सिद्धार्थ आणि यशोधरा दोघांचाही जन्म एकाच दिवशी.इ.स.पू. ५६३ वैशाख पौर्णिमेचा.
आज सारं जग बुद्धजयंती साजरी करीत असतांनाच यशोधरा ( अर्हत भद्दा कच्चना) यांच्याही जयंतीचे स्मरण असणे आवश्यक वाटते.
-प्रा.प्रसेनजित एस तेलंग
इ.स. पू. ५६३ चा वैशाख वणवा आपल्या लसलसत्या जिव्हांनी या धरेच्या मोठ्या भागावर ज्वाळांचे फुत्कार सोडून हैराण करीत होता. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या शाक्यांची नगरी ‘कपिलवस्तू’ आणि कोलीयांची ‘रामग्राम’ ही राज्य रोहिणी नदीच्या पात्राच्या सीमेने खंडीत झाले होते. शितल लहरींनी ह्या दोनही राज्यांत मात्र आल्हाददायक वाऱ्याची झुळझुळ नेहमीप्रमाणे अजूनही सुरूच होती. कलेकलेने वाढणाऱ्या चंद्र प्रकाशात शाक्य राजा ‘शुद्धोधन’ आणि कोलीय राजा ‘दंडपाणी’ यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि चिंतेची आभा ठळकपणे प्रगटायला लागली होती. कारण दोनही राज्यांतील राण्या गर्भवती होत्या. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी राणी महामायाच्या पोटी कपिलवस्तूला ‘पुत्ररत्न’ आणि कोलीय राज्यात राणी पमिताच्या पोटी ‘कन्यारत्न’ प्राप्त झाले होते. त्यामुळे दोनही राज्यांना विभागणाऱ्या रोहिणीच्या पात्रातून आनंदाचे चांदणे ओसंडून वाहू लागले होते. हळुहळू कपिलवस्तूचा प्रासाद सिद्धार्थाच्या बोबड्या बोलांनी व दुडुदुडु धावणाऱ्या पावलांनी गजबजून जावू लागला. आपली जन्मदात्री आई आपल्याला केवळ सातव्या दिवशीच सोडून गेली ह्याची जाणीव त्याची मावशी महाप्रजापतीने त्याला कधी होऊच दिली नाही. तर तिकडे सर्वांची लाडकी गोपा (यशोधरा) आपल्या अवखळ लीलांनी रामग्रामच्या महालाला निझर्राच्या खळाळणाऱ्या लयीत झुलवत होती.
हळुहळू दोघांचेही शिक्षण सुरू झाले. ही मुलं इतर सामान्यांसारखी नसल्याचं त्यांच्या वर्तनातून दिसायला लागले. शाक्यांमध्ये पेरणीच्या समयी वप्रमंगल हा उत्सव करीत. यावेळी प्रत्येक शाक्यकुलीनाला हातात नांगर धरावा लागे. शस्त्र हातात धरतांना मणामणाचं ओझं उचलतोय असा भाव चेहऱ्यावर आणणारा सिद्धार्थ या प्रसंगी मात्र भूमीला मनोभावे स्पर्श करून नांगर हातात धरायचा. कपाळावर मोत्यांची माळ लखलखेपर्यंत नांगर हाकतांना एकाग्र व्हायचा. यावेळी अंगातून निथळणाऱ्या स्वेदगंगेने तो बहरून आल्यासारखा वाटायचा. एरवी पण कधी शेतात, कधी पहाटवाऱ्यात चिवचिवणाऱ्या झाडांखाली, कधी थबथबणाऱ्या ओल्याशार चांदण्यांखाली तर कधी रातकिड्यांच्या किर्रss साक्षीने तो असाच एकांती मनमोराचा पिसारा उमलवून बसायचा. त्याची आत्ममग्नता दिवसेंदिवस चिवट मेनासारखी गडद व्हायला लागली होती. त्याचे मन करूणेच्या रिमझिम धारांत न्हावून निघत होते. सभोवताल लोभांध वणव्यांत होरपळणारे जीव पाहून तो बेचैन व्हायला लागला. सिद्धार्थाच्या मनातील ही बेचैनी राजा शुद्धोधनाच्या मनाला चिंतेच्या डंखाने घायाळ करीत होती. तारूण्याच्या उंबरठयावर उभा ठाकलेला सिद्धार्थ रणांगण, तलवारबाजी, नृत्य,गाणं, यौवनाने मुसमुसणाऱ्या ललनांत रमायचे सोडून एखाद्या आध्यात्मिक मुनीच्या थाटात चर्चा-युक्तीवाद करायचा, तासंतास ध्यानस्थ बसायचा. सिद्धार्थाच्या ह्या अश्या वर्तनाने सर्व कपिलवस्तूच्या राजमहालावर चिंतेचे जाळे दाट होत चालले होते. भविष्याच्या अंध:काराची एक थंड धारदार आणि तिक्ष्ण सुरी आपल्या काळजाच्या आसपास वावरते आहे असे शुद्धोधनाला वाटत होते. दिवसेंदिवस सिद्धार्थाच्या भविष्याचा काळजीचा भुंगा राजाचे मन आतल्या आत पोखरत चालला होता.
