शर्विलचे स्क्रीन ऍडिक्शन तोडताना…

-डॉ. शीतल आमटे

माझा सहा वर्षांचा मुलगा शर्विल करजगी लहानपणापासून अतिशय सृजनशील आहे. खोडकर पण सुस्वभावी, कोणाला त्रास देणार नाही, नेहमी सर्वांना मदत करणारा आणि आईवडिलांना समजून घेणारा असा आहे. तसा तो व्हावा यासाठी आम्ही बरेच प्रयोगही केले. त्याला लहानपणापासून खूप मुक्त वातावरणात वाढविले. मेंदूच्या वाढीसाठी आवश्यक ते खेळ आणून दिले. मातीत खेळू दिले आणि मुख्य म्हणजे त्याचे वय न बघता वेगवेगळी माध्यमे त्याला हाताळायला दिली. यात acrylic रंग, कॅनव्हास, चिखल, झाडांची पाने, फुले, धान्ये अशी वेगवेगळी माध्यमे देऊन त्यांच्यातून स्वतःचे खेळ बनवायला प्रोत्साहित केले. तीन वर्षाच्या वयात त्याला 8 तुकड्यांचे एक पझल दिले, तिथपासून त्याने जो वेग पकडला की आज तो 9 वर्षांच्या मुलाने केली पाहिजेत अशी 300 तुकड्यांची पझल्स सहज करतो. एका जागी चिकाटीने तासनतास बसून पझल्स करणे हा जणू त्याचा छंदच बनला.

तो जात्याच अत्यंत हुशार आणि संवेदनशील आहे. त्याची रंगांची जाण आणि अवकाशीय ( spatial) प्रतिभा वेगळीच आहे. अगदी दीड वर्षांपासून सुंदर सुंदर abstracts आणि acrylic paintings करतो. पहिल्यांदा हातात ब्रश आणि कॅनव्हास दिला तेव्हा अंगाला लावून घेण्यापासून आज एक प्रसिद्ध छोटा चित्रकार म्हणून त्याची महाराष्ट्रात ओळख आहे.

डायनोसार आणि समुद्राचा तर तो चालता बोलता encyclopedia आहे. एक विषय घेतला की खोलात नेऊन संपवायचा यावर त्याचे लक्ष असते. झाडांवरही त्याचे प्रेम आहे. त्याने आजवर 93 झाडे लावली असल्याने वनखात्याचे सचिव त्याला वनखात्याचा हिरो म्हणतात.

एकंदर माझ्याकडे बरेच लोक ‘आदर्श पालकत्व’ या विषयावर सल्ला मागत असतात. आम्ही देतोही पण आमच्याही चुका होतातच, त्यातून आम्ही वर कसे येतो हे ही विशद करतो. त्याबद्दल मला लिहायचे आहे.

त्यापैकी एक मोठी चूक म्हणजे त्याला विविध स्क्रीन देणे. त्याला मोठे करण्यात आमची ही खरंच अक्षम्य चूक झाली. आम्ही लहानपणापासून त्याला गाणी शिकवायला मोबाईल देत असू. सुरुवातीला मज्जा वाटे. त्याची बडबडगीते ऐकताना दिवस मस्त जाई. त्यामुळे याचे पुढे भयंकर काही होईल असा अंदाज आला नाही. सुरुवातीला दहा मिनिटांपासून ते पाच वर्षांच्या वयात दिवसाला तीन तीन तास तो TV बघू लागला. सगळे भीतीदायक बघायला त्याला आवडू लागले. Scary शार्क म्हणून एक भीतीदायक series आहे ती त्याची आवडती होती. पुढे Halloween चे भूत आवडू लागले. अर्धा तास, एक तास ठीक होते. मग शाळेतून आल्यावर दप्तर फेकले की TV लावणे ओघानेच आले. हट्ट वाढू लागले.

घरी माझी आणि गौतमची याबद्दल तात्विक भांडणे होत. मला हे आवडत नसे परंतु त्याच्या हट्टापायी गौतम काहीच करू शकत नसे. खरे म्हणजे मी आजूबाजूच्या आणि घरातील सर्वांना कात्रणे पाठविणे, डोळे कसे खराब होतील याबद्दल शास्त्रीय कारणे देणे असेही करून बघितले. पण त्यामुळे काहीच साध्य झाले नाही.

