संतांना सत्याकडे नेणाऱ्या ज्ञानाचा पत्ताच नव्हता

लेखक- मुग्धा कर्णिक

ईश्वराच्या आराधनेत कवने रचणारी सगळी संतकवीकवयित्री मंडळी फार गोड होती. पण बाकी सत्याकडे नेणाऱ्या ज्ञानाचा त्यांच्यात पत्ताच नव्हता हे मला नेहमीच स्पष्टपणे वाटत आलंय.

नसलेल्या कृष्णाच्या कल्पनेमागे वेडी होऊन गाणारी, सुंदर भक्तीकाव्य लिहिणारी मीराबाई तर मानसिक किंवा सायकोसोमॅटिक केस होती हे माझं मत झालंय. अक्क महादेवीची ज्ञानलालसा एककल्ली होत एकटी पडली आणि ईश्वरध्यानात कविता लिहितालिहिता तीही तोलच तर हरवून बसली. विठ्ठलाच्या पायी वेडावणारी महाराष्ट्रीय संतमंडळीही मला याच प्रकारांत आतबाहेर वाटतात. काहींचा तोल कमी ढळला, काहींचा जास्त. ईश्वरस्तुतीची कवने सुंदर शब्दांनी, रचनांनी समृद्ध झाली- बाकी काही नाही. अजूनही त्या वारीचा मोह आणि ती कशी ग्रेट म्हणत त्याच्या चित्रिकरणावर वा पत्रीकरणावर आपला अवकाश कमावून घेणारे लोक हे मस्तच सुरू आहे. त्या त्या काळांच्या चौकटीत ही सारी अस्तित्वे आणि त्यांचे लेखन, रचना यांबद्दल एक मर्यादित आदर मी अवश्य बाळगते आणि थोडं मिस्किल हसून सोडून देते.

छानच. ती कवने गोड गळ्यात ऐकताना फार सुंदर वाटतं. चाला बाहीं देस… कहो कुसुंबी सारी रंगावा… कहो तो भगवा भेस… कहो तो मोतियन मांग भरावा… कहो तो छिटकावा केस… गाते-ऐकते मीही अनेकदा स्वरांत हरवून जात. खेळ मांडियेला… म्हणायलाही छान वाटतं. पण तरीही हा सगळा एक निरर्थक वेडेपणा होता हे मी माझ्याशी पक्कं जाणून आहे. तरीही आत्ता लावा- ओ रमैय्या बिन नींद ना आवे… मी हातातलं काम बाजूला ठेवून ऐकेन.

त्या कवनांतून अजूनही त्या काळची सामाजिक परिस्थिती दिसते एवढं त्यांचं महत्त्व निश्चितच आहे. एका गांजलेल्या समाजाला देवप्रीतीची अफूची गोळी चढवल्यावर त्यांना तेव्हा निश्चितच समाधानाचा आभास होऊ लागला. फार काही बदल घडवण्याची गरज मिटली… मुखे हरीहरी बोला… बस की.
या सगळ्याचं बौद्धिक पातळीवर उदात्तीकरण करणं माझ्या विवेकाच्या बैठकीला शक्य नाही. आणि जे घडून गेलं, घडत राहिलं, घडत रहातं आहे त्यातलं शब्द-स्वर-रंग-रूप रचना सौंदर्य नाकारण्याचीही माझ्या विवेकाला गरज नाही.

पण मानवाने केलेल्या असल्या करामती सौंदर्याच्या पलिकडे विश्वाच्या, सृष्टीच्या निखळ सत्याचे सौंदर्य मला केवळ वैज्ञानिकांच्या कठोर बौद्धिक परिश्रमांतूनच उलगडणार आहे हे मी माझ्या बाह्य संज्ञांच्या रसिकतेच्या ओघातही चुकूनही विसरत नाही.

