डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि वसंत पळशीकर यांच्या सामाजिक भूमिका भिन्न होत्या. दाभोलकर कार्यकर्ते व संघटक होते तर पळशीकर विचारवंत होते. दोघांमध्ये काही मुद्द्यांवर मतैक्य होतं तर काही मुद्द्यांवर मतभिन्नता होती. मात्र परस्पर संवादातून दोघांचीही व्यक्तीमत्व समृद्ध झाली. या दोघांबद्दल असणारी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचे मनापासून आभार मानतो.
१९५८ साली संयुक्त महाराष्ट्र होणार हे जवळपास निश्चित झालं होतं. समाजवादी भारतात, समाजवादी महाराष्ट्राची जडणघडण करण्यासाठी वैचारिक बांधबंदिस्तीची गरज शंकरराव देव यांना वाटली. त्यासाठी त्यांनी पुण्यामध्ये एक बैठक बोलावली. डॉ. अ. भि. शहा, देवदत्त दाभोलकर आणि ग. प्र. प्रधान ह्या तीन प्राध्यापकांशी त्यांनी सल्लामसलत केली. या बैठकीमध्ये समाजप्रबोधन संस्थेची स्थापना करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर १९५९ साली समाजप्रबोधन संस्थेची रितसर स्थापना झाली. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, मे. पुं. रेगे, गं. बा. सरदार, गोवर्धन पारीख, दि. के. बेडेकर इत्यादी वैचारिक क्षेत्रातील धुरीणांनी या कामी पुढाकार घेतला. समाजप्रबोधन संस्थेचे सचिव म्हणून काम करण्याची जबाबदारी पन्नालाल सुराणा यांनी स्वीकारली. १९६५ वा ६६ साली समाजप्रबोधन पत्रिका या नियतकालीकाच्या संपादनाची जबाबदारी वसंत पळशीकर यांच्यावर सोपवण्यात आली. समाजप्रबोधन पत्रिकेची छपाई सुजित पटवर्धन यांच्या छापखान्यात होत असे. सुजित पटवर्धन सांगतात, वसंतरावांना अनेक विषयात केवळ रस नव्हता तर गती होती. चित्रकला, फोटोग्राफी, चित्रपट या विषयांबाबतही ते केवळ सजग नव्हते तर त्यांना त्या क्षेत्रातलं कळतही होतं आणि अधिक जाणून घेण्याची जिज्ञासाही होती.
सारीपाट
१९६० चं दशक विद्रोहाचं समजलं जातं. अमेरिका आणि युरोपातील प्रगत देशांमध्ये तरुणांनी बोहेमियन जीवनपद्धतीचा आणि मुक्ततेचा नारा लावला. प्रस्थापित राजकीय व्यवस्था, शिक्षण पद्धती, भांडवलशाही, चंगळवाद यांच्याविरोधात अनेक तरुण रस्त्यावर आले. फ्रान्समध्ये युवक आंदोलनाला .कामगारांच्या संपाची जोड मिळाली. देशातील २२ टक्के लोकसंख्या संपावर गेली. हिंसाचार सुरू झाला. अराजक वा क्रांतीची लक्षणं दिसू लागली. अमेरिकेमध्ये नागरी स्वातंत्र्याच्या चळवळीने वेग घेतला, स्त्रीवादी आंदोलन, व्हिएतनाममधील अमेरिकेच्या लष्करी हस्तक्षेपाच्या विरोधातील आंदोलनात तरुण मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले. हिप्पी संस्कृती निर्माण झाली. तरुण फाटके कपडे चढवू लागले. दाढी-मिश्या आणि केस वाढवून हिंडू लागले. बिटल्स हा इंग्लडमधला बँण्ड या तरुण पिढीचं प्रतीक बनला. बिटल्सने युरोपनंतर अमेरिका पादाक्रांत केली. १९६७ साली “टाइम” या अमेरिकन मासिकात या हिप्पी संस्कृती विषयावर कव्हर स्टोरी प्रसिद्ध झाली. हिप्पी संस्कृतीची प्रेरणा डायोजिनीस या तत्वज्ञाची आहे. येशू, गौतम बुद्ध, हेन्री डेव्हिड थोरो, महात्मा गांधी यांचा त्यांच्यावर प्रभाव आहे. नैसर्गिक प्रेरणांशी प्रामाणिक राहाणं वा निसर्गाशी नातं जोडणं, समूह जीवन आणि कलाविष्कार विशेषतः संगीतातून, ही त्यांची मूल्यं आहेत असं सदर लेखात म्हटलं होतं.
