जवाहरलाल नेहरू विशेष लेखमाला – भाग ४
साभार – साप्ताहिक साधना
– सुरेश द्वादशीवार
१९०८ मध्ये टिळकांना शिक्षा झाली. मात्र त्यानंतरही देश शांत नव्हता. बंगालमध्ये हिंसेचा उघड पुरस्कार करणारी ‘युगांतर’सारखी नियतकालिके लोकप्रिय झाली होती. ‘युगांतर’चे संपादन विवेकानंदांचे बंधू भूपेंद्रनाथ दत्त हे करीत. सरकारने त्यांनाही अटक करून दीर्घकाळच्या कारावासाची शिक्षा सुनावली. अरविंद घोषांची लेखणीही त्याच काळात त्यांच्या ‘वंदे मारतम्’मधून आग ओकत होती. 1910 मध्ये त्यांनी पाँडेचरीचा आश्रय घेतपर्यंत त्यांचा हा लढा सुरूच होता.
१९१० मध्येच वयाच्या विसाव्या वर्षी नेहरूंनी केंब्रिजचा निरोप घेतला. त्यांची अखेरची परीक्षा ते दुसर्या वर्गात उत्तीर्ण झाले. विज्ञानाचे विद्यार्थी असतानाही विज्ञानवाद्यांची एकाच विषयावर खिळून राहणारी नजर त्यांच्याजवळ नव्हती. एकाचवेळी राजकारण, समाजकारण, साहित्य व लोकचळवळ अशा सार्या विषयांवर लक्ष ठेवणारे त्यांचे मन त्यांना त्यांच्या अभ्यासातही एकाग्र करता येत नव्हते. परीक्षेनंतरची दोन वर्षे त्यांचे वास्तव्य लंडनमध्येच होते. या काळात त्यांचे वेब पती-पत्नीच्या फेबियन समाजवादाचे आकर्षण वाढले. मात्र त्याचे स्वरूप शैक्षणिक पातळीवरचेच राहिले. बर्ट्रांड रसेल आणि जॉन केन्सची बरीच व्याख्यानेही त्यांनी ऐकली. याच काळात त्यांनी आयर्लंडला भेट देऊन तेथे सुरू असलेल्या सिनफेन चळवळीचीही माहिती घेतली. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या मताधिकारासाठी सुरू झालेल्या आंदोलनाचाही त्यांनी अभ्यास केला. स्त्रियांची आक्रमक ताकद केवढी शक्तिशाली असू शकते याचे घडलेले दर्शन त्यांना पुढच्या चळवळींच्या उभारणीसाठी मार्गदर्शकही ठरले.
मात्र भारतातून भारतीय म्हणून गेलेले नेहरू या काळात ब्रिटीश संस्कृतीचा ठसा अंगावर उमटवून परतले. मुळात त्यांना भारताच्या परंपरांची व इतिहासाची ओळख होती आणि आता तिच्यावर जागतिक प्रवृत्तींचा प्रभाव होता. ‘मी स्वत:च एक संमिश्र प्रवृत्ती बनलो आहे पूर्व आणि पश्चिम यांचे मिश्रण असलेली. सर्वत्र परका आणि कुठेही घरचा नसलेला.’ अशी स्वत:विषयीचीच त्यांनी केलेली नोंद त्यांच्या आत्मचरित्रात आढळते. त्याचवेळी समाजवाद, राष्ट्रवाद, स्वातंत्र्याविषयीची ओढ व साम्राज्यवादाचा तिरस्कार मात्र इंग्रजी शिस्तीचे आकर्षण अशा सार्या गोष्टी एकाचवेळी त्यांच्यात होत्या. टी.एस. इलियट या कवीशी बोलताना त्या काळात ते एकदा म्हणाले ‘मी एक आतला दुभंग अनुभवतो आहे.’
नंतर अलाहाबाद विद्यापीठातील एका प्राध्यापकाने त्यांना आपल्या सोबतच्या सभांमध्ये सहभागी व्हायचे निमंत्रण दिले, तेव्हा ते सहजपणे म्हणाले, ‘पण मी माझ्यातल्या समूहाचे काय करू’.