पुढे तर त्याला त्याचे व्यसन लागत गेले. इतके की दररोज न चुकता काहीही खाताना त्याला TV किंवा मोबाईल लागत असे. पाच वर्षांचा झाला तरी स्वतःच्या हाताने खात नसे, कारण खाताना त्याचे लक्षच नसे. त्यामुळे खूपच कमी पदार्थ खाई. बहुतेक त्याचे पाचक रस बाहेर येत नसल्याने त्याला अन्नाची quality आणि quantity कळत नसे. कधीकधी चार चार पोळ्या खाल्ल्या तरी त्याला कळत नसे. कधी एक पोळी खातानाही खूप त्रास. अन्नाकडे लक्षच नसल्याने पंचेंद्रिये साथ देत नव्हती.

डॉ.शीतल आमटे यांचा या विषयातील ABP Mazha या वृत्तवाहिणीवरील Video Blog-नक्की पहा- https://youtu.be/_pPV0RwYH-E

जेवण सोडले तर इतर अनेक बाबतीतही सतत त्याला मोबाईल हवा असे. प्रवासात गुगल मॅप्स, जेवताना पेप्पा पिग, रात्री scary शार्क. चित्र काढणार तर मोबाईल मध्ये पाहून, ओरिगामी करणार असेल तर TV मध्ये बघून. प्रत्येक ठिकाणी विविध स्क्रीन त्याच्या आयुष्याचा भागच बनत गेले.

शाळेतील गृहापाठातील माहिती बघायची, बाकी काहीही करायचे तर त्याला इंटरनेट हवे असे. पुढे ऍमेझॉन वापरायची त्याला सवय लागली. एकदा माझ्या ऍमेझॉन च्या कार्ट मध्ये त्याने 68,000 च्या वस्तू टाकून ठेवल्या होत्या. पुढे एकदा तर क्रेडिट कार्डाच्या OTP पर्यंत पोचला. आम्ही जे स्क्रीनवर करायचो ते लक्षात ठेवून ते तो करीत असे हे आमच्या फार उशीरा लक्षात आले. अमहो दोघेही प्रचंड कामात व्यग्र असल्याने आमच्यापाठी तो काय करतोय हे ही तो कळू देईना.

बाकी सुरुवातीपासूनच तो असा खूप सोशल नाहीच. मित्र एकच होता. परंतु एक लक्षात आले की स्क्रीन वापरायला लागल्यापासून शर्विल सतत distracted असायचा. आम्ही त्याला चष्म्यापासून ते भुतापर्यंत खूप भीती दाखवली पण त्यामुळे तो स्क्रीन सोडत नव्हता. होमवर्क करणे त्याने सोडून दिले होते. हट्टीपणा टोकाला गेला होता. हट्ट म्हणजे टोकाचे होऊ लागले. शर्विल आणि हट्ट हे समीकरणच आमच्याने जुळेना.

वेळोवेळी मी घरातील इतरांना अलर्ट करूनही त्याचे हे वेड जात नव्हते. कारण त्यात माझ्याकडून active प्रयत्न होत नव्हते.

एकदा बालरोगतज्ञ डॉ. समीर दलवाई यांचा एक व्हिडिओ बघण्यात आला. त्यात त्यांनी स्क्रीन आणि नशेच्या पदार्थांची तुलना केली होती. ते बघून मन व्यथित झाले. त्यांना भेटायचे ठरविले. त्यांनीही हो म्हटले आणि आम्ही पुण्यात भेटलो.

त्यांना भेटल्यावर मी ही व्यथा मांडली आणि त्यांनी मला स्क्रीनच्या अतिवापरामुळेमुळे होणाऱ्या Attention Deficit Hyperactivity Disorder बद्दल सांगितलं. त्यांनी मला विचारले की त्याला काय येतेय यापेक्षा तो काय गमावतोय हे तुझ्या लक्षात येतेय का? त्याने किती नवीन मित्र बनविले, तो किती चाणाक्ष आहे, त्याला स्वतःच्या हाताने का जेवता येत नाही आणि का तो सतत हट्ट करतो. यावरून माझे डोळे उघडले. याकडे मी कधी लक्षच दिले नव्हते.

