महाराष्ट्रभूषण’ दिनू रणदिवे

-ज्ञानेश महाराव

महाराष्ट्र राज्य स्थापनेला (१ मे १९६०) गेल्या महिन्यात ६० वर्षें पूर्ण झाली.* भाषावार प्रांतरचनेनुसार मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती होण्यास सलग ५ वर्षे लढा द्यावा लागला. या लढ्यात जाणतेपणे सहभागी झालेले एन.डी.पाटील, शाहीर लीलाधर हेगडे, डॉ. बाबा आढाव यांच्या सारखी वयाची नव्वदी पार केलेली फार थोडी माणसे आज शिल्लक राहिलीत. त्यात आणखी एक होते, ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे ! त्यांचं नुकतंच (१६ जून रोजी) वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झालं. ‘संयुक्त महाराष्ट्र’च्या लढ्याला सुरुवातच दिनू रणदिवे व दुसरे अशोक पडबिद्री या पत्रकारांनी १९५६ मध्ये प्रकाशित केलेल्या ‘महाराष्ट्र पत्रिका’ या चळवळीच्या पत्राने झाली.

घरात ‘महाराष्ट्र टाइम्स’ व ‘लोकसत्ता’ ही दैनिकं येत असल्याने मी लहानपणापासून दिनू रणदिवे आणि अशोक पडबिद्री यांची नावं विशेष बातम्यांत पहिल्या पानावर वाचत होतो. १९८० मध्ये अ.र.अंतुले यांना ‘सिमेंट घोटाळ्या’मुळे मुख्यमंत्रीपदावरून जावे लागले, तेव्हा दिनू रणदिवे यांचे रिपोर्ट विशेष गाजले. मुंबई महानगरपालिका आणि मुंबई विद्यापीठांमधील भ्रष्टाचाराच्या दिनू रणदिवे यांच्या बातम्याही लक्षवेधक असायच्या. पुरावे, तपशील यामुळे रणदिवे यांच्या बातम्यांत विश्वासार्हता शोधावी लागायची नाही‌. ती ठासून भरलेली असायची.

१९८५ मध्ये ते ‘मटा’ मधून सेवानिवृत्त झाले. त्याच वर्षी मी पत्रकारितेत आलो. ‘मुंबई मराठी पत्रकार संघ’च्या कार्यालयात ते दिसायचे. पण बोलण्याचा प्रसंग आला नाही. १९८८ पासून निखिल वागळे यांचे ‘महानगर’ हे सांज दैनिक सुरू झाले आणि त्यातून दिनू रणदिवे यांची पत्रकारितेतील ‘सेकंड इनिंग’ पत्रकार म्हणून पाहायला मिळाली. त्यांच्या पत्नी सविताजी ह्या गुजराती होत्या. त्यामुळे गुजराती ‘चित्रलेखा’च्या त्या जुन्या वाचक होत्या. मराठी ‘चित्रलेखा’तून नारायण आठवले यांचे ‘महाराष्ट्र माझा’ हे सदर गर्जू लागले. तसे रणदिवे मराठी ‘चित्रलेखा’ घरी आणू लागले. ६ डिसेंबर १९९२ मध्ये ‘बाबरी मशीद’ पडली. तेव्हा मी अयोध्येत होतो. तिथून रिपोर्टिंग केले होते. मुंबईत आल्यावर पुढच्या अंकात २२ छापील पानांचे चार रिपोर्ट्स लिहिले होते. ते वाचून रणदिवे यांचा ‘चित्रलेखा’त फोन आला. सुरुवातीला ते गुजरातीत बोलले. मला काही समजले नाही‌. तसे हसत म्हणाले, “मालक गुजराती असला तरी तुम्ही ‘मराठी बाणा’ सोडलेला दिसत नाही !” मला काही कळेना. म्हटलं, काय झालं ! माझं काही चुकलं का ?

तसे म्हणाले, “खूप चुकलं. एका पत्रकाराने ४ रिपोर्ट्स लिहायचे आणि २२ पानं भरायची, हे संपादक म्हणून तुम्हाला कितपत योग्य वाटते?”

मी म्हटलं, ”तुमचं म्हणणं बरोबर आहे. तीन रिपोर्टवर टोपणनाव किंवा प्रतिनिधी म्हणून लिहिता आले असते. पण ‘चित्रलेखा’ने एकाच विषयासाठी चौघांना अयोध्येत पाठवणे, मराठी पत्रकारितेत खूपच खर्चिक दिसले असते; म्हणून टाळले !”

माझ्या बोलण्यातली खोच त्यांना क्षणात समजली. म्हणाले,” समजले ! म्हणजे संपादक महाराव यांना स्वतःतला रिपोर्टर मारायचा नाही तर ! तो जपा. खूप काळ संपादक म्हणून टिकाल. बरेच जण संपादक झाले की, स्वतःतला रिपोर्टर विसरतात. तेव्हाच त्यांची पत्रकारिता संपलेली असते. तुमच्यातल्या रिपोर्टरने भरपूर माहिती जमवली आणि तुमच्यातल्या संपादकाने ती नेमक्या शब्दांत लिहिली. म्हणून २२ पाने वाचनीय झालीत. लेखन मनापासून आवडले, म्हणून अभिनंदन ! फक्त आता पत्रकारिते पुरतंच लेखन करून थांबू नका. दरवर्षी एखाद्या विषयावर एक तरी पुस्तक प्रकाशित झाले पाहिजे !”

