डोक्यातला अस्पर्श प्रांत…

-आशुतोष शेवाळकर

आपल्या डोक्यात येणाऱ्या विचारांबाबत विचार केला तर यातले ९०% विचार आपण उगीचच  करत असतो हे लक्षात येतं. हे विचार आपल्या नोकरी-व्यवसायाच्या वा व्यक्तिमत्व वाढीच्याही दृष्टीनी काहीच कामाचे नसलेले,पूर्णपणे ‘अन-प्रॉडक्टीव्ह’ असेच असतात. हे सगळे विचार आपण अगदीच आपल्याही नकळत करत असतो. ‘ठरवून’ यातले कुठलेच विचार आपण केलेले नसतात. काहीतरी ‘ट्रिगर’ मुळे हे विचार आपोआपच आपल्या डोक्यात येत असतात. हे ‘ट्रिगर्स’ बहुतांशी आपल्या शरीराच्या वा मनाच्या गरजांचे वा मोहांचे असतात.

अगदी १० मिनिटांसाठी जरी पूर्ण एकाग्रतेनी आपण आपल्या डोक्यातल्या विचारांकडे लक्ष द्यायचं ठरवलं तरी आपल्याच डोक्यात येणाऱ्या विचारांवर आपला काहीच ताबा नसतो हे तर लक्षात येतंच पण या काळात आपण काय काय विचार केलेत हे सुद्धा निरीक्षणं आपल्याला कठीण जात असतं. आपलं डोकं अशा रितीनी वापरणं हे नकळतच हळूहळू आपल्या सवयीचं झालेलं असतं. नकळत हे आपलं ‘कंडिशनिंग’ व अॅडिक्शन’ होऊन बसलेलं असतं.

मोबाईल वरचे ‘ॲप्स’ आपण वापरतो वा लहान मुले मोबाईल वरच्या अशा ॲप्स वा खेळ वापरल्याने ‘स्क्रीन अॅडिक्ट’ झाले असतात, तसंच अॅडिक्ट होऊन एखाद्या खेळण्यासारखं त्यात गुंतून राहून आपण आपलं डोकं सतत वापरत असतो. एखाद मशीन सतत वा जास्त वापरलं तर जसं गरम होतं, तसंच आपलं डोकं अशा सततच्या वापरानी त्याचा एक ‘रेझोनन्स’ आपल्या मनात तयार करत असतं. तशा सततच्या ‘रेझोनन्स’ मधेच जगण्याची मग आपल्याला हळूहळू सवय होऊन गेलेली असते. रोजच्या जगण्यात मनाच्या या अवस्थेला आपण ‘यूज्ड टू’ झालेलो असतो.

पण हेच जर डोकं आपण काम असेल तितकंच, ठरवून, आपल्या ‘कंट्रोल’नी वापरलं तर मग मन  आपोआपच हळुहळू ‘आत’ शांत होत जातं व मन जसं जसं शांत होत जातं तशी तशी आपली बुद्धी (इंटेलिजन्स), संवेदनशीलता, वर्तमानात जगण्याचा आनंद वाढत जातो.

हे असं सततचं विचारात व ‘रेझोनन्स’ मधे जगणं आपल्यात हळूहळू सुरू होत असेल. अगदी लहानपणी असं होत नसेल. म्हणूनच लहानपणी बहुतांशी लोकं आता आहेत त्यापेक्षा जास्त आनंदी, जास्त संवेदनशील असतात. लहानपण हा ‘सुखाचा काळ’ असाच बहुतांशी लोकांना म्हणूनच वाटत असतो.

विचार आणि अनुभव यांच्या पलीकडेही एक निर्विचार व अनुभूतीचा प्रांत असतो. हा प्रांत विलक्षण सुखदायक आणि समज, ज्ञान वृद्धीचा असतो. या प्रांताच्या सेकंद दोन सेकंदाच्या स्पर्शानीही मनात सुखाच्या लहरी उठतात, ज्ञानाचा स्पर्श होतो व त्यानंतर काही काळपर्यंत आपलं अस्तित्वच आमूलाग्र बदललेलं असतं.

