विजय आनंद : कदम के निशां बनाके चले..!

(साभार : दैनिक ‘महाराष्ट्र दिनमान’)

-मिथिला सुभाष

*****

विजय आनंद! नावातच ‘विजय’ आहे, ‘आनंद’ही आहे. मागच्या सोमवारी सालगिरह होती गोल्डीची. होय, गोल्डी, सोन्यासारखा! म्हणून आज आपण त्याची याद काढतोय, त्याच्या ‘ज्वेल थीफ’च्या आठवणी ताजा करूया. 1957-1971 हा विजय आनंदचा सुवर्णकाळ! म्हणजे ‘नौ दो ग्यारह’ ते ‘तेरे मेरे सपने’.. व्हाया ‘तेरे घर के सामने,’ ‘ज्वेल थीफ,’ ‘तिसरी मंजिल,’ ‘काला बाजार,’ ‘जॉनी मेरा नाम’ आणि लास्ट बट नॉट लीस्ट, ‘गाईड’! ‘गाईड’ हे बेशक़ीमती जवाहिर आहे. त्याबद्दल नंतर, कदाचित पुढच्याच आठवड्यात. आज फक्त ‘ज्वेल थीफ!’

गोल्डीने इतर अनेक सिनेमे केलेत, पण वर दिलेत ते त्याचे बेहतरीन नगीने! गोल्डी त्याच्या काळाच्या पुढचा दिग्दर्शक होता. त्याहून चांगला तो स्क्रीनप्ले रायटर होता. त्याचं क्राफ्टिंग आणि रेझरशार्प एडिटिंग या त्याच्या सिनेमाच्या जमेच्या बाजू. त्याच्या स्क्रिप्टवरच एडिटिंगच्या सूचना असायच्या. त्याचे सिनेमे क्लास, मास आणि टीकाकार या तिन्ही तबक्यांना संतुष्ट करायचे. गाण्यांच्या चित्रीकरणाच्या बाबतीत गोल्डीचा हात धरणारं आजही कोणी नाही. ‘कुतुब’मधे चित्रित झालेलं ‘दिल का भंवर’ असो, नाहीतर स्वप्नातल्या रस्त्यासारख्या रस्त्यावर चित्रित केलेलं ‘तू कहां ये बता’ असो.. ‘आंखों में क्या जी’ असो, नाहीतर ‘होटोंपे ऐसी बात’ असो.. तेरे मेरे सपने’मधलं ‘ए मैने क़सम ली’ असो, ही गाणी विजय आनंदच करू जाणे.. ‘ए मैने क़सम’ अतिशय मधाळ रोमँटिक गाणं..पण त्यात ‘मदिर’ असा एक शब्द आहे. आणि मुमताजच्या गुलाबी पारदर्शक ब्लाऊजमधून सतत दिसत राहणारी काळी ब्रा’ची पट्टी त्या ‘मदिर’चा अर्थ सांगत राहते. (गाणं पाहण्यासाठी क्लिक करा-https://bit.ly/3dVJdvO)चांगले दिग्दर्शक अशी बदमाशी करतात. पण ती दिलक़श असते.

‘ज्वेल थीफ’च्या टायटल्सवरच दस्ताने घातलेला एक हात मोठमोठय़ा शोरुममधले हिऱ्याचे दागिने चोरतोय असं दिसतं. एखाद्या इंग्रजी सिनेमाशी साधर्म्य साधणारं धडकी भरवणारं पार्श्वसंगीत सुरु आहे. नंतर या संगीतावरच धडाधड येणाऱ्या वर्तमानपत्रातल्या बातम्या आपल्याला एका चलाख, तरबेज हिरे चोराचे कारनामे दाखवतात. अवघ्या देशातलं पोलिस खातं या हिरेचोराला पकडण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करतंय, हे कळतं. या दृश्यमालिकेवर हिऱ्यासारखीच श्रेयनामावली! देव आनंद, वैजयंतीमाला, अशोक कुमार, संगीत सचिनदेव बर्मन, त्यांचे साहाय्यक राहुलदेव बर्मन… आणि आपल्याला पहिला शोध लागतो… हे जे बॉन्डपटात शोभेल असं पार्श्वसंगीत श्रेयनामावलीबरोबर वाजतंय ते ‘आरडी’चं.. आणि सगळ्यात शेवटी – लेखक-दिग्दर्शक विजय आनंद! गुंतागुंतीच्या वळणदार रस्त्यावरुन जाणारी एखादी हसीन, माहजबीन सब्ज़परी प्रत्येक वळणावर बेसाख्ता दीदार देऊन बेताबी वाढवून गायब होते, तसा आपल्याला प्रत्येक वळणावर गोल्डी भेटत राहतो. “होय, हा माझा सिनेमा आहे,” हे सांगत राहतो.

