माध्यमांची रणनीती : प्रवाहातली आणि भोवऱ्यातली

tvआपण टीव्ही बघायला सुरुवात कशी केली, पहिल्यांदा काय पाहिलं हे आठवायचा प्रयत्न केला तर नीटसं आठवत नाही. पण घरी टीव्ही नव्हता आणि रविवारी दाखवण्यात येणारा हिंदी चित्रपट किंवा छायागीत, चित्रहार वगैरे कार्यक्रम शेजारी कुठेतरी जाऊन बघायचो हे आठवतं. मग ‘क्राऊन’चा टीव्ही घरी आला आणि बसलो आहोत तिथूनच सगळं दिसू लागलं. टीव्हीने अगदी जादू केली असं नाही, पण टीव्हीची सवय लागली नाही असंही नाही. हे आठवायचं एक कारण म्हणजे सध्या माझ्या वयाच्या (३७) आणि माझ्याहून लहान असलेल्या मुला-मुलींनासुद्धा ‘सुरभि’, ‘करमचंद’, ‘नुक्कड’, ‘मालगुडी डेज’ वगैरे मालिका आठवतात, ‘एकता का वृक्ष’सारखी छोटी फिल्म आठवते. मुख्य म्हणजे आजच्या टीव्हीच्या तुलनेत जुन्या मालिका किती भारी होत्या हे बोललं जातं आणि नॉस्टॅल्जिक व्हायला होतं.

मला टीव्हीचा बऱ्यापैकी तिटकारा येऊ लागल्यावर घरातला टीव्ही बंद करायचा विचार मी करु लागलो आणि पत्नीचा होकार मिळताच टीव्ही बंद केला. त्याला आता दोन वर्षं झाली. जानेवारी २०१३ मध्ये आम्ही टीव्हीचं कनेक्शन काढून टाकलं. त्या जानेवारीत जेव्हा सबस्क्रिप्शन संपलं तेव्हा रीचार्ज करायचं नाही असं ठरवून टाकलं होतं. घरी सदस्य दोन. मी आणि माझी पत्नी-तनुजा. संपूर्ण दिवसात जास्तीत जास्त अर्धा तास टी.व्ही. बघणं व्हायचं. रात्रीचं जेवण घेताना – काहीतरी करमणूक म्हणून. पण अर्थातच ‘करमणूक’ म्हणजे जे असतं ते मनस्ताप वाढवणारं असतं हे लक्षात येऊ लागलं होतं. त्यामुळे खरं तर कितीतरी आधीपासूनच ते मनात होतं. ते अखेरीस झालं.

टीव्ही सेट खूपच जुना झाला होता आणि दुरुस्त करण्याच्या पलीकडे बिघडला होता. म्हणून कनेक्शन काढल्यावर साधारण एका वर्षाने नवीन सेट मात्र विकत घेतला, कारण आम्हा दोघांनाही चित्रपटाचं वेड आहे. त्यामुळे टीव्हीला हार्ड ड्राईव्ह जोडून चित्रपट बघण्यासाठी या सेटचा उपयोग होतो. (इथे अरुण खोपकरांची आठवण होते. त्यांचं लेखन मला अतिशय आवडतं आणि ‘कथा दोन गणपतरावांची’ हा त्यांचा चित्रपट माझ्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. त्यांच्या फेसबुक पेजवर ‘टीव्हीवरील आवडते कार्यक्रम’ या मुद्द्यापुढे Can’t stand TV असं लिहिलेलं वाचून आपल्या आवडत्या लेखक-दिग्दर्शकाचं आणि आपलं जमतं असं वाटून मला एकदम मस्त वाटलं होतं! मी त्यांना कधी भेटलेलो नाही आणि त्यांच्याशी माझा परिचयही नाही. पण कधी भेट झालीच तर ‘मलाही टीव्ही बघायला आवडत नाही’ असं त्यांना सांगेन!)

