आताही येडीयुरप्पा पायउतार झाले ते त्यांचे द्वितीय पुत्र विजयेंद्र यांच्यामुळे . येडीयुरप्पा जरी मुख्यमंत्री होते तरी सर्व सत्ता विजयेंद्रच्या हाती केंद्रीत होती . पडद्याआडचे मुख्यमंत्री विजयेंद्रच होते . मंत्र्यांच्या परस्पर अधिकाऱ्यांना बोलावून विजयेंद्र कारभार हाकत असल्याच्या तक्रारी होत्या . अलीकडच्या काळात तर दर आठ-दहा दिवसांतून एकदा विजयेंद्रच्या वाढतच चाललेल्या हस्तक्षेपाबद्दलच्या तक्रारी दिल्लीश्वांराच्या कानी घालण्यासाठी भाजप आमदार आणि नेत्यांची रीघ लागलेली होती . थोडक्यात प्रकरण ‘नाकापेक्षा मोती जड’ झाल्यानं येडीयुरप्पा यांना हटवणं आवश्यक बनलेलं होतं . केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात शोभा करंजलांदे यांची वर्णी लागली तेव्हाच येडीयुरप्पा जाणार हे निश्चित झालेलं होतं . अर्थात कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे येडीयुरप्पा यांचेच समर्थक आहेत आणि कर्नाटकात ३५ टक्क्यांपेक्षा जास्त असणाऱ्या लिंगायत समाजाचे ते आहेत . त्यामुळे एकीकडे केंद्रीय नेतृत्वानं सत्तेचा तोल नीट सांभाळला आहे तर दुसरीकडे आपला समर्थक मुख्यमंत्री झाला असं समाधान येडीयुरप्पा यांना नक्कीच मिळालेलं आहे . थोडक्यात पक्षश्रेष्ठी आणि येडीयुरप्पा दोघेही जिंकले आणि दोघेही हरले अशी एकंदरीत परिस्थिती आहे .