बाबाच्या औषधाला कायद्याचे बूच

-ज्ञानेश महाराव

 ‘कोरोना’च्या साथीमुळे सारं जग हैराण झालंय. टाळेबंदीचे तीन महिने उलटून गेलेत. अर्थचक्र रुतून बसले आहे. साऱ्या जगाचं लक्ष ‘कोरोना’ची लस कधी येते, याकडे लागून राहिले आहेत. टाळेबंदी शिथिल केल्यानंतर भारतात या ‘कोरोना’ विषाणूची लागण अधिक वेगाने होऊ लागलीय. परिणामी, रेल्वे प्रशासनाने १२ ऑगस्टपर्यंतच्या रेल्वे सेवा- वेळापत्रकाला स्थगिती दिलीय. ‘मोदी सरकार’ने नोटाबंदी-जमाच्या ५० दिवसांत १०० फतवे काढले होते. तसेच ‘कोरोना- लॉकडाऊन- अनलॉकडाऊन’च्या गेल्या ३ महिन्यांत ३०० सूचना-आदेश पत्रकं काढली आहेत. सरकारी धोरणं रोज बदलत आहेत आणि रोजच्या नव्या नियमांमुळे सामान्य माणूसही परेशान झालाय. टाळेबंदीमुळे आधीच पोटाची मारामार सुरू असताना त्यात पुन्हा सरकारी नियमांच्या मारामुळे जगणे दिवसेंदिवस कठीण बनत चालले आहे.

    जागतिक पातळीवरील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ‘कोरोना’वरील लस सर्वसामान्य माणसांना उपलब्ध व्हायला, सप्टेंबर २०२१ उजाडावा लागेल. म्हणजे, भारतासारख्या देशात लस उपलब्ध झाली, तरी ती टप्प्याटप्प्याने येईल. एकूणच संभ्रमित करणारी परिस्थिती आहे. प्रसारमाध्यमे बातम्यांनी घबराट निर्माण करीत आहेत. लस तयार करणारी जी संशोधनं चालली आहेत; त्यांच्या बातम्या अशा पद्धतीने देताहेत की, जणू उद्याच लस उपलब्ध होणार!  ‘करोना’चं संकट संपणार! सारं काही पूर्वीसारखं आलबेल होणार! प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे.

    जगभरात ‘कोरोना’चे संकट ‘जैसे थे’ असताना योगगुरू आणि ‘पतंजली प्रॉडक्ट’चा धंदेवाईक मुखवटा असलेल्या बाबा रामदेव यांनी, ‘कोरोना’वर औषध शोधल्याचा दावा केला. बाबा रामदेव हे आजच्या काळातील सर्व वृत्तवाहिन्यांसाठी जाहिराती देणारे सर्वात मोठे जाहिरातदार आहेत. त्यामुळे त्यांच्या औषधाच्या मार्केटिंगसाठी त्यांनी मोठी तयारी करून ठेवली होती. गेल्या पंधरा दिवसांपासून वेगवेगळ्या वाहिन्यांवर त्यांच्या मुलाखती सुरू होत्या. त्यातून ते ‘कोरोना’वरील भावी औषधाची जाहिरात करीत होते. वातावरण निर्मिती करीत होते. त्यामुळे त्यांच्या औषधाबाबतही उत्सुकता लागून राहिली होती. तथापि, हे औषध बाबा रामदेवने शोधलं आहे की, आसारामबापूने शोधलं, याला महत्त्व नाही. आजच्या काळात जग संकटात ढकलणाऱ्या साथीपासून बचाव करणारं काहीतरी लोकांना हवंय.

   अशा वातावरणात बाबा रामदेवने गाजावाजा करीत आपल्या ‘कोरोनिल’ या औषधाची घोषणा केली. “कोरोना’च्या विषाणूला हरवण्यासाठी आपले हे आयुर्वेदिक औषध प्रभावी आहे,” असा दावा बाबा रामदेव यांनी केला. रामदेव बाबांचे सहकारी आचार्य बालकृष्ण* यांनी आधी ‘ट्वीट’ करून “कोरोना’वरील पहिले आयुर्वेदिक औषध ‘लाँच’ केले जात आहे,” अशी घोषणा केली. त्यानुसार, हरिद्वार येथील त्यांच्या ‘पतंजली योगपीठ’मध्ये ‘पत्रकार परिषद’ झाली. या ‘पत्रकार परिषद’ला बाबा रामदेव, आचार्य बालकृष्ण यांच्याबरोबरच ‘पतंजली’चे काही संशोधक आणि डॉक्टरही उपस्थित होते. ‘पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूट’ आणि जयपूर येथील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स’ यांनी या औषधासाठी संयुक्तपणे संशोधन केल्याचे यावेळी सांगण्यात आले.