तिकडे गोपाची तऱ्हाही न्यारीच. सर्वांगाने बहरून येवू लागलेली यशोधरा दागदागीणे,नटण्या-थटण्यापेक्षा ही राजकन्या आजूबाजूच्या गोरगरीबांच्या वस्त्यांत जावून त्यांची सेवा करण्यात रमत होती. अनाथांना पोटाला अन्न दे, दारोदार फिरणाऱ्या लहान लहान मुलांना न्हाऊमाखू घाल, त्यांच्यासोबत खेळ अश्या कामांत तिच्या मनाला आल्हाद मिळत होता. एकदा सिद्धार्थ आपला सारथी छन्नाला सोबत घेऊन दूरच्या गावात भटकंतीला निघाला. मोडक्या तोडक्या खोपटांच्या वस्तीच्या चेहऱ्यावरून अगतिकता थेंबाथेंबाने ठिबकत होती. दु:ख,दारिद्रय, अज्ञान वस्तीतून ओसंडून वाहात होतं. हे पाहतांना वेदनेची सल सिद्धार्थाच्या मनाला असह्य करीत होती. ही सल उरात जपत त्या वस्तीतून भटकत असतांना त्याची नजर यशोधरेवर पडली. लहान लहान गरीब मुलांच्या गोतावळ्यात ती रमलेली होती. तिच्या उपस्थितीने त्या अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाची फुलपाखरं भिरभिरत होती. यशोधरेच्या नादमधुर किणकिणनाऱ्या आवाजाला मुलं ओसंडणाऱ्या झऱ्याप्रमाणे प्रतिसाद देत होती. शाल्व वृक्षाच्या फाटक्या सावलीत त्या मुलांना घेऊन बसलेल्या यशोधरेच्या गोऱ्यापान चेहऱ्यावर उन्हाचा एक कोवळा कवडसा रेंगाळत होता. तिच्या धारदार सरळ नाकाची रेषा प्रकाश स्पर्शाने चकाकत होती. भालप्रदेशावरील कुरळे कुंतल सोनेरी किरणांनी मोठे मोहक वाटत होते. यशोधरेला अश्या वस्तीत अनाथ मुलांत रमलेले तो प्रथमच पाहात होता. बऱ्याच वर्षांपासून ओळखत असूनही ही आपणास किती अनभिज्ञ आहे, ह्या जाणिवेने सिद्धार्थाला कसेसेच झाले. अधिक चौकशी केली तेव्हा, यशोधरा गत काही वर्षांपासून अधून मधून या वस्तीत येवून, येथील गोरगरीब लोकांच्या, रूग्णांच्या, येथील आईबापाविना मुलांच्या सेवेत रमते असे माहित झाले. यशोधरा शुद्धोधनाची बहीण पमितेची मुलगी. सिद्धार्थाच्या रंध्रारंध्रात पेरलेल्या मानवी जीवनाबद्धलची अपार मेत्ता भावनेची बीजं त्याच्या भवतालाला सुगंधित करीत होती. शेजारी उभ्या असलेल्या सिद्धार्थाच्या या बेधुंद करणाऱ्या गंधाने यशोधरा देहभान हरपून गेली आणि सिद्धार्थही यशोधरेच्या नजरेतून त्या फाटक्या मुलांप्रती ओसंडून वाहणाऱ्या वात्सल्य भावाने मोहरून गेला होता. यावेळी दोघांचेही वय सोळा वर्षांचे होते.