बंगालमध्ये “हंग्री जनरेशन” ही नवी साहित्यिक चळवळ उभी राह्यली. या चळवळीचं केंद्र कलकत्यात होतं पण बिहार, आसाम, त्रिपुरा या राज्यातील लेखक व कवी त्यांच्याशी जोडले गेले होते. शक्ती चट्टोपाध्याय, मलय रॉय चौधुरी, समीर रॉयचौधुरी, देबी रॉय या कवी, साहित्यिक त्यामध्ये सहभागी झाले. १९६१ ते १९६५ या पाच वर्षांमध्ये हंग्री जनरेशनच्या लेखकांनी १०० जाहिरनामे प्रसिद्ध केले. या काळात बिट जनरेशनचा अमेरिकन कवी अलन ग्रीन्सबर्ग, मेक्सिकन कवी व निबंधकार, ऑक्टोव्हिया पाझ, कोलंबियातील बारांकिला ग्रुप (गॅब्रिअल गार्सिया मार्खेज हा नोबेल पारितोषिक विजेता लेखक या ग्रुपमध्ये होता) त्याशिवाय स्पॅनिश साहित्यिकांनी हंग्री जनरेशनशी आपलं नातं जोडलं. हे सर्व प्रस्थापितांच्या विरोधात होते, युद्ध विरोधी होते, निसर्गाशी जवळीक साधली पाहिजे असं म्हणणारे होते. काही जण तर निसर्गाकडे परत चला अशी घोषणा देणारे होते. त्यांनी आपलं नातं गांधीजींशी जोडलं होतं. अलन ग्रीन्सबर्ग, शक्ती चट्टोपाध्याय, फणीश्वरनाथ रेणू, सुनील बंदोपाध्याय इत्यादी लेखक, कवी बंगालमधील चाईसबासा या जंगलात सहलीसाठी अधून-मधून जात. या विषयावर सुनील बंदोपाध्याय या बंगाली लेखकाने “अरण्येर दिनरात्री” ही कथा लिहीली. त्यावर सत्यजित राय यांनी चित्रपट काढला. हंग्री जनरेशनने नव्या रसरशीत लोकभाषेचा आविष्कार केला. या हंग्री जनरेशनशी अशोक शहाणेंचा संबंध होता. त्यामुळे लिटल मॅगेझिन वा लघुपत्रिकांचे वारे बंगालातून महाराष्ट्रात पोचले. अरुण कोलटकर, मनोहर ओक, तुलसी परब, भालचंद्र नेमाडे, चंद्रकांत पाटील, वसंत आबाजी डहाके हे या पिढीचे लेखक आणि कवी.
“ १९५० ते १९६० या काळाला स्वातंत्र्यानंतरचे पहिले दशक म्हणून विशेष महत्व होते. या काळात एका बाजूला स्वातंत्र्योत्तर पिढी वाढत होती. दुसर्या बाजूला स्वातंत्र्यपूर्व काळातील आदर्शवाद जपणारी पिढी हळूहळू बाजूला पडत होती. तिची जागा नोकरशाहीतील आणि राजकीय क्षेत्रातील पोकळी भरून काढणार्य़ा ध्येयशून्य, करिअरिस्ट आणि आत्मलुब्ध-आत्मकेंद्रीत पिढीने घ्यायला सुरुवात केली होती. देशप्रेम आणि स्वातंत्र्याची नारेबाजी करीत स्वार्थासाठी सत्तेचा आणि अधिकाराचा वापर करणारी ही पिढी होती. सामान्य माणसांच्या सुखदुःखापासून दूर गेलेल्या या पिढीला स्वातंत्र्यापूर्वीच्या आदर्शवादाचे आणि मूल्याधिष्ठीत जीवनपद्धतीचे सोयर-सुतकही नव्हते. क्वचित कुठे काही बुद्धिवादी लोक आपला क्षीण आवाज या प्रचंड कोलाहलात उंचावण्याचा एकेकटा प्रयत्न करत होते. सामान्य माणसाच्या दैनंदिन व्यवहारात स्वातंत्र्याने कुठलेही मूलभूत परिवर्तन घडवून आणले नाही. राजकारण आणि समाजकारणात प्रचंड दरी वाढत चाललेली होती. समाजातील विकसित आणि उच्चवर्णीय घटकांनी बौद्धिक मिरासदारीच्या आणि बहुसंख्येच्या जोरावर दुर्बलांना ‘आश्रित’ म्हणूनच वागवले. दुर्बलांना स्वतंत्र देशाचे प्रतिष्ठीत नागरीक म्हणून प्रतिष्ठा मिळत नव्हती. दुर्बलांना मतांपुरतेच अस्तित्व होते आणि मतांचा व्यापार उघड चालू होता. या विदारक राजकीय परिस्थितीची पाळेमुळे एका बाजूने वसाहतवादाच्या अवशेषांत आणि दुसर्य़ा बाजूने चिरंतन जातिवादात होती.” अशी नोंद चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. (मराठी साहित्य- प्रेरणा व स्वरूप १९५० ते १९७५, संपादक- गो. मा. पवार, म. द. हातकणंगलेकर, १९८६)