सबस्क्रिप्शन संपलं आणि सगळे चॅनेल्स बंद झाले. कुणीतरी म्हणालं की डीडी नॅशनल दिसतं. म्हणून एकदा डीडी लावलं. सुरू होतं. डीडी सह्याद्री, डीडी भारती, डीडी इंडिया सगळ्या वाहिन्या सुरू होत्या. डीडी इंडियावर एक सिनेमा सुरू होता. नाव कळालं नाही. मी अगदीच पाच मिनिटं तो सिनेमा बघितला. पण गुंतलो होतो. अमोल पालेकर एका खेडुताच्या वेषात. डोंगरातून चाललेले. एक गरोदर खेडूत बाई त्यांना भेटते. एकटीच कशी? कुठे निघालीस? वगैरे बोलणं होतं. ती काही कारणं सांगते. म्हणणे तिचं दु:ख सांगते. याला तिच्याविषयी करुणा वाटते. तिला काहीबाही सांगत, तिचं मन रमवत, तिचा प्रवास जरा हलका होईल अशा बेतानं हा तिच्याबरोबर चालू लागतो. बस्स्! मी फक्त इतकंच पाहिलं आणि काही कामासाठी बाहेर पडलो. पण मनात विचार उमटला. ही अशी माणसं, त्यांचं हे असं चित्रण आपल्याला टीव्हीवर आता कुठे बघायला मिळतं? टीव्ही आता केवढा चकचकीत झालाय. तिथे अशा शांत, ‘स्थिर’ चित्रणाला वावच कुठाय? मला मनोमन आनंद झाला की आता आपण जमेल तसं डीडी इंडिया, नॅशनल किंवा भारती वगैरे बघायला हरकत नाही. काय कार्यक्रम असतात हे निदान एक्सप्लोअर तरी करू या असं मी ठरवलं. पण पुढे डीडीही दिसेनासं झालं आणि ते राहिलंच.

सॅटेलाईट टेलीव्हिजन मी बंद करतो आणि त्याच्या दुसर्‍या दिवशी मला एका मराठी न्यूज चॅनलकडून फोन येतो. फेसबुकवरची माझी एक कविता वाचून एका चर्चेत सहभागी होण्यासाठी मला ते आमंत्रित करतात. बाप रे! टी.व्ही. ला तर आपला विरोध. आपण कालच टीव्ही बंद केलाय. टीव्ही कायद्याने बंद करु नये, पण कायद्याने संध्याकाळी सहा ते दहा या वेळेतच सुरू ठेवावा हे आपलं सध्याचं घोषवाक्य आणि आता आपल्यालाच निमंत्रण! हो म्हणावं की नाही म्हणावं? हो म्हणावं तर आपण तडजोड करतोय, नाही म्हणावं तर आपलं म्हणणं मांडायची एक संधी गेली असं होईल. आणि शिवाय आपला पहिला टीव्ही अ‍ॅपिअरन्स वगैरे! मी हो म्हणतो. यातला अजून एक भाग ‘बघू तरी न्यूज चॅनल म्हणजे काय प्रकरण आहे ते’ हा विचारही असतो.

