जगात खूप साऱ्या औत्सुक्यपूर्ण गोष्टी आहे . ज्ञान – तंत्रज्ञानाने जग कितीही बदललं असलं तरी जगाच्या प्रत्येक देशात जुन्या प्रथा – परंपराचे पालन करणारा समाज मोठ्या संख्येने आहे . प्रगत देशही याला अपवाद नाहीत . ज्याप्रमाणे जगभर वेगवेगळ्या देव – देवतांची आराधना होते . तसाच प्रकार भुतांच्या बाबतीतही होतो, हे सांगितले तर विश्वास बसणार नाही . पण ते खरंआहे . जगातील अनेक देशात भूतांची दरवषी मोठ्या धुमधडाक्यात पूजा केली जाते.
……………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………..
डॉ अनुभूती मेटकर पाटील
सरळ डोक्यांची असतात तशी उलट्याही डोक्यांची माणसे असतातच, आपण म्हणतोच ना . समोर चालणारी असतात तशी मागे खेचणारी पण माणसे असतातच. पावले समोर असणारी असतात तशी ‘मागे पावले असणारी’ पण असतात. हो! मागे पावले असणारी म्हणजे ‘भुते’ असतात .लहानपणी एवढेच माहीत. उलट्या पावलांचे creatures./जीव.
पण चक्क या उल्टया पावलांच्या भुतांची जगात कित्येक ठिकाणी पूजा होते .भीतीने नव्हे , तर सन्मानाने . भुते म्हणजे त्यांचे देव .त्यांचे पूर्वज. त्यांचे पितर.
आपल्याकडे ‘विक्रम आणि वेताळ’ नावाने कधी न संपणारा प्रश्नोत्तराचा गोष्टीरूप भाग आपण पाहिलाय. बस तसेच! भूते म्हणजे प्रेतात्मे, मृतात्मे, मृत शरीरात वास करणारा आत्मा. भूते सर्व जाणतात. वेगळ्या लोकांत राहतात. विशेषतः पाताळात , आणि कधी कधी सार्वत्रिक सुद्धा असतात. आताच नाही का, थायलंड मध्ये एव्हढे त्या गुहेत अडकलेल्या १२ मुले आणि एका कोचला कित्येक आठवड्यानंतर बाहेर तर काढले गेले, एकाच्या प्राणाची आहुती पण गेली, मुले आपल्या कोचसहटसुरक्षित आईवडीलांकडे देखील पोचली . मात्र त्यांनी ९ दिवस गुहेत राहून तिथल्या मृत आत्म्यांना, भुतांना ‘ डिस्टर्ब ‘ केले, पाप केले, म्हणून ९ दिवस , ११ मुले आणि एक कोच यांची थायलंड च्या बुद्धिस्ट रिवाजाप्रमाणे शांती- शुद्धिकरण प्रक्रिया केली गेली ( हे नियम एक मुलगा जो बुद्धिस्ट नव्हता त्याला लागू नाही झाला .बाकींची भिक्खूंनी २७ जुलै ते ४ ऑगस्ट २०१८ या काळात शांती करून दिली . ).
ही अशी भुतांच्या रूपातील पूजा कुठेकुठे प्रचलित आहे माहिताय??
चीन ,जापान ,कोरिया, दक्षिण पूर्व एशिया ज्यात थायलंड मुख्यत्वे , सिंगापूर, हॉँगकॉंग, केल्टिक आयरलैंड . या सर्व देशात तेथील लोकांच्या पितर पूजेचा एक भाग आहेत.
किती प्रागतिक , किती पुढारलेले देश.पण संस्कृती पुढे काय?, त्यांची संस्कृती आहे ती . तिथे भूत -प्रेत, अलौकिक जीव ,दैत्य , राक्षस। (ghosts ,monsters, supernatural creatures) यांची पूजा होते.ते उपद्रवी असतात हे ते मानतात. ही भूत पूजा,पुढे चीनी बुद्धिजमचा भाग बनली . Hungry ghost festival, Phor Thor म्हणजे उपाशी असलेल्या भूत पितरांचा सण. आजही चीन(विशेषतः Penang मध्ये) ,कोरिया, हांगकांग ,मलेशिया, सिंगापूर येथे साजरा करतात. मृत पितरांच्या थड़ग्याजवळ जावून , तेथे उदबत्ती लावून, अन्न, कागदी पैशांचा किंवा जॉस पेपरचा अंगारा करुन आपले पाताळातील (underworld, netherworld) पूर्वज शांत केले जातात.
