राजांची भव्य मंदिरे आणि निसर्गाची दिव्य मंदिरे!

-सोपान जोशी
———————————————————————
‘अंगकोरवात’ म्हणजे मंदिरांची नगरी.
कंबोडियामध्ये उभारलेले हे हिंदू मंदिरांचे नगर आजसुद्धा जगातील सर्वात मोठे धार्मिक स्मारक आहे.
इथे विष्णु,ब्रह्मा आणि इतर देवांची मंदिरे बाराव्या शतकात बनविण्यास सुरूवात झाली होती,आजपासून ८००-९०० वर्षांच्या अगोदर.
तेव्हा इथे राज्य करत असलेल्या राष्ट्रांपाशी अफाट सत्ता होती,साधनसामग्री होती,मजूर होते.

…काळाबरोबर राज्य करणार्‍यांची श्रद्धा बौद्ध
धर्माकडे झुकली.
कैक मंदिरांच्या गाभार्‍यात बुद्धाच्या मूर्ती लावल्या गेल्या,मात्र बाहेरून मंदिरं जशी होती तशीच राहिली.
हळूहळू ती साम्राज्ये लयास जाऊ लागली,राज्यं,राष्ट्रं
क्षीण होत गेली.आजपर्यंत कुठलेही साम्राज्य वा राष्ट्र-राज्य स्वतःला काळापासून वाचवू शकलेले नाहीत,भले त्यांच्याजवळ कितीही शक्ती असेना,भले ते कितीही मोठी आणि ताकदवान असले तरी.

….मंदिरे भव्य तर होती,पण त्यांच्यात दिव्यत्व नव्हते.जेव्हा राज्यकर्त्यांची सक्ती संपली तेव्हा आमजनतेने मंदिरात जाणे बंद केले.
ना वैदिक-पौराणिक देवतांच्या मूर्ती यांना वाचवू शकल्या ना अवैदिक मूर्तीसुद्धा.जगातले सर्वात मोठे धार्मिक स्मारक,सर्वात मोठी मंदिरे,सर्वकाही ओसाड अवशेष बनून राहून गेले.यांना कुठल्याही धर्मांध आक्रमकाने फोडले नाही,फक्त वार्‍याची दिशा बदलली होती.

….वार्‍याच्या मदतीने काळाच्या ओघात या भव्य मंदिरांच्यावर शाल्मली वृक्षांचा कापूस पडला,ज्यात लहानसे बी होते.त्या बीजांचे अंकुर मंदिरांच्यावरती फुटले.त्यातुन झाडं उगवली.मजूरांविना लावलेली,जनतेकडून देणगी,वर्गणी वसुल न करता,प्रचाराविना.ही झाडं इतकी विशाल झाली की त्यांच्यापुढे राजांनी उभारलेली मंदिरे खुजी दिसू लागली.त्या बीजांमध्ये असे काही होते की जे राजे-महाराजांच्या नीती-अनीतीमध्ये आणि त्यांच्या श्रद्धेत नव्हते.
त्यांच्यात सृष्टीच्या दिव्यत्वाचा अंश होता.
त्यांच्या जीवनधर्माचा अंश होता.

…साधारणपणे दीडशे वर्षांपूर्वी औंरी महू नावाचे एक फ्रेंच पर्यटक इथे आले.त्यांना तिथे फक्त अवशेषच दिसले आणि उत्तुंग झाडे.आजूबाजूला शेतीवाडी होती,आसपास गावेही होती आणि वस्त्यासुद्धा.मात्र तिथे राहणार्‍यांना जगातल्या सर्वात भव्य धार्मिक स्मारकांविषयी कुठलाही जिव्हाळा वाटत नव्हता.आज ही स्मारके पर्यटन स्थळे बनली आहेत.यांची भव्यता,उत्तुंगता पाहण्यासाठी जगभरातले पर्यटक येतात,मौजमजा करतात,यांच्यासमोर उभे राहून विविध मुद्रेत फोटो काढतात.या मंदिरांमुळे आश्चर्यचकित होतात.सांस्कृतिक कार्यक्रम होतात.या मंदिरांना उभे करणार्‍यांनी कल्पानाही केली नसेल की चंगळवादी आधुनिक संस्कृती यांच्या भव्यतेचा असाही उपयोग करेल म्हणून.

…सत्तेच्या नशेमध्ये राज्यसत्ता भव्य इमारती बनविण्याच्या स्पर्धेत उतरतात.विविध प्रकारची भव्यता व उत्तुंगतेचे ध्येय हे सर्वसामान्य लोकांना भयभीत करणे हेच असते.
हा राजकारणाचा स्वभाव पूर्वीपासूनच राहिला आहे.
माणूस जेव्हा इतर लोकांवर सत्ता मिळवत असतो,तेव्हा त्याच्या मूळ स्वभावातली ही खोट प्रकर्षाने पुढे येत असते.

….भव्य इमारती उभारणारे विसरतात की काळाच्या ओघात त्यांची भव्यता त्यांना वाचवू शकत नाही.
कुठून वार्‍यासोबत उडत आलेल्या शाल्मली वृक्षाच्या कापसात कुठलेसे दिव्य बीज येते आणि काही वर्षातच भव्यतेचा माज-मस्ती उतरविणारे उदाहरण उभे राहते.
पण राजकारणासाठी असले धडे व्यर्थ ठरत असतात.
त्याचे काम शिकण्या-शिकवण्याने चालत नाही.
त्याला तर फक्त समोरच्याला हिणवण्याकरिता भव्य इमारती उभारायच्या असतात.
त्याला दिव्यत्वाशी काही देणेघेणे नसते.
——————————————————————–
मूळ हिंदी लेख
सोपान जोशी

मराठीकरण
भरत यादव

९८९०१ ६१६८०

Previous articleडोक्यातला अस्पर्श प्रांत…
Next articleकथा निलंगेकरांच्या पीएच. डी.ची !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.