योगी भांडवलदार

सौजन्य- बहुजन संघर्ष  

‘गॉडमन टू टायकून’ या जगरनॉट ने इंग्रजीतून प्रकाशित केलेल्या पुस्तकाचा संक्षिप्त सार
भाग १

२०१७ हे वर्ष अनेकांना आभासी जगतातून खाडकन जागं करणारं वर्ष ठरलं. प्रधान सेवकांच्या भक्तीत रमलेल्यांना नोटबंदीनं आणि मग वस्तू व सेवा करानं आणि नंतर थोतांड शेतकरी कर्जमाफीनं जागं केलं, रामराहिम आणि अनेक भोंदू बाबा बुआ यांच्या भक्तीतून त्यांच्या शोषित भक्तांनीच जागं केलं. नवीन पिढीच्या मानगुटीवरून आता राष्ट्रभक्तीचीही नशा उतरू लागलेली दिसते आहे. तशीच संक्रांत रामदेवबाबा या योगगुरुवर केव्हाही येऊ शकते हे नुकत्याच प्रकाशित “गॉडमॅन टू  टायकून- दी अनटोल्ड स्टोरी ऑफ बाबा रामदेव” हे पुस्तक वाचल्यावर वाटायला लागतं- नव्हे आतापर्यंत हा बाबा गजाआड कसा गेला नाही ह्याचंच आश्चर्य वाटतं. अर्थात ज्यांच्या सोबत मिळून बाबा खिचडी पकवतो आहे ते सर्व एकाच माळेचे मणी असल्याची खात्री “गुजरात फाईल्स” हे राणा अयुब या पत्रकार महिलेचं पुस्तक वाचून झाल्यावर पटते. दुसरं म्हणजे प्रधानसेवक असो वा बाबा बुवा यांच्या बाबतीत भक्तीभावाची काजळी दूर करण्याचं काम स्त्रियांनीच केलं ही आणखी एक अधोरेखित करण्यासारखी गोष्ट आहे.

प्रियंका पाठक नारायण यांनी २००७ मध्ये कोलंबिया जर्नालिजम स्कूल मधून २००७ मध्ये पदवी घेतली आणि मग लगेच “मिंट” साठी धर्माच्या नावावर होणाऱ्या धंद्यांवर वार्तांकन सुरू केलं ते २०१३ पर्यंत. सेतूसमुद्रन प्रकल्पाचं वार्तांकन केल्याबद्दल त्यांना २००७ चा CNN यंग जर्नालिस्ट पुरस्कार देखील मिळाला आहे. हल्ली न्यू यॉर्क टाइम्स साठी अधूनमधून लिहितात. त्यांनी हे पुस्तक लिहिण्यासाठी स्वतः रामदेव बाबासहित त्यांचे नातेवाईक, त्यांना ओळखत असंणारे, कामानिमित्त बाबाच्या संपर्कात आलेले-सोबत असलेले- आता सोबत नसलेल्या अशा शेकडोंच्या मुलाखती घेतल्यात. त्यातून आकाराला आलेलं हे पुस्तक शोधपत्रिकेचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. या पुस्तकाचं मराठी भाषांतर करून ते लगेच मराठी वाचकांपर्यंत पोचवण्यात कुण्या प्रकाशकाने पुढाकार घेतला आहे की नाही माहीत नाही. लेखिकेनं दी वायर या youtube चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की “बाजारात विक्रीसाठी ठेवलेल्या या पुस्तकाच्या कॉपीज गायब व्हायला लागल्या आहेत.”

लेखिकेनं सुरुवातीला रामदेवबाबाच्या कुटुंबाची आणि जन्मगावाची माहिती दिली आहे. सैद अलीपुर या हरियाणातल्या गावात रामदेवबाबाचा जन्म शेतकरी कुटुंबात १९६५ ते १९६७ च्या मध्ये केव्हातरी झाला. जन्माची तारीख कुणीच नीट सांगू शकत नाही. सैद अलीपुर एक अत्यंत मागासलेल्या महेंद्रगढ जिल्ह्यातलं गाव आहे त्यामुळं ‘बॅकवर्ड रिजन्स ग्रांट फंड स्कीम’ चं लाभार्थी आहे. देशपातळीवर हजार पुरुषांच्या मागे स्त्रीयांची संख्या २०११ मध्ये ९१९ होती तेव्हा महेंद्रगढ मध्ये ती संख्या होती ८७७. २००१ मध्ये ही संख्या ९१८ होती. ० ते ६ मुलींच्या वयोगटात हा रेशो ८१८(२००१) वरून ७७८(२०११) वर आला, ज्यावरून स्त्रीभ्रूणहत्यांचं प्रमाण वाढल्याचं लक्षात येतं. जमिनीतील पाण्याची पातळी इतकी खोल गेली आहे की शेती करणं अशक्य झालंय. रामदेवच्या रागीट बापानं रामदेवला चोरीच्या शंकेवरून बेदम मारलं होतं आणि नेहमीच मारायचे. गरिबी, भूक, मारहाण, जातीप्रथेची घट्ट मगरमीठी याला कंटाळून रामदेवनं १९८८ मध्ये घर सोडल्याचं त्याचे चुलते सांगतात. रामदेवनं थेट घरापासून ३० किमी दूर असलेलं गुरुकुल गाठलं जिथे संस्कृत व्याकरण शिकले, गाई राखल्या, आजूबाजूच्या गावांतून भिक्षा मागितली, योगाचं शिक्षण घेतलं. इथंच आचार्य बाळकृष्ण आणि रामदेवची ओळख झाली.