बाकी त्यांनी अनेक अनुभव सांगितले. ते ऐकून मी ठरवले की कशीही करून या प्रश्नावर आपण मात करायचीच.

मी घरी आल्यावर सर्वात पहिले आठ दिवस सुट्टी घेतली. या आठ दिवसांत पूर्ण वेळ मुलाला द्यायचे ठरविले. घरच्या सर्वांना थोडे प्रेमाने आणि थोडे धमकावून सांगितले की मी आता एक प्रयोग करणार आहे आणि त्यात काहीही झाले तरी आपण त्याला कुठलाही स्क्रीन द्यायचा नाही. कितीही तमाशा त्याने केला तरी सहन करायचा आणि आता व पुढे जे होईल त्याला मी जबाबदार राहीन.

माझा अवतार बघून घरच्यांनी सहकार्य करायचे मान्य केले. सर्वात पहिले मी शर्विलला विश्वासात घेऊन त्याला सांगितले की आठ दिवस आपण खूप मजा करणार आहोत. मी पूर्ण वेळ तुझ्यासाठी उपलब्ध आहे. जे तुला हवे ते सगळे करू फक्त आपण TV आणि मोबाईल बघणार नाही. जे ही करू ते तुझ्या मनानेच करू. त्याला ते समजले नाही परंतु काहीतरी वेगळे घडणार यामुळे तो खूश झाला.

पहिले मी त्याच्या रुटीनचा पूर्ण ताबा घेतला. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्याच्या सोबत होते. प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये त्याला सांगितले की आपण मज्जा करणार आहोत, त्यामुळे तो प्रत्येक तासाला excited असायचा. त्यात आम्ही जुन्या आणि नवीन छंदाना उजाळा दिला. घरात सासू सासऱ्यांसकट अक्षरशः relay केल्यासारखे काम आम्ही केले. एकाने त्याच्यासोबत पझल्स केली, तर दुसऱ्याने गोष्टी रचून लिहिणे शिकवणे सुरू केले, तिसऱ्याने गोष्टी रचून त्याला त्याचा हिरो बनवून सांगणे सुरू केले, घरात आणि घराबाहेर खूप ऍक्टिव्हिटीज केल्या. एक नियम केला की, कोणीही स्क्रीन हातात घेतला की ‘नो स्क्रीन ‘ असे ओरडणे सुरू केले. आम्हीही आमचे स्क्रीन बाजूला ठेवले.

त्यामुळे असे झाले ‘नो स्क्रीन’ हा घराचा पासवर्ड बनला. यात तो ही आम्हाला ‘नो स्क्रीन’ म्हणू लागला आणि जेव्हा चक्क आम्ही त्याचे ऐकू लागतो तेव्हा तो फारच उत्साहित झाला. ‘नो स्क्रीन policy’ मुळे सर्व एकमेकांशी बोलू लागले, त्यामुळे घरात त्याला फार करमू लागले. प्रत्येक जण आपल्याला पूर्णपणे वेळ आणि भाव देतोय ही भावनाच त्याच्यासाठी मोठी होती.

आठ दिवसात काही वेळा relapse झाला. एक दोनदा त्याने मोठा तमाशाही केला पण तो मीच स्क्रीन हातात घेतल्याने. त्याला थोडी फसवणुकीची भावनाही आली. पण तरीही स्वतःचे स्क्रीन बाजूला ठेवून त्याला मात्र आम्ही स्क्रीन दिला नाही. आम्हीही TV पाहिला नाही.

पण त्यामुळे असे झाले की सर्वांकडे अचानक वेळ उपलब्ध झाला. त्याला मी गोष्टी सांगत हाताने जेवायला प्रेरित करू लागले. त्या आठ दिवसात तो हाताने जेवू लागला, नवनव्या गोष्टी रचू लागला, विसरलेली पझल्स करू लागला. त्यामुळे त्याचे जी ऍक्टिव्हिटी करतोय त्यात पूर्ण लक्ष लागू लागले. आठव्या दिवशी सासूबाईंसोबत 300 चे पझल साडेतीन तास बसून त्याने पूर्ण केले.