भारतीय कंपन्या, वृत्तवाहिन्या धरून, फारशा ‘प्रोफेशनल’ नसतात. अशी माझी एक अटकळ होती, आहे. या वाहिनीच्या बाबतीत तसाच अनुभव येऊ शकेल असं मी स्वत:ला बजावत असतो. त्यामुळे तसा मी तयारीत असतो. पहिला फोन ‘शूटिंग परवा मुंबईत होईल. उद्या तुमच्याशी सविस्तर चर्चा करू. अमुक वाजता फोन करू,’ इथे संपतो. उद्या उजाडतो. अमुक वाजता उजाडतात. वर दोन-एक तास जातात. मग मी मेसेज करतो – ‘उद्याचं नक्की आहे ना? मी तिकीट बुक करू ना?’ त्यावर ‘हो नक्की. तिकीट बुक करा.’ असं उत्तर येतं. मग मी तिकीट बुक करतो. सुमारे तासाभराने फोन येतो. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाचा. उशीर झाल्याबद्दल तो दिलगिरी व्यक्त करतो ही जमेची बाजू. मग चर्चा होते. मी माझी भूमिका सांगतो. चर्चा संपते. दुसर्‍या दिवशी दुपारी मी मुंबईत पोहोचतो. गोरेगावचा पत्ता मेसेज केलेला असतो. सायनला वळून बस बोरिवलीच्या दिशेने धावायला लागते. तेव्हा मी मेसेजमध्ये दिलेल्या नंबरवर फोन करतो. मी जिथे बस सोडेन तिथून मला पिक-अप करण्यात येईल असा मला कळवलेलं असतं. फोनवरची मुलगी म्हणते गोरेगावला उतरल्यावर कुठे थांबायचं हे मी तुम्हांला पंधरा मिनिटात फोन करून सांगते. तसं काही ती सांगत नाही. गोरेगावला हायवेला बसचा थांबा असतो. मी उतरून रस्ता ओलांडून चालत चालत ओबेरॉय मॉलपाशी येतो आणि तिला मेसेज करतो ‘मी तिथे आहे म्हणून.’ माझी अपेक्षा की मला इथून पिक-अप केलं जाईल. पण उत्तर म्हणून जो मेसेज येतो त्यात आदल्या रात्री मेसेज करून जो पत्ता पाठवलेला असतो तोच पत्ता असतो. मी मनात म्हणतो बाई गं, मला पत्ता मिळाला आहे. पण तू पिक-अपचं बघणार होतीस ना? पण मी परत तिला फोन/मेसेज करायच्या फंदात न पडता दिलेला पत्ता शोधत निघतो. पत्ता असतो, ‘आर्य (Aary) भास्कर गार्डन, फिल्मसिटी रोड’ बर्‍याच जणांना माहीत नसतो. मी त्यांना चॅनलचं नाव सांगतो तरी त्यांना कळत नाही. एकाला अखेरीस तो पत्ता माहीत असतो. त्याच्या दिग्दर्शनाखाली मी चालायला लागतो. दीड-दोन किलोमीटरच आहे असं तो म्हणतो. माझ्याकडे वेळही असतो. म्हणून चालत निघतो. पण मध्ये रस्ता चुकतो. मग एक रिक्षावाला मदतीला येतो. ‘वो आर्य भास्कर नहीं, आरे भास्कर गार्डन है’ म्हणतो आणि मला तिकडे सोडतो. (मेसेज लिहिताना Aary लिहिल्याने हा गोंधळ होतो. ‘आरे मिल्क’चं योग्य स्पेलिंग ‘Aaray’ असं आहे. स्पेलिंग अचूक माहीत नसणं हे ठीक आहे, पण Aare लिहिलं असतं तरी गोंधळ झाला नसता!) म्हणजे इथे चॅनलचं ऑफिस नसून हे आऊट-डोअर शूटिंग होणार आहे तर! हा उलगडा तिथे गेल्यावर होतो. गार्डनमध्ये चॅनलची काही मंडळी असतात. इतर सहभागी मंडळी आल्यावर चर्चा सुरू होते. दीड-एक तास चालते. मी पुण्याला परत येतो.
त्या वीकएंडला कार्यक्रम प्रसारित होतो. दीड तासाच्या चर्चेचं संपादन करावं लागणार याची मलाही कल्पना असते. पण जो मुद्दा मला महत्त्वाचा वाटत असतो तो संपादित झालेला असतो. आणि शिवाय पाच-सहाजण एकत्र येऊन बोलणार म्हणजे बरीच खिचडी होणार ही अटकळही खरी ठरते. चर्चा एकूणात जरा वरवरची वाटते. हा कार्यक्रम मी अर्थातच घरी बघत नाही. आईच्या घरी बघतो. प्रवासखर्च मिळेल असं सांगण्यात आलेलं असतं. तो या क्षणापर्यंत तरी मिळालेला नाही. इथून पुढे मिळाला तर चांगलंच म्हणायचं. कार्यक्रमाची डीव्हीडी मात्र येते.

हा अनुभव अगदी छोटासा. आणि तो मी सांगितला यात मला खरोखरंच मोठी तक्रार वगैरे करायची नाही. पण काही निरीक्षणं मांडायची होती. या अनुषंगाने मला जे वाटतं ते पुढे येईलच.