      आचार्य बालकृष्ण यांनी दिलेल्या माहितीनुसार, ”दिव्य कोरोनिल टॅब्लेट’ मध्ये अश्वगंधा, गिलोय, अणू तेल, श्वासारी रस आणि तुळसी यांसारख्या औषधी वनस्पतींचा समावेश आहे. ‘कोरोना’ संक्रमित रुग्णांच्या घेतलेल्या चाचण्यांमध्ये शंभर टक्के निकाल आलाय,” असा दावाही त्यांनी केलाय.  ‘पतंजली’कडून २८० रुग्णांवर प्रयोग करण्यात आला. “६९ टक्के ‘कोरोना’ रुग्ण तीन दिवसांमध्ये बरे झाले. तर शंभर टक्के ‘कोरोना’ रुग्ण सात दिवसांमध्ये बरे झाले,” असा दावा रामदेव बाबा यांनी केला. संपूर्ण नियमांचे पालन करून हे औषध तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

       बाबा रामदेव यांनी केलेल्या दाव्यानुसार, “कोरोना’चा संसर्ग झालेला रुग्ण या औषधाच्या वापरामुळे तीन दिवसांच्या आत बरा होईल. नंतरच्या सात दिवसांत तो पूर्ण बरा होऊन घरी जाईल. ‘कोरोनिल’ हे औषध सकाळी आणि संध्याकाळी असे दोनवेळा घ्यावयाचे आहे. ‘कोरोना’ विषाणूच्या ‘रिसेप्टर बाइंडिंग डोमेन’ला आणि शरीरातील ‘अँजिओटेन्सीन कनव्हर्टिंग एंजाइम’ला या औषधामध्ये असलेले अश्वगंधा  शरीरात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करते. तर गिलोय संक्रमण कमी करण्यास उपयुक्त ठरते. कोणत्याही गोष्टीचा व्यापार कसा करायचा याचे तंत्र बाबा रामदेवने आत्मसात केले आहे. माध्यमांना आर्थिक दबावाखाली ठेवून, आपला हेतू कसा साध्य करायचा, हेही त्यांना चांगले जमते. त्यानुसार, ‘कोरोना’वरील औषधाचा शोध म्हणजे आजच्या काळात सोन्याचे अंडे देणारी कोंबडीच !

     परंतु छोट्या पातळीवर असले ‘जुमले’ खपून जात असतात. त्यात ‘मोदी सरकार’ देशात आहे म्हटल्यावर, आयुर्वेदाला महत्त्व असणारच!  बदलत्या जीवनशैलीमध्ये लोकही  मोठ्या प्रमाणावर ॲलोपॅथीकडून आयुर्वेदाकडे वळत आहेत. या मानसिकतेचा फायदा बाबा रामदेव यांच्यासारखे चलाख लोक करून घेत आहेत. कोट्यवधींची माया गोळा करीत आहेत. ‘कोरोना’वरील औषधाच्या माध्यमातून त्यांचा अशाच प्रकारे नोटा छापण्याचा डाव होता. परंतु जिथे सारे जग ‘कोरोना’वरील लस शोधण्यासाठी झटत आहे. जगभरातील संशोधक, शास्त्रज्ञ झटत आहेत. त्यांना अजूनही निष्कर्षाप्रत पोहोचता आलेले नाही किंवा काँक्रिट काही हाती लागलेले नाही. तिथे या धंदेवाईक बाबाने दावा केल्यावर, ”कोरोना’वरील औषध सापडले म्हणून नाचत सुटल्यास, देशाचे हसे होईल, हे केंद्र सरकारनेही ओळखले. त्यामुळेच बाबा रामदेव ‘सरकारी बाबा’ असले, तरी जागतिक पातळीवर हसे करून घेण्याची सरकारची तयारी नसल्यामुळे त्यांनी या औषधापासून स्वत:ला दूर ठेवले. इतकेच नाही तर, ‘कोरोनिल’ची जाहिरात थांबवावी आणि त्यासंदर्भातील सविस्तर माहिती ‘केंद्र सरकार’ला द्यावी, असा आदेश  ‘पतंजली’ला दिला.