आपल्याकडील पूर्वज अगदी उलटे, स्वर्गात असतात, मजेत असतात, तेथूनच आशीर्वाद देतात. त्यांना जेवू आपणही घालतो, आणि गोडधोड़ स्वतःच संपवतो. इकडे मात्र सगळं उत्सवी असतं. किमिंग उत्सव आणि चुंयांग फेस्टिवल अशी पितर पूजा चीनमध्ये आहे, मात्र यात हे पितर भेटायला येत नाहीत, तर पाताळातच असतात. ’घोस्ट फेस्टिवल’ ला मात्र ते तेथून निघून आपापल्या वंशजांकड़े येतात, अशी समजूत आहे. यात रिकाम्या किंवा रिक्त खुर्चीला जेवण दिले जाते, त्यात आपले पूर्वज,मृतात्मे बसले आहेत असे समजले जाते. (अशीच मनोभावे मृतात्मा पूजा रिकाम्या तिरडीची करतात , भारतात, गोंडी समाज, बस्तर,छत्तीसगढ़, त्याला ते ‘आंगा’ म्हणतात. यान वांग हा मर्त्यलोकांचा देव चीनी व जपानी बुद्धिसममध्ये न्यायाधीश मानला जातो . हिन्दू ‘यमदेवते’ सारखा. झोंग कुई हा भुतांचा संहारक. युलां पेन हे ghost festival चे चीनमधील बुद्धिस्ट नाव.तर जोंग्वां Zhongyuan हे ताओइस्ट धर्मातील नाव. चीनी चांद्रमासाच्या सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी हा सण असतो . अख्खा सातवा महिना हा मृतात्मा महीना, घोस्ट मंथ असतो . (आपल्याकडे श्राद्धपक्ष किंवा पितृपंधरवडा असतो तसा ). इजिप्त मध्ये मृतात्मा ज्याला ‘का’ म्हणतात,दवात duat किंवा पाताळातून ७० दिवसात पुढे जावून मगच पितर बनतो. चीन मध्ये या आत्म्याला Qi किंवा ‘ची’ म्हणतात. जापानमध्ये भूतपूजा म्हणजे बॉन किंवा ओबोन पूजा.
चीनी पितर पूजा ही मृत्यूनंतर पण आत्मा जगतो या विश्वासावर आहे. आत्मा हा नश्वर नसून तो केवळ शरीर सोडतो आणि दुसरीकडे प्रवेश करतो. पुनर्जन्म घड़तो. त्याचे अस्तित्व Grave/ थड़ग्यातुन पुढे जाते. म्हणून तिथे शांती करणे गरजेचे, ही त्यांची भावना . आपल्याकडे आत्मा भटकत नाही तर त्याला ‘मोक्ष’ मिळतो, जीवन मृत्युच्या चक्रातून तो मोकळा होतो. म्हणून अक्षयतृतीया असो की प्रत्येक राज्यातील भारतीय पितरपूजा, मोक्ष मिळावा म्हणून कित्येक विशिष्ट दिवशी या पूजा नदीसाठी केल्या जातात . आज ही काशी ,(आजकाल येथे ऑनलाइन अस्थिविसर्जन आणि पिंडदान होते म्हणे) , कुरुक्षेत्र (जवळच कुलतारण येथे पांडवांनी पूर्वजांचे अस्थिविसर्जन केले अशी वदंता आहे ) , बाणेश्वर, प्रयाग, अयोध्या, गया , द्वारका वगैरे. शेवटचा अंश, राख,अस्थी देखील पाण्यात विसर्जित करून पितरांचा कुठलाही लवलेश स्मृतींशिवाय मागे ठेवलाजात नाही, म्हणजेच त्यांना मोक्ष प्राप्ती करवून दिली असे समजल्या जाते . बघा किती उलटे. एक संस्कृती आत्मा अमर आहे , तो यातून त्यात भटकतो म्हणते , तर दुसरी त्याला भटकूच देत नाही, त्याला मोक्ष देते. उरतात फक्त आठवणी . स्मृतीशेष.