आणखी एक छोटा अनुभव. एका मराठी वृत्तपत्रात रविवार पुरवणीसाठी एका आवडलेल्या पुस्तकाचं परीक्षण लिहून मी पाठवतो. ते स्वीकारल्याची मेलही येते. दोन-चार आठवड्यात घेऊ असं कळवतात. येत नाही म्हणून मी विचारतो. ‘येईल’ असं म्हणतात. येत नाही. मी पुन्हा विचारतो. पुन्हा ‘येईल’ म्हणतात. याला सुमारे तीन वर्ष झाली. मी नंतर अर्थातच विचारणं सोडून दिलेलं असतं. लक्षात येतं ते असं की या गोष्टीवर आपलं नियंत्रण नाही.

माणसं कधीकधी कम्युनिकेट करत नाहीत, व्यवस्थापनात कमी पडतात या गोष्टी समजून घेणंही आवश्यक आहे, कारण इतक्या विविध तऱ्हांच्या संवादात, देवाणघेवाणीत, कामांच्या व्यापात त्रुटी राहू शकतात. पण जेव्हा या गोष्टी ‘प्रोफेशनॅलिझम’च्या चौकटीत येतात तेव्हा मात्र त्या मला अमान्य होऊ लागतात. काही माणसांची, समूहांची एक विशिष्ट घडण, त्यात होणारे संथ बदल या पार्श्‍वभूमीवर झपाट्याने होणार्‍या बदलांमुळे बसणारे धक्के दिसून येतात. आपल्याकडे हे असं झालं असावं का? विशेषत: माध्यमांच्या बाबतीत?
माध्यमे आज ‘एक्सप्लोड’ झाली आहेत. त्यामुळे सतत काहीतरी बोललं जातंय, मतं दिली जातायत, मतभेद व्यक्त केले जातायत आणि हे भीती वाटावी इतक्या सातत्याने, न थांबता होतंय. सतत चर्चा, एक विषय चघळत राहणे, ‘स्लॉट’ भरायची धावपळ, दगदग यातून माणसं एक अर्थी ‘अनप्रोफेशनल’ होतात का? आणि दुसरं म्हणजे आपण ‘आर्थिक’ उदार वगैरे झालो असतो तरी सरंजामशाहीत अडकलेले आहोत का?

माझ्या एका जुन्या नोकरीत त्या कंपनीचे एम.डी. एका भल्यामोठ्या केबिनमध्ये बसायचे. बाहेर पी. ए. बसलेला. त्याची वेळ घेऊन आत जावं लागायचं. एकदम कडक काम. नोकरी सोडायच्या आधी एकदा तरी यांना एखादा विनोद सांगून टाळी द्यावी असं मला फार वाटायचं! ‘मी वर, तू खाली’ ही संस्कृती. ‘माझा अधिकार अधिक, तुझा कमी’ हे समजा ठीकच आहे. कारण व्यावसायिक जागी निर्णयप्रक्रिया याच पद्धतीने होत असते. पण ‘वर-खाली’मध्ये, बंद केबिनमध्ये सरंजामी अवशेष आहेत. ‘अधिकार जास्त-कमी, तरी आपण बरोबरीचे’ हे योग्य वाटतं. पुढे एका आयटी कंपनीत गेल्यावर ताण थोडे सैल झाले. पण त्यालाही अमेरिकन-युरोपियन कंपन्यांशी क्लायंट म्हणून, पार्टनर म्हणून येणारे संबंध कारणीभूत होते असं मला वाटतं. आपण ते ‘ओपन कल्चर’ आयात केलं आहे. एरवी आपण ‘जी साब’ वालेच!

मॅक्सम्युलर भवनमध्ये जर्मन शिकत असतानाचा एक अनुभव. ब्रेकमध्ये मुलं-मुली लाऊंजमध्ये गप्पा मारतायत. चहाची रिकामी कप-बशी कुणीतरी खाली जमिनीवर ठेवलीय. संस्थेच्या मुख्याध्यापिका – एक जर्मन बाई – तिथून जातात. त्यांचं लक्ष कप-बशीकडे जातं. त्या ती उचलून वर कट्ट्यावर ठेवतात. मुलांना ग्रीट करून पुढे निघून जातात. दुसरा एक प्रसंग जर्मनीतला. मी कंपनीच्या कामासाठी तिकडे असतानाचा. एके ठिकाणी ट्रेन बदलताना गडबड होते. ट्रेन चुकली तर फ्लाईट चुकणार असते. माझ्या धांदलीमुळे आधीच मोडकंतोडकं असणारं जर्मन पूर्णच मोडतं आणि काउंटरवरच्या बाई तर ‘बोलेन तर जर्मनमध्येच’ हा आग्रह धरून बसलेल्या. एका गार्डाच्या लक्षात येतं की गडी घाबरलाय. तो मला नीट डब्यापर्यंत पोचवतो. फ्रांकफुर्ट एअरपोर्ट पहाटे पाचला येतो. ही तुझी सीट. झोप निवांत. मी येतो पहाटे पाचला तुला उठवायला.’ असं म्हणून तो निघून जातो आणि पहाटे पाचला तो मला उठवायला हजर होतो. मला भडभडूनच येतं!