हिंदी रहस्यपटांची फार काही गौरवशाली परंपरा नाही. पण जे थोडेबहुत रहस्यपट आठवणीत राहिलेत त्यात ‘ज्वेल थीफ’ (उच्चार : जूsssल थीफ!) या स्टायलिश सिनेमाचा नंबर वरचा, पहिलाच म्हणा ना! बॉण्डछाप असल्यामुळे सिनेमात खणखणीत रहस्य आहेच. शिवाय देव आनंद आहे त्यामुळे प्रणय आहे. वैजयंती आहे म्हणून एक दहा मिनिटांचं डोळे दिपवणारं नृत्य आहे. तंग-तोकडे कपडे घालणाऱ्या हेलन, फरियाल, अंजू महेंद्रु आहेत. त्या आहेत म्हणून क्लब डान्सेस आहेत. एसडी आहे त्यामुळे कर्णमधुर गाणी आहेत. आरडी त्यांचा या सिनेमात साहाय्यक असल्यामुळे विषयाला साजेसं थरारक पार्श्वसंगीत आहे. पण हे सारं आहे ते एका विजय आनंदमुळे आहे! तो या ताजमधला कोहिनूर आहे!!

रहस्यपट पाहतांना प्रेक्षक सवयीनं अंदाज बांधायला लागतात. ते सगळे अंदाज आपल्या शेवटानं खोटे ठरवणारा सिनेमा हा खरा रहस्यपट! ‘ज्वेल थीफ’ या निकषावर अगदी शंभर टक्के खरा उतरला. अनेक फास्ट कट्सने सिनेमा सुरु होतो.. आपण अंदाज बांधत राहतो.. ते सगळे अंदाज ध्वस्त करत, सिनेमा सुरु होऊन फक्त सहा मिनिटं आणि सदतीस सेकंद झालेले असतांना पहिलं गाणं सुरु होतं, ‘ये दिल ना होता बेचारा..कदम ना होते आवारा!’ आपण अंदाज लावतो, ‘हा आता या पोरीला गटवणार.!’ आणि हाही अंदाज तहसनहस होऊन जातो..

ज्या काळात हा सिनेमा आला त्या काळात सिनेमांच्या इंग्रजी नावांचं फारसं चलन नव्हतं. त्यामुळे ‘ज्वेल थीफ’ हे नाव आणि त्यासोबत कॉड्राय सूट आणि काळ्यापांढऱ्या चौकडींची ट्विड-कॅप घातलेल्या चिकण्या देव आनंदचं पोस्टर झळकलं आणि सिनेमा पंडितांची उत्सुकता चाळवली गेली. पहिल्या खेळापासून ‘ज्वेल थीफ’ हाऊसफुल्ल झाला! आणि गंमत म्हणजे हा सिनेमा पहिल्यांदा पाहिल्याबरोबर दुसऱ्यांदा पाहण्याची तीव्र इच्छा होते. दुसऱ्यांदा पाहताच आपल्याला सारं समजतं पण, ‘कुठे तरी सुटं टोक मिळेल – लूझ एन्ड मिळेल. कथेची इतकी विश्वसनीय मांडणी कशी? इतका वेग कसा? कुठे तरी काही तरी नक्की सुटलं असणार विजय आनंदच्या हातून,’ असा विचार कुरतडत राहतो आणि मग खरा रसिक ‘ज्वेल थीफ’ तिसऱ्यांदा पाहतो. पण विजय आनंदच्या हातून काहीही सुटलेलं नसतं! विजय आनंद कधीच चुकत नसतो!!

लेखन हा कुठल्याही सिनेमाचा आत्मा असतो. त्यातही पटकथेची गुंफण खरी महत्त्वाची. विजय आनंद या कामातला नामांकित क्राफ्ट्समन..! म्हणूनच आजही त्याची ‘जॉनी मेरा नाम’ची स्क्रिप्ट विद्यार्थ्यांना, ‘पटकथा कशी असावी’ हे सांगण्यासाठी शिकवली जाते. ‘ज्वेल थीफ’ची त्यानं विणलेली पटकथा म्हणजे गाठी-गाठींचं डिझाईन आहे. त्यातली एकही गाठ हलत नाही, आपली जागा सोडत नाही…आणि तरीही त्याची नक्षी नजरबंदी करणारी. जेव्हा सिनेमा संपतो आणि एकूण एक गाठ उकललेली असते, तेव्हा आपल्याला अचानक जाणवतं की, अरे, टेबलक्लॉथचा गालिचा झालेला आहे! तसाच रंगीत, तसाच सुंदर आणि गाठी उकलल्यामुळे त्यात आलेला मऊ मुलायमपणा!

