मी टू – बाई गं, तू एकटी नाहीस!

-भक्ती चपळगावकर

२००७ सालची गोष्ट आहे, मी स्टार न्यूजमध्ये (आताची एबीपी) काम करत होते. श्रीलंकेत होणा-या दक्षिण आशियायी देशांच्या माध्यम प्रतिनिधींच्या साफमा या संघटनेच्या वार्षिक बैठकीसाठी मला आमंत्रित करण्यात आले. त्यावेळी मुंबईहून अजून एक पत्रकार येणार होते, पण काही कारणाने त्यांचे येणे रद्द झाले. मी श्रीलंकेला पोचले, त्यावेळी विमानतळावर कोणीही हजर नव्हते. बहुदा मुंबईहून कुणी येणार आहे, याची त्यांना कल्पना नव्हती. कसेबसे राहण्याचे स्थळ शोधून काढले, बॅगा टाकल्या आणि शोधत शोधत साफमाच्या गेटटुगेदरला जाऊन पोचले. यजमान देशातर्फे प्रतिनिधींच्या स्वागताचा कार्यक्रम होता. काही क्वायर सिंगर स्टेजवर आले आणि त्यांना फार सुंदर परफॉरमन्स दिला. अजून काही कार्यक्रम झाले, आणि नंतर एक गृहस्थ समोर आले आणि त्यांनी नाचायला सुरूवात केली. शेजारी बसलेल्या बाईंनी सांगितले की हे साफमाचे अध्यक्ष इम्तियाज आलम. आलम साहेबांनी हजर असलेल्या प्रत्येक बाईला हात धरून समोर आणले आणि तिच्याबरोबर ते नाचू लागले. काही बायका नकोनको म्हणत होत्या पण हे साहेब ऐकायला तयार नव्हते. मुंबईहून आलेली मी एकटी पत्रकार. कुणाचीही ओळख नाही. नव्याने ओळख झालेल्या एका पाकिस्तानी महिला पत्रकारासोबत बसले होते. ती माहिती देत होती, नाचाला नाही म्हटले तर त्यांना आवडयाचे नाही. त्यांनी तिलाही नाचायला लावले आणि नंतर मोर्चा माझ्याकडे वळवला. माझ्या चेह-याचा एक प्रॉब्लेम आहे, जे काही मनात असतं, ते चेह-यावर दिसतं. त्यामुळे माझा चेहराच त्यांना नकार सांगून गेला. पण तरीही ते म्हणाले, प्रत्येकीने नाचायला हवं. मी म्हटलं, मला नाचायचं असेल तर मी नाचीन, पण मला हात लावलात तर खबरदार. ते गप्प बसून पुढे गेले. आणि दुस-या बाईचा हात ओढून तिच्याबरोबर नाचायला लागले. आता हा प्रसंग वाचून काहीजण म्हणतील एका नाचाने काही बिघडणार नव्हते. शिवाय सार्वजनिक कार्यक्रम होता. पण माझ्या दृष्टीने माझी इच्छा महत्वाची होती. नकोशा पुरूषी स्पर्शांबद्दल माझे अॅंटिना नेहमी कार्यरत असतात. लहानपणी आलेल्या अनुभवांनी आयुष्यभराची जखम केली आहे. पण सक्षम झाल्यानंतर मात्र मी अतिसावध झाले. बायकांच्या अंगचटीला येणा-या इम्तियाज आलमचे वागणे काही चूक आहे, याची जाणीवच कोणाला नव्हती. पत्रकार म्हणून त्याचे नाव मोठे आहे. मग बायकांशी तो कसा वागतो हे दुय्यम महत्वाचे अशीच समाजाची भूमिका आहे.असे प्रसंग अनेक जणींच्या आयुष्यात घडतात. त्यामुळे पुरूष असेच असतात, किंवा स्त्री म्हणजे असे छळ सहन करावे लागतातच असे समज तिच्या मनावर ठसतात. नकोशा स्पर्शांच्या पुढे जाऊन जर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला असेल तरी झालेल्या अत्याचाराची वाच्यता करणे हाच गुन्हा आहे, लैंगिक छळ गुन्हा नाही असा आवेश समाजाचा असतो. ही चर्चा करण्याचे कारण म्हणजे गेले वर्षभर जगभरात आणि काही दिवस भारतात मी टू किंवा मी सुध्दा या चळवळीचे उठणारे पडसाद. समाजातल्या बड्या धेंडांनी केलेल्या लैंगिक अत्याचारांविरुध्द दाद मागण्यासाठी अनेकजणी आज पुढे येत आहेत. अत्याचार झालेल्या घटनांनंतर त्या इतक्या वर्षांनी का रडगाणं गाताहेत, असा प्रतिप्रश्न काहीजण विचारत आहेत. या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर वरील प्रसंग लक्षात घेतले पाहिजेत. लैंगिक छळ हा तुझ्या नशीबाचे भोग आहेत, तुझ्याच वागणुकीत काही तरी चूक आहे, नाही तर असं कसं होईल आशा प्रकारचे ट्रेनिंग समाज तिला देत असतो. काहीजणी या अनुभवातून खमक्या बनतात. जे त्यांना त्रास द्यायला येतात त्यांचा चांगला समाचार घेतात. पण काहीजणी मात्र मनावर घाव झेलत जगतात. जवळच्या व्यक्तींची साथ नसेल तर त्या मनातल्या मनात कुढत राहतात.