प्रस्थापित राजकारण्यांच्या विशेषतः डाव्या व आंबेडकरवादी राजकीय पक्षांच्या कक्षेबाहेर .असणार्या तरुणांच्या संघटना .वा .चळवळी आकार घेत होत्या. बंगालमध्ये चारु मजुमदार आणि जंगल संथाल यांच्या नेतृत्वाखाली नक्षलवादी चळवळीने मुक्तीचा नारा दिला. केरळ, आंध्र प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये नक्षलवादी चळवळ पसरली. महाराष्ट्रात युवक क्रांती दल, समाजवादी युवक दल या संघटना समाजवादी वर्तुळातील तरुणांनी स्थापन केल्या होत्या. मार्क्सवादी वर्तुळात मागोवा या नियतकालीकाने जम बसवायला सुरुवात केली होती. श्रमिक संघटना स्थापन झाली होती. आंबेडकरवादी चळवळीत दलित पँथरने मुक्तीचा नारा दिला होता.
समाजप्रबोधन पत्रिकेच्या संपादकपदाची जबाबदारी वसंत पळशीकर यांनी स्वीकारली त्यावेळी जगाचा, देशाचा आणि महाराष्ट्राचा वैचारिक-साहित्यिक सारीपाट काय होता याची थोडीफार कल्पना यामधून येते. महाराष्ट्रातील लघुपत्रिकांच्या चळवळीचे बिनीचे शिलेदार होते अशोक शहाणे, भालचंद्र नेमाडे आणि राजा ढाले. यापैकी नेमाडे आणि शहाणे यांच्याशी वसंतरावांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. शंकरराव देव, देवदत्त दाभोलकर, ग. प्र. प्रधान, अ. भि. शहा, गं. बा. सरदार, दि. के. बेडेकर, मे. पुं. रेगे इत्यादी वैचारिक क्षेत्रातील धुरीण तरूणांच्या दृष्टीने प्रस्थापित होते. वस्तुतः हे सर्व आधुनिकतेचे पुरस्कर्ते होते. आधुनिकता म्हणजे केवळ औद्योगीकरण एवढंच त्यांना अभिप्रेत नव्हतं. भारतीय समाजाची पुनर्रचना स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय या आधुनिक मूल्यांवर करण्याचं त्यांचं ध्येय होतं. या पाश्चात्य संकल्पनांचा भारतीय समाज व संस्कृतीशी वा भारतीय परंपरेशी मेळ घालण्याची गरज त्यांनाही वाटत होती. किंबहुना त्यासाठीच समाजप्रबोधन संस्था स्थापन करण्यात आली होती. पळशीकरांनी आधुनिकतेची मूलगामी चिकित्सा करून जातिवाद, जमातवाद, सेक्युलॅरिझम, लोकशाही, निवडणुका, अर्थरचना, समाजशास्त्रे, साहित्य इत्यादी क्षेत्रात वेगळी मांडणी केली. प्रस्थापितांना वा आधुनिकतेच्या पुरस्कर्त्यांना आव्हान देण्याचा आव पळशीकरांच्या लिखाणात नव्हता. वास्तव परिस्थिती कोणत्याही विचारधारेच्या चष्म्यातून न पाहता, तिच्या जडण-घडणीच्या संदर्भात घडलेल्या प्रक्रियांचा अभ्यास करून मग निष्कर्षाला पोचायचं ही पळशीकरांच्या लिखाणाची रीत होती. त्यामुळे मतमतांतराच्या गलबल्यामध्ये ते कधीही हरवून गेले नाहीत. वादामध्ये आपण जिंकण्याची इर्षा त्यांच्यामध्ये कधीही नव्हती. आपली भूमिका कायम ठेवून स्नेह आणि मैत्रीला बाधा येऊ न देता चर्चा व संवाद करत राहणं ही पळशीकरांची शैली नव्हे तर वृत्ती होती. वेदोपनिषदे आणि अन्य धार्मिक साहित्याकडे ऐतिहासिक आणि चिकित्सक दृष्टीने पाह्यले पाहिजे अशी मे. पुं. रेगे यांची धारणा होती. मे. पुं. रेगे यांची ‘ऐतिहासिक आणि चिकित्सक दृष्टी’ आधुनिक म्हणजे पाश्चात्य आहे या आशयाची टीका भालचंद्र नेमाडे यांनी केली होती. पाश्चात्य आधुनिकता आणि भारतीय दर्शने यांच्यामध्ये संवाद व समन्वय साधण्याची भूमिका घेणारे मे. पुं. रेगे आणि देशीयतेचा पुरस्कार करणारे नेमाडे या दोन टोकांशी संवाद चालू ठेवण्याची किमया पळशीकरांकडे होती.
