बेगाने शादी, अब्दुल्ला दिवाना?

-राज कुलकर्णी

मा. पंतप्रधान मोदीजींनी रविवारी संघाच्या टोपीऐवजी नेताजींच्या आझाद हिंद सेनेची टोपी घालून मुघल सम्राट शहाजहां यांने बांधलेल्या लाल किल्यावर ध्वजारोहन केले ही आनंदाची बाब आहे. मोदीजींची वस्त्रांची व आभुषणांची ‘आवड’ व ‘सवडीने निवड’ उत्तम असते हे, पुन्हा अधोरेखित झाले!

सुभाषबाबूंनी स्वतंत्र आझाद हिंद सरकारची स्थापना २१ ऑक्टोबर १९४३ रोजी सिंगापुरमधील कॅथे सभागृहात केली होती. खरं तर मोदीजींना या निमित्ताने हा ध्वजरोहणाचा कार्यक्रम सिंगापुरमधे घेऊन परदेश दौ-याचा आपसुकच ‘कपिलाषष्ठीचा मणिकांचन दुग्धशर्करा’ योग आलेला असतानाही त्यांनी अत्यंत त्यागी, निरिच्छ व वितराग वृत्तीने हा मोह टाळून देशातच आणि शिवाय राजधानीतच लाल किल्ल्यावर ध्वजारोहन केले ही अत्यंत समाधानाची बाब आहे, या त्यागाबद्दल मोदीजींचे शतश: आभारच!

लाल किल्ल्याचे व नेताजी बोस यांचे आत्मियतेचे नाते आहे. त्यांचा ‘चलो दिल्ली’ हा नारा, लाल किल्ल्याला समोर ठेऊनच होता कारण नेताजी ज्या मुघल सम्राट दुस-या बहाद्दुरशहा जफरच्या ‘गाजियों में बू रहेगी जब तलक ईमान की, तख्त-ए- लंदन तक चलेगी तेग हिन्दुस्तान की’ या ओवी सतत उच्चारत असत, त्या जफरवर १८५८ साली ब्रिटीशांनी याच लाल किल्ल्यात खटला चालवून त्यांना रंगून येथे बंदिवासात धाडले होते. त्यानंतर नेताजींच्या आझाद हिंद सेनेतील शहनवाज खान, सहगल आणि धिल्लन या अधिका-यांवर राजद्रोहाचा व युद्धखोरीता खटला याच लाल किल्ल्यात भरला होता आणि हा खटला भुलाभाई देसाई यांच्या समवेत ज्यांचा मोदीजी अविश्रांत मत्सर करतात अशा जवाहरलाल नेहरूंनी लढला होता, हे विशेष आहे!

नेहरूं ऐवजी पटेल देशाचे पंतप्रधान झाले असते तर देशाचे भविष्य उज्ज्वल झाले असते असे सतत म्हणणा-या मोदीजींनी आज अचानक पटेलांनाही टांग मारली आणि नेताजी देशाचे पहिले पंतप्रधान असायला हवे होते, असेच म्हणाले. पण यातून सरदार पटेल यांचा अवमान करावा असा त्यांचा हेतु खचितच नसावा, याची जाणीव सर्व भारतीयांना नसली तरी त्यांच्या भक्तांना नक्कीच असणार आहे. तरीही नेहरूंना पर्याय म्हणून ते कॉग्रेसच्याच पटेल यांचे आणि कॉग्रेसच्याच आणि डाव्या विचारांच्या नेताजींचेच नाव घेतात हे कांही कमी नाही. मोदीजींनी स्वार्थ पाहिला असता तर ते नेहरूंना पर्याय म्हणून पटेल आणि नेताजीऐवजी नथुराम अथवा सावरकर अथवा गोळवळकर यांचेही नांव घेऊ शकले असते, पण ते निस्वार्थी आहेत! एका बाजूला त्यांचे स्नेही अमित शहा कॉग्रेसमुक्त भारत ही योजना राबवत असताना मोदीजी मात्र बिनदिक्कत पणे कॉग्रेसी नेत्याचे गुणगौरव करतात ही त्यांची अत्यंत उजवी बाजू आहे! म्हणूनच त्यांनी पटेलांचा भव्य दिव्य पुतळा उभा करण्याचे कार्य राममदिरांच्या निर्माण उद्गिष्टांबरोबर हाती घेतले आहे.

