या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादस दानवे यांचं निलंबन क्लेशदायक आहे . अंबादास दानवे जसं वागले आणि जी भाषा त्यांनी उच्चारली ती मुळीच समर्थनीय नाही . त्या उक्ती आणि कृतीचं त्यांनी नंतर केलेलं समर्थन तर लोकशाहीसाठी जास्तच चिंताजनक आहे . आचार्य अत्रे , जांबुवंतराव धोटे , बबनराव ढाकणे , केशवराव धोंडगे , प्रमोद नवलकर , छगन भुजबळ असे अनेक महाआक्रमक लोकप्रतिनिधी या विधिमंडळानं पाहिले पण , त्यापैकी एकानंही अंबादास दानवे यांच्यासारखी भाषा उच्चारली नाही . त्या उक्ती आणि कृतीचं अंबादास दानवे यांनी केलेलं मग्रूर समर्थन आपल्या सर्वच लोकप्रतिनिधींच्या सभ्यतेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणारं आहे . उद्धव ठाकरे यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केल्यावर अंबादास दानवे जरा नरमले तरी त्या पदावर डाग पडला तो पडलाच . ज्येष्ठ सदस्यांपैकी कुणी तरी ‘तुमचं चुकल . पुन्हा असं वागू नका’ असं अंबादास दानवे यांना ठणकावून सांगायला हवं होतं . अंबादास दानवे यांच्याकडून विरोधी पक्ष नेतेपद काढून घेण्याचा खमकेपणा उद्धव ठाकरे यांनी दाखवला असता तर बरं झालं असतं , त्यामुळे त्यांची लोकशाहीवर असणारी श्रद्धा अधिक उजळून निघाली असती . याचा अर्थ प्रसाद लाड यांचं कांहीच चुकलं नाही असं नव्हे , तेही चुकलेच . दानवे आणि लाड यांच्यासारखे अनेक गणंग नेते (?) सध्या राजकारणात आहेत . अशा सर्व पक्षीय गणंग नेत्यांचं पीक केवळ राज्याच्या नव्हे तर देशाच्याही राजकारणात फोफावलं आहे , लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्यांचा उल्लेख नाव न घेता बालबुद्धीचा असा वापर करणारा सभागृहाचा नेता हे त्याचं उदाहरण आहे . राजकारणातले असे हे बहुसंख्य गणंग हे या लोकशाहीचं दुर्दैव म्हणायला हवं .