माध्यमांमधले बदल, शांततेची हकालपट्टी, मूळची सरंजामशाहीत अडकलेली वृत्ती, प्रोफेशनॅलिझमचा अभाव, लोकसंख्येमुळे येणारे ताण या गोष्टी आपल्याबद्दल काही सांगतात. आणि ते काही फारसं चांगलं नाही.
‘एकदा शब्द दिला की दिला’ वगैरे मलाही मंजूर नाही. अडचणी येऊ शकतात. पण त्या सांगितल्याही जाऊ शकतात. पिक-अप करणार होतो, पण गाडी उपलब्ध नाही झाली, तुम्ही रिक्षाने याल का? हा पत्ता.’ हे सांगायला किती वेळ लागतो? ‘तुमचं परीक्षण स्वीकारता येणार नाही’ हे कळवायला किती वेळ लागतो? की आपल्याला कम्युनिकेट करण्यासाठी समोरच्या माणसाची प्रसिद्धीच आवश्यक असते? त्यादिवशी पुण्याहून मुंबईला माझ्याऐवजी डी.एस.कुलकर्णी गेले असते तर? माझ्या परीक्षणाऐवजी जर अच्युत गोडबोल्यांनी लिहिलेलं त्याच पुस्तकाचं परीक्षण गेलं असतं तर?

अडचण आपल्या मानसिकतेची आहे. आणि ओढवून घेतलेल्या व्यावसायिक गुंत्यांचीही आहे. विशेषत: आर्थिक उदारीकरणानंतरच्या काळात जेव्हा सगळंच भरमसाठ वाढलं तेव्हा ते ‘वाढलेलं’ नियंत्रणात ठेवतानाची होणारी गोची लक्षणीय आहे. तांत्रिक उत्पादने हातात पडल्याने काम भागत नाही. आधी बॉस केबिनमध्ये बोलावून हाताखालच्यांना झाडत असेच. तो आता मोबाईलवर झाडतो किंवा मेल करून झाडतो. पद्धत बदलली. वृत्तीचं काय? मोबाईल, टॅब, लॅपटॉप, वाय-फाय, स्काईप, प्रोजेक्टर्स सगळं एकत्र केलं तरी ते माणसामध्ये मूलभूत बदल घडवून आणू शकतात का? ‘प्रोफेशनल्स’ निर्माण व्हायला ही हत्यारं खरोखरंच गरजेची असतात का?

मी वर दिलेले काही छोटे छोटे अनुभव संपूर्ण वास्तव मांडत नाहीत याची मला कल्पना आहे. तसा कुठलाच अनुभव संपूर्ण वास्तवाची ओळख करून देऊ शकत नाही. पण छोटे अनुभव ‘लिटमस टेस्ट’ सारखे उपयोगी पडतात. त्यामुळे छोट्या अनुभवात ज्या व्यक्ती आपल्याला भेटतात, ज्यांच्यावर आपण क्षणभर वैतागतो त्या व्यक्तींबद्दल आकस असण्याचा प्रश्‍नच उरत नाही. मुद्दा हा की ती व्यक्ती अशी ‘का’ वागली असेल? कुठल्याही प्रकारचं वर्तन – चांगलं वा वाईट – हे अखेरीस एक ‘सादरीकरण’ असतं. त्याचा मूलस्त्रोत मेंदूत असतो. त्यामुळे कुठल्याही घटनेचं, प्रश्‍नाचं विश्‍लेषण करताना ‘मेंदू’कडे लक्ष द्यावंच लागतं!