कोलीय राजा दंदपाणी संन्यस्त वृत्तीच्या सिद्धार्थाशी आपल्या मुलीचा विवाह करण्यास ठाम विरोधात होता. पमिता मात्र सिद्धार्थासाठी आपल्या गोपाचे तीळतीळ तुटणारे मन पाहात होती. इकडे शुद्धोधन राजाला सिद्धार्थाचा यशोधरेसारख्या सुंदर, सालस, समजुतदार आणि बौद्धिक दृष्टीने परिपक्व असलेल्या आणि सिद्धार्थाच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या मुलीशी विवाह झाल्यास तो संसारात रमेल आणि कपिलवस्तूचा सक्षम उत्तराधिकारी ठरेल असे वाटत होते. यशोधरा ‘विवाह करायचा तर सिद्धार्थाशीच !’ या निर्णयावर ठाम होती. महाराज दंडपाणीने स्वयंवराची शक्कल लढविली. शस्त्र अस्त्रांत अजिबात रस नसलेला सिद्धार्थ जिंकूच शकणार नाही अशा धनुर्विद्या परीक्षेचे स्वयंवरात आयोजन करण्यात आले. आपल्या मातापित्याच्या स्वाभिमानाला धक्का लागू नये व यशोधरेच्या मनाला आघात पोहोचू नये म्हणून अगदी शेवटी अनिच्छेने सिद्धार्थ स्वयंवरात उतरला आणि विजय यशोधरेच्या मनोनिग्रहाचा म्हणजे सिद्धार्थचाच झाला. खरं तर सिद्धार्थाचा मनातील शस्त्र अस्त्रांचा तिटकारा म्हणजे हिंसेच्या दलदलीत फुलणाऱ्या वैराच्या ताटव्यांबद्दल वाटणारी घृणा होती. हिंसेतून ठिबकत राहणारे रक्त तेजाबाप्रमाणे मानवी मन जाळत नेते. म्हणूनच सर्व प्राणीमात्रांविषयी दयाभावाने आपले ह्रदय थबथब ओथंबून असावे, ह्यावर सिद्धार्थाचा ठाम विश्वास होता. आणि यशोधरेचाही. आता करूणेचे दोन झरे विवाहाने एकमेकांत मिसळून एकजीव झालेत.
सिद्धार्थ यशोधरेच्या वैवाहिक जीवनाला प्रारंभ झाला. ते एकमेकांत रमू लागले. सिद्धार्थाला आता त्याला समजू शकणारी, जगाच्या दु:खाने विव्हळणाऱ्या त्याच्या मनाची स्पंदने टिपू शकणारी संगिणी मिळाली होती. यशोधरा हे सारे सहज जाणू शकत होती, कारण तिचीही मनोधारणा सिद्धार्थापेक्षा काही फार वेगळी नव्हती. दोघांच्याही ह्रदयातून झंकारणाऱ्या तारा एकाच नादलयीत तरंगत राहायच्या. सिद्धार्थाची ध्यान धारणा, विविध विद्वत जनांशी त्याच्या चालणाऱ्या चर्चा यात ती नकळत सहभागी होऊ लागली. तिने आपले समाजसेवेचे कार्य पुन्हा एकदा सुरू केले. यशोधरेच्या या कार्याला सिद्धार्थाचे मन:पूर्वक प्रोत्साहन आणि सदिच्छा होत्या.
विसाव्या वर्षी तो शाक्य संघाचा सभासद झाला. आता तो राज्यकारभाराच्या चर्चांतही रमायला लागला. शाक्यांच्या राज्यकारभाराला मानवी कल्याणाची लखलखित किनार असावी ह्या दृष्टीने तो सजग असायचा. पुढे सात आठ वर्षे हे सुरळीत चाललेले असतांना रोहिणीच्या नदीच्या पाणी वाटपाच्या प्रश्नावरून शाक्य-कोलीय संघर्ष पेटला. कोलियांसोबत युद्धाचा निर्णय घेण्यात आला. युद्धात हिंसेशिवाय काहीच निष्पन्न होणार नाही, वैराने केवळ वैराचाच अग्नी पेटत राहील, त्यामुळे शाक्य संधाच्या निर्णयाचा सिद्धार्थाने ठासून विरोध नोंदविला. बहुमत युद्धाच्या बाजूने गेल्याने शाक्य संघाच्या परंपरेनुसार, संघाच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या सिद्धार्थाला देहदंड वा गृहत्याग अशी संघाने शिक्षा