यात त्याला कुठलीही भीती आम्ही दाखविली नाही. सतत विश्वास टाकत गेलो. तो स्क्रीन सोडणे ही आमची गरज असल्यासारखे वागत असल्याने आपण आईबाबांसाठी काही करतोय ही भावना त्यात आली.

आठ दिवसात स्क्रीन पूर्ण विसरला. आज स्क्रीन सोडून तीन महिने झालेत पण आता तो स्क्रीन मागत नाही. हवी असलेली माहिती पुस्तकातून घेतो किंवा आम्हाला काढून द्यायला सांगतो. मैदानी खेळ खेळतो. स्क्रीनसाठी अजिबात हट्ट करीत नाही. हट्ट केला की आईवडील बळी पडणार नाही हे त्याला कळले.

आता तो स्वतःच्या हाताने खातो. अन्नाच्या चवी कळतात.त्यामुळे दोनच पोळ्या पण त्या पूर्ण चावून खातो. पूर्ण लक्ष देऊन अभ्यास करतो आणि अतिशय सुंदर पेंटिंग करतो. हट्ट त्याचे अजिबात बंद झाले. घरच्या कुत्र्यांमध्येही तो फार रमू लागला.

आम्ही आता दिवसातून त्याला जरी दोन तीन तास वेळ देऊ शकत असलो तरी आम्ही नसताना तो अजिबात स्क्रीनला हात लावत नाही कारण याचे foundation भीतीवर नाही तर परस्पर विश्वासावर आहे. त्याला भीती दाखवून जे झाले नाही ते विश्वासाने झाले. आमचा मुलगा आम्हाला परत मिळाला आहे यातच आम्हाला खूप आनंद आहे.

(लेखिका आनंदवनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत)

[email protected]
हे सुध्दा नक्की वाचा. भारत होतोय नोमोफोबियाचा शिकार http://bit.ly/2su677w

हे सुध्दा नक्की वाचा. डिजिटल युगातले सहजीवन ‘सही’ जीवन होईल? http://mediawatch.info/3638-2/

Previous articleसावरकरांना विरोध का ?
Next articleशाओमी नावाची चमत्कारीक सत्यकथा
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

29 COMMENTS

  1. “आम्हीही आमचे स्क्रीन बाजूला ठेवले.” हे सगळ्यात जास्त महत्वाचे!!! लहान मुले अनुकरणप्रिय असतात. आपण जे करू तेच करायला बघतात.

    • मुलांवर संस्कार करतांना आपणास तसेच किंवा त्यापेक्षा काकणभर जास्त काळजी घेतली पाहिजे. मुले तुम्हाला फॉलो करतात. ” ही गोष्ट करू नका ” सांगण्यापेक्षा तुम्ही सतत तसें वागणे हे मुलांवर जास्त चांगले बिंबते.

      • खुप छान लेख आहे.
        फ़क्त समस्या नाही तर त्यावरती कोनते उपाय करायला हवे, ते साध्या शब्दात विषद केले आहे.

  2. मुलं अनुकरणप्रिय असतात. मोबाईल बाबतीत पालकच दोषी असल्याचं दिसतं.
    भान देणारी स्टोरी!