मुंबईच्या पोलिस कमिश्नर (नासिर हुसेन) चा विनय (देव आनंद) नावाचा मुलगा. बापाच्या मते तो कुचकामी असतो, कारण तो काहीही कामधंदा करत नाही. त्यामुळे बाप परेशान. शिवाय देशभरात मोठमोठय़ा हिरेचोऱ्या करणारा ‘ज्वेल थीफ’ मुंबईत आलेला आहे, त्याचंही टेन्शन आहेच कमिश्नरला. इथे विनयला वेड आहे, रत्नांचं..! हिरे-माणिक, पाचू-मोत्याचं! जेवढं वेड आहे, तेवढीच पारखही आहे. त्याला सेठ विशंभरदास (सप्रू) नावाच्या एका मोठय़ा जवाहिऱ्याच्या शो रुममधे जेमालॉजिस्ट म्हणून नोकरी मिळते. सेठची बालिश मुलगी अंजू (तनुजा) विनयच्या प्रेमात पडते. अनेक ठिकाणी फिरताना योगायोगानं कित्येकजण विनयला ‘अमर’ समजतात. त्याच सुमारास सेठ विशंभरदासकडे त्याचा लहानपणीचा मित्र आपल्या धाकटय़ा बहिणीसह येतो. ही बहीण म्हणजे शालू (वैजयंतीमाला). सेठ विशंभरदासच्या घरच्याच एका पार्टीत ही शालू विनयला पाहते आणि रडायलाच लागते. कारण तीही त्याला अमर समजते आणि कहर म्हणजे तो अमर या शालूचा मंगेतर असतो. हिंदी सिनेमाची हिरॉईन कधीच खोटं बोलत नाही हे आपल्याला पक्कं माहीत असल्यामुळे आपल्याला खात्री पटते की, हा अमरच. शालूचा मोठा भाऊ तर जाम संतापतो.

  इथे हा कानीकपाळी ओरडून सांगत असतो की मी अमर नाही, माझं नाव विनय आहे. शेवटी शालूच्या भावाला आठवतं की अमरच्या उजव्या पायाला सहा बोटं होती. विनयवर बूट काढून पाय दाखवण्याचा दबाव येतो, तो काही बधत नाही सुरुवातीला. हा अमरच आहे अशी जेव्हा प्रेक्षकांची पक्की खात्री पटते तेव्हा तो बूट काढतो आणि त्याला सहा बोटं नसल्याचं कळतं. मग सगळे त्याची माफी मागतात, शालूचा भाऊ तर बिचारा फारच खजिल होतो. पहिला सस्पेन्स फुस्स झाला म्हणून प्रेक्षकांचीही फजिती होते. एक कोणीतरी अमर नावाचा अत्यंत हरामखोर माणूस आपल्या हिरोसारखा दिसतो, एवढं नक्की होतं. पण या गोंधळात शालू आणि विनय प्रेमात पडतात आणि आपले तिकिटाचे पैसे वसूल व्हायला लागतात. प्रेक्षक खुर्चीला बऱ्यापैकी चिकटला याची खात्री झाल्यावर दिग्दर्शक त्याच्यासमोर आणखी एक तुकडा फेकतो. त्यानुसार, तो बदमाष, बदफैली, अमरच खरा ‘ज्वेल थीफ’ आहे आणि तो हुबेहूब विनयसारखा दिसत असल्यामुळे विनय बनूनच हिरेचोरी करत असतो. झालं! आता कमिश्नर बाप आपल्या मुलाचीच मदत घेतो आणि… अख्खी स्टोरी सांगायची काय? मग सस्पेन्स काय राहिला? जरा बघा तो ‘ज्वेल थीफ!’ मजा घ्या त्याची आणि…

