-अमोल उदगीरकर
एक मराठी उपराष्ट्रवाद नावाचा प्रकार अस्तित्वात आहे . म्हणजे एखादा माणूस महाराष्ट्रीयन असेल तर त्याला सचिन तेंडुलकरपेक्षा सौरभ गांगुली आवडणं लोकांना पचत नाही . लता मंगेशकरपेक्षा नूरजहाँ जास्त आवडते म्हंटल की लोक विचित्र नजरेने बघायला लागतात . मराठी सिनेमापेक्षा हिंदी सिनेमे जास्त आवडतात असं म्हंटल की लोक तुम्हाला मराठीद्रोही वर्गात टाकून मोकळे होतात . खरं तर सचिन काय किंवा लता काय हे दोघंही राज्य ,देश यांच्यासारख्या भौगोलिक सीमा ओलांडून जगभरातल्या त्यांच्या चाहत्यांना आवडतात .पण मराठी लोकांना सचिन , लता यांच्याबद्दल ते मराठी भाषिक असल्यामुळे किंचित मालकी हक्काची भावना असावी . असाच एक प्रकार म्हणजे मला माधुरी दीक्षितपेक्षा श्रीदेवी जास्त आवडते म्हंटल की माझ्या शत्रुपक्षाच्या संख्येत अजून वाढ होते . अभिनय असो , नृत्य असो , स्क्रीन प्रेझेन्स असो मला श्रीदेवी माधुरीपेक्षा कायमच सरस वाटत आली आहे .
फटाक्यांच्या फॅक्टरी साठी प्रसिद्ध असलेल्या तामिळनाडूमधल्या शिवकाशीमध्ये श्रीदेवीचा जन्म झाला . तिने बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात तमिळ सिनेमामधून केली . वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी तिने ‘मुंदरु मुदीचू ‘ नावाचा सिनेमा केला होता . त्यात तिने चक्क रजनीकांतच्या आईची भूमिका केली होती . त्या चित्रपटात ती रजनीकांतची सावत्र आई असते . त्या चित्रपटात रजनी पडद्यावरच्या आईच्या पाया पडताना दाखवला आहे . रजनीकांत पण जिच्या पाया पडला आहे अशी श्रीदेवी एकमेव नायिका असावी अशी रजनीकांतवर असणाऱ्या अनेक विनोदांमध्ये भर पडायला हरकत नाही . १९७५ मध्ये आलेल्या ‘ज्युली ‘ मधून श्रीदेवीने हिंदीत पण पदार्पण केलं . पण हिंदी सिनेमात तिचा प्रभाव वाढायला लागला तो १९८३ साली आलेल्या ‘हिम्मतवाला ‘ पासून . हिम्मतवाला सुपरहिट झाला आणि श्रीदेवीने हिंदीमध्ये पण एकामागून एक हिट सिनेमे द्यायला सुरुवात केली . हे सगळे सिनेमे दाक्षिणात्य सिनेमांचे रिमेक होते . अतिशय बटबटीत कथानक , भडक संवाद , कवायती नृत्य ही या सिनेमांची वैशिष्ट्य .अजून एक म्हणजे या बहुतेक सिनेमांमध्ये नायिका या शो पिससारख्या सारख्या होत्या . तिथे काही अभिनयाला वाव मिळण्याचा प्रश्न नव्हता . पण त्यावेळेसच आलेल्या ‘सदमा ‘ पिक्चरने श्रीदेवी ही किती अव्वल प्रतीची अभिनेत्री आहे हे प्रेक्षकांना कळलं होत . ‘सदमा ‘ हा खरं तर आउट अँड आउट कमल हसनचा सिनेमा होता . कमल हसनच्या सर्वोत्कृष्ट अभिनयापैकी एक अभिनय हा ‘सदमा’ मध्ये होता . पण श्रीदेवी पण कमल हसनच्या समोर तितक्याच ताकदीने उभी राहिली . एक अभिनेत्री म्हणून ती खूप मोठा पल्ला गाठणार आहे याचा हा शुभ संकेत होता .
