सनातन धर्म म्हणजे काय?

-श्रीकांत ढेरंगे

सनातन धर्म म्हणजे काय? याविषयी सध्या चर्चा सुरू आहे. सनातन धर्माचं स्तोम माजवणारे लोक नेमके कोण? कसे असतात, हे आपण खालील उदाहरणांद्वारे पाहुयात. 

१. तुकोबा

तू शूद्र आहेस,कुणबी आहेस म्हणून तू अभंग लिहू शकत नाहीस. तुला तो अधिकार नाही. असं सांगून तुकोबांच्या लेखणीवर बंदी घालणारांनी, त्यांची गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडविणारांनी, त्यांच्यावर मारेकरी घालणारांनी, त्यांच्याकडे वेश्या पाठवणारांनी, अशा नीच, नराधम कृत्ये  करणारांचे वारसदार म्हणजेच सनातनी लोक होय.

२. ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे

ज्ञानेश्वरादी भावंडांना त्रास देणारांनी, त्यांच्याकडून शुद्धिपत्र घेणारांनी, त्यांना त्राही त्राही करणारांचे वारसदार…

३. संत चोखामेळा

संत चोखामेळ्याला तो देवाची भक्ती करतो, एक अस्पृश्य असूनही तो अभंग लिहितो म्हणून त्यांना क्रूरपणे ठार मारणारे लोक.

४. संत नामदेव

नामदेवांना देवळात कीर्तन करू न देणारे लोक. (औंढा नागनाथाचे देऊळ)

५. छत्रपती शिवाजी महाराज

कुठल्याश्या अस्तित्वात नसलेल्या परशुरामाने ही समस्त पृथ्वी नि:क्षत्रिय केली म्हणून तुम्हाला ‘राजा’ होण्याचाच अधिकार नाही. म्हणून माझ्या शिवबांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे, त्यांच्या घरातच पितापुत्रांमध्ये बेबनाव, कलह निर्माण करणारे, राज्याभिषेकाच्या आडून स्वराज्याची अख्खी तिजोरी रिकामी करायला लावणाऱ्यांचे वारसदार…

६. छत्रपती संभाजी महाराज

स्वराज्याचे युवराज स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना कालपर्यंत आपल्या नाटकांतून व्यसनी,बदफैली, व्याभिचारी ठरवणारे, त्यांची ठरवून बदनामी करणारे, त्यांच्या घातपातास कायम टपून बसणारे, अगदी शिवाजी महाराजांच्या अंतिम समयी त्यांना भेटू न देता रायगडाचे दरवाजे सत्तेसाठी हापापून बंद करणाऱ्या नीच,नरपशू लोक

७. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले

ज्ञानदान करण्याचा अधिकार आम्हालाच आहे. असे म्हणत सावित्रीबाईंवर शेणाचे/चिखलाचे गोळे टाकणारे,त्यांच्यावर थुंकणारे लोक.

८.महात्मा फुले

महात्मा जोतिबा फुले यांच्यावर मारेकरी घालणारे लोक.

९.चौथे शिवाजी महाराज

चौथ्या शिवाजी महाराजांना वेडसर ठरवून त्यांचा अहमदनगरला कट करून, त्यांचा घात करणारे लोक.

१०. राजर्षी शाहू महाराज

कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची हवी तशी बदनामी करणारे लोक. (जिरगे प्रकरण, वेदोक्त प्रकरण)

ही अशा अनेक महान लोकांना त्रास देणाऱ्या, त्यांचा छळ करणाऱ्या, त्यांना ठार मारणाऱ्या सनातन धर्माच्या नीच लोकांची यादी अगदी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांवर दगडफेक करणारांपर्यंत,महात्मा गांधींच्या खुनापर्यंत वाढवता येईल. पानसरे,कलबुर्गी,दाभोळकर,गौरी लंकेश यांच्यापर्यंत आणता येईल.

या वरील सर्वांना त्रास दिलेल्या महान लोकांचा मला वारसा लाभलाय. आणि तो मानवाच्या,मानवतेच्या कल्याणासाठी सदैव झटणारांचाच आहे. हे सर्व लोक जन्मले तेव्हा धर्माने हिंदूच होते. आणि मीही जन्माने हिंदूच आहे. परंतु महत्त्वाची बाब ही की या सर्व महात्म्यांना त्रास देणारेही कुणीच परधर्मीय नव्हते. ते कुठल्या धर्मातील आणि जातीतील होते. हे मी नव्याने का सांगायचे?