सध्या कम्युनिस्ट राजवटीमुळे चीनच्या शहरी भागात ही पितर पूजा कमी होतेय, मात्र खेड़याखेड़यांत तिचे अस्तित्व आजही आहे. (पितर पूजा किंवा ancestral worship ही तिथे शान राजवट म्हणजे साडेतीन हजार वर्षांपासून कमीतकमी आहे. ) चीन चा दूसरा धर्म , ‘ताओइस्म’ ,त्यात सुद्धा यातील मोठ्या बदलांना आणि मान्यतेच्या वेगळेपणा ला सुरुवात झालीय. ‘मन मई पो’ हे मांदरिन भाषेतील तांदूळ हाती घेवून भूतांशी संवाद करणाऱ्या काकू चे नाव. छोट्या मोठ्या भाग्य आजमावायच्या गोष्टीत ही मद्त करते. (चीनी लोक आपल्यापेक्षा कमी अंधश्रद्धाळू नाहीत) घराघरात देखील एरवी अशीच पूजास्थळ altar करून , दररोज चहा देवून , उदबत्ती लावून पूजा केली जाते. मृतात्म्याना शांत न केल्यास ते कधीही hungry घोस्ट बनून जीवावर उठु शकतात, असे समजले जाते.घोस्ट फेस्टिवल ला ‘चीनी होलोवीन’ म्हटल्या जाते. हा मेक्सिकोच्या ‘दीव दे ला मर्ता’ सारखा आहे . यात फक्त भूतांना बोलावल जात नाही तर मर्त्य,मृत लोकांच्या थड़ग्याजवळ जावून भूतांच्याचेहऱ्याची किंवा कवटीच्या, हाडांच्या आकारांत साखरेची पाककृती सजवल्या जाते.
आयर्लंडमध्ये हाच घोस्ट फेस्टिवल होलोवीन/ Holloween नावाने साजरा होतो. मुळात हा क्रिश्चियनिटी च्या उदयापुर्वीचा samhain किंवा ‘सावन’ सण आहे,जो तेथील’ ‘सेल्टिक’/celtic लोक पूर्वीपासुन साजरा करतात. या दिवशीपासुन उन्हाळ्याचा ऊष्मा संपून लांब हिवाळा सुरु होतो. या दिवशी आतापर्यंतचे सर्व भूत, मृतात्मे रात्रीला भेट देतात, आगी शेजारी ठेवलेले सर्व पक्वान्न, मिष्टान्न खातात . त्यांच्या साठी भोज, पेय, खेळ आणि भूतांचे चेहऱ्याचे मास्क यांची चंगळ असते. आता ख्रिस्ती धर्मासोबत त्याचे मूळ स्वरूप काही अंशी बदलले पण ,भूत,मृतात्मा हा प्राचीन पितर भावनेचा भाग कायम आहे. हेच ते ‘सेल्टिक लोक’ आहेत, जे नग्नतेला नैसर्गिक मानतात, प्राचीन काळी युद्धात नग्न जायचे. आपल्याकडे ही दिगंबर जैन आपल्याकडे भूत- प्रेत म्हणजे आता जुनाट रूढी आणि समज म्हणू. पण अजुनही याच भुतांची जगाच्या बहुतेक भागात पूजा होते. आत्म्या चे घर समजले जाते, पुनर्जन्म त्याच्याशी संबंधित मानला जातो, आणि samhain किंवा ‘सावन’ तर चक्क अंधाराच्या साम्राज्याच्या सुरूवातीचा दिवस आहे.तेव्हा ही ‘अद्भूत भुत -पितर- पूजा’ केली जाते. जगात आपल्याकडे दिवस उगवतो तर निश्चितच कुठेतरी अंधार होणार असतो, आपला अंधार संपून दुसरीकडे सुरु झालेला असतो . कोणी दिवसाला महत्व देतं तर कोणी रात्रीला , अंधाराला . सगळे आपापल्या संस्कृती वर अवलंबून असते. प्रत्येकाचे आपापले भावनिक आणि कार्यकारण असलेले विश्व असते हेच ते काय शेवटी खरे!!!!!!!
(लेखिका नामवंत स्त्री रोग तज्ञ व इतिहास , मानववंशशास्त्र अभ्यासक आहेत)