      या औषधाची माहिती, त्याची ‘क्लिनिकल टेस्ट’ कुठे करण्यात आली? त्याला मान्यता कुणी दिली?  त्याचा परिणाम काय आला?  याबाबतचा सविस्तर माहिती अहवाल सुपूर्द करण्याचे आदेश ‘आयुष मंत्रालय’ने ‘पतंजली’ला दिले आहेत. उत्तराखंड राज्याच्या परवाना देणाऱ्या प्राधिकरणालाही या उत्पादनाला परवानगी दिल्याचा तपशील सादर करण्यास सांगितले. ‘आयुष मंत्रालय’ने ‘पंतजली’ला या औषधाची जाहिरात करण्यासही मनाई केलीय. तसेच बाबा रामदेवने “सर्दी- खोकल्याचे औषध बनवतो, असे सांगून परवाना घेतला आणि ‘कोरोना’चे औषध बनवले,” असे उत्तराखंडच्या अधिकार्‍यांनी म्हटले आहे. राजस्थान सरकारनेही आधीच त्यासंदर्भात कठोर भूमिका घेतली असून ‘कोरोना’वरील रामबाण उपाय म्हणून कोणीही कोणत्याही औषधांचा दावा करून त्या औषधांची विक्री केल्यास विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिलाय. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही ”पतंजली’च्या या औषधाच्या विक्रीस महाराष्ट्रात परवानगी नाही,” असे स्पष्टपणे सांगितले आहे.

        ही कठोर कारवाई ‘कोरोना’ची संकट-साथ ‘जागतिक’ असल्याने करण्यात आली. ही संकट-साथ भारतापुरतीच मर्यादित असती, तर रामदेवची ‘बाबागिरी’ लाखो लोकांना गिऱ्हाईक बनवून करोडो रुपयांचा चुना लावण्यासाठी मोकाट राहिली असती.

……………………………..

लस निर्मितीचे जगभर प्रयत्न

साथीच्या वा संसर्गजन्य रोगावर लस शोधून काढण्याचं काम मोठं कठीण आणि अत्यंत जोखमीचं असतं. एक परिपूर्ण लस तयार होण्यासाठी काही वर्षांचा कालावधी जावा लागतो. अलीकडे तेच काम काही महिन्यांत करण्याचा प्रयत्न वैज्ञानिक करतात. तरीसुद्धा किमान बारा ते अठरा महिन्यांचा म्हणजे वर्ष ते दीड वर्षांचा कालावधी लागतोच.  ‘कोरोना व्हायरस’ डिसेंबर २०१९ मध्ये जगासमोर आला. तिथून दीड वर्षं म्हणजे, लवकरात लवकर २०२१सालच्या जून-जुलैपर्यंत लस उपलब्ध होऊ शकेल. भारतासारख्या मोठ्या देशात ती सामान्य माणसांपर्यंत पोहोचायला तिथून पुढचा सहा महिन्यांचा कालावधी लागू शकेल. संशोधनापासून लस बाजारात येईपर्यंत अनेक टप्पे आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तयार झालेली लस सुरक्षित असल्याचे चाचणीतून सिद्ध व्हावे लागते. लशीमुळे लोकांच्या प्रतिकारशक्तीला ‘कोरोना’च्या विषाणूला प्रतिकार करता आला पाहिजे. यात रुग्णाची प्रकृती आणखी खालावणार नाही, याचीही खातरजमा करावी लागेल. औषधं प्रमाणित करणाऱ्या संस्थांनी या लशीला मान्यता द्यावी लागेल.