  3. इथे माझा अनुभव सांगते. माझ्या मुलाला मोबईलचे अजिबात व्यसन नाहि याच कारण मोबाइल किति खराब आहे हे त्याला आम्ही पहिल्यापासुन सांगत आलो आहोत.अजुन सर्वात महत्वाच म्हणजे आमच्याकडे टिव्ही नाहि त्यामुळे त्याला त्याच वेड नाहि. थोडाफार टिव्ही तो आज्जीकडे बघतो. आमच्या दोघांच्या मोबईलमधे एकही गेम नाहि. त्यामुळे ते हि त्याला माहित नाहि या सगळ्या परिणाम असा कि अत्ता तो ९ वर्षाचा आहे पण ५ वर्षाचा असताना पासुन तो छान कविता लिहितो. रंगकाम उत्तम करतो. संस्क्रृत श्लोकांच ज्ञान असल्यामुळे त्याचा आवाज ठणठणित आहे. जस तुम्हि लिहिलय तस पझल पटापट लावतो.अत्ता या वयात सुध्दा छोटि छोटि नाटक लिहितो. निबंध छान लिहितो. व्यावहारिक ज्ञान उत्तम आहे. निसर्गाच आकर्षण आहे. ट्रेकिंगला येतो ५ /६ तास आरामात चालु शकतो. मोबईल टिव्ही नसेल तर मुलांचा खरोखर सर्वांगिण विकास होतो.

  4. दर आठवड्याला किमान एक मूल माझ्याकडे स्क्रीनमुळे आलेला दृष्टिदोष घेऊन येतो..eye surgeon

  5. Very nice …me pan mulachya TV ani mobile band kelay mahinyatun 3 te 4 velach 1 te 2 tas Sathi cartoon or movie lavun dete…TV band mule tyala Vachan karaychi avad lagali.

  6. एकदम छान लेख.
    आजपासूनच “नो स्क्रीन” स्वतःपासून आमलात आणण्याचा प्रयत्न करू!
    धन्यवाद!

  7. अतिशय आवश्यक आणि महत्त्वाची गरज. अनुकरणीय.
    मोबाईल ही सोय न रहाता स्टेटस,फॅशन,व चिंतेची बाब ठरली आहे. त्यांचं मूळ उद्देश बाजूला राहिलेत. कॅमेरा, फेसबुक,वाॅट्सप, खरेदी, अनावश्यक माहिती यासाठी जास्त उपयोगी ठरत आहे.
    त्यामधील अनावश्यक गोष्टी टाळाव्यात. उदा. गेम्स, डाऊनलोड,
    हे प्रकार.
    आपण म्हटल्याप्रमाणे त्याचं उच्चाटन करायचा प्रयत्न केला तरच त्याच्या वापरावर नियंत्रण राहिल.

      • फारच छान लेख , मुलं अनुकरण प्रिय असतात , त्यामुळे आपला कोणत्याही गोष्टीचा वापर कमी झाला तर त्यांनाही आपण बोलू, रागावू शकतो , मुलांना वळण लावणे थोड्याफार प्रमाणात आपल्या हातात आहे,शर्विल चे अभिनंदन व आई-बाबांना शुभेच्छा

  8. apan mulana changlya goshtimadhe busy thewal tar mul screen kade nahi pahat.jase books dena,activity dena,apan tyanchyasobat khelan.mazya muline screen sathi hatt kela ki mi tila coloring book ghyayla sangte ani to hi awadine colorong karte

  9. मुलांना technology पासून दूर करुन त्यांचा कसला विकास करताय, आज 8 वर्षाचा मुलगा computer किंवा mobile तुमच्यापेक्षा चांगला handle करतो. त्याचे पाय ओढणे योग्य आहे का. आपलाच perspective योग्य आहे असे समजणे हे चुकिचे वाटते.

  10. हो मुलांना नवीन करून पहावे असे वाटत असते.पण आपण त्याला नवीन काय देतो यावर त्याच्या सवयी ठरत असतात. मुलाच्या चांगल्या वाईट कृतीला पालक जबाबदार असतात. वेलीच मुलांना वेल देऊन प्रश्न सोडवता येतात.