आणि माध्यमांचा विचार केला तर आज मेंदूच्या मुळाशी पराकोटीची घाई, माहिती आणि बातम्या पुरवण्याचा ताण आहे असं दिसतं. माहितीचा, मतांचा, चर्चांचा सतत मारा करणे हे बहुधा आपल्याला हानिकारक ठरतंय. मुळात आपण फारसे खोलवर प्रोफेशनल नव्हतो. सरंजामशाहीचे अवशेष आपल्यामध्ये होतेच, आहेत आणि या दोषांसकट आपण पानं भरून, दिवसदिवस चर्चाही करतोय. निष्क्रियतेचं मी समर्थन करत नाही पण अतिसक्रियतेचं काय करायचं हा प्रश्‍न मला सतावतोय. मला मेंढा-लेखाची आठवण होते. चार वर्षांपूर्वी मी तिथे गेलो होतो. तीन दिवस राहिलो होतो. त्यावेळेस मिलिंद बोकीलही तिथे होते. आणि मोहन हिराबाई हिरालाल, देवाजी तोफा तर होतेच. मासिकासाठी एक लेख लिहायच्या उद्देशाने मी तिथे गेलेला असल्याने मी ‘माहिती’साठी लगेच शोध सुरू केला. मोहन हिराबाई हिरालाल तिथे अनेक वर्षांपासून काम करत आहेत. त्यांच्याकडून माहिती घेतली. संध्याकाळी तिथे माणसं जमायची. गप्पा व्हायच्या. भाषा कळत नसल्याने सगळं बोलणं समजायचं नाही. पण मोहनभाऊ सांगायचे. टीव्हीची भानगड नव्हती. एक पेपर यायचा. लोक शांतपणे बोलायचे. कुणाला कसली घाई नव्हती. मग मला एकदम लक्षात आलं की सतत काहीतरी ‘करणे’, मत देणे, चर्चा करणे याची आपल्याला इतकी सवय झालीय की शांतपणे काहीही न करता बसणे, फक्त निरीक्षण करणे हे आपण विसरूनच गेलोय की काय? आपल्याला लगेच ‘बोअर’ व्हायला लागतं. आणि मुख्य म्हणजे आपण चर्चा करतो, मत देतो म्हणून आपण श्रेष्ठ आहोत असंही आपल्याला वाटायला लागतं. (मेंढा-लेखात मी कुर्‍हाडीने लाकडं फोडायचा प्रयोग केला होता आणि सांगायला अत्यंत लाज वाटते की मला एकही लाकूड धड फोडता आलं नव्हतं!)

आपण खूप काही करतो आहोत ही भावना माणसाला अहंमन्यतेकडे लवकर नेते. मनुष्य एखाद्या मोठ्या पदावर जाऊन पोचतो, एक संस्था चालवतो यात त्या मनुष्याचं कर्तृत्व असतंच. पण त्याचंच कर्तृत्व कायम निर्विवादपणे सर्वश्रेष्ठ असतं का? शाळेत असताना मी बुद्धिमापन चाचणीतील प्रश्नांच्या एका विशिष्ट प्रकारापाशी बराच अडायचो. त्या प्रकारातील प्रश्नाचं एक उदाहरण देतो – फुटबॉलच्या खेळासाठी खालीलपैकी सर्वाधिक आवश्यक गोष्ट कोणती? पर्याय १) खेळाडू २) फुटबॉल ३) मैदान ४) प्रेक्षक. अशा प्रकारचे प्रश्‍न असायचे आणि ज्यांचं निर्विवादपणे एकच उत्तर देणं मला अजिबात जमायचं नाही! उलट अधिक प्रश्‍न मनात यायचे. या पर्यायांमध्ये ‘ग्राऊंडची काळजी घेणारे’ हा पर्याय का नाही ? सिंहाचा वाटा जरी असला तरी तो ‘वाटा’च असतो, ‘संपूर्ण श्रेय’ नव्हे, हे विसरून कसं चालेल?