इंग्लंडला शिकायला व त्याचा शोध घ्यायला गेलेला हा बुद्धिमान पण एकाकी वृत्तीचा तरुण भारतात परतला तो अखेर भारत समजून घ्यायला आणि त्याचा शोध घ्यायला.
नेहरूंच्या इंग्लंडमधील वास्तव्यात त्यांचे आणि मोतीलालजींचे वाद घडले नाहीत असे नाही. आपल्या कर्तृत्वाचा पुरेपूर अभिमान असणारे मोतीलालजी आणि स्वत:च्या स्वतंत्र वृत्तीची जोपासना करणारे नेहरू यांच्यात सदैव एकवाक्यता होणे तसेही अवघडच होते. नेहरूंनी परीक्षेत अपेक्षेनुसार यश न मिळविल्याने मोतीलालजी नाराज होते. त्यातून नेहरू दुसर्या वर्गाचे गुण मिळवून उत्तीर्ण होत होते व त्याच काळात त्यांचा पुतण्या, पं. बन्सीधरजींचा मुलगा श्रीधर बी.ए., बी.एससी. (अलाहाबाद), एम.ए. (कॅनडा), पीएच.डी. (हायडेलबर्ग) या पदव्यांसह आयपीएस झाला होता. सगळ्या सोयी उपलब्ध करून देऊनही जवाहरलालला हे जमले नाही याची खंत मोतीलालांच्या मनात होती आणि ते ती बोलूनही दाखवत होते.
१९११ मध्ये इंग्लंडचे राजे पाचवे जॉर्ज भारताच्या काही दिवसांच्या भेटीला यायचे होते. दिल्लीत भरणार्या त्यांच्या दरबारात हजर राहण्याचे सन्माननीय निमंत्रण मोतीलालजींना मिळाले होते. एक नामांकित कायदेपंडित आपल्या सरकारला अनुकूल असावा ही सरकारची इच्छा त्यामागे होती. मात्र त्याचवेळी राजे पंचम जॉर्ज हे मोतीलालजींना लॉर्डशिप प्रदान करणार असल्याची अफवा देशात पसरली. आपल्या वडिलांनी आपल्यावर गुलामगिरी लादणार्या राजाकडून असा सन्मान स्वीकारावा ही बाब नेहरूंना आवडली नाही. तसे त्यांनी संतापाने मोतीलालजींना कळविलेही. मात्र ही अफवा असल्याचे मोतीलालजींनी परोपरीने सांगूनही नेहरूंचा त्यावर विश्वास बसला नाही. तो सन्मान अखेर मोतीलालांना मिळाला नाही. मात्र दिल्ली दरबारचे निमंत्रण स्वीकारून ते थेट दरबारी जामानिम्यानिशी त्यात हजर झाले. राजांनीही त्यांना आपल्या जवळचे आसन देऊन त्यांचा सन्मान केला.
असले मतभेद वगळले तरी बाप-लेकांचा परस्परांवरील लोभ कायम होता. केंब्रिजनंतर ऑक्सफोर्डला जाण्याची नेहरूंची इच्छा मोतीलालजींनी त्याचमुळे फेटाळली व त्यांना तात्काळ भारतात यायला फर्मावले. त्यांच्या स्वागताची तयारी त्यांनी सार्या कुटुंबासोबत आपल्या मसुरीच्या निवासस्थानी केली. पुत्रभेटीचा तो सोहळा सार्यांच्या स्मरणात राहील असा अभूतपूर्व बनविण्याचा प्रयत्नही त्यांनी यावेळी केला होता… भारतात परतल्यानंतर काही काळ आयसीएसची परीक्षा देऊन सरकारी सेवेत जाण्याचे नेहरूंच्या मनात होते. पण तो विचार लवकरच मागे पडून त्यांनी वकिलीच्या व्यवसायात प्रवेश करण्याचे मोतीलालजींच्या सल्ल्याने ठरविले. सरकारी नोकरीत गेलेला मुलगा तीत होणार्या बदल्यांमुळे आपल्यापासून दूर राहील ही मोतीलालजींची चिंता त्याला कारण ठरली.