    एकूण जगाचा विचार करता या लशीचे अब्जावधी डोस कसे बनवता येतील, याचीही व्यवस्था करावी लागेल. म्हणजे जगभरातल्या ‘कोरोना’ बाधितांपर्यंत लस पोहोचण्यासाठी पुरवठा यंत्रणा सक्षम करावी लागेल.’कोरोना’वरील लस शोधण्याचं काम जगभरातले संशोधक, शास्त्रज्ञ करीत आहेत. त्यासाठी करोडो रुपयांचा निधी वेगवेगळ्या देशांनी उपलब्ध करून दिलाय. आपल्याकडे ‘कोरोना’च्या साथीची सुरुवात झाली, तेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ”कोरोना’ची लस शोधून काढणारास एक लाख रुपयांचे बक्षीस देणार,” असे जाहीर केले होते. यावरून संशोधनाकडे बघण्याची आपली एकूण दृष्टी आणि ऐपत किती आहे, हेच दिसून येते. आजघडीला जगभरात शंभराहून अधिक वैज्ञानिक- संशोधकांच्या टीम  ‘कोरोना’वरील लस शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातल्या चार गटांनी चाचण्याही सुरू केल्याचे सांगण्यात येते.

      ‘बीबीसी’ने दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भातील पहिला प्रयोग अमेरिकेत झालाय. मार्च महिन्यात अमेरिकेतल्या सिएटल येथील संशोधक- वैज्ञानिकांनी त्यांच्या लशीचे माणसांवर प्रयोग सुरू केलेत. आपल्याला ज्ञात असलेल्या माहितीनुसार, कोणत्याही लशीचा प्रयोग आधी प्राण्यांवर केला जातो. परंतु, या गटाने ती पायरी वगळून थेट माणसांवर प्रयोग सुरू केलेत. अशाच प्रकारे इंग्लंडमधल्या ‘ऑक्सफर्ड विद्यापीठ’मधील वैज्ञानिक    त्यांनी तयार केलेल्या लशीचे प्रयोग माणसांवर सुरू केलेत. या प्रयोगात आठशे लोक आहेत. त्यातल्या निम्म्या लोकांना ‘कोरोना’वर तयार करण्यात आलेली लस दिली जाईल, तर उर्वरित लोकांना ‘मेनिंजायटिस’वरील लस देऊन दोन्हींचे तुलनात्मक निकाल पाहिले जातील. ऑस्ट्रेलियातल्या वैज्ञानिकांनी ‘कोरोना’ लशीचे  दोन प्राण्यांवर प्रयोग सुरू केलेत. काही दिवसांत ते माणसांवर या लशीची चाचणी घेणार आहेत. त्याचबरोबर ‘सानोफी’ आणि ‘जीएसके’ या औषध क्षेत्रातल्या दोन बड्या कंपन्या लस निर्मितीसाठी एकत्र आल्या आहेत. या तुलनेत ‘मोदी सरकार’ची धाव बाबा रामदेवच्या ‘पतंजली’ची बोगसगिरी रोखण्यापलीकडे गेली नाही. याला काय बरं म्हणावे ?

………………………………………………..

रद्द वारी, गणेशोत्सवास प्रश्न विचारी

‘पंढरीची वारी’ हा महाराष्ट्राच्या समतावादी विचारांचा महासोहळा असतो. लाखो लोकांचे लक्ष पंढरपूरच्या दिशेने लागलेले असते. तथापि,’कोरोना लॉकडाऊन’च्या संकटाची भयानकता ओळखून देहू- आळंदीहून निघणाऱ्या तुकोबा-ज्ञानोबांच्या पालखी- दिंड्या फारशी चर्चा न होता रद्द करण्यात आल्या. ‘वारी’ रद्द झाल्याने महामारीला थोडाफार चाप बसला. सरकारी यंत्रणांवरचा ताण कमी झाला. त्याचबरोबर वारकर्‍यांच्या ठायी असलेले वास्तवाचे भानही उजळले. यापेक्षा भक्ती-ज्ञान वेगळे नसते.