गेल्या वर्षी १० ऑक्टोबरला न्यूय़ॉर्कर मासिकात रॉनन फॅरो या पत्रकाराने हार्वी वाईनस्टीन या हॉलीवूडमधल्या बलाढ्य निर्मात्याने केलेल्या लैंगिक अत्याचारांबद्दल एक मालिका चालवली. या मालिकेने हार्वीच्या अत्याचारांना बळी पडलेल्या अनेक बायका एकत्र आल्या. या आधी टाईम्स वर्तमानपत्राच्या दोन पत्रकार जोडी कॅंडर आणि मेगन टूहे यांनी हार्वीच्या विरोधात अनेक महिलांना बलात्कार आणि लैंगिक हिंसेचे आरोप केल्यासंदर्भात बातम्या दिल्या. २००६ साली तराना बर्क नावाच्या कार्यकर्तीने metoo ही संज्ञा सर्वात प्रथम वापरली. हार्वीच्या अत्याचारांच्या विरोधात अलिसा मिलानो या अभिनेत्रीने ट्वीटरवर एक आवाहन केले. ज्या ज्या महिलांना आयुष्यात कोणत्याही प्रकारे लैंगिक अत्याचाराचा सामना करावा लागला असेल तर तिच्या ट्वीटला #metoo असे उत्तर द्या असे ते आवाहन होते. तिच्या ट्वीटला उत्तर म्हणून हजारो महिला आणि पुरूषांनी #metoo ट्वीट केले. काही तासांत मी टू या शब्दांनी लैंगिक अत्याचाराच्या विरोधात एक चळवळ उभी केली. लैंगिक छळांना सहन करणारी तू एकटी नाहीस बाई, मी पण याच छळाचा सामना केला आहे, असं या चळवळीनं इतर स्त्रियांना सुचवलं, त्यांना एकत्र आणलं. ही चळवळ फक्त हॉलीवूड पुरती मर्यादित राहिली नाही. इतर क्षेत्रात काम करणा-या महिलाही आपले अनुभवकथन करु लागल्या. कित्येक प्रकरणांमध्ये अत्याचाराच्या घटना होऊन बराच काळ निघून गेला होता, पण इतका काळ उलटल्यानंतरही त्यांच्या मनावरचे घाव भरले नव्हते. ज्यांच्यावर आरोप झाले होते, त्यांनी इतका काळ उलटलाय असे सांगत आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला पण तो फारच लंगडा ठरला. अत्याचार झाल्यानंतर वर्षानुवर्षे तो प्रसंग रोज जगणा-या बायका पुढे येऊ लागल्यावर त्यांना इतरांनी पाठिंबा दिला.

स्त्री घराबाहेर पडून पैसे कमावयला लागली, मोठ्या पदांवर काम करायला लागली म्हणजे ती सक्षम झाली असा समज कित्येकदा किती पोकळ ठरतो, याचे उदाहरण ही चळवळ ठरली. स्त्री ख-या अर्थाने सक्षम होण्यासाठी अजून किती संघर्ष करावा लागणार आहे याचा अंदाज या चळवळीमुळे आला. इतकेच नाही तर या चळवळीचे लोण भारतातही येऊन पोचले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत पुढे जायचे असेल तर एक तर आमच्या (लैंगिक ) मागण्यांना शरण जा, अत्याचार झाले तर गप्प बसा अशा तो-यात असलेल्या काही जणांचं पितळ आता उघडं होतंय. हार्वीविरुध्द आरोप करायला एक नाही तर अनेक महिला समोर आल्या, पुढे कोर्टात काय होईल ते होईल पण त्याच्या मुसक्या बांधायण्यात या बायका यशस्वी ठरल्यात. भारतात आऱोपांना सुरूवात झाली आहे, पण नक्की कारवाई कशी होणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. लैंगिक अत्याचाराच्या कहाण्या घेऊन पुढे येणा-या महिला फक्त चित्रपटसृष्टीतल्या नाहीत. यात महिला पत्रकारांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. दरवेळेस होणारा छळ शारिरीक नसतो. शेरेबाजीच्या स्वरूपातही असतो. कोर्टाने विशाखा गाईडलाईन्स नेमून दिल्या आहेत. २०१३ च्या कायद्यानुसार प्रत्येक कार्यालयात लैंगिक अत्याचारांच्या चौकशीसाठी एक समिती असणं आवश्यक आहे, पण हे नियम सर्रास डावलले जातात. एक से बढ़कर एक हिट सिनेमे बनवणारी कंपनी असो वा सगळ्यात तेज असल्याचा दावा करणारे मिडिया हाऊस, तक्रारदार महिलांना थातूरमातूर उत्तरं देऊन आरोपींना अभय देण्याचे धोरणच या कंपन्यांनी अवलंबले आहे. जर या चळवळीचा परिणाम म्हणून अशा प्रकारच्या तक्रारी गंभीरपणे घेतल्या गेल्या आणि त्याची रितसर चौकशी झाली, तर फार मोठा फायदा करियरिस्ट मुलींना- महिलांना होईल.

-भक्ती चपळगावकर
पूर्वप्रसिद्धी- बिगुल- http://www.bigul.co.in
Previous articleसनातनचे उपद्व्याप ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे
Next articleमहात्मा गांधी आणि संगीत
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.