टीव्ही सतत काहीतरी ओततोय आणि माणसं ते डोळ्यांनी आणि कानांनी पीत बसली आहेत हे मला का कुणास ठाऊक पण जरा भयंकर वाटतं. शिवाय कार्यक्रमांची गुणवत्ता हा तर वेगळाच भाग. ‘मालगुडी डेज’च्या ताकदीची एक जरी मालिका असती तरी बरं वाटलं असतं. आपल्याकडे इतक्या विपुल प्रमाणात विविध भाषांतील साहित्य उपलब्ध असताना मालिका तयार करणाऱ्या निर्मिती संस्था आणि त्या मंजूर करणाऱ्या वाहिन्या साहित्यकृतींकडे पूर्ण दुर्लक्ष का करतात मला कळत नाही. (अपवाद आहेत, पण मोजकेच.) व्यावसायिक बंधनं असतात हे मान्य, पण मग ती आधी नव्हती का असा प्रश्न पडतो. आणि जर व्यावसायिक बंधनं इतकी जाचक झाली आहेत की आपण चांगलं काही देऊ शकत नाही तर मग व्यवसायाचा पुनर्विचार का करु नये?

आता व्यवसायाचा पुनर्विचार वगैरे करा म्हणणं हे जरा फारच होतंय असं वाटेल, पण आपल्याला एखादं चांगलं उत्पादन देता येत नसेल तर ‘तुम्ही ही लाईन बदला’ असा सल्ला मिळतोच. मुळात एक असं आहे की कुठलाही मोठा होत जाणारा व्यवसाय भांडवलशाहीशी जोडलेला असतो. आपलं कौशल्य विकून पोट भरणारा छोटा व्यावसायिक आणि कंपनीकरण झालेला दुसरा व्यावसायिक यात फरक आहे. (मला तर बरेचदा हे जाणवतं की मूलभूत वाद ‘मर्यादित विस्तार आणि अमर्याद विस्ताराची महत्त्वाकांक्षा’ आणि ‘मर्यादित आणि अमर्यादित म्हणजे काय’ हाच आहे.) माध्यमं, विशेषतः टेलीव्हिजन, भांडवलशाहीच्या हातात आहेत हे आजचं वास्तव आहे. आपले कार्यक्रम आखताना अमेरिकन टेलिव्हिजनवरील अनेक कार्यक्रमांच्या कल्पना उचलणारे भारतीय भांडवलदार फक्त आवरणाचं अनुकरण करतात. आतल्या गाभ्याचं नाही. पुरोगामी वगैरे तर सोडाच, पण वैविध्याच्या गाभ्याचंही नाही. भारतीय टेलिव्हिजनवरचे कार्यक्रम, मालिका आणि इतर टेलिव्हिजनवरील मालिका यांची आशय, लेखन, सादरीकरण, अभिनय यांची तुलना केली तर हे सहज लक्षात येतं. मला काही चांगल्या अमेरिकन मालिका इथे आठवतात. कदाचित इतरही देशातल्या काही चांगल्या मालिका कुणी सांगू शकेल. लक्षणीय गोष्ट ही आहे की एका टप्प्यावर आपला टेलीव्हिजन खरोखर फार सकस कार्यक्रम देत होता. ‘भारत एक खोज’सारखी मालिका आज का निर्माण होत नाही याचं कारण टीव्हीच्या लादून घेतलेल्या ‘प्रतिगामी आधुनिकतेत’ आणि भांडवलशाहीच्या जोखडात आहे.

भारतीय भांडवलदार माध्यमांच्याबाबतीत जो फॉर्म्युला वापरतात तो त्यांच्या दृष्टीने भारतीय संस्कृती, परंपरांशी जुळवून घेणारा आहे असं त्यांना वाटत असतं. पण प्रत्यक्षात ते अत्यंत मागासलेला फॉर्म्युला वापरत असतात. ज्यांचं अनुकरण करायचा ते प्रयत्न करत आहेत ते धर्म, परंपरा, कुटुंबसंस्था, स्त्री-पुरुष नातं याबाबतीत अनेक वर्षांनी पुढे असतात आणि तशी एखादी कल्पना करणं आणि तिला टेलीव्हिजनवर आणणं हे काही त्या फॉर्म्युल्यात बसत नाही. आपल्याकडे प्रादेशिक वाहिन्यांचा प्रेक्षकवर्ग प्रचंड मोठा आहे आणि या वाहिन्या चालवणाऱ्या भांडवलदारांनी संस्कृती-परंपरांचा संभाळ करण्याच्या नादात जो काही घोळ गेल्या वीसएक वर्षात घालून ठेवलाय तो दुरुस्त करण्याच्या पलीकडे गेलाय.