आधुनिकतेची चिकित्सा
निसर्गाचे नियम जाणून घेतले की तंत्रज्ञान रचता येतं. निसर्ग नियमांचं ज्ञान जेवढं सूक्ष्म तेवढं तंत्रज्ञान प्रगत बनतं. प्रगत तंत्रज्ञानामुळे उपभोग्य वस्तूंचं ठोक उत्पादन करता येतं. उपभोग्य वस्तूंचं भरपूर उत्पादन झाल्याने त्यांचा उपभोग घेणं शक्य होतं त्यामुळे मानवजात सुखी होते. माणूस हाही निसर्गाचाच आविष्कार असल्याने निसर्गाप्रमाणेच माणसाचे म्हणजे मानवी समाजाचेही नियम असणार, त्यांचं ज्ञान करून घेतलं की अधिक न्याय्य, समतेवर आधारित निरामय समाज निर्माण करणं शक्य आहे, अशी आधुनिक विचाराची ढोबळपणे मांडणी करता येईल. स्वतंत्र भारताची आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक पुनर्रचना आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञावर करायला हवी तरच समाजवादी भारतात समाजवादी महाराष्ट्र साकार होऊ शकेल अशी तत्कालीन सामाजिक, राजकीय धुरिणांची धारणा होती. भारताच्या आधुनिकीकरणाचा हा प्रकल्प १९५०च्या दशकात सुरू झाला. गांधीवादी, समाजवादी, मार्क्सवादी, फुले-आंबेडकरवादी हे सर्व आधुनिकतेच्या अंगानेच मांडणी करत होते. भारतीय समाज आणि संस्कृती यांचा सांधा पाश्चात्य आधुनिक विचारांशी कसा जोडायचा या मुद्द्यांवर त्यांच्यामध्ये मतभेद वा मतभिन्नता होती. या पार्श्वभूमीवर वसंत पळशीकरांनी केलेली आधुनिकतेची चिकित्सा नवी होती.
कोणत्या प्रकारची समाजरचना श्रेयस्कर आहे या प्रश्नाच्या उत्तरानुसार ज्ञानाची आणि सामाजिक-राजकीय संस्थांची उभारणी करायला हवी हा पळशीकरांच्या चिकित्सेचा आरंभ बिंदू आहे. तुमचं श्रेयस काय आहे- जगण्याचं वा जीवनाचं, चांगला समाज कोणत्या श्रेयसावर आधारलेला हवा, असे प्रश्न पळशीकरांच्या लिखाणामध्ये वारंवार येतात. हे प्रश्न सतत केंद्रस्थानी ठेवून ते विचार करतात त्यामुळे किशोर बेडकिहाळ हे अभ्यासक पळशीकरांचं वर्णन करताना समग्रपणे विचार करणारा ज्ञानोपासक असे शब्द योजतो. माझ्या आसपासचा मानवी समाज आणि माझ्याभोवतीचं चराचर विश्व-चेतन आणि अचेतन, या सगळ्याचा विचार करायला मी बांधील आहे अशी पळशीकरांची जीवनदृष्टी होती. पाश्चात्य आधुनिक विचाराची धारणा याच्या अगदी विरुद्ध आहे. मॅन इज द मेझर ऑफ द युनिव्हर्स म्हणजे मनुष्य सर्व विश्वाचा मानदंड आहे अशी आधुनिकतेची धारणा आहे. युरोपमध्ये आधुनिकता ज्या प्रक्रियेमधून निर्माण झाली ती प्रक्रिया माणसाच्या जगण्यासाठी चांगलं श्रेयस असणारी नव्हती. “आधुनिकता ही काही सर्वत्रच शुभंकर अशी घडामोड युरोपातही नव्हती व आपल्याकडेही नाही,” असा अभिप्राय वसंत पळशीकरांनी एका लेखात दिला आहे.