नेहरू भारतात परतले तेव्हा हा देश तुलनेने शांत होता. टिळक मंडालेच्या तुरुंगात होते. गांधी आफ्रिकेतून परतले नव्हते आणि मवाळांचा इंग्रज सरकारशी सहकार सुरू होता. मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा देशात लागू झाला होता. त्याने केंद्रात मध्यवर्ती कायदे मंडळाची स्थापना केली आणि मुंबई, कलकत्ता व मद्रासला प्रांतिक विधिमंडळे निर्माण केली. मात्र त्या सार्यांवर ब्रिटीशांचा वरचष्मा राहील आणि त्या सरकारवर या विधिमंडळातील भारतीयांचा कोणताही प्रभाव असणार नाही अशा नेमणुकांची व्यवस्थाही त्याने केली. गव्हर्नर जनरलच्या सल्लागारात एका भारतीयाची नेमणूक करण्याचीच तेवढीच सवलत या कायद्यात होती. शिवाय मुसलमानांना विभक्त मतदारसंघ देऊन पुढे होणार्या देशाच्या फाळणीचीही पायाभरणी होती… बंगाल शांत होता. १९११ मध्ये बंगालची फाळणी मागे घेऊन सरकारने लोकांचा रोष कमी केला होता. १९०६ मध्ये मुस्लिम लीग स्थापन झाली होती. तिची प्रतिक्रिया म्हणून निर्माण झालेली पण काँग्रेसमध्ये राहून काम करणारी हिंदू महासभाही त्याच वर्षी निर्माण झाली होती… एक बदल आणखीही होता. नेहरूंच्या कृष्णा या दुसर्या बहिणीचा जन्म १९०७ मध्ये झाला होता.
नेहरूंनी वकिलीची सुरुवात चांगली केली. त्यांनी स्वीकारलेल्या पहिल्याच खटल्यात त्यांना पाचशे रुपयांची घसघशीत फी मिळाली. मात्र न्यायालयातले वातावरण आणि तेथील बार असोसिएशनमध्ये होत असलेली निष्फळ चर्चा यांना ते वैतागले होते. वेळ मिळेल तेव्हा त्यापासून शक्यतो दूर राहण्याचा त्यांचा प्रयत्न् होता. त्याचमुळे 1912 च्या डिसेंबरमध्ये बिहारमधील बांकीपूर येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाला एक सामान्य प्रतिनिधी म्हणून ते हजर राहिले. मात्र त्यात उपस्थित असलेल्या धनवंतांची स्वातंत्र्याविषयीची न दिसलेली उत्सुकता, त्यासाठी कोणताही लढा न देण्याची त्यांची वृत्ती आणि त्यांचा पोषाखी बडेजाव पाहून तेथेही ते निराशच झाले. त्यांच्याच शब्दात तो ‘इंग्रजीतून बोलणार्या उच्चभ्रू वर्गाचा मेळावा’ असे त्याचे वर्णन मग नेहरूंनीच करून ठेवले. न्यायालयातले वातावरणही कंटाळवाणे व वकिलांच्या वर्गात होणार्या चर्चाही त्यांना निष्फळ व दिखाऊ वाटत राहिल्या. स्वातंत्र्यलढ्याच्या तयारीची स्वप्ने पाहात भारतात आलेल्या तरुणाला निराश करणारे ते चित्र होते. त्याने नेहरूंना वैफल्याखेरीज काही दिले नाही. या स्थितीत त्यांना प्रथम ना. गोखल्यांच्या सर्व्हंटस् ऑफ इंडिया सोसायटीविषयीचे कुतूहल वाटले. गोखल्यांची भाषणे त्यांनी इंग्लंडमध्ये ऐकली होती. बांकीपूर काँग्रेसवरील त्यांचे वर्चस्वही त्यांनी पाहिले होते. मवाळ असला तरी हा नेता काहीतरी करणारा व समाजाच्या प्रश्नांवर बोलणारा आहे असे त्यांचे मत झाले. काही काळ त्यांच्या सोसायटीचेही सभासद व्हायचे त्यांनी मनात आणले. पण ते सारे विचारापाशीच थांबले.