श्रीदेवी तिच्या एन भरात होती तेव्हा तिला डोळ्यासमोर ठेवून सिनेमे लिहिले जात . तिच्या चित्रपटांमध्ये तोंडी लावायला नायक असत पण श्रीदेवीसमोर ते निष्प्रभ वाटायचे . ‘चालबाज ‘ नावाचा सिनेमा आठवतोय ? परस्पर विरुद्ध स्वभाव असणाऱ्या जुळ्या बहिणींची भूमिका श्रीदेवीने केली होती . ‘चालबाज’ मध्ये दुहेरी भूमिकेत तिने इतका कहर केला होता की त्या सिनेमात रजनीकांत आणि सनी देओल पण होते हे सांगावं लागत . ‘बाजीगर ‘ हा असाच श्रीदेवीला डोळ्यासमोर ठेवून लिहिलेला सिनेमा . काजोल आणि शिल्पा शेट्टीने केलेल्या भूमिका श्रीदेवी एकटीच करणार होती . पण पडद्यावर श्रीदेवीचं मरण प्रेक्षकांना झेपणार नाही म्हणून श्रीदेवीने पाऊल माग घेतलं . ‘डर’ मधली जुही चावलाने केलेली भूमिका श्रीदेवीला ऑफर झाली होती . श्रीदेवीला चित्रपटाची कथा आवडली होती पण यश चोप्रासमोर तिने अट ठेवली होती की शाहरुख जी भूमिका करतोय ती मला द्या आणि त्या अनुषंगाने संहितेमध्ये बदल करा . असा आत्मविश्वास फार कमी लोकांमध्ये आढळतो . यश चोप्रानी श्रीदेवीची अट मान्य केली असती तर बॉलीवूडला स्वतःची पहिली जबरदस्त खलनायिका मिळाली असती आणि कदाचित शाहरुख खान नावाचा कल्ट पण निर्माण झाला नसता . अर्थात जर तरच्या गोष्टींना फारसा अर्थ नसतो हे ही खरं . श्रीदेवीची ‘जुदाई’ नावाच्या तद्दन दाक्षिणात्य सिनेमाचा रिमेक असणाऱ्या चित्रपटातील भूमिका पण मला आवडते . पैशांसाठी स्वतःच्या नवऱ्याला दुसऱ्या बाईला विकणाऱ्या स्त्रीची भूमिका त्यात श्रीदेवीने केली होती . हा चित्रपट बघताना श्रीदेवीने निभावलेल्या गृहिणीच्या पात्राचा एकाचवेळेस राग पण येत असतो , हसू पण येत असत आणि तिची कीव पण येत असते . श्रीदेवी टॉप फॉर्म मध्ये होती तेंव्हा पडद्यावर जशा स्ट्रॉंग भूमिका करायची तशाच पडद्याबाहेर पण करायची . काही कारणांमुळे अमिताभ बच्चनसोबत मी काम करणार नाही अशी भूमिका तिने घेतली होती . बच्चनसारख्या सुपरस्टारवर बहिष्कार घालायला जी जबरदस्त हिंमत आणि आत्मविश्वास लागतो , तो तिच्यामध्ये नेहमीच होता .शेवटी बच्चननेच माघार घेऊन श्रीदेवीशी व्यवसायिक संबंध प्रस्थापित केले .
श्रीदेवीसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक यश चोप्रांचे एक प्रसिद्ध विधान आहे , “जेव्हा तुम्ही श्रीदेवीसोबत काम करत असता तेव्हा तुम्हाला नायकाबद्दल फारसा विचार करावा लागतं नाही .” यश चोप्रानी तिच्यासोबत केलेले ‘चांदनी ‘ आणि ‘लम्हे ‘ चित्रपट याची साक्ष देतातच . शेखर कपूर सारखा आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त दिग्दर्शक पण श्रीदेवीच्या अभिनयाच्या प्रेमात होता . त्याचा ‘मिस्टर इंडिया ‘ ह्या चित्रपटाचं अनिल कपूरच्या पात्राभोवती फिरत असला तरी तो