त्यानंतर दादर ( पश्चिम ) रेल्वे स्टेशन समोरच्या ‘घामट मॅन्शन’मधील त्यांच्या घरी भेट घेण्यासाठी गेलो. जुन्या पद्धतीची ती मजबूत इमारत, पंचवीस-तीस पायर्यांचे दोन जिने, दोन खणांच्या त्या खोलीत शिरताच प्रथम मोरी आणि स्वयंपाकाचा ओटा लागायचा. तो ओलांडला, की बसायची खोली आणि वर माळ्यावर जायचा जिना दिसायचा. बाकी जागा दोन-चार माणसं बसण्यापुरतीच शिल्लक असायची. कारण ती सगळी खोली जुन्या-नव्या वृत्तपत्रांनी व्यापलेली असायची. जवळपास १९४८ पासूनचे महत्त्वाची बातमी-लेख असलेले इंग्रजी, मराठी, हिंदी आणि अन्य भाषिक वृत्तपत्र त्यांनी संदर्भासाठी संग्रहित केले होते. त्यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पत्नी सविता घरी येणाऱ्यांकडे थोडी नाराजी व्यक्त करायच्या. पत्रकार किंवा लेखनाशी संबंधित कोणी आलं, की गमतीनं म्हणायच्या, “तुमच्या कामाचे काही असेल, तर यातले थोडेफार पेपर घेऊन जा!’ या दांपत्याला मूलबाळ नव्हतं. पण मावळतीच्या वयात दोघांनी एकमेकांना सांभाळलं होतं. १९९५ नंतर महाराष्ट्रात ‘शिवसेना-भाजप’ची सत्ता आली. घरी जाण्यासाठी मी दादर स्टेशनला उतरत असल्याने आठवड्यातून एकदा रणदिवेंच्या घरी डोकावणं व्हायचं. त्यांना पत्रकारितेत काय घडतं, ते समजून घेण्यात रस असायचा; तर सविता मॅडमना आजूबाजूला काय घडतं, ते समजून घ्यायचं असायचं. त्या सेवानिवृत्त शिक्षिका होत्या. मला रणदिवे यांच्याकडून विविध विषयांवरचा आगा-पिछा समजून घ्यायचा असायचा. सारी माहिती ते तारीख-तपशिलासह देत. त्यांच्या पेपरांची थप्पी लावलेल्या टेबलावर लिहिण्याचा कागद ठेवण्याइतकीच मोकळी जागा असायची. ती जागा लिहिण्यासाठी आणि तीच जेवणाचं ताट ठेवण्यासाठी !

त्यांच्या घराच्या खिडकी समोरून दादर रेल्वे स्टेशनसमोरचा वाहतुकीचा पूल जायचा. त्या गाड्यांचा आवाज, रेल्वेचा खडखडाट, इमारतीखालील दादर बाजारातील लोकांचा कलकलाट; या साऱ्या झमेल्यात त्यांचं लेखन-वाचन आणि लोकांना भेटणं चालायचं. या भेटणाऱ्यांत खूप बडी माणसं असायची. नवोदित पत्रकार, अनोळखी कार्यकर्ते असायचे. काही दिवसांपूर्वी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख भेटीसाठी रणदिवेंच्या घरी आले होते. जो भेटेल त्याला समाजोपयोगी माहिती देताना, आपण ‘अपडेट’ राहण्याचा रणदिवेंचा प्रयत्न असायचा. त्यांना कुणाकडूनही सहानुभूतीची वा मदतीची गरज नसायची.

त्यांना पत्रकारिता आणि सामाजिक कार्य क्षेत्रातले पुरस्कार मिळाले. पण त्याची रक्कम त्यांनी कधी घरी आणली नाही. २००६ चे वर्षे असेल. ‘नवी मुंबई पत्रकार संघा’ने त्यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार दिला. सत्काराची दहा हजाराची रक्कम दिली. ती माझ्याकडे देताना म्हणाले, ‘सध्या ही तुमच्याकडे ठेवा. मी सांगेन तेव्हा द्या !’ मी ते पैसे बँकेत माझ्या खात्यात ठेवले . दरम्यान, ते पैसे कुणाला द्यायचे ते त्यांनी आवश्यक ती तपासणी करून नक्की केले आणि ते घेऊन येण्यासाठी फोन केला. सहा महिने उलटले होते.

मी १२ हजार रुपये घेऊन त्यांच्याकडे गेलो. म्हणालो,’ हे दहा हजार पुरस्काराचे आणि हे दोन हजार रुपये व्याज!’