वाहिन्यांवरील चर्चा आणि सामाजिक-राजकीय विश्लेषण याबाबतीत बोलायचं झालं तर मला नेहमीच असं वाटत आलेलं आहे की लिखित स्वरुपातील नोंदी, लेख अधिक प्रभावी असतात कारण लिहिताना त्या राजकीय-सामाजिक अभ्यासकाला एक सूत्र धरुन, दाखले देत लिहावं लागतं. लिहिलेलं वाचताना वाचक त्या मांडणीशी जोडला जातो, स्वतः विचार करु लागतो. वाहिन्यांवरील चर्चेमध्ये बोलणारा आणि ऐकणारा भरकटण्याची शक्यता फार असते. ती वाचनात नसते. कारण प्रत्येकच लेख खूप बांधेसूद नसला तरी त्याला काहीएक आकार नक्की असतो. वाचन अर्धवट राहू शकतं, पण ज्ञानाच्या आभासापेक्षा अज्ञान परवडतं! सुहास पळशीकरांसारखे कसलेले अभ्यासक बोलतानाही प्रभावी असतात किंवा विश्वंभर चौधरी, उल्का महाजन यांच्यासारखे अपवादात्मक लोक खरोखरीच चर्चेतून काहीतरी दिशा देतात हे खरं आहे. वाहिन्यांमुळे सामाजिक चळवळीतील अनेक नावं लोकांपुढे आली, त्यांना मुख्य माध्यम प्रवाहातील व्यासपीठ मिळालं ही मोठी जमेची बाजू आहे हे मान्य करायलाच हवं. पण वृत्तवाहिन्यांवर बहुतेक वेळा जी चर्चा, वादावादी सुरु असते त्यातून आपल्या हाती काय लागलं हा प्रश्न बघणाऱ्यांनीच स्वतःला विचारावा. या चर्चांमधून जनमत तयार होतं असं म्हणणं तर मला फारच धाडसाचं वाटतं. कारण ऐतिहासिक संदर्भांचा आधार घेत, खोलात जाऊन केलेलं विश्लेषण, राजकीय-आर्थिक घडामोडींची व्यवस्थित उकल या गोष्टी अशा चर्चांमधून क्वचितच समोर येतात. आणि त्यादृष्टीने पाहिलं तर फ्रंटलाईन, आऊटलुक, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली यासारख्या नियतकालिकांच्या किंवा हिंदू आणि इंडियन एक्स्प्रेससारख्या दैनिकांच्या तोडीची वृत्तवाहिनी शोधावीच लागेल.

माध्यमांच्या बाबतीत आलेल्या अनुभवांवरून मी हा विचार करू लागलो आणि मग इतरही अनेक छोटे-छोटे अनुभव आठवत गेले. गांधी-विनोबांनी मौन, श्रम, वेळेचं नियोजन या गोष्टींना किती महत्त्व दिलं होतं हे आठवलं आणि मग वाटू लागलं की दररोज वृत्तवाहिन्यांच्या स्टुडिओत बसून किंवा फेसबुकवर शाब्दिक हाणामारी करणारे सगळेचजण रोज घाम फुटेपर्यंत शरीरश्रम करू लागलो तर विस्कळीत, विभाजित असं हे जग सांधायला कदाचित जास्त हातभार लागेल!

((पूर्वप्रसिद्धी : माध्यमांची रणनीती : प्रवाहातली आणि भोवऱ्यातली, प्रकाशन – अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट, संपादक – कुंदा प्रमिला नीळकंठ)
Utpal V B

Previous articleगुढीपाडवा…महाराष्ट्राच्या आद्य स्वातंत्र्यलढ्यातील विजयाचा स्मृतिदिवस
Next articleसोशल मीडियातील अभिव्यक्तीची जीवघेणी मरमर
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here