  11. खूपच छान लिहिलंय। अगदी खरंखुरं। आणि सर्वांना उपयुक्त सुद्धा आहे। आपण पालकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी अस मला वाटतं जस मी माझ्या मुलाकडून,अथर्व कडून लहानपणापासून करवून घेतली ती म्हणजे त्याला जेव्हा घड्याळ कळत नव्हतं तेव्हापासून मी त्याला TV बघतांना वेळ बघायला शिकविली। जेव्हा घड्याळ कळत नव्हतं तेव्हा काटे बघ आणि 12 वर काटा आला की तुझा तू TV बंद करा असे मी सांगायचे। नंतर दिवसातला कुठला तरी एकच तास TV बघायचा असं सांगितलं । आणि सुदैवाने त्याने ही ऐकलं।
    एकदा हट्ट धरला होता की मला जास्त वेळ बघू दे मग मी एक दिवस त्याला पाहिजे तितका वेळ TV बघू दिला पण दिवसाच्या शेवटी तो अतिशय कंटाळलेला होता मग मी म्हणाले बघ जास्त वेळ TV पाहिल्याने अस बोअर होतं। हे त्याच्या मनात पक्के बसलं त्याला पटलं आणि माझा प्रश्न सुटला। त्यानंतर आजपर्यंत मला कधीच सांगायला लागलं नाहीये आत्ता तो नववी मध्ये आहे आणि अजूनही घड्याळ बघून TV लावतो आणि बरोबर एक तासाने बंद करतो।

  12. Good read…repair work done..but i just want to say that..why wake up so late ? The eight day holiday that was taken for reforming the kid…ws not needed, if the kid was given time frm childhood. Don’t wait for such a situation. Be there for your child in their growing years. A few lacs les in life, can b earned later. But your child’s childhood years will not wait. 🙂

  13. Good read…repair work done..but i just want to say that..why wake up so late ? The eight day holiday that was taken for reforming the kid…ws not needed, if the kid was given time frm childhood. Don’t wait for such a situation. Be there for your child in their growing years. A few lacs les in life, can b earned later. But your child’s childhood years will not wait. 🙂

  14. नमस्कार डॉ.,

    आपला मुलाच्या मोबाईल व्यसनावरचा लेख मला माझ्या आईने पाठवला होता. माझी मुलगी अडीच वर्षाची आहे. सुरवातीला खूप काळ तिला मोबाईल पासून दूर ठेवण्यात आम्ही यशस्वी ठरलो होतो पण मध्यंतरी काही कारणांनी तिला खाताना मोबाईलची सवय लागली. इतकी की मोबाईल बघायचा म्हणून खायला मागण्यापर्यंत गेलं. हे योग्य नाही हे समजत असूनही आम्हीपण तिची मागणी पुरवत गेलो, पुरेसे प्रयत्न झाले नाहीत आमच्याकडून.

    आपला लेख मी वाचून लगेच नवऱ्याला पाठवला. तो म्हणाला आपण करूयात हे. लगेच त्या दिवसापासूनच तिला सांगितलं की आजपासून आपण जेवताना मोबाईल नाही बघायचा. अर्थातच खूप आरडाओरडा, रडारड, कमी जेवण हे सर्व झालंच पण आम्ही ठाम राहिलो. आज ४ दिवस झाले. अजूनही मधेमधे मोबाईल मागते पण आता जोर कमी झालाय. आम्हीपण तिला रमवण्यासाठी नवनवीन गोष्टी शोधतो.

    तुमच्या लेखामुळे योग्यवेळी आमचे डोळे उघडले आणि आम्ही मोबाईल बंद करण्यासाठी प्रोत्साहित झालो.

    खूप खूप आभार ????

    Pauravi Rohan Medhi

  15. फारच छान सध्या मोबाईल हे लहानच नाहीतर तरूण व वयस्करांनाही मोठे व्यसन लागले आहे व कंपन्या आकर्षक आँफर देत आहेत त्यामुले तरुण पिढी अकार्यक्षम होत असून तसेच विद्न्यानाचा ऊपयोग समाजाच्या हिता साठी कमी व अहीता साठी जास्त होत आहे याला आपणच जबाबदार आहोत पालकांनी जागृत होऊन मुलांचे ऊज्वल भवीष्य घडविण्या करीता अवश्य लाड प्यार करावे परंतू ज्यामुले मुलांचे भविष्यात प्राब्लेम निर्माण होईल यांची परवाणगी केंव्हाही देऊनये कारण पालक सद्न्य असतात नव्हे तेअसावेत तेव्हाच शक्य आहे नाही तर पुढे महासत्ता होणार्या आपल्या भारत देशाचे भवितव्यकाय असेल हे कोण्या जोतिष्याला विचारायची गरज नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here