तसे ते म्हणाले,’तुम्ही हे पैसे पठाणी व्याजाने कोणाला दिले होते का ?’ मी म्हणालो, ‘अहो, ते २ हजार रुपये माझ्याकडून तुम्ही ज्यांना १० हजार देणार त्यांना द्या !’
तेव्हा ते म्हणाले, ‘असे पैसे वाटू नका. तुम्हाला पुरस्काराच्या रकमा मिळतील, त्या गरजू व्यक्तींना आणि योग्य संस्था कार्याला द्या !’

दिनू रणदिवेंनी मला सामाजिक जबाबदारीची वाट दाखवली. त्याआधी १९९८च्या दरम्यान, अंकशास्त्री ( न्यूमरालॉजीस्ट ) उल्हास गुप्ते यांच्या ‘अंकशास्त्र आणि भविष्य’ या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होता. मी प्रमुख पाहुणा होतो. ‘ज्योतिष-भाकितांना खोटं कसं ठरवायचं’ यावर ज्योतिषशास्त्राच्या विद्यार्थ्यांसमोर भाषण केलं. आणखी बरीच नामवंत कलावंत मंडळी होती. कार्यक्रम संपल्यावर भोवती गर्दी जमली. पाठीमागून शाबासकीची थाप पडली, म्हणून वळून पाहिलं तर दिनू रणदिवे !

म्हटलं, ‘तुम्ही इथे कसे?’ तर म्हणाले, ‘लिहितात तसेच बोलता का, ते पाहायला आलो !’ नंतर फोन करून म्हणाले, ‘आता सुट्टीच्या दिवशी वेळ काढून मुंबईबाहेर व्याख्यानं – भाषणं द्यायला जा. पत्रकार म्हणून तुमचं ते कर्तव्य आहे!’ त्यांचा हाही सल्ला मानला. म्हणून महाराष्ट्राचे साडेतीनशे तालुके थोडेतरी समजून घेता आले.

‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्ना’चा सोक्षमोक्ष लावावा, यासाठी ‘मुंबई मराठी पत्रकार संघा’ने २००० मध्ये स्थापन केलेल्या समितीचा मी निमंत्रक होतो. त्यात दिनू रणदिवे, मधू शेटे, नारायण आठवले, शां.शं. गोठोस्कर, यशवंत मोने हे ‘संयुक्त महाराष्ट्र’च्या लढ्यात सहभागी झालेले पत्रकार होते. त्यांच्याशी होणाऱ्या चर्चातून भाई माधवराव बागल, प्रबोधनकार ठाकरे, नाना पाटील, भाऊराव पाटील, एसेम जोशी, आचार्य अत्रे, कॉम्रेड डांगे, शाहीर अमरशेख, अण्णाभाऊ साठे आदींनी महाराष्ट्राचा लढाऊ बाणा लोकांत कसा जागवला, त्याची माहिती मिळाली. शाहीर आत्माराम पाटील, लीलाधर हेगडे, शाहीर साबळे यांच्या लेखणी-वाणीची जुगलबंदी ऐकायला मिळाली.

रणदिवे यांनीच दाखवून दिलेल्या वाढत्या कामात मीही गुंतून गेलो. दर आठवड्याला होणाऱ्या भेटी ५-६ महिन्यांनी व्हायला लागल्या. अधे-मधे फोनाफोनी व्हायची. तीन वर्षांपूर्वी दादर पूर्वेच्या एका सभागृहात रोझा देशपांडे यांनी आपले वडील- ‘कॉम्रेड डांगे’ यांच्यावर लिहिलेल्या चरित्र ग्रंथचा प्रकाशनाचा कार्यक्रम होता. त्याला दिनू रणदिवे पत्नीसह आले होते. वयाने नव्वदी पार केली होती. समोर जाऊन नमस्कार केला तर म्हणाले, “तुम्हाला मी ओळखले नाही. विस्मरण होते.” सविता मॅडमनी माझी ओळख वजा आठवण करून दिली. तसे त्यांच्या ‘खास स्टायली’त चेहर्यावरचे हसू आवरत म्हणाले, “पाहताच ओळखलं. हा बदलणारा माणूस नाही. पण पत्रकारांनी एकमेकांना बर्याच दिवसांनी भेटल्यावर ओळख दाखवायची नसते!”

पत्रकार हा आपल्या कामात आणि प्रत्यक्ष जीवनात कसा असावा, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दिनू रणदिवे होते. ते पाहण्यासाठी अनेक तरुण पत्रकारांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांना भेटण्यास सांगायचो. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या साठीपूर्ती वर्षात रणदिवे यांना ‘महाराष्ट्रभूषण’ सन्मानाची मानवंदना मिळायला पाहिजे होती.

दोन महिन्यांपूर्वी सविता मॅडम गेल्या‌. त्या पाठोपाठ दिनू रणदिवे गेले. ‘खरा पत्रकार’ दाखवायचे उदाहरणच संपले!

(लेखक साप्ताहिक ‘चित्रलेखा’ चे संपादक आहेत)

9322222145

Previous articleअंधे घोडे , फौज मे दौडे
Next articleआभासी दुनियेतील स्वप्नभंगाचे बळी
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.