‘बोले तैसा न चाले’च्या परंपरेला शरद पवार जागले !

-प्रवीण बर्दापूरकर

गेल्या आठवड्यात चार दिवस महाराष्ट्र शरद पवारमय झालेला होता . शरद पवार यांनी (महा)राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला ,  हा राजीनामा नक्की मागे घेतला जाणार याची खात्री होती. कारण जे बोलायचं तसं वागायचं नाही,असा शरद पवार यांचा लौकिक आहे ; त्या लौकिकाला शरद पवार यांनी याही वेळी  तडा जाऊ दिलेला नाही . शरद पवार लिखित ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनाची निमंत्रण पत्रिका बघायला मिळाली तेव्हाच एखाद्या नियोजनबद्ध खेळीची ही तयारी आहे , अशी शंका आली . सुधारित आवृत्तीत मूळ पुस्तकाला जेमतेम  ७०-७५ पानांची जोड होती ; म्हणजे काही फार मोठी सुधारणा नव्हती . देशातल्या राजकारण , समजकारण  , क्रीडा , सांस्कृतिक , उद्योग अशा अनेक  क्षेत्रातलं प्रकाशनासाठी शरद पवार यांचं वादातीत ज्येष्ठत्व लक्षात घेता त्यांच्यापेक्षा २२-२५ वर्षांनी लहान असणारे पत्रकार प्रमुख पाहुणे असणं हे फारच आश्चर्याचं होतं .

राष्ट्रीय वलय लाभलेल्या शरद पवार यांना या प्रकाशनासाठी अगदी पंतप्रधानांसकट कोणीही राष्ट्रीय नेता सहज उपलब्ध झाला असता पण , ते टाळण्यात आलेलं होतं ( एक मात्र खरं पत्रकार गिरीश कुबेर यांचं कार्यक्रमातलं भाषण वेधक झालं. ) शिवाय राज्यभरातील महत्त्वाच्या कार्यकर्ते व नेत्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचा सांगावा धाडण्यात आलेला होता . याचा अर्थ या कार्यक्रमात काहीतरी ‘घडवून’ आणलं जाणार आहे, अशी शंका किमान मला तरी आलेली होती आणि घडलंही तसंच . पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर मोठ्या सुरक्षा व्यवस्थेत वावरणाऱ्या शरद पवार यांना तिथून निघून जाणं सहज शक्य होतं पण , ते त्यांनी टाळलं आणि पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्याच्या घोषणेवर काय प्रतिक्रिया उमटतात हे ते बघत बसले . नुसतेच बघत बसले नाही तर एखाद्या वाद्यवृंदाचा संचालक  ज्या पद्धतीने वाद्यांचा मेळ  जुळवून आणतो , तसं संचालन अधूनमधून लिड  शरद पवार करत होते . याचा अर्थ प्रतिक्रिया काय होते, यांचा अंदाज त्यांना घ्यायचाच  होता .

दुर्मीळ अपवाद वगळता आजकाल राजकारणात कोणाचेच हात तसे स्वच्छ नाहीत . कोणत्या ना कोणत्या दगडाखाली बहुसंख्य राजकारण्यांचे हात अडकलेले आहेत आणि त्याचाच वापर केंद्रातलं भाजप सरकार वेगवेगळ्या चौकशांचा ससेमिरा मागे लावून पक्षवाढीसाठी करुन घेत आहे . (महा )राष्ट्रवादीत या आणि कांहीच्या राजकीय महत्त्वाकांक्षेमुळेही अस्वस्थता आहे . अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षातील आमदारांचा एक गट भाजपच्या वाटेवर असल्याच्या उघड चर्चा आहेत . अजित पवार यांच्या मागे (महा)राष्ट्रवादीचे बहुसंख्य आमदार आहेत . त्यातच दस्तुरखुद्द अजित पवार यांनीही मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा लपवून ठेवलेली नाही . (महा)राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहून अजित पवार यांची ही महत्त्वाकांक्षा पूर्ण होणं शक्य नाही . किमान महाराष्ट्राच्या राजकारणात तरी काकानं पुतण्याला राजकीय वारसदार नेमण्याची परंपरा नाही . म्हणूनच मुख्यमंत्री पदासाठी वेगळं एखादा समीकरण जुळवून आणणं अजित पवार यांना आवश्यक आहे .