 बाळकृष्णचं कुटुंब नेपाळ मध्ये आजही राहत आहे आणि २०११ मध्ये सी बी आयने बालकृष्णवर २००५ साली खोटी शालेय पत्रके दाखवून भारतीय पासपोर्ट मिळवल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. बाळकृष्ण सुवेदी नं लेखिकेला सांगितलं, ‘नेपाळमध्ये वाढताना आयुर्वेदाचा विचारही मी केलेला नव्हता’. कालवा गुरुकुलातल्या शिस्तीला कंटाळून बाळकृष्ण बरेचदा गुरुकुल सोडून जंगलात भटकायचा, आयुर्वेदिक वैद्यांकडे मदतनीस म्हणून काम करायचा, आयुर्वेद शिकायचा किंवा कंखाल इथं निघून जायचा. त्याच्या वडीलांनी कंखाल इथं गोरख्याचं काम केलेलं होतं, जेव्हा तो लहान होता. तिथं करमवीर हे योग गुरू त्याला भेटले. करमवीर निष्ठावान आर्यसमाजी होते, त्यांच्याच प्रयत्नामुळं हरिद्वार विद्यापीठात योगाचा  पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. त्यांच्याच शिफारसिमुळं बालकृष्णाला पोरबंदरच्या आर्यसमाज चालवत असलेल्या आयुर्वेदिक दवाखान्यात काम करण्याची काही काळ संधी मिळाली. तिथं काही रुग्णांना बालकृष्णच्या औषधांचा फायदा झाला आणि बालकृष्णची ख्याती पोरबंदरात एकदम पसरली. ‘हे अचानक घडलं’, बाळकृष्ण लेखिकेला सांगतो.

दरम्यानच्या काळात रामदेव कालवा गुरुकुलातून पदवी घेऊन खानपूर गुरुकुलात जातात तिथून मग किशनगढ घासेराच्या दुसऱ्या एका आर्यसमाजी गुरुकुलात शिक्षक म्हणून रुजू होतात. तिथं एका विद्यार्थ्याला काळं निळं करून रक्तस्राव होईपर्यंत ठोकतात. रामदेवच्या अधिकृत चरित्रात सुद्धा हा प्रसंग दिला आहे. चरित्रात लिहिलंय जखमी विद्यार्थ्याकडे बघून, ‘रामदेवबाबा च्या मनात करुणा दाटून आली. त्यांना स्वतःचा खूप राग आला. पश्चाताप झाला. म्हणून त्यांनी गुरुकुल सोडलं’. पण लेखिकेला तिथल्या स्थानिक लोकांनी सांगितलंय की झगडा करून रामदेव निघून गेले.

तिथून रामदेव बालकृष्णाकडे जातो. बाळकृष्ण रामदेवची शिफारस करमवीर कडे करतो. करमवीर रामदेवला दोन शपथा घ्यायला सांगतात. ‘ब्रम्हचर्य पालन आणि निःशुल्क सेवा’. रामदेव शपथ घेतो. इथं करमवीर रामदेव आणि बालकृष्णाला अनेक गोष्टी शिकवतात, त्यातली एक म्हणजे मोठ्या समुदायाला योगा प्रशिक्षण देणे. करमवीर यांनी जे शिक्षण आणि प्रतिष्ठा कमावली त्याचा फायदा पुढं रामदेव बाळकृष्णला आपलं बस्तान बसवताना झाला.

कंखाल मध्ये गंगेतून निघणाऱ्या कॅनल च्या काठावर एक कृपाळू बाग आश्रम होता. या आश्रमानं देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी अनेक क्रांतिकारकांना आश्रय दिला होता. पण आता १९६८ नंतर पासून शंकर देव हे एकाकी हा आश्रम सांभाळत होते. त्यांना करमवीरनं तो ताब्यात घ्यावा, तिथल्या अडेल जुन्या भाडेकरूंना तेथून बाहेर काढावं आणि आपलं काम तिथून चालवावं असं फार वाटत होतं. करमवीरला ते सारखी तशी गळ घालायचे. रामदेवच्या म्हणण्यावरून करमवीर यांनी त्यांना १९९४ मध्ये होकार दिला.

शंकर देव करमवीर ना म्हणाले, ‘मी तुझ्या या दोन मित्रांना ओळखत नाही, पण तुला ओळखतो. तुझ्यावर माझा भरवसा आहे.’

५ जानेवारी १९९५ रोजी ‘दिव्य योग मंदिर ट्रस्ट’ ची स्थापना झाली. रजिस्ट्रेशन मध्ये स्वामी शंकर देव यांना ‘संरक्षक’,  आचार्य रामदेव ‘अध्यक्ष’, आचार्य करमवीर ‘उपाध्यक्ष’ आणि आचार्य बाळकृष्ण यांची ‘महामंत्री’ म्हणून नोंद आहे. भाडेकरूंशी कोर्टाच्या बाहेर वाटाघाटी करून त्यांना जागा रिकामी करवून घेण्यात आली.

क्रमशः 

प्रज्वला तट्टे

Previous articleसमज वाढवा ! वैर संपवा !
Next articleदक्षिणायन कसले करता ? आता उत्तरायण हवे !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here