भक्त विठोबाचे भोळे।

त्यांचे पायी ज्ञान लोळे॥

नामा म्हणे ऐसे जाण।

नाही भक्तासी बंधन॥

हा संत नामदेवांचा विश्वास वारकऱ्यांनी खरा करून दाखवलाय. ज्ञानोबा-तुकोबांच्या पादुका एसटी बस किंवा अन्य वाहनाने आषाढी एकादशीला पंढरपूरला जातील. फडकरी-बुवा मंडळींच्या खुळाच्या समाधानासाठी हा तोडगा काढला असावा.

     तथापि, त्यांच्या नादाने आणखी गर्दी होऊ नये, यासाठी पंढरपुरात आषाढी एकादशीच्या आठवड्यात संचारबंदी जारी करण्यात आलीय. यातून ‘वारी चुकली, तरी आपले मरणही चुकले’, हे वास्तव वारकरी समजून घेतील. फडकरी- बुवांच्या नादाला किती लागायचं, याचं अनुभवसंपन्न ज्ञान वारकऱ्यांना आहे. अन्यथा, या फडकरी-बुवा मंडळींनी वारकऱ्यांचे शक्तिप्रदर्शन करून ‘ब्रह्मीभूत’ संत ज्ञानेश्वर कधी प्रकटतात आणि पालखीतल्या पादुका पायांत घालून कधी निघतात किंवा सोन्याचा पिंपळ गदगदा हलवून तुकोबांच्या पादुका पंढरपुरास नेण्यास ‘गरुड विमान’ कधी येतंय, याकडे डोळे लावून सरकारलाही बसायला लावलं असतं. यातलं काही घडणार नव्हतं, म्हणूनच या मंडळींनी पावसाचा धोका ओळखून हेलिकॉप्टरचाही आग्रह धरला नाही. हे बरेच झाले ! अशी समज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी का दाखवत नाहीत ?

      लवकरच येणारे दहीहंडी आणि गणेशोत्सव हे पूर्णपणे रद्द करणेच योग्य आहे. यातला ‘गोविंदांची दहीहंडी’ रद्द करण्याशिवाय पर्याय नाही. कारण ‘अक्कल उताणी’ झाल्याशिवाय हा डोक्यावर पडण्याचा धोकादायक खेळ कुणी शहाणा  खेळणार नाही. त्यात ‘कोरोना’चा धोका. तो सार्वजनिक गणेशोत्सवाला अधिक आहे. तिथे होणारी गर्दी टाळावी आणि ‘गणेशमूर्ती’ जास्तीत जास्त चार फूट उंचीची असावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव मंडळांना केली आहे. तथापि, गणपती ही बुद्धीची देवता असून, ती गणेशोत्सव मंडळवाल्यांवर विशेष प्रसन्न असल्याने, ते डोकं चालवून चार फूट उंचीची मूर्ती बनवतील. पण ती ४० फूट लांबी-रुंदीची ‘शेषशायी’ बनवून गर्दी जमवतील, याचा अंदाज मुख्यमंत्र्यांना अजून आला नसावा.

     खरंतर, गणेश मूर्तीच्या उंचीपेक्षा या छोट्या-मोठ्या घरगुती-सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनामुळे जे पर्यावरणाचे नुकसान होतं; जलप्रदूषण होतं, ते अधिक नुकसानकारक आहे. पैशाचा अपव्यय करणारं आहे. याचा धडाच निसर्गाने ‘कोरोना’ संकटाच्या रूपाने आपल्याला दिलाय, असं घरगुती-सार्वजनिक गणेशोत्सवींना का नाही वाटत ? तेवढी समज बुद्धीची देवता देत नाही का? ‘तबलीगीं’पेक्षा वेगळं वागायचंच नाही, हा अट्टहास कशासाठी ? असे प्रश्न मुख्यमंत्री आणि अन्य राजकीय पक्षनेते विचारणार नाहीत. पण तो प्रश्न वारकऱ्यांनी वारी रद्द करण्याच्या कृतीतून विचारला आहे. त्याचे उत्तर नको, कृती हवी. गणपती जागृत आणि त्याचे भक्त झोपलेले, असे नको.

(लेखक साप्ताहिक ‘चित्रलेखा’ चे संपादक आहेत)

९३२२२२२१४५

Previous articleउद्धव ठाकरेंचा अनिष्ट पायंडा !
Next articleवारी: सामुदायिक सदाचाराचा अमीट संस्कार
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.