कृष्णाच्या गीतेपेक्षा, व्यासांच्या कवितेपेक्षा, वाल्मिकीच्या शोकात्म काव्यापेक्षाही मला मोहवतात ते विश्वाची मांडणी कशी झाली असेल ते रसरसून मांडणाऱ्या वैज्ञानिकांचे फॉर्म्युले… ते फॉर्म्युले मला या कवींच्या, संतांच्या, भक्तांच्या लेखनाच्या मानाने कमीच आकळतात. तरीही तेच श्रेष्ठतम आहेत हे कळायला लागणारा सुंदर तोल माझ्यात आहे.

ईश्वरी अस्तित्व मान्य करण्याचा भ्रम मी दूर केल्यानंतर विश्व असे विस्तारले आहे… शब्दसुरांच्या पलिकडे जाऊन ते सुंदर झाले आहे.

…………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………….

देव आहे-देव नाही या विश्वासातील सात पातळ्या प्रा. डॉकिन्स स्पष्ट करतात. त्या आपल्या सहजसंदर्भासाठी इथे देतेय. आपण कुठे आहोत हे पाहून मग कुठल्या दिशेने जायचंय ते ठरवता येतंय.
माणसंच माणसं आहेत आपल्या जगात. आणि सारे वेगवेगळ्या पातळ्यांवर विचार करतात. अस्तित्वाचा… बुद्धीच्या पातळ्याही विभिन्न. आणि भावनिकताही वेगवेगळी. पण एक पट्टी लक्षात घ्यावी.

१- प्रखर ईश्वरवादी. ईश्वराचे अस्तित्व आहे असे १००% मान्य असलेला.
सी. जी. जुंगच्या शब्दात सांगायचे तर, ‘माझा विश्वास आहे असे नव्हे, मला
हे माहीत आहे.’

२- खूप जास्त पण १००% पेक्षा कमी शक्यता मानणारे, प्रत्यक्ष आचरणात
ईश्वरवादी असूनही आशंका व्यक्त करणारे लोक. ते म्हणतात, ‘मी नक्की
सांगू शकणार नाही पण माझी देवावर दृढ श्रध्दा आहे आणि तो आहे याच
विश्वासावर मी माझे जीवन जगतो.’

३- ५० टक्क्यांपेक्षा जास्त पण फार जास्त नव्हे. तांत्रिकदृष्ट्या अज्ञेयवादी
पण ईश्वरवादाकडे झुकणारे. ‘मला खात्री नाही, पण देवावर विश्वास ठेवणं
मला बरं वाटतं.

४- बरोबर ५०%. पूर्णत: तटस्थ अज्ञेयवादी. यांच्या मते देव असणे किंवा
नसणे या दोन्हीच्या अगदी सारख्याच शक्यता संभवतात.

५- ५०%पेक्षा कमी, पण फार कमी नाही. तांत्रिकदृष्ट्या अज्ञेयवादी, पण
नास्तिकतेकडे झुकणारे. ‘देव आहे की नाही माहीत नाही पण माझ्या मनात
त्याच्या अस्तित्वाबद्दल शंका आहे.’

६- अगदी कमी शक्यता गृहीत धरतात, शून्याला जरा कमी. जवळपास
नास्तिकच. ‘मी निश्चित विधान करणार नाही, पण मला वाटतं की देव
अस्तित्वात असणं जवळपास अशक्यच आहे. मी माझं आयुष्य जगतो ते तो
नाही हेच गृहीत धरून.

७- तीव्र नास्तिक, ‘देव नाही हे मला माहीत आहे. ज्या तीव्रपणे जुंगला
‘माहीत आहे’ की देव आहे तितक्याच तीव्रपणे मला ‘माहीत आहे’ की ‘देव
नाही’- असे म्हणणारा.

लेखक- मुग्धा कर्णिक
Previous articleसेपिअन्स – मानवजातीचा अनोखा इतिहास
Next articleपुरुष नावाच्या पशुंनो….
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.