महाराष्ट्राच्या इतिहासातील निकराची लढाई !

प्रवीण बर्दापूरकर

महाराष्ट्राला आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. दिवाळी नंतर होणाऱ्या  निवडणुकीची  खडाखडी जोरात सुरु झालेली आहे . ही निवडणूक महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वांत अटीतटीची तसंच निकराची लढाई म्हणून बघावी लागणार आहे . लढाई म्हटलं की नुसती खडाखडी करुन भागत नाही तर एकमेकाशी थेट भिडावं लागतं . त्या भिडण्यात कुणाला इजाही होऊ शकते . गेल्याच आठवड्यात घडलेल्या   सुपारी , नारळ आणि शेणफेकीच्या घटनांतून ही निवडणूक कोणत्या स्तरावर जाऊन लढवली जाणार , यांचे स्पष्ट संकेत मिळालेले आहेत .

महायुती विरुद्ध महाआघाडी असं लोकसभा निवडणुकीतलं  दुहेरी लढतीचं  चित्र येत्या विधानसभा निवडणुकीत नसेल. या दोन आघाड्या आणि त्यातील सहा पक्ष वगळता महाराष्ट्र नवनिर्माण सेना , प्रकाश आंबडेकरांची वंचित आघाडी , राजू शेट्टीची तिसरी आघाडी , बच्चू कडू , विनय कोरे , रामदास आठवले , जोगेन्द्र कवाडे , अपक्ष एमआयएम हेही कांही ठिकाणी  रिंगणात असतील . ही लढत एवढीच नसेल तर , जरांगे पाटील हा एक कळीचा मुद्दा या निवडणुकीत असेल . जरांगे पाटील यांच्या आंदोलनांनं  महाराष्ट्राचा काही भाग अक्षरश: ढवळून निघाला आहे . आरक्षणासाठी मराठे आता आक्रमक आणि जरांगे यांच्या नेतृत्वाखाली संघटितही झालेले आहे . त्यांनी खरंच निवडणूक लढवली तर महाराष्ट्राच्या जवळपास सत्तर मतदारसंघात या मराठा आंदोलनाचा प्रभाव नक्कीच जाणवेल . त्यातील जवळ जवळ चाळीस मतदारसंघ केवळ मराठवाड्यातील असतील .

आरक्षण मागण्याचा हक्क देशातील प्रत्येक जाती-जमातीला नक्कीच आहे. मराठ्यांच्याही आरक्षणाची मागणी गैर नाही पण हा प्रश्न केंद्राच्या अखत्यारीत आहे . मात्र , मराठा आरक्षणाच्या आक्रमक आंदोलनामुळे महाराष्ट्राच्या काही भागात आणि त्यातही विशेषत: मराठवाड्यात ‘मराठा विरुद्ध अन्य सर्व’ असं जे ध्रुवीकरण झालेलं आहे , ते अतिशय चिंताजनक आहे कारण त्यामुळे  महाराष्टाच्या सामाजिक सौहार्दाला तडा गेला आहे . महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर ‘ब्राह्मण विरुद्ध सर्व’ असं भयावह चित्र महाराष्ट्रात निर्माण झालं होतं , त्या ज्या हकीकती माझ्या पिढीनं  ऐकल्या आहेत , तशा काहीशा वळणाचं हे चित्र आहे . सत्तरेक गावात तर लोक एकमेकांकडे सद्भावनेनं नव्हे तर शत्रुत्वाच्या नजरेतून बघू लागले आहेत . देशाचे ज्येष्ठतम नेते शरद पवार यांनीही या वातावरणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे मात्र , सामाजिक सौहार्दाला तडा देणारं हे वातावरण निवळण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनीच पुढाकार घ्यावा असा चेंडू शरद पवार यांनी टोलावला आहे . एकटे शरद पवारच कशाला, हे वातावरण निवळावं याबद्दल राज्यातील कोणत्याच पक्षांचं नेतृत्व गंभीर नाही . प्रत्येकाला त्याची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे हेच खरं .

जातीय सलोखा हा मुद्दा क्षणभर बाजूला ठेवला तरी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक वाटते तेवढी सोपी नाही . नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं . त्या यशामुळे विधानसभा निवडणूक सोपी होण्याऐवजी अवघडच झाली आहे कारण एका लोकसभा मतदारसंघात म्हणजे सहा विधानसभा मतदारसंघात विजय तसंच दावाही या हिशेबानं जागा वाटपाची मागणी सुरु झालेली आहे . खरं तर , लोकसभा निवडणुकीचे निकाल विधानसभा निवडणुकीतही तंतोतंत उतरतात , असं कधी नसतं  पण , मिळालेल्या अनपेक्षित यशामुळे महाविकास आघाडीतले विशेषत: काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष सुसाट सुटलेले आहेत . म्हणूनच महाविकास आघाडीतील  तिन्ही पक्षांना हव्या असणाऱ्या जागांची बेरीज महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांपैकी जास्त होत आहे असे हे चित्र आहे .