चित्रपट म्हणजे श्रीदेवी किती धमाल कॉमेडी करू शकते याचं प्रात्यक्षिक होत . त्यात पत्रकार श्रीदेवी आणि सतत येणाऱ्या रॉंग नंबर ने कावलेला अनु कपूरचा संपादक गायतोंडे यांच्यातले कॉमेडी सीन्स निव्वळ अफाट आहेत . खरं तर अनु कपूर हा महान अभिनेता . त्याच विनोदाचं टायमिंग पण जबरदस्त . पण श्रीदेवी अनु कपूरसमोर पण आत्मविश्वासाने उभी राहते . श्रीदेवीचं कॉमेडी टायमिंग हे खूप जबरदस्त आहे हे ‘चालबाज’ आणि ‘मि .इंडिया’ मध्ये अधोरेखित होत . साप या सरपटणाऱ्या प्राण्याबद्दल भारतीय जनमानसात एक विचित्र भीतियुक्त आकर्षण आहे. इच्छाधारी नाग, नागमणी आणि तत्सम शेकडो अंधश्रद्धा सापाच्या बाबतीत प्रचलित आहेत. ‘नगिना’, ‘निगाहे’ या चित्रपटांमधून हा कल्ट वाढवण्याचं श्रेय पुन्हा श्रीदेवीचं .श्रीदेवीचे हे नागपट असतील किंवा एका स्वतंत्र नायिकेला ‘वठणीवर ‘ आणणारा नायक असणारा ‘लाडला ‘ चित्रपट असेल यांचा कन्टेन्ट खूप रिग्रेसिव्ह आहे . भारतातल्या सर्व क्षेत्रात स्वतंत्र वाटचाल करणाऱ्या स्त्रियांचं चित्रण या चित्रपटांमध्ये दिसत नाही . स्त्रियांना कमी लेखणाऱ्या अशा अनेक चित्रपटांमध्ये श्रीदेवीने काम केलं . तिला असं करताना फार आनंद झाला असेल असं वाटत नाही . शेवटी त्या काळाच्या मर्यादा पण लक्षात घ्याव्या लागतात . पण नंतर पंधरा वर्षांनी श्रीदेवीने ‘इंग्लिश विंग्लिश ‘ करून सगळ्याची भरपाई केली .
पण ‘इंग्लिश विंग्लिश ‘ करण्यापूर्वी तब्बल पंधरा वर्ष श्रीदेवी अभिनयामधून बाहेर पडली होती . निर्माता बोनी कपूरसोबत लग्न झाल्याबरोबर संसार आणि मुलांवर लक्ष केंद्रित करणं तिन पसंद केलं . एकेकाळची यशस्वी अभिनेत्री पूर्णवेळ गृहिणी बनली . सतत लाइमलाईट मध्ये राहिलेल्या माणसाला असं एकदम अज्ञातवासात जाण जड जाऊ शकत . पण श्रीदेवीच्या प्राथमिकता पक्क्या होत्या .दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हा श्रीदेवीचा जबरदस्त फॅन . इतका मोठा फॅन की आपलं आत्मचरित्र त्याने श्रीदेवीला अर्पण केलं आहे . श्रीदेवीला त्याने देवीचा दर्जा दिला आहे .तो एकदा बोनी कपूरच्या घरी मिटिंगसाठी गेला होता .तिथं त्यानं श्रीदेवीला चहा बनवताना बघितलं आणि तडक तिथून उठून आला . श्रीदेवीला चहा बनवायला लावणाऱ्या बोनी कपूरला रामूने कधीच माफ केलं नाही . आपल्या ‘मस्त ‘ या चित्रपटामध्ये त्याने बोनी कपूरला यथेच्छ चिमटे काढले . ‘मस्त ‘ मधला नायक आपल्या आवडत्या अभिनेत्रीला भेटण्यासाठी पळून मुंबईला येतो . तिथं त्याला एक ऑटोवाला भेटतो . योगायोगाने तो ऑटोवालापण श्रीदेवीला भेटण्यासाठी मुंबईला पळून आलेला असतो . बोनी कपूरशी श्रीदेवीने लग्न केल्यामुळे तो बोनीला मर्मभेदक शिवी देतो . त्या प्रसंगाला रामूच्या वैयक्तिक अनुभवाची किनार आहे .