नेमक्या अशावेळी १९१३ च्या नोव्हेंबरमध्ये गांधीजींनी आपल्या २५०० भारतीय सहकार्यांसोबत दक्षिण आफ्रिकेच्या सरकारविरुद्ध नाताळपासून ट्रान्सव्हॉलपर्यंत नेलेला शांततामय मोर्चा नेहरूंच्या आकर्षणाचा विषय बनला. द. आफ्रिकेचे सरकार जनतेला व कामगारांना दिलेली आश्वासने पाळत नाही आणि श्रमिकांवर बसविलेला वार्षिक कर आश्वासन देऊनही मागे घेत नाही याविरुद्ध गांधींनी तो लढा उभारला होता. त्याचे स्वरूपच अभिनव होते. त्याच्या निषेधात हिंसा नव्हती आणि आग्रहात सत्याखेरीज काही नव्हते. गांधीजींनी त्याआधीही १९०७ मध्ये असा सत्याग्रह केला होता. पण १९१३ च्या त्यांच्या लढ्याचे यश सरकारला माघार घ्यायला लावणारे होते. स्वदेशापासून दूर असणारे गरीब कामगार, छोटे व्यापारी व सामान्य माणसे संघटित होऊन अहिंसेच्या मार्गाने एवढे यश दूर देशात मिळवीत असतील तर ते आपल्या येथेही होणे शक्य आहे या विचाराने मग नेहरू भारावले आणि गांधींच्या प्रत्येक हालचालीची ते दक्षतापूर्वक माहिती घेऊ लागले.
१९१४ मध्ये पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली. त्यात ब्रिटनचा पराभव होईल या आशेने येथील काहींना आनंद झाला होता. मात्र जर्मनीचा हुकुमशहा कैसर याच्याविषयीचा विश्वास कोणाला वाटत नसल्याने त्याच्याकडेही कोणाची सहानुभूती नव्हती. दरम्यान झालेल्या बाल्कन युद्धात अनेकांना, व विशेषत: भारतातील मुसलमानांना तुर्कस्तानविषयीची सहानुभूती होती. पण तो देश जर्मनांना अनुकूल झाल्याने तीही काही काळात प्रश्नार्थक बनली. संस्थानिकांचे वर्ग इंग्रज सत्तेसोबत जायला बांधले होते. सामान्य माणसांना मात्र या युद्धाच्या बातम्यांखेरीज बाकी कशात फारसा रस नव्हता. एका गोष्टीचा संताप मात्र देशात यावेळी वाढला होता. इंग्रजांनी पंजाब व देशाच्या काही प्रांतात सक्तीची सैन्यभरती करून त्यात दहा लाख लोकांना युद्धात गोवले होते. बातम्यांवर बंदी होती आणि भारत संरक्षण कायदा जारी होऊन देशात कोठेही अशांतता निर्माण होणार नाही याची काळजी सरकार घेत होते.
१७ जून १९१४ या दिवशी सहा वर्षांची शिक्षा भोगलेल्या टिळकांची सुटका झाली. त्यांनी तुरुंगात लिहिलेल्या ‘गीता रहस्या’ने देशाला भारले असतानाच १९ फेब्रुवारी १९१५ या दिवशी गोखल्यांचा मृत्यू झाला. त्याच क्षणी काँग्रेसच्या नेतृत्वाविषयीचा व त्या पक्षाच्या भावी दिशेविषयीचा वादही संपला होता. संघटना टिळकांच्या मार्गाने जाणार हे सार्यांना दिसू लागले होते व तशी ती गेलीही. ९ जानेवारी १९१५ या दिवशी गांधीही भारतात कायमच्या वास्तव्यासाठी परतले होते.
(लेखक नामवंत विचारवंत , वक्ते व लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे संपादक आहेत)
9822471646