आधुनिकतेच्या बुडाशी असणार्या प्रेरणा भांडवलदारांच्या, नफ्यावर आधारलेल्या, व्यक्तीच्या स्वार्थाला प्रोत्साहन देणार्या आणि स्वार्थ संपादनाच्या होत्या. अनिर्बंध व्यक्तीस्वातंत्र्य आणि अतिरिक्त स्पर्धा समाजजीवन हिंसक बनवतात. त्यामुळे व्यक्ती व समाज यांचं अस्तित्व धोक्यात येतं अशी पळशीकरांची मांडणी आहे. स्वातंत्र्य, समता व बंधुता ही आधुनिकतेची मूल्यं आहेत. या मूल्यांना पळशीकरांनी नकार दिलेला नाही. मात्र मनुष्य हाच विश्वाचा मापदंड मानला तर निसर्ग व चराचर सृष्टी उपभोग्य ठरू शकते, याकडे पळशीकर लक्ष वेधतात. विवेक वा रिझन ही माणसाची अमोघ शक्ती आहे, प्रतिसृष्टी निर्माण करण्याची क्षमता त्यामुळे माणसाला प्राप्त होते, परिणामी निसर्गाचा कितीही विद्ध्वंस केला तरीही ते नुकसान करण्याची क्षमता माणसामध्ये आहे असा विचारभ्रम तयार होतो. त्यामुळे आधुनिक मूल्यांचा स्वीकार करताना श्रेयस वा शुभंकर काय आहे या मुद्द्याला पळशीकर केंद्रस्थानी ठेवतात. चराचर सृष्टी आणि माणूस यांची एकात्मता गृहित धरणं शुभंकर वा श्रेयस आहे असा त्यांचा पळशीकरांचा अभिप्राय आहे. ही एकात्मता का गृहीत धरायची असा प्रश्न उपस्थित होतो. त्याचं स्पष्टीकरण देताना पळशीकर म्हणाले असते की एकत्वाची ही अनुभूती ऐंद्रीय नाही. अतिंद्रीय पद्धतीनेच ते समजावून घ्यावं लागेल, गृहीत धरावं लागेल, ही गृहीतकं भौतिक वा तार्कीक युक्तिवादातून हाती लागणारी नाहीत.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रसिद्ध केलेल्या एका पुस्तिकेचं (१०१ प्रश्न आणि त्यांची उत्तरे) पळशीकरांनी केलेलं विस्तृत आणि चिकित्सक परिक्षण उदाहरणादाखल घेऊ. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि प्रा. प्र. रा. आर्डे हे या पुस्तिकेचे लेखक आहेत. पुस्तिकेचं परीक्षण करण्यापूर्वी पळशीकरांनी विज्ञान, मानसशास्त्र, समाजशास्त्र या ज्ञानशाखांमधील अद्ययावत लिखाण, अर्थातच अंधश्रद्धेसंबंधीचं अभ्यासलं होतं ह्याचे पुरावे त्या लेखातच आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याबद्दल असणारी तळमळ आणि आदर या भावनेतूनच त्यांनी या पुस्तिकेचं कठोर परिक्षण केलं, जेणेकरून अंधश्रद्धा निर्मूलनाची भूमिका अधिक भक्कम व्हावी. समाज काय आहे आणि अंध्दश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रवर्तक व कार्यकर्ते त्याच्याकडे कसे पाहतात याची चिकित्सा पळशीकरांनी केली आहे. एखाद्या व्यक्तीला अंधश्रद्ध केव्हा म्हणायचं? मनोरुग्ण केव्हा म्हणायचं ? असे प्रश्न पळशीकरांनी उपस्थित केले आहेत. प्रत्येक समाज वा समूह जगण्याच्या प्रक्रियेत वा ओघात व्यक्ती-समाज-निसर्ग-विश्व यांच्यासंबंधात काही विचारव्यूह आणि कल्पनाव्यूह तयार करतो, विचारप्रणाली तयार करतो. त्या विचारप्रणालींचे प्रभाव पुसून टाकून नवी प्रणाली तिथे निर्माण करणं वा रुजवणं हे काम कोणत्याही प्रणालीच्या बाबतीत अवघड असतं. पण अशा वेळी समाजाचा वा समूहाचा इतिहास आणि परंपरा लक्षात न घेता संपूर्ण समाजाला वा समूहाला अंधश्रद्धेच्या पारड्यात टाकून देणं उचित आहे का असा प्रश्न पळशीकर उपस्थित करतात. वैज्ञानिक ज्ञानाच्या चौकटीच्या बाहेर जे ज्ञान वा शहाणपण वा कर्मकांड वा विधि आहेत, त्या सर्व गोष्टी अंधश्रद्धा ठरवायच्या का असाही प्रश्न ते विचारतात. दुर्दैवाने या महत्वपूर्ण लेखावर कुठे चर्चा झाल्याचं माझ्या वाचनात नाही.