मूळ शिवसेना आणि मूळ राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष फोडल्यामुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीचा लाभ महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत नक्कीच झाला . सहानुभूतीची ती लाट विधानसभा निवडणुकीतही कायमच राहील असं गृहीत धरून एकाच वेळी एकत्र आणि स्वबळावरही लढण्याची तयारी अशी ‘डबलढोलकी’ काँग्रेस तसंच शिवसेना वाजवत आहे . जागांचा हट्ट असाच कायम राहिला आणि ताणून धरलं गेलं तर  त्याचा परिणाम महाविकास आघाडी फुटण्यातही होऊ शकतो . महाविकास आघाडीत तुलनेनं शरद पवार जागा वाटपावर फारसं काही बोलत नाहीत पण , शेवटच्या क्षणी नेहमीप्रमाणे ते कोणती सोंगटी कुठे कशी फिरवतील याचा नेम नसतो . शरद पवार राजकीय तहाच्या काटाकाटीत शेवटपर्यंत चिकाटीने लढतात आणि यशस्वी होतात असाच आजवरचा अनुभव आहे . लोकसभा निवडणुकीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मिळालेली सहानुभूती तसंच राहुल गांधी यांच्यावर जनतेनं दाखवलेला विश्वास कायम राहिला तर विधानसभा निवडणुकीत आघाडीचं यश निश्चित आहे पण , कोणत्याही निवडणुकांत दोन अधिक दोन बरोबर चार असं कधी घडत नसतं .

भाजप , शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मुळीच मिळवता आलं नाही हे शंभर टक्के खरं असलं तरी महायुतीला लोकसभेत मिळालेलं यश दुर्लक्ष करण्यासारखं आहे असंही नाही . लोकसभा निवडणुकीतील अनपेक्षित पराभवानंतर केवळ नरेंद्र मोदी यांच्या नावावर मतदार प्रतिसाद देणार नाहीत हे लक्षात आल्यानं महायुतीतील पक्ष सावध झाले आहेत . शिवाय सहानुभूतीची लाट  कमी करण्यासाठी  , हाती सरकार असल्यामुळे मतदारांना मोहात पाडणाऱ्या अनेक योजना मंजूर करण्याचा धडाका महायुती सरकारनं लावला आहे . याचा किती फायदा विधानसभा निवडणुकीत होईल हे आता सांगता येणार नसले तरी महायुती विरुद्ध असणारी जनतेतील नाराजी या योजनांमुळे कमी होण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही .

महायुतीतही सगळ्यात कळीचा मुद्दा जागा वाटपाचाच असेल . भाजपला १५० ते १६० जागा जर ( त्यातील कांही जागा मित्र पक्षांना द्याव्या लागतील ) मिळवता आल्या नाही तर पक्षातंर्गत असंतोष वाढत जाईल . इतक्या जागा जर भाजपला द्यायच्या असतील तर सुटणाऱ्या जागांवर शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष समाधानी राहतील असं वाटत नाही . म्हणजे जागा वाटपापासूनच महायुतीला ‘प्रथम ग्रासे मक्षिकापात’ होणार हे दिसतं आहेच . महायुतीच्या संभाव्य यशापयशातील कळीचा संभाव्य मुद्दा देवेंद्र फडणवीस आहेत . भाजपचे नेते कितीही दावे करोत पण , देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व आता महाराष्ट्र भाजपत एकमुखी राहिलेलं नाही , ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे . खाजगीत बोलतांना अनेक लोकप्रतिनिधी फडणवीस यांच्या एकाधिकारशाही विषयी नाराजी व्यक्त करतात , हे आता महाराष्ट्रभर पसरलेलं आहे . केंद्रीय नेतृत्वाचा पाठिंबा असल्यामुळे केडरबेस नेते आणि कार्यकर्ते कदाचित निमूटपणे फडणवीस यांना साथ देतीलही पण , जे ३२ ते ३५ टक्के नेते बाहेरुन आलेले आहेत ते मात्र फडणवीस यांची साथ सोडू शकतात . हे सर्व लक्षात घेत येत्या निवडणुकीत सर्वात जास्त कस देवेंद्र फडणवीस यांचाच लागणार आहे .