तुकोबांचा गाथा हा सर्वसामान्यांच्या जगण्याचे प्रतिबिंब असलेला ग्रंथ हा माझ्या मनाने स्वीकारलेला माझ्या मनोधर्माचा ग्रंथ आहे. आणि तुझा धर्मग्रंथ कोणता? असे विचारल्यावर माझ्या डोळ्यांपुढे तुकोबांचा गाथाच उभा राहतो. आणि तोच माझा धर्मग्रंथ होय.

आपल्याला सर्व प्रकारचे फरक करता आले पाहिजेत. ज्ञान यापेक्षा आणखी वेगळं काय असतं? जे तुमच्या स्वातंत्र्याला, स्वतंत्र बुद्धीच्या मताला मान्यता देतं. त्याच्या चूकबरोबर गोष्टींशी सहमती-असहमतीची आदरार्थी निकोपता वाढवतं. ते ज्ञान म्हणजेच तुमचा धर्म होय. या पलीकडे आणखी धर्मग्रंथांत तरी काय आहे? कर्मकांड हे पोटाच्या सोयीसाठी, ऐतखाऊ हेमाद्री पंडितासारख्या लोकांनी सुरू केलेले उद्योग आहेत.

इयत्ता तिसरी ते बी.ए.च्या शेवटच्या वर्षापर्यंत मी श्रावण पाळलेला माणूस आहे. नियमितपणे पहाटे नदीवर जाऊन महिनाभर अंघोळ करायची आणि महादेवाच्या पिंडीला बेल,पाण्याचा अभिषेक करायचा. तरीही माझ्यात कुठलही धार्मिक कट्टरपण आलं नाही. कारण, माझे आजोबा मला सांगायचे की, माणसानं पाण्यासारखं वाहतं रहावं. (वाहतं हा आजोबांचा शब्द. प्रमाण मराठीत ‘प्रवाही’ हा शब्द वापरू शकतो.) वाहतं पाणी प्रगतीशील असतं. डबक्यातलं पाणी वास मारतं. हे साधेसोपे नियम आहेत. पाणी पाण्यापासून विलग करता येत नाही. पाण्यावर तुम्ही काठी मारा, त्याची अडवणूक करा ते त्याचा एकजीव होऊन वाहण्याचा धर्म सोडत नाही. माणसांनीही पाण्याकडून एवढच शिकायला हवय की आपणही एकमेकांपासून विलग होऊ नये. त्यासाठी जी काही जातिधर्माची कारणे आपण देत असतो, ती फारच तकलादू असतात. विषम असतात. वर्चस्वशालीपणाची हजारो वर्षे जपणूक करण्यासाठी त्यांना पोसलं गेलं. त्यावर अनेकांची आयती सोय झाली.

उदयनिधी स्टॅलिन हे काय म्हणाले , लक्षात घ्या – “नवीन संसदेत बाॅलिवूड अभिनेत्रींना बोलवलं गेलं, परंतु राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना बोलवलं नाही. कारण त्या आदिवासी आणि विधवा आहेत. यालाच आम्ही सनातन धर्म म्हणतो.”

ही जी काही सांस्कृतिक वर्चस्वाची त्यातून जातिधर्मा/लिंगाच्या आधारे सांस्कृतिक दहशतीची जोपासना होते, त्यासाठीच मी वरील महापुरूष/स्रियांची त्यांच्याबाबत झालेल्या अन्यायाबाबतची उदाहरणे दिली आहेत. इतिहासाचे विद्रुपीकरण आपण पाहतो आहोतच, परंतु इतिहास पुन्हा पुन्हा आपल्याला त्याच त्या गोष्टींपर्यंत कसा आणून सोडतो. याचं हे वरील उदाहरण फार बोलकं आहे.

‘आपल्या जगण्याचे सगळे स्रोत आता संपले आहेत.’ हे मी माझ्या एका कवितेत लिहून ठेवलं आहेच. कुणाला स्वतःच्या माणूस म्हणून जगण्याचे स्रोत माहीत असतील तर मला सांगा. मी एक सार्वजनिक सत्यधर्माचा अनुयायी म्हणून ते स्रोत कुणाकडून तरी ऐकण्यास फार उत्सुक आहे.

Previous articleअस्वस्थतेच्या ज्वालामुखीवर महाराष्ट्र…
Next articleसत्यशोधकांचा महाराष्ट्र ‘असत्या’च्या विळख्यात
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.