समारोप
आधुनिक भारताचा इतिहास, आधुनिक भारताचे व महाराष्ट्राचे विचारवंत वा वैचारिक क्षेत्रातील धुरीण, हिंदुत्ववाद, मार्क्सवाद, समाजवाद, सोवियेत रशिया, गांधी विचार, स्त्री-पुरुष समता, पर्यावरण, जात, जमातवाद, लोकशाही, सेक्युलॅरिझम, राष्ट्रवाद, जागतिकीकरण, साहित्य समीक्षा अशा नानाविध विषयांवर पळशीकरांनी विपुल लेखन केलं आहे. त्यांनी लिहीलेल्या विस्तृत लेखांची संख्या सुमारे ६५० असावी असा अंदाज आहे. आधुनिकतेची चिकित्सा ही पळशीकरांच्या जीवनदृष्टीतच सामावली असल्याने यापैकी कोणत्याही लेखाची बैठक तीच आहे.
पळशीकरांनी केलेल्या आधुनिकतेच्या चिकित्सेमध्ये ज्ञान निर्मिती आणि निसर्गाचे नियम शोधण्याची मानवी प्रेरणा याला विशेष स्थान नाही. युरोपमधील अंधश्रद्धांचं उदाहरण घेऊ. १५८० ते १६३० या जवळपास तीन शतकांमध्ये युरोपमध्ये सुमारे ६० हजार स्त्री-पुरुषांना चेटके वा चेटकिणी म्हणून जिवंत जाळण्यात आलं. हे चेटके सैतानाची पूजा करतात अशी समजूत होती. हे खटले न्यायालयात चालवून त्यांना जिवंत जाळण्याच्या शिक्षा दिल्या जात. त्याला आळा घालावा म्हणून इंग्लडमध्ये १८ व्या शतकात कायदा करण्यात आला. पण १८ व्या शतकात चेटकिणी नाहिशा झाल्या होत्या. गावामध्ये एखादी जख्ख म्हातारी असायची, कुणाच्या गाई दूध देईनाशा व्हायच्या, कुणाच्या कोंबड्या मरून जायच्या, म्हणजे ज्या पुराव्यांच्या आधारे खटले चालवले जायचे ते पुरावे होते पण चेटकिणी नाहिशा झाल्या. समाजसुधारकांच्या कार्यामुळे हा फरक पडला नव्हता. निसर्गातील घटितांचा अर्थ लावण्याच्या लोकांच्या दृष्टिकोनात बदल झाला होता. हा बदल अर्थातच विज्ञानाने केला होता. बुद्धिमान, प्रतिभाशाली व्यक्ती ज्ञानाचा म्हणजे वैज्ञानिक सत्याचा वा निसर्गनियमांचा शोध घेऊ लागल्या होत्या. कारागीर, कामगार, खलाशी यांनी त्यामध्ये भर घालायला सुरुवात केली होती. निसर्गनियमांचं ज्ञान झाल्यावर तंत्रज्ञान रचता येतं आणि त्यानुसार जीवनदृष्टीमध्ये व जीवनपद्धतीत बदल करायचा असतो ही बाब सामान्य जनतेच्या अंगवळणी पडली होती. त्यातून हे परिवर्तन घडलं.
