्यापेक्षा अधिक महत्त्वाची अशी दुसरी कोणतीही आज्ञा नाही.’ (नवा करार, मार्क १२:३१)
…………………………………………………………………………………
आज कविवर्य मंगेश पाडगावकर असते तर त्यांनी आपलेच बायबलचे मराठी भाषांतर उंचावत मिस्कीलपणे डोळे वटारून विचारले असते, ‘दिवंगत पोप जॉन पॉल दुसरे यांनी प्रेम केले, तर तुमचे काय गेले?’
साऱ्याच धर्माची हीच एक महत्त्वाची शिकवण आहे, की प्रेम करा. दुसऱ्यावर प्रेम करा. येशूने तर सांगितले, शत्रूवरही प्रेम करा. तेव्हा येशूचे या विश्वातील प्रमुख संदेशवाहक असलेल्या पोप यांनी प्रेम केले तर त्यात असा काय धर्मद्रोह झाला, असा प्रश्न कोणाच्याही मनात तरळेल. पण धर्मसंदेशांची ही एक मौजच असते. धर्म जेव्हा असा सर्वसाधारण विध्यर्थी विधाने करीत असतो, तेव्हा त्यांचा अर्थ जणू अमूर्तातच जमा होत असतो. सगळ्यांवर प्रेम करा अशा विधानाचा अर्थ व्यवहारात वेगळाच होत असतो. कोणत्याही धार्मिकांचे लौकिकातील वर्तन पाहिले की सगळेच धर्म प्रेमाचा संदेश देतात या म्हणण्यातील फोलपणा लख्ख उठून दिसतो. आणि येशूने तर शत्रूवरही प्रेम करा असे सांगतानाच परस्त्रीचा मात्र नेमका अपवाद सांगितला आहे. पोप जॉन पॉल दुसरे हे सगळ्यांवर प्रेम करीत असतात तेव्हा त्याबद्दल कोणाचेच काही म्हणणे नसते. कल्लोळ होतो तो ते सगळ्यांवर प्रेम करता करता एका परस्त्रीवरही प्रेम करतात, त्या विवाहितेला प्रेमपत्रे पाठवतात तेव्हा.
सुमारे तीस वष्रे त्यांचे या महिलेशी प्रेमसंबंध होते. तिचे नाव अॅना-तेरेसा टायमिएनेका. वेळोवेळी ते तिला प्रेमपत्रे पाठवीत असत. दोन वर्षांपूर्वी, वयाच्या ९१ व्या वर्षी तिचे निधन झाले. योगायोग असा, की नेमक्या त्याच वर्षी, २०१४ मध्ये पोप जॉन पॉल यांना संतपद बहाल करण्यात आले. नुकतीच ‘बीबीसी’च्या धर्मविषयक बातमीदाराच्या हाती ती पत्रे लागली. सनसनाटी बातमी म्हणतात ती हीच. पोप यांचे गोपनीय प्रेमकरण म्हणजे काही साधासुधा मामला नव्हे. परंतु बीबीसीने – ती एक चित्रवाणी वृत्तवाहिनी असूनही – अत्यंत जबाबदारीने, सहृदयतेने ती बातमी प्रसिद्ध केली. अशी धर्मगुरूविरोधातील बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर काही प्रतिक्रिया हल्ली आपणांस अपेक्षितच असतात. म्हणजे त्या धर्मगुरूच्या अनुयायांच्या भावनांची हळवी गळवे पटापटा फुटणे, त्यांनी रस्त्यावर उतरणे, संबंधित वृत्तपत्र वा वाहिनीच्या कार्यालयावर हल्ला करणे, बातमीदार ‘मॉìनग वॉक’ला जात असेल तर नशीब त्याचे, एरवी मग त्याला समाजमाध्यमांतून, दूरध्वनीवरून शिवीगाळ करणे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्याला – ‘त्या अमुक अमुक धर्माबद्दल बोलून दाखव, िहमत असेल तर’ अशी – आव्हाने देणे हे स्वाभाविकपणे घडतच असते. या सनातन प्रतिक्रिया आहेत. सर्वच धर्म प्रेमाचा संदेश देतात हे खरे असले, तरी हे घडत असते. परंतु पोप यांच्या प्रेम प्रकरणाची बातमी आल्यानंतर असे फारसे घडलेच नाही. लोकांना धक्का नक्कीच बसला. चर्चला तर मोठाच धक्का बसला असेल. परंतु विद्यमान पोप फ्रान्सिस यांनी या सगळ्या प्रश्नांकितांना थेटच सवाल केला, ‘त्यात काय चुकले? एखाद्या धर्मगुरूने एखाद्या महिलेला आपले हृदय दिले – आणि ते तेथेच संपत असेल – तर त्यात काहीही चूक नाही. अखेर पोप हाही एक माणूसच आहे.’