शरद पवार हे कसलेले राजकारणी आहेत . महाराष्ट्राचं राजकारण गेली पाच दशकं कायमच त्यांच्याभोवती फिरत आहे . पक्षातला असंतोष म्हणा की अस्वस्थतेची , जाणीव शरद पवार यांना लागणार नाही , हे शक्यच नाही . शरद पवार म्हणजे उद्धव ठाकरे नव्हेत . शिवसेनेतले बहुसंख्य आमदार बंडखोरीच्या तयारीत आहेत याची गंधवार्ताही उद्धव ठाकरेंना लागली नाही , तसं शरद पवारांच्या बाबतीत घडणं शक्यच नव्हतं . काही आमदारांशी बोलल्यावर लक्षात आलं की , शरद पवार यांनी पक्षातल्या असंतोषाची खातरजमा अनेकांना फोन करुन घेतलेली होती .  मात्र बहुसंख्य आमदार जरी अजित पवारांसोबत असले तरी पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणजेच पक्ष , आपल्या बाजूने आहे याची पक्की जाणीव शरद पवार यांना होती . अशा परिस्थितीत भाजपत जाऊ इच्छिणाऱ्यांना शह देण्याची जाहीर खेळी खेळणं आवश्यक होतं आणि तीच खेळी ‘लोक माझे सांगाती’च्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनच्या निमित्तानं शरद पवार खेळले .

(महा)राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदाच्या त्यागाच्या शरद पवार यांच्या घोषणेनंतर शरद पवारांना अपेक्षित असणारा पाठिंब्याचा जोरदार आणि कांहीसा भावनिकही कल्ला झाला . हा भाजपच्या वाटेवर असणाऱ्या पक्षातील आमदारांना देण्यात आलेला खास पवार शैलीतला कात्रजच्या घाटात पकडणारा शह होता . ‘तुम्हाला जिथे कुठे जायचं तिथे तुम्ही तुमच्या बळावर जा . पक्ष आणि कार्यकर्ते मात्र माझ्या बाजूने आहेत .’ असा इशारा असंतुष्टांना देऊन टाकला . याचा एक परिणाम असा होईल की , भाजपात जाण्याच्या संदर्भात ज्यांच्या मनात चलबिचल आहे ते त्यांच्या निर्णयाचा नक्कीच फेरविचार करतील कारण ज्याची स्वबळावर निवडून येण्याची ताकद नसेल तो जर दुसऱ्या पक्षात गेला तर त्याचा पराभव करण्यासाठी (महा)राष्ट्रवादी पक्षाची ताकद पुरेशी असेल.

शरद पवार यांनी भाकरी फिरवण्याची घोषणा केली होती , नवीन भाकरी थापण्याची नाही ; हे या काळात विविध माध्यमातून व्यक्त होणाऱ्या कोणत्याही राजकीय विश्लेषकानं लक्षातच घेतलं नाही . त्यामुळे ‘बोले तैसा न चाले’ या परंपरेला जागून  पवारच पक्षाध्यक्षपदी कायम राहतील ही शक्यता लक्षातच घेण्यात आली नाही ; यांचा अर्थ या पिढीतीलही पत्रकारांवर शरद पवार यांचं गारुड आहे असा होतो . त्यातूनच (महा)राष्ट्रवादी राष्ट्रीय (?) नेतृत्व सुप्रिया सुळे आणि राज्याचं नेतृत्व अजित पवार यांच्याकडे दिलं जाईल अशी अतार्किक मांडणी माध्यमांकडून केली गेली . माझ्या पिढीतील ज्येष्ठ पत्रकार सातत्याने सांगत  की , ‘शरद पवार काय करतील याचा थांगपत्ता कधीच कुणाला लागत नाही .’ त्यासाठी १९७८च्या पुलोदसह अनेक घटनांचा दाखला ते देत. पत्रकारांच्या माझ्या पिढीनंही तोच अनुभव घेतला ; श्रीमती सोनिया गांधी यांच्या परदेशी नागरिकत्वाचा मुद्दा मांडून काँग्रेसमधे फूट  पडून वेगळी चूल मांडणारे शरद पवार निवडणुका संपताच काँग्रेससोबत राज्यातच नाहीतर केंद्राच्याही सत्तेत टुन्नकन उडी मारुन  सहभागी कसे झाले , हे माझ्या पिढीनं बघितलं आहे . त्यामुळे राजीनामा ही केवळ घोषणा आहे , हे उघड होतं .