मा. पंतप्रधान मोदीजी, गुजरात मधे सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभा करत आहेत. पटेल कणखर व पोलादी नेते म्हणून ओळखले जातात. मा. मोदीजींना आणि त्यांच्या समर्थकांना पटेलांच्या कर्तृत्वाबद्दल शंका असण्याचे कांहीच कारण नाही. पण कॉग्रेस अंतर्गत बाबींत मोदीजींचे असणारे अवधान विलक्षण आहे. खरेतर मा.मोदीजी भाजपाचे पण तरीही त्यांची रूची कॉग्रेस अंतर्गत राजकारणात असते याला कोणी ‘ बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’ म्हणू शकेल, पण मोदीजींचे हेच वैशिष्ट्य आहे. त्यांच्या आंतरात्म्याचा मोठा भाग कॉग्रेसी नेत्यांनी व्यापला आहे, हे वास्तव आहे. अमित शहा यांनी देश कॉंग्रेस मुक्त करायची घोषणा केली असली तरी ते मोदीजींचे ह्रदय आणि मनाचा कानाकोपरा ते कॉग्रेसमुक्त करू शकले नाहीत, हेच यातून दिसतंय! पण पटेलांचे मोदीजी कौतुक करत असताना १९३८ साली, पट्टाभी सितारामया विरूद्ध सुभाषबाबू यांच्यातील निवडणूकीत सरदार पटेल यांनी कोणाचे समर्थन केले होते हा प्रश्न त्यांना अजिबात पडत नाही. वास्तवात या निवडणुकीत पट्टाभी सितारामया यांचा पराभव करून सुभाषबाबू निवडून आले ,तेंव्हा कॉंग्रेस वर्किग कामिटीपैंकी गांधी समर्थक व सुभाषबाबू विरोधी अनेकांनी राजीनामे दिले. त्यात केवळ तीन नेत्यांनी सुभाषबाबूंचे समर्थन करत राजीनामा दिला नव्हता, ते तीन नेते म्हणजे स्वतः नेताजी सुभाषबाबू, त्यांचे बंधू सरत बोस आणि जवाहरलाल नेहरू ! विशेष म्हणजे पटेल त्यावेळी गांधीजींसोबत होते आणि ते नेताजीच्या विरोधात होते ! एकाच वेळी कॉग्रेसचे पटेल आणि कॉग्रेसचेच नेताजी यांच्याबद्दल मोदीजींच्या मनात ‘मन की बात’ सोबत आलेला जिव्हाऴा, उमाळा त्यांच्या आकलनातील परस्पर विसंगती स्पष्ट करणारा आहे, हे ही आवर्जून नमुद करावे लागेल.

नेहरूंऐवजी पटेल पंतप्रधान व्हायला हवे होते कारण १९४६ साली बहुसंख्य प्रदेश कॉग्रेस समित्यांनी पटेलांची संविधान सभेतील पक्षनेता म्हणून निवड केली असताना व लोकशाही मार्गाने पटेल निवडून आले असताना गांधीजींनी पटेलांना निवडले नाही. म्हणून नेहरूंची पंतप्रधानपदी झालेली निवड लोकशाही विरोधी आहे, असे म्हणणारे मोदीजी वा त्यांचे समर्थक सुभाषबाबू जेंव्हा लोकशाही मार्गाने निवडून आले तेंव्हा पटेलांची भुमिका काय होती, हा देखील विचार करत नाहीत. यावर मोदीजींनी खरंतर विचार करायला हवा, अशी प्रामाणिक अपेक्षा आहे!

