रावेरी गावातील वयोवृद्ध मंडळी जी आख्यायिका सांगतात, त्यानुसार, लक्ष्मणाने सीतेला गरोदर अवस्थेत दंडकारण्यात सोडल्यानंतर वाल्मीकी ऋषींच्या आश्रयाने ती येथे राहू लागली . येथेच लव-कुशाचा जन्म झाला. मुलांच्या जन्मानंतर सीतेने गावातील लोकांकडे पसाभर गहू मागितला. मात्र, गावकऱ्यांनी तो देण्यास नकार दिला. त्यामुळे व्यथित झालेल्या सीतेने या गावात कधीही गहू पिकणार नाही, असा शाप गावकर्यांना दिला. शेकडो वर्ष रावेरी आणि पंचक्रोशीत गहू पिकत नव्हता. २० व्या शतकाच्या प्रारंभी रावेरीवासीयांनी मंदिरातील सीतेच्या मूर्तीला साकडे घालून सीता मंदिरात भेट दिल्याशिवाय आम्ही गव्हाचा एकही दाणा खाणार नाही,असा संकल्प केल्यानंतर येथे गहू पिकायला लागला, असे गावकरी सांगतात. या कथेतील खरेखोटेपणा तपासण्याचा काही मार्ग नाही . मात्र रावेरीतील सीता मंदिर परिसरात अनेक पुरातन अवशेष आहेत, हे खरं.
एका राजाची भूमिकन्या, रामासारख्या पराक्रमी राजाची पत्नी असलेल्या सीतेला केवळ स्त्री असल्याने अनेक कष्ट आणि यातनांना सामोरे जावे लागले .शेतकरी कुटुंबातील महिलांना अशा दु:खांचा नेहमीच सामना करावा लागतो. त्यामुळे वनवासकाळात सीतेला आधार देणारं रावेरी हे स्त्रियांना आधार देणारं केंद्र व्हायला हवं, परित्यक्त्या महिलांचं रावेरी माहेरघर झालं पाहिजे, अशी भावना शरद जोशींनी त्या कार्यक्रमात बोलून दाखवली.