आणखी एक मुद्दा म्हणजे शरद पवार यांना भाजपशी थेट हातमिळवणी करायची नाहीये  पण , भाजपला थेट शिंगावरही घ्यायचं नाहीये  हेही आजवर अनेकदा दिसलं आहे . शिवाय ते आणि त्यांच्या पक्षातले बहुसंख्य फार काळ सत्तेशिवाय राहू शकत नाहीत . महाराष्ट्रात ‘पुलोद’च्या प्रयोगात भाजपचा सत्तेतला सन्माननीय सहभाग शरद पवार यांनीच करवून दिलेला आहे  अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतांना नॅशनल डिझॉर्स्टरचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं आहे आणि २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर भाजपच्या नियोजित सरकारला बिनशर्त पाठिंबा देऊन टाकला होता . दत्ता मेघे यांना भाजपनी राज्यसभेची उमेदवारी दिली होती ( तेव्हा मेघे (महा) राष्ट्रवादीतच होते .) पण ,  उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मेघे विमानानं दिल्लीहून मुंबईला पोहोचेपर्यंत ती उमेदवारी शरद पवार यांनी भाजपतले त्यांचे सर्व सूत्रं वापरुन कशी रद्द करवून घेतली , याचा विसर अनेकांना पडलेला नाही . सांगायचं तात्पर्य हे की , शरद पवार यांची भाषा जरी भाजपच्या विरोधात असली तरी वर्तन मात्र भाजपपूरक असतं . म्हणूनच चार दिवसांच्या नाट्यातून (महा)राष्ट्रवादीतल्या ज्यांना भाजपत जायचं आहे त्यांना , ‘तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा .‘ असा संकेत देतानाच  शरद पवार यांनी पक्षावरची त्यांची असली-नसलेली   पकड आणखी घट्ट केली .

चार दिवसांच्या शरद पवार यांच्या खेळीनंतर  सांगितलं गेलं की ,  शरद पवार यांना म्हणे पक्षात नवीन नेतृत्व तयार करायचं आहे . सर्व संमतीनं वारसदार नेमायचा आहे आणि तरुणांना संधी द्यायची आहे . हे खरं आहे असं क्षणभर मानू . मग प्रश्न उरतो तो हा की , हे सर्व करायला त्यांना नाही कुणी म्हटलं होतं . राजीनाम्याची घोषणा न करताही हे सर्व करणं पवारांना शक्य होतं की ! ते तर पक्षाचे सर्वेसर्वा आहेत पण , त्यांनी ते केलं नाही कारण शह काटशहाच्या खेळात तरबेज असलेल्या पवार यांना केवळ भाजपत जाऊ इच्छिणाऱ्यांना इशाराच द्यायचा होता . ते इशारा देण्याचं राजकारण करण्यात शरद पवार यशस्वी झाले , यात शंकाच नाही पण, त्यासाठी त्यांना त्यांच्या ‘बोले तैसा न चाले’  या परंपरेची बेडी तोडताच आली नाही !

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)

९८२२० ५५७९९

प्रवीण बर्दापूरकर  यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –प्रवीण बर्दापूरकर– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleपवार नावाच्या माणसाचा विचार कोण करणार?
Next articleगांधी+नेहरू+आंबेडकर= भारत! आता हे घ्या वस्तुनिष्ठ पुरावे
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here