श्रीदेवीला पंधरा वर्षांच्या अज्ञातवासातून बाहेर काढण्याचं श्रेय दिग्दर्शक गौरी शिंदेच . ‘इंग्लिश विंग्लिश ‘ मधलं श्रीदेवीचं घरातल्या सगळ्यांसाठी झटणार , इंग्रजीच्या अभावातून न्यूनता आलेलं , घरातल्या सगळ्या लोकांचं बोलणं ऐकून घेणार पात्र हे बरचस गौरी शिंदेच्या पात्रावर बेतलेलं होत . श्रीदेवीने ते पात्र मोठ्या कन्व्हीक्शनने केलं . तिचा पंधरा वर्षांचा गृहिणीपणाचा अनुभव , किशोरवयीन मुलींना वाढवताना आलेले अनुभव तिला हे पात्र करताना नक्कीच कामी आले असणार . चित्रपटाच्या पूर्वार्धात श्रीदेवीचं पात्र हे स्वतःचा लाडवांचा बिजनेस आत्मविश्वासाने करणारे दाखवले आहे . पण आपली इंग्रजी चांगली नाही , आपला पेहराव व मॅनरिज्म हाय क्लास साठी योग्य नाहीत असा न्यूनगंड तिला असतो . आपल्या घरचे लोक आपल्यावर प्रेम तर करतात पण आपला सन्मान करत नाहीत याची बोचरी जाणीव तिला आहे . चित्रपटाच्या उत्तरार्धात इंग्रजी हळूहळू जमू लागल्यावर तिचा आत्मविश्वास वाढू लागतो . व्यक्तिमत्वातलं हे ट्रान्सफॉर्मशन श्रीदेवीने खूप छान दाखवलं आहे . चित्रपटावर समीक्षक आणि प्रेक्षकांनी पण पसंतीची मोहोर उमटवली .पण सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट आली ती तिच्या नवऱ्याकडून . बोनी कपूरने जाहीर कबुली दिली की हा चित्रपट पाहण्यापूर्वी माझी बायको अभिनेत्री आहे हेच मी विसरून गेलो होतो . ती माझी बायको असण्याआधी पण एक मोठी अभिनेत्री आहे हे माझ्या लक्षात आणून दिल्याबद्दल गौरी शिंदेंचे आभार .
एक काळ असा होता की श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित एकाच कालखंडात काम करत होत्या .माधुरी जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आली तेव्हा श्रीदेवी नंबर वन होते . श्रीदेवीची कारकीर्द उतरणीला लागली तस माधुरीने श्रीदेवीचा अव्वल क्रमांक पटकावला . त्यामुळं दोघींची तुलना होणं अटळ आणि अपरिहार्य आहे . एका चाहत्याच्या दृष्टिकोणातून हा वैयक्तिक आवडी निवडीचा मामला आहे . पण श्रीदेवीला जितक्या आव्हानात्मक भूमिका मिळाल्या तितक्या माधुरीला मिळाल्या नाहीत हे सत्य आहे . कॉमिक टायमिंग मध्ये पण श्रीदेवी बरच सरस आहे .’धक धक करने लगा ‘ पेक्षा ‘कांटे नही कटते ये दिन रात ‘ हे गाणं मला प्रचंड जास्त मादक वाटत . पुनरागमनाच्या शर्यतीमध्ये पण माधुरी चाचपडत असताना श्रीदेवीने ‘इंग्लिश विंग्लिश ‘ करून पुन्हा बाजी मारली . पण श्रीदेवी आणि माधुरीमधला एक मोठा फरक अस्वस्थ करणारा आहे . श्रीदेवीने आपल्या मातृभाषेतील चित्रपटांसाठी मोठं योगदान दिल आहे . माधुरीला हे जमलं नाही . आता माधुरी एका मराठी चित्रपटाची निर्मिती करत असल्याच्या बातम्या येत आहेत . देर से ही सही दुरुस्त आये . अर्थात माधुरीचे स्वतःचे असे बरेच गुण आहेत आणि तिचा एक मोठा चाहता वर्ग आहे हे ही मान्यच .
श्रीदेवी ही सर्वगुणसंपन्न आहे अशातला भाग नाही . तिचे हिंदी उच्चार खूप सदोष आहेत . वर उल्लेख केल्याप्रमाणे तिच्या बऱ्याचशा सिनेमाचा कंटेंट रिग्रेसिव्ह आहे जो ती करियरच्या एका उंचीला असताना टाळू शकली असती . तिच्या वैयक्तिक आयुष्यावर पण बरीच टीका केली जाते .पण हे सगळं असून पण बॉलिवूडच्या इतिहासातली ती एक महत्वपूर्ण अभिनेत्री आहे हे नक्की . जेव्हा इतिहासाचा लेखाजोखा घेतला जाईल तेव्हा श्रीदेवी पहिल्या दहा अभिनेत्रींमध्ये असेल हे नक्की.
(लेखक नामवंत स्तंभलेखक आहेत)
7448026948
………………