‘अमर’ नावाचा कुणी नसतोच, ते काल्पनिक पात्र असते…. हे कळल्यावर कसं वाटतं ते अनुभवा! खऱ्या ‘ज्वेल थीफ’नं पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी उभं केलेलं काल्पनिक पात्र असतं ते! हा खरा ‘ज्वेल थीफ’ सगळ्यांना पुरुन उरणारा असतो. पोलिस मारे विनयला त्या ‘ज्वेल थीफ’च्या अड्डय़ावर पाठवतात. तो पोचतो तिथे. पोलिस भ्रमात की आपण ‘ज्वेल थीफ’ला गंडवतोय. खरं तर ‘ज्वेल थीफ’ या सगळ्यांना माती चारत असतो. तो आणि त्याची माणसं गंडवले गेल्याचा अभिनय करत असतात आणि ते प्रेक्षकांना कळत असतं! पटकन सिनेमा संपावा, असं एका मनाला वाटत असतं… हा सिनेमा कधी संपूच नये, असं दुसऱ्या मनाला वाटत असतं…!! खरा ‘ज्वेल थीफ’कोण आहे हे रहस्य विजय आनंदने इतक्या कौशल्यानं लपवलंय आणि इतक्या अचूक वेळी सहजपणे प्रेक्षकांच्या समोर आणलंय की त्या ‘सहजपणाचा’च धक्का बसतो. ‘हा खरा ज्वेल थीफ? कसं शक्य आहे?’ आता इतक्या वर्षानंतर, फक्त याददाश्तवर दारोमदार ठेऊन लिहितांनाही भीतीचा शहारा आला.. खरा गुन्हेगार कळल्यावर एक अत्यंत तीव्र इच्छा होते, आत्ताच्या आत्ता हा सिनेमा इथे थांबवावा आणि पुन्हा पहिल्यापासून नीट पाहावा. कळलं कसं नाही आपल्याला? पण मग आणखीन धक्के असतातच. आणि ते सगळे इतके अफलातून, इतके सनसनाटी आणि बेमालूम की आपली बोबडीच वळते. ‘अरेच्चा, हे असं होतं?’ ‘…बाप रे, असं केलंय होय यानं?’ ‘…तरीच म्हंटलं ही अशी काय वागते!’… असे सगळे आपल्याच आधीच्या अंदाजांना मोडीत काढणारे आपल्या मनात यायला लागते. पुरेपूर पैसा वसूल!

देव आनंदनं यातला विनय आणि नंतरचा अमर मस्त रंगवलाय. खरं तर तो ‘ज्वेल थीफ’च्या वेळी पंचेचाळिशीच्या पलीकडे होता. मुळात देव अतिशय देखणा! ‘ज्वेल थीफ’मधे तो शोभून दिसला. नव्हे, त्या ‘ज्वेल थीफ’च्या वेषात तो चिकणा दिसला. (यातल्याच ‘बैठे हैं क्यूं उसके पास’ या गाण्यात एक ओळ आहे, मुख्य म्हणजे ती हेलनच्या तोंडी आहे – ‘हम से भी ख़ूबसूरत तुम हो, हम भी क्या करें..!’ रसिकांनी या ओळीचा शब्दशः अर्थ घ्यावा म्हणजे देव आनंद यात ‘कसला’ दिसलाय ते लक्षात येईल!) त्याच्यामुळेच काळ्यापांढऱ्या चौकडीच्या ट्विड कॅपला ‘ज्वेल थीफ कॅप’ हे नाव पडलं. अशोक कुमारच्या अभिनयाबद्दल नव्यानं काही सांगायला नको आहे. तो त्याच्या समकालीनांचा बाप होता! वैजयंतीमालानंही यात चांगलं काम केलंय, मस्त साड्या नेसून. लाल साडीवर पांढऱ्या कापसाचे पुंजके तर गजबचे दिसले.

तनुजासाठी वेगळाच पॅराग्राफ उघडायला पाहिजे. बालिश आणि निरागस पण देखणी आणि मादक अशी ‘अंजू’ तिनं तब्येतीनं उभी केलीय. विनयवर एकतर्फी प्रेम करणारी ही अंजू म्हणजे या सिनेमातलं एक भाबडं तरी मदमस्त असं प्रकरण. ‘रात अकेली है, बुझ गये दिये’ या गाण्यात तिनं जो काही दंगा केलाय ना तो तिच्या देहबोलीतल्या निरागसपणामुळे आणि शरीराच्या सुबक वळणवेलांट्यांमुळे अत्यंत दिलखेचक झालेला आहे. या एका गाण्यासाठी पण ‘ज्वेल थीफ’ पुन्हा-पुन्हा बघायला हरकत नाही! या गाण्यातला ‘जो भी चाहे कहिये’ हा तारस्वरातला तुकडा बघावा की ऐकावा हे ठरतच नाही. (या गाण्याच्या बाबतीत ‘बघणे’ आणि ‘ऐकणे’ या दोन क्रिया एकसाथ करता येत नाहीत. कारण गाणारी आशाबाई, तिनंही खासा दंगाच घातलाय.)