साहित्य, कला, संगीतातल्या बहुतांशी प्रतिभावंतांना या प्रांतांच्या स्पर्शाचा नित्य अनुभव येत असतो. किंबहुना या प्रांताच्या स्पर्शानीच व्यक्तिमत्त्वात प्रतिभा येते असंही मला वाटतं. काही प्रतिभावंतांना तर या प्रदेशात नित्य वावरही शक्य होतो. आणि असं वावरतांना बरसलेल्या तेजोलहरींनी निथळतच मग ते लौकिक जीवनात परत येतात. कवी ग्रेस त्यांच्यावरच्या दुर्बोधतेच्या आरोपांना उत्तर देतांना ‘वास्तवच दुर्बोध आहे त्याला मी काय करू?’ असं म्हणत असत. या उत्तरात त्यांना याच प्रांतातली दुर्बोधता अभिप्रेत असावी.

कवी ना.घ.देशपांडे दिवसभर भगवद्गीता वा  अशा कुठल्यातरी जुन्या संस्कृत काव्याची मराठी भाषांतरं करीत बसत व संध्याकाळी ती एकदा वाचून मग फाडून टाकत. कविवर्य मंगेश पाडगावकरांनी त्यांना याबाबत विचारल्यावर त्यांनी यावर, ‘आपल्याला प्लग लावून बसायला पाहिजे, करंट केव्हा येईल ते आपल्या हातात नसतं. करंट जेव्हा केव्हा येतो तेव्हा कविता होते. ही भाषांतर म्हणजे माझं प्लग  लावून बसणं आहे’, असं उत्तर दिलं होतं

आपल्या विचार व अनुभवांच्या लौकिक प्रांतापेक्षा हा प्रांत कितीतरी मोठा असेल कदाचित. आपल्या मेंदूविषयी आपल्याला अजून दहा टक्केच समजू शकलं आहे, बाकी त्याच्या ९० टक्के कार्याविषयी आपण अजूनही अनभिज्ञ आहोत असं आजचं शरीर शास्त्र सांगतं. त्या ९० टक्के अनभिज्ञापैकीच कदाचित हा प्रांत असेल. ‘टेलीपथी” वा ‘इन्ट्यूशन’ या मेंदूच्या ‘फॅकल्टीज’ चा आपल्यापैकी प्रत्येकालाच आयुष्यात कधी ना कधी काही ना काही अनुभव आलेला असतो. आपण फारशा वापरू शकत नसलेल्या मेंदूच्या या ‘फॅकल्टीज’ कदाचित याच ९० टक्के अनभिज्ञ मेंदूचा भाग असतील.

बुद्धी व मनापलिकडच्या या प्रांताची किल्ली किंवा ‘पासवर्ड’ मेंदूच्या या ९० टक्के भागातच दडलेला असेल कदाचित. निर्विचाराच्या सरावानी पुढे निर्मन पण होता येत असावं व मनाशीच संपर्क तुटल्यानी लौकिकाचा पूर्ण संपर्कच तुटून या प्रांतातल्या ऊर्जेशी मिसळून जाता येत असावं.  स्वत:च्या अस्तित्वाची ऊर्जा त्या वैश्विक उर्जेत विसर्जित करण्यालाच कदाचित मोक्ष, बोधी किंवा मॅस्लॉनी म्हटलेले “सेल्फ अॅक्चुअलायझेशन” म्हणत असावेत.

(लेखक शेवाळकर डेव्हलपर्स चे अध्यक्ष व सीईओ आहेत)

9822466401

Previous articleमहिलांना शक्ती देणारं रावेरीतील सीता मंदिर
Next articleराजांची भव्य मंदिरे आणि निसर्गाची दिव्य मंदिरे!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.