सुनावली. शाक्य संधाचा निर्णय शुद्धोधनाच्या राजमहालापर्यंत पोहोचला आणि प्रासादाच्या भिंतीची कोपरा न् कोपरा याने थरारून उठला. क्रूर हिंसेचे तांडव घालणाऱ्या युद्धाविरोधात ठाम नकाररात्मक भूमिका घेणाऱ्या सिद्धार्थाबद्धल यशोधरेचा माथा अभिमानाने उन्नत झाला. एकीकडे आपल्या पतीबद्दलचा अभिमान तिच्या नजरेतून ओसंडून वाहात होता, तर दुसरीकडे सिद्धार्थाने गृहत्यागाचा निर्णय मान्य केल्याचे ऐकून तिला सिद्धार्थाविना आपल्या भविष्यकाळाळाला वेढणाऱ्या तप्त किनारीच्या कल्पनेने तिचे मन गदगदून आले होते. लहानग्या राहुलला कवटाळून मोठ्याने हंबरडा फोडावासा तिला वाटत होता. विवाहाच्या तेरा वर्षानंतर त्यांच्या जीवनवेलीवर राहूल नावाचे नाजुक फूल उमलले होते. याच वेळी सिद्धार्थाने प्रवज्या(संन्यास)धारण करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात सिद्धार्थाने यशोधरेशी विचारविनिमय केल्यानंतर यशोधरा सिद्धार्थाच्या निर्णयाच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. गृहत्याग करून सिद्धार्थ मानवी जीवनाला दु:खमुक्त करणारा विचार शोधण्याच्या पथावर आरूढ होत आहे आणि त्या महान कार्यात आपण सहभागी होत असल्याची जाणीव निश्चितच यावेळी यशोधरेला होती. आसवांचा बांध थोपवूनच सिद्धार्थाला निरोप द्यायची तयारी तिने केली.
वयाच्या एकोणतीस ते पस्तीस अशी सहा वर्ष सिद्धार्थाचा बुद्धत्वाचा अखंड प्रवास सुरू होता. भृगूरृषी, आलारकलाम, उदकरामपुत्त यांसारख्या विद्वत आचार्यांपासून ज्ञान ग्रहण करीत, चर्चा करीत, ध्यान- धारणा, तपस्या, अखंड चिंतन यांतूनच त्यांना मानवी कल्याणाचा मार्ग गवसला. सिद्धार्थ हे ‘सम्यक संबुद्ध’ झालेत. तृष्णेचा पाठलाग हेच मानवी मनाच्या यातनांचं कोठार आहे हे त्यांना गवसले. इकडे सिद्धार्थाच्या अनुपस्थितीच्या काळात यशोधरा पुरेपुर मन:पूर्वक सिद्धार्थमय झाली होती. तिने घरातल्या घरात संन्यस्त जीवन स्वीकारले. विटकरी रंगांचे वस्त्र परिधान करून, अलंकारांचा त्याग करून आपल्या भरजरी जगण्याचा त्याग केला. पुत्र राहूल ,सासरे शुद्धोधन आणि सासू महाप्रजापती यांना खंबीरपणाने आधार दिला.
पुढे सात वर्षानंतर सिद्धार्थ ‘बुद्ध’ होऊन कपिलवस्तू नगरीत आले तेव्हा, स्वत: ती आपल्या पतीला भेटायला न जाता मानीनी होऊन त्यांनी आपल्याला भेटायला यावे यासाठी अडून बसली. आपणही ह्या काळात यातनांचा मोठा प्रवास केला आहे, हेच ती आपल्या पतीला जाणवून देऊ इच्छित होती. जगत् कल्यानाचा विचार देणाऱ्या आपल्या पतीबद्दल यशोधरेला अभिमान होताच. पण या कार्यासाठी आपणही मेणबत्तीसारखे अखंड जळत राहिलो आहे, हेच तिला सांगायचे होते. खरं तर बुद्धालाही यशोधरेच्या त्यागाची पुरेपुर कल्पना होती. तिच्या परवानग शिवाय आपण प्रवज्या धारण करू शकलो नसतो आणि पुढचा सिद्धा्र्थ ते बुद्घ हा अत्यंत कष्टप्रद प्रवास चिंतामुक्त होऊच शकला नसता, ह्याची त्यांना जाणीव होती.
याच वेळी यशोधरेने राहूलला आपल्या वडिलांना आपला दायाद (वारसा)मागण्यास प्रेरित केले.