‘ज्वेल थीफ’चं संगीत बेहद्द लोकप्रिय झालं होतं. किशोर आणि लताचं ‘आसमां के नीचे’ आणि रफी, लताचं ‘दिल पुकारे आ रे, आ रे, आ रे’ ही दोन्ही प्रणयगीतं आजच्या पीढीलाही माहीत आहेत. पहाडी रागातलं ‘रुलाके गया सपना मेरा’ हे स्व. शैलेंद्र यांचं शेवटचं गाणं. (बाकीची गाणी मजरुहनं लिहिली.) या गाण्यात पाश्चिमात्य वाद्यं आणि देशी सुरावटीचं इतकं अप्रतिम मिश्रण आहे की, लतानं ‘वोही है ग़मेदिल, वोही है चंदा तारे’नंतर ‘हा़य’ केलं की आपल्याही काळजात कळ उठते. ‘ये दिल ना होता बेचारा’ आणि ‘रात अकेली है, बुझ गये दिये’ बद्दल झालंय बोलून. आशाबाईन गायलेलं एक क्लब डान्सचं गाणंही आहे यात – ‘बैठे हैं क्यूं उसके पास..!’ या गाण्याची खासियत एकच. यावर हेलन नाचलीये. अर्ध्या गाण्यात हेलन टेबलवर आणि कॅमेरा खाली, खतरनाक अँगल. तिचा लाल रंगाचा तंग, तोकडा आणि पारदर्शक पोशाख – ‘आत्ता सुटेल की आत्ता फाटेल,’ असं वाटायला लावणारा! या सगळ्या ऐवजामुळे गाणं ‘ऐकू’च येत नाही! नुसतं ‘दिसतं’च राहतं.. अति रसिक असाल तर स्वप्नंही पडतात या गाण्याची..

‘ज्वेल थीफ’मधलं तजेलदार माणकासारखं गाणं म्हणजे ‘होटों में ऐसी बात मैं दबा के चली आयी!’ लाल-काळ्या कपडय़ातली शालू, तिचे चमचमणारे दागिने, लखलखणारं रुप आणि लाल, हिरव्या, निळ्या, पिवळ्या घाघऱयांच्या त्या समूहनृत्यातल्या चकरा! सिक्किमच्या राजदरबारातले भीतीदायक मुखवटे आणि त्यातून तिला दिलासा देणारं विनयचं, ‘ओsss… शालू!’ बी. सोहनलाल यांनी बसवलेल्या या नृत्याला अजून तरी तोड नाही मिळालेली. तीस आणि चाळीस सेकंदांचे एक-एक शॉट. खायचं काम नसतं ते. केवढी कठीण आहे ही गोष्ट हे समजायला जाणकारच हवा. दोन-चार सेकंदांचं शॉटकटिंग असलेली गाणी मामूली वाटतात या गाण्यासमोर! हे गाणं ‘ज्वेल थीफ’चा कळस आहे आणि ते कळसदृश्यातच आहे.

दहा मिनिटांचं गाणं! यानंतरच ‘ज्वेल थीफ’ पकडला जातो. अर्थात बहुत धावपळ आणि जद्दोजहद होतेच. पण शेवटी तो पकडला जातो, त्याच्या साथीदारांसह! पळून जाण्यासाठी ठेवलेल्या त्याच्या विमानातच पोलिस त्याला जेरबंद करतात. देव आनंद पडद्यावर अवतरतो. आणि आपल्याला सांगतो – ‘एक था ‘जूsssल थीफ!’ विमान उडतं, आपणही त्या विमानासारखेच आनंदाने पिसाहून हलके, प्रसन्न झालेले असतो. इतका बिनचूक आणि तरीही इतका देखणा सिनेमा फार कमी पाहायला मिळतो.

कधी-कधी वाटतं, काही क्षणांसाठी विजय आनंद परत यावा, आपण त्याच्या कोटावर एक फूल लावावं आणि त्याला सांगावं, ‘‘बाबा रे, ‘एक था ‘जूsssल थीफ’च्या चालीवर ‘एक था विजय आनंद’ असं म्हणण्याची वेळ आमच्यावर आणलीस खरी.. पण मित्रा, ‘कदम के निशां’ बनवूनच गेलायस रे तू…!’’

(मिथिला सुभाष या नामवंत पटकथाकार व संवाद लेखिका आहेत)