महाविकास आघाडी आणि महायुटी यांच्यातील एक समान मुद्दा म्हणजे युती आणि आघाडीत असणारे मुख्यमंत्रीपदाचे पायलीभर उमेदवार . आघाडीत तर मुख्यमंत्रीपदावरुन आत्ताच बाजारात तुरी..’चा कलगीतुरा रंगला आहे . मुख्यमंत्रीपदाच्या महत्वाकांक्षेतून उमेदवार पाडापाडीचा नेहेमीचा  खेळ खेळला गेला तर अंतिम निकाल त्रिशंकु विधानसभा असेल . मग घोडेबाजार तेजीत येईल आणि अनपेक्षित असं कांही भलतंच घडलेलं दिसेल .

राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्याही भूमिका कळीच्या ठरणार आहेत . या दोन्ही नेत्यांचा पक्ष म्हणजे हे नेतेच आहेत आणि त्यांचा शब्द सर्वच बाबतीत पक्षात प्रमाण असतो . त्यामुळे लोकशाही प्रक्रिया पाळून सर्व सहमतीने निर्णय घेण्याची प्रथा या दोन्ही नेत्यांच्या पक्षात उरलेलीच नाहीये . आणखी एक मुद्दा म्हणजे हे दोन्ही नेते अनेकदा जे काही राजकीय निर्णय घेतात , नेमके त्याच्याविरुद्ध नंतर वागतात असा अनुभव आहे . लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिला  तर आता विधानसभेत  २२५ ते २४० जागा लढवणार असं राज ठाकरे म्हणतात तर प्रकाश आंबेडकरांनी अजून तरी त्यांचे पत्ते उघड केलेले नाहीत . त्यामुळे या दोन्ही नेत्यांची मतं नेमकी कुठे आणि कशी वळणार हेही बघणं उत्सुकतेचं आहे . निवडणूक जेव्हा चार किंवा त्यापेक्षा जास्त पक्षांमध्ये लढवली जाते तेव्हा विजयाचं मताधिक्य फार मोठं नसतं . अगदी हजार-पाचशे मतांनाही फार मोठं मोल असतं . ३० ते ३२ टक्के मत मिळवणारा उमेदवार विधानसभा निवडणुकीत विजयी होतो असा अलीकडच्या चार-साडेचार दशकातील निवडणुकांचा अनुभव आहे .

राज्याचं राजकीय चित्र सध्या तरी खूपच अंधुक आहे . राजकारणातले नेते आणि स्वयंघोषित राजकीय विश्लेषक कांहीही म्हणोत , येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत आज कांही अंदाज बांधणं हे वाळूचा किल्ला उभारण्यासारखं आहे . जागा वाटप होऊन , मतदार संघनिहाय कोण नेमकं कुणाच्या बाजूला आहे हे पत्ते  उघड झाल्यावरच चित्र कांहीसं  स्पष्ट होईल आणि  येत्या विधानसभा निवडणुकीत कोणाचा पारडं जड आहे किंवा नाही याचा अंदाज बांधता येईल .

येणारी विधानसभा निवडणूक प्रचाराच्या बाबतीत आणखी कोणती खालची पातळी गाठणार आहे याची झलक सुपारी , नारळ आणि शेणफेक यातून दिसलेली आहे . एकापेक्षा एक ‘नामचीन‘ वाचाळवीर आतापासूनच कामाला लागले आहेत.  संजय राऊत यांचं एकट्याचं नाव घेण्याचं काही कारण नाही . सर्वच पक्षात बोलण्याच्या बाबतीत तोल सुटलेले एकापेक्षा एक नेते खच्चून भरलेले आहेत. देवेंद्र फडणवीस , चंद्रशेखर बावनकुळे , नितेश राणे , जितेंद्र आव्हाड , अमोल मिटकरी , संजय सिरसाट , प्रवीण दरेकर , सुषमा अंधारे अशी ही बरीच मोठी यादी आहे . सध्या तर उद्धव ठाकरे यांची अनेक वक्तव्ये , संजय राऊत यांनाही लाजवणारी आहेत . हे बोलण्यापर्यंत होतं तोपर्यंत ठीक होतं पण , आता ही पातळी सुपाऱ्या , नारळ आणि शेण फेकण्यापर्यंत गेली आहे . उद्या शब्दांच्या जागी शस्त्र आली तर फारसं आश्चर्य वाटायला नको . शस्त्र आली की , रक्तलांच्छितपणा आपसूकच येतो . म्हणूनच म्हटलं , केवळ खडाखडीवर लढाई थांबण्याची चिन्हे नाहीत . येती विधानसभा निवडणूक महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वांत अटीतटीची तसंच निकराची लढाई ठरणार आहे .

(लेखक नामवंत पत्रकार व राजकीय विश्लेषक आहेत)

९८२२० ५५७९९

प्रवीण बर्दापूरकर  यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –प्रवीण बर्दापूरकर– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleसुधीर रसाळ – वाङ्मयाभ्यासाच्या वाटेवरचा व्रतस्थ
Next articleजीर्णशीर्ण हवेलीतला मार्क्सवादी!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.