बुद्धाजवळ वारसा तो काय असणार? ‘धम्म पथ’ हाच त्यांचा वारसा. शेवटी त्या लहानग्या राहुलला प्रवर्जित करून बुद्धाने त्याला आपल्या संघात दाखल करून घेतले. मानवी कल्याणाच्या विचारांच्या प्रसारासाठी आपल्या काळजाचा तुकडा वयाच्या अवध्या सातव्या वर्षी यशोधरेने दान केला. प्रथम पती आणि आता आपलाच अवयव असलेला कोवळा राहुल संघकार्यासाठी दान देतांना यशोधरेला धम्मकार्याचे महत्त्व पुरेपुर कळले होते. समग्र मानवी जीवनाची अज्ञानामुळे होणारी होरपळ थांबविण्याचा धम्म हाच एक मार्ग आहे ह्यावर ती ठाम झाली होती. पुढील काळात शुद्धोधनाच्या मृत्यूनंतर महाप्रजापती गौतमीने संघात स्रियांना प्रवेश द्यावा यासाठी आग्रह धरला. महाप्रजापतीच्या पाठीमागे संघप्रवेशासाठी यशोधरा मोठी अधीर झाली होती. आपल्या पतीच्या या महान कार्यात आपण मन:पूर्वक सहभागी असावे, आपणही प्रवर्जित(संन्यस्त) होऊन धम्म विचारांच्या प्रसारातील आधारशिला व्हावं असं तिला मनोमन वाटत होतं. अनाचार आणि लोकनिंदेची भिती यामुळे प्रारंभी खळखळ करणाऱ्या तथागतांनी शेवटी भंते आनंदच्या यशस्वी शिष्टाईनंतर काही अटी घालून स्त्रियांना संघप्रवेशाचा मार्ग मोकळा केला. सिद्धार्थाचा सांभाळ करणारी महाप्रजापती आणि पत्नी यशोधरा प्रवर्जित होऊन इतर पाचशे भिक्षूणींसहित संघात त्या दाखल झाल्या.
यशोधरा आता भद्दा कच्चाना झाली. संघात आपल्या ज्ञान आणि कार्याप्रतीच्या अपरिमित निष्ठेने ‘अभिज्ञालाभिनी भिक्षूणिश्राविकांत श्रेष्ठ ‘ अशी आपली ओळख निर्माण केली. ती अर्हत पदापर्यंत पोहोचली. आता गात्र न् गात्र पार थकून गेले होते. आयुष्याची अठ्याहत्तर वर्षे अलगद घरंगळून गेल्यासारखी वाटत होती. आपण तथाकथित भरजरी जगण्याचा त्याग केल्याने आणि सम्यक संबुद्धाच्या मार्गातील शेवटपर्यंत सहपथिक राहिल्याचे समाधान भद्दा कच्चनाच्या चेहऱ्यावर आकाशात फुललेल्या चंद्रप्रकाशात ठळकपणे दिसून येत होते. आपल्या श्वासाचे काहीच थेंब शिल्लक असल्याची जाणीव तिला झाली होती. ती बऱ्याच भिक्षुणींना घेऊन तथागतांजवळ आली. भद्दा कच्चानाचा अंतिम समय जवळ आल्याचे तथागताने जाणले. आपले थरथरते हात जोडत ती तथागतांना म्हणाली, “ आता मी तुम्हाला सोडून जाणार आहे. आपण दिलेल्या धम्म मार्गामुळे मला माझे निब्बाण माझ्या जिवंतपणीच अनुभवायला मिळाले आहे. या संसारात जर माझ्याकडून तुमचा काही अपराध झाला असेल तर क्षमा करा.” तथागतांच्या चेहऱ्यावर समाधानाचे तेज फाकले होते. भद्दा कच्चनाचा चेहराही आनंदभावनेने अधिक प्रफुल्लीत व तेजस्वी वाटत होता. श्वासाची लय मंद होत होत शेवटी निखळून पडली. गोपा-यशोधरा- भद्दा कांचना असा अठ्ठ्याहत्तर वर्षांचा प्रदीर्घ प्रवास थांबला होता.
वैशाख पौर्णिमेच्या एकाच दिवशी सिद्धार्थ आणि यशोधरा या घरेवर अवतीर्ण झालेत. मानवी जीवनाच्या वैशाख वणव्यात सिद्धार्थावर चंद्रकिरणांची सतत रिमझीम बरसात करणारी यशोधरा उर्फ भद्दा कच्चाना तथागतांच्या दोन वर्षाअगोदर मृत्यूच्या अपरिहार्य ग्रहणाने ग्रासल्या गेली. यशोधरा नावाची चंद्रकळा कायमसाठी अंधारात लोप पावली.
(पूर्वप्रसिद्धी-‘आकांक्षा’ दिवाळी अंक २०२०)
प्रा. तेलंग हे नामवंत कवी व समीक्षक आहेत
9960910240