
‘लॉकडाऊन’ने देव-देवळाभोवती व्यवसाय करणाऱ्या लाखो लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालाय. तथापि, हे दगड- धोंड्यांच्या जागृत थोतांडाभोवती निर्माण झालेलं अर्थकारण ही अभिमानाने सांगण्यासारखी बाब नाही. भट- ब्राह्मणाचं पोट हे श्रद्धा-भक्तीच्या शेंडीत आणि जानव्याच्या गाठीत बांधलेलं असतं. त्यातून श्रद्धास्थानं – तीर्थस्थानं निर्माण झालीत. मात्र त्याभोवती जो बाजार उभा राहतो, त्यातले विक्रेते राजीखुशीने भक्त-भाविकांना आपली गिऱ्हाईक बनवत नसतात. शिक्षण असून आणि मेहनत करण्याची तयारी असूनही नोकरीची संधी मिळत नाही ; मिळाली तर अचानक बेकारीची कुऱ्हाड कोसळली, म्हणून त्यांनी तिथे आपला धंदा मांडलेला असतो. त्यात आता ‘लॉकडाऊन’ बेकारांची भर पडेल. देवाची पूजा-अर्चा करून भटा- ब्राह्मणांचा भिकार भिक्षुकीपणा संपत नाही ; तसा फोटो, हार, पूजेचे सामान विकल्याने आपला उद्धार होणार नाही, याची जाणीव या विक्रेत्यांना असते. तरीही ‘मजबुरी का नाम पांडुरंग’ म्हणत ते धंद्यासाठी रोजचे १५-१६ तास खपत असतात. आपल्या पुढच्या पिढ्यांना शिक्षण देत, वाट्याला आलेल्या मजबुरीतून सुटण्याचा प्रयत्न करीत असतात.
पुण्याचे प्रवीण तरडे हे ज्येष्ठ अभिनेते, लेखक आहेत. सामाजिक प्रश्नांवर ते ‘सोशल मीडिया’तून लिहीत-बोलत असतात. पण ‘भारतीय संविधान’चा वापर त्यांनी घरातल्या गणपतीच्या डेकोरेशनसाठी केल्याने, त्यांचा ‘बोलका पत्थर’ झाला. गणपती ही बुद्धीची देवता असल्याने, त्यांनी मूर्तीच्या दोन्ही बाजूंना पुस्तकांची चळत रचली आणि भारताच्या संविधानाची प्रत गणपतीच्या पाटाखाली ठेवली. ती गणेशमूर्तीच्या डोक्यावर ठेवली असती, तरी तो निर्बुद्धपणाच ठरला असता.