चराचर सृष्टी आणि माणूस यांची एकात्मता गृहित धरणं शुभंकर वा श्रेयस आहे असा त्यांचा पळशीकरांचा अभिप्राय आहे. या जीवनदृष्टीचा स्वीकार केल्याने वेगळ्या विज्ञानाची निर्मिती शक्य आहे का? आशिष नंदी या अभ्यासकाने दोन भारतीय शास्त्रज्ञांचा मानसशास्त्रीय अभ्यास केला. रामानुजम हे गणिती आणि जगदीशचंद्र बोस हे वनस्पती शास्त्रज्ञ. दोघेही पारंतंत्र्याच्या काळातले. दोघांनीही आधुनिक इंग्रजी शिक्षण घेतलं होतं. मात्र त्यांची जीवनदृष्टी भारतीयच होती. वनस्पतींना भावना असतात ह्या विषयाचा शोध घ्यावा असं केवळ भारतीय शास्त्रज्ञालाच सुचू शकतं असा अभिप्राय आल्बर्ट आईनस्टाईन यांनी दिला. कारण भारतीय जीवनदृष्टीनुसार चराचरामध्ये चैतन्यतत्व आहे. गणित या शास्त्रात काय प्रगती झाली आहे ह्याची काहीही माहिती रामानुजम यांना नव्हती. त्यामुळे या क्षेत्रातले अनेक कूट प्रश्न वा सिद्धांत त्यांनी स्वतःशी झटापट करून सिद्ध केले होते. दोन्ही शास्त्रज्ञांच्या सामाजिक, कौटुंबिक पार्श्वभूमीची, मानसिक जडणघडणीची सविस्तर चर्चा करून आशिष नंदी यांनी असा निष्कर्ष काढला आहे की पाश्चात्य विज्ञान हेच एकमेव विज्ञान आहे असं मानण्याचं कारण नाही. भारतीय वा अन्य देशाच्या संस्कृतीतही वेगळं विज्ञान निर्माण होऊ शकतं (श्याम मनोहर यांच्या “कळ” या कादंबरीतही ही शक्यता वर्तवण्यात आली आहे.)
पाश्चात्य आधुनिक विज्ञानावर समाजशास्त्रांचीही उभारणी पाश्चात्यांनी केली. व्यक्तीमूल्य, व्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्तीवाद म्हणजेच व्यक्ती हे समाजाचं एकक ठरवून अर्थशास्त्राची उभारणी करण्यात आली. भांडवलशाहीचं अर्थशास्त्र याच पायावर उभं आहे. आज या अर्थशास्त्राला आव्हान देणारं संशोधन आणि सिद्धांत पाश्चात्य जगातील अभ्यासक मांडत आहेत. माणूस केवळ व्यक्तीवादी नसतो तर समाजशीलही असतो, माणसाची समाजशीलता ध्यानी न घेता आधुनिक अर्थशास्त्राची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे आधुनिक अर्थशास्त्र शोषण, स्वार्थ यांचा पुरस्कार करणारं आहे अशी मांडणी केली जात आहे.
वसंत पळशीकर यांच्या निधनानंतर श्याम मनोहर यांना फोन केला. वसंतरावांनी त्यांच्या पहिल्या कथेला दाद दिली होती. त्यांच्या एका नाटकाचं विस्तृत परिक्षणही केलं होतं. श्याम मनोहर म्हणाले, “पृथःकरणाची कमाल मर्यादा पळशीकरांनी गाठली आणि सिद्धांताचा वा ज्ञानाचा प्रदेश खुला केला.” पळशीकरांनी पाश्चात्य आधुनिकतेचा किल्ला भुईसपाट केला मात्र त्यांच्या जीवनदृष्टीनुसार ज्ञान निर्मिती करण्यासाठी भारतीयांनी एखाद्या विषयाचा वा प्रश्नाचा ध्यास घेऊन एकेकट्याने काम करण्याची गरज आहे. या ज्ञान निर्मितीच्या कार्याला लागण्याची ऊर्जा माझ्यासह सर्वांमध्ये जागी होवो असं आवाहन करून हे भाषण संपवतो.
डॉ.नरेंद्र दाभोलकर विवेक व्याखानमाला, नाशिक येथे दिनांक २० नोव्हेंबर २०१६ रोजी दिलेलं व्याखान
(लेखक नामवंत पत्रकार आहेत)