हे खरेच आहे. पोप जॉन पॉल हे कॅथॉलिकांचे सर्वोच्च धर्मगुरू होते. पण तोही एक हाडामांसाचा माणूस होता. ते जॉन पॉल होते, पण हे नाव धारण करण्याआधी ते कारोल वायटुला होते. त्यांनाही जवळिकीची, प्रेमाची भूक होती. प्रत्येक भावनाशील माणसाची ती गरज असते. अनुदिनी अनुतापांनी तापलेल्या, दमलेल्या-भागलेल्या माणसाला अशी एक कूस हवीच असते, की जेथे आपण हक्काने विरघळून जाऊ शकू. सगळे काही विसरून त्या सावलीत शांतनिवांत पहुडू शकू. सर्जनशील माणसाला तर अशा सखीची नितांत आवश्यकता असते. हे सगळीकडेच दिसते. त्याची गृहिणी हीच त्याची सखी असेल तर प्रश्नच मिटतो. पण सत्यभामा सखी होऊ शकत नसेल, तर त्याचा रुक्मिणीचा शोध सुरू होतो. पोप जॉन पॉल यांचा प्रश्न वेगळाच होता. त्यांच्या विवाहाचा प्रश्नच नव्हता. त्यांनी ब्रह्मचर्य स्वीकारलेले होते. आदिम दैहिक आवश्यकतांवर मात मिळविली होती. महायुद्धच असते ते. त्यात जय मिळविणे हे सामान्यांचे काम नव्हे. मोहनदास गांधींसारख्या महात्म्याचा हा संघर्ष ज्यांनी वाचला आहे त्यांना त्या लढाईचे स्वरूप समजेल. अर्थात ते समजण्यासाठीही पाशवी मनोविचारांतून बाहेर यावे लागेल हा भाग वेगळा. पण कायिक व्यापातून सुटका मिळविली तरी मनाचा प्रश्न उरतोच. त्याच्या गरजा वेगळ्या असतात. त्याला या हृदयीचे गुज ओळखणारे ते हृदय हवे असते, मनोवेदनांवर फुंकर घालणारे ओठ हवे असतात, विशिष्ट बौद्धिक पातळीवरून केला जाणारा संवाद हवा असतो, वैचारिक सख्यत्व हवे असते. जॉन पॉल यांना तशी सखी अॅना-तेरेसामध्ये भेटली. ती कोणी सामान्य गृहिणी नव्हती. पोलंडमधील सरदार घराण्यातील ती स्त्री. हार्वर्डमधील प्रोफेसर हेंड्रिक ह्य़ुथॅकर हे तिचे पती. ती स्वत: एक तत्त्वज्ञ होती. त्यांची पहिली भेट झाली १९७३ मध्ये. तेव्हा ती ५० वर्षांची होती आणि जॉन पॉल अजून काíडनल कारोल वायटुला होते. त्यांच्या एका पुस्तकाच्या भाषांतराच्या निमित्ताने ही भेट झाली. तिचे रूपांतर गाढ मत्रीत झाले. ते पोप झाल्यानंतरही त्यांची मत्री कायम राहिली. त्या मत्रीत, त्या प्रेमात घनिष्ठता, आत्मीयता होती, पण तिला कुठे लैंगिकतेचा स्पर्श होता याचे मात्र पुरावे नाहीत. बीबीसीनेही ते स्पष्ट केले आहे. तसा स्पर्श असता तरी काही बिघडण्याचे कारण नव्हते, हे नीट समजून घेतले पाहिजे. ब्रह्मचर्याभोवती असलेल्या पावित्र्याच्या कल्पना याच मुळात अनसíगक आहेत. व्यभिचार ही संकल्पना स्त्रीविषयक मालकीहक्काच्या भावनेतून जन्माला आलेली आहे. आपली खिल्लारे, आपली जमीन-जायदाद, तशा आपल्या स्त्रिया. विवाहसंस्थेच्या विकासापूर्वी अगदी भारतीय उपखंडातही स्त्री ही कुळाच्या मालकीची मानली जात असे. तिच्या उपभोगाचा हक्कसंपूर्ण कुळाला असे. म्हणून ती कुलवधू असे. पुढे त्यात प्रगती झाली. स्त्री ही एकटय़ाच्या मालकीची गणली जाऊ लागली. नवरा ‘मालक’ झाला. स्त्री परतंत्र झाली आणि त्यातून विवाहबाह्य़ संबंध – तेही खासकरून स्त्रीसाठी – पाप मानले जाऊ लागले. येशू जेव्हा व्यभिचारनिषेध सांगतात तेव्हा त्यामागे हीच सामाजिक कल्पना असते. त्याचा अध्यात्माशी काहीही संबंध नाही. तसा तो असता, तर भारतीय आगम परंपरेत स्त्रीसंबंधांना एवढे महत्त्व आलेच नसते. यातील ब्रह्मचर्य ही कल्पना तर आपल्या संतांनी केव्हाच गुंडाळून फेकून दिली. त्यांचा व्यभिचाराला विरोध होता, परंतु विवाहाला नव्हता. आणि गंमत म्हणजे त्यांना कृष्णाच्या लीलांमध्ये कधी काहीही वावगे दिसले नव्हते.
परंतु एकीकडे काम हा ‘अर्थ’ मानायचे आणि दुसरीकडे त्याला दूर लोटायचे, स्त्री ही नरकाची वाट म्हणत काष्ठीचीही स्त्री पाहू नये असे सांगायचे आणि लैंगिक भावनांवर कमालीचे र्निबध घालायचे यातून धर्माने कामाप्रतिची विकृतीच जन्माला घातली. त्याचे आविष्कार मग कधी गिरजाघरांतील वासनाकांडातून समोर येतात, तर कधी आसारामसारख्या भोंदू संतांच्या काळ्या लीलांतून पुढे येतात. आजही चर्चसमोर धर्मगुरूंतील लैंगिक चाळ्यांचा मोठा प्रश्न आहेच. या पाश्र्वभूमीवर पोप यांचे हे प्रेमस्वरूप अधिकच उठून दिसते. कारण त्यात निखळपणा आहे, सुसंस्कृतता आहे, सर्वात महत्त्वाचे म्हणजे माणूसपणा आहे. संत जॉन पॉल यांच्यापेक्षा हा माणूसच अधिक भावणारा वाटतो. अखेर कोणीही मनापासून केलेले प्रेम हे पवित्रच असते. ते कोणीही कोणावरही करायचे असते. अगदी पोप झाले तरी.. –
सौजन्य – लोकसत्ता