दुसरे महायुद्ध चालू होते तेंव्हा नेहरू आणि पटेल दोघेही अहमदनगरच्या इथं कारावासात होते. १५ जून १९४५ रोजी पटेल आणि नेहरूंची सुटका झाली. सुभाषबाबू यांचा विमान अपघातातील मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ ला झाला! मग नेहरूंनी सुभाषबाबूंचा घातपात केला म्हणणारे, नेहरूंनी सुभाषबाबूंना युद्धगुन्हेगार ठरवून क्लेमेंट अॅटलींना पत्र लिहील्याच्या वावड्या उठवणारे अनेक विद्वान कणखर व पोलादी पुरूष असणा-या पटेलांनी हे सारे कसे निमूटपणे होऊ दिले, असा प्रश्न पटेलांचा पुतळा उभा करणा-या मोदीजींनी खरे तर लाल किल्यावरून जनतेला विचारायला हवा होता. पण ते का विचारत नाहीत? शिवाय आझाद हिंद सेनेच्या कॅलेंडरवरती गांधी, नेहरू, मौलाना आझाद यांची छायाचित्रे असतात पण सावरकर, गोळवळकर, नथुराम यांचे कां नाही, हे ही प्रश्न ते कां उपस्थित करत नाहीत, हे या देशातील जनतेला आजही माहीत नाही!

सरदार पटेल १५ जून १९४५ पासून स्वतंत्र होते आणि जून १९४६ पासून ऑक्टोबर १९४६ पर्यंत संविधान सभेच्या निवडणुकीत एकत्रित प्रचार करत होते. मग तरीही त्यांना नेहरूंबद्दल कांहीच माहीती कशी काय नव्हती? नेताजींच्या अपघाती मृत्यूबद्दल ‘फिगेस कमिशन’ त्या दरम्यान १९४५ मधे नियुक्त केले गेले होते व त्याच्या अहवालात नेताजींचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले तरीही पटेल शांत कसे काय होते? अंतरिम सरकारात नेहरूंच्या मंत्रीमंडळात पटेल गृहमंत्री होते. त्यांच्या देशांतर्गत घडणा-या सर्वबाबींचा तपास करणारी यंत्रणा होती शिवाय स्वतंत्र भारतात ते नेहरूंच्याच मंत्रीमंडळात उपपंतप्रधान आणि गृहमंत्री होते तरीही त्यांना नेहरूंनी नेताजींचा कथित घातपात केल्याचा व हेरगिरी केल्याचा कधीही तपास करावा असे का वाटले नाही? त्यांनी हे सत्य भारतीय जनतेसमोर का मांडले नाही? पटेल १५ ऑगस्ट १९४७ पासून १५ डिसेंबर १९५० म्हणजे ३ वर्ष् ४ महिने मंत्रीपदावर होते पण तरीही त्यांनी एकदाही नेहरूंवर नेताजीबाबत कोणताही आरोप का केला नाही? देशाच्या वतीने हे प्रश्न मोदीजींनी विचारायला हवे आहेत, हे आज महत्वाचे आहे.

मोदीजी जर हे प्रश्न विचारत नसतील तर, कॉग्रेस पक्षाच्या अंतर्गत बाबीत उगाच हस्तक्षेप मोदीजी करतात हा आरोप खोडून कसा काढता येईल. मोदीजी ‘बेगानी शादीमें अब्दुल्ला दिवाना’ नक्कीच नाहीत हे त्यांना सिदध करावेच लागेल. या कार्यात ते यशस्वी व्हावेत यासाठी त्यांना अंदमानपासून काश्मीरपर्यंतच्या शुभेच्छा!

(लेखक पंडित नेहरूंच्या व्यक्तित्व , साहित्य व विचारांचे अभ्यासक आहेत )

Previous articleमी नथुराम गोडसे बोलतोय!
Next articleमला समजलेला गांधी – डॉ. अभय बंग
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.