सितादही – एक अनोखी निसर्ग पूजा

– सीमा शेटे-रोठे, अकोला

पिका मंदी पिक प-हाटी पिकली

तिच्या वस्त्रानं सारी दुनिया झाकली

           – लोककवी डॉ. विठ्ठल वाघ

   प-हाटी…! कापूस…! व-हाडचं लेनं…! पांढरं सोनं…! एकेकाळी ज्याच्यामुळे इथला शेतकरी राजा होता… तो कापूस!

कापूस म्हणजे पानावरील चुना

कापूस म्हणजे उरूस

कापूस म्हणजे चंद्राचं कमळ

कापूस म्हणजे लक्ष्मीचं रूप

कापूस म्हणजे विधात्याने निर्माण केलेले मातीच्या वैभवाचे रूप

   असा हा कापूस शेतात आंगोपांगी बहरतो. बोंडातून  टचटचून बाहेर पडलेला हा पांढराशुभ्र साज नजरेला सुखावतो, तेव्हा शेतकऱ्याला वेध लागतात ते त्याच्या वेचण्याचे! कापसाचा वेचा करायचा तर त्यासाठी तयारी करावी लागते. तयारी कशाची? मुहूर्ताची! सितादहीची!  सितादही हा शब्द पहिल्यांदा ऐकला तेव्हा, वाटलं होतं बोलणार्‍यांनं चुकीचा उच्चारला असेल. पण चूक त्यांची नव्हती. माझ्या शहरी मानसिकतेचा तो घोटाळा होता. माझ्या नागरी मनाला हे प्रादेशिक वैशिष्ट्य माहितच नव्हतं. निसर्ग आणि भूमी यांच्याशी असणारं नातं कुठेतरी दुरावलेलं असताना ग्रामजीवनातील हा ‘सितादही सोहळा’ मला कसा माहीत असावा?

    खरंय! आमची रसरशीत जिवंतपणा असणारी ग्रामसंस्कृती हरवत चालल्याची तक्रार आम्ही नेहमी करतो आणि तिचे धागेदोरे शोधायचे तर फक्त ओवीगीतांपर्यंतच जाऊन थांबतो. पण त्याही पलीकडे असणाऱ्या या ग्राम लोकरितींचा आम्ही फारसा शोध घेत नाही. काय नाही या लोकरितीत? कृषी जीवन आणि निसर्गाच्या एकरुपत्वाचं दर्शन त्यात आहे. त्यातूनच निर्माण होतात समाजधारणा आणि लोकजीवनाच्या श्रद्धा परंपरा! त्याचं परिवर्तन होत असतं, ‘सितादही’ सारख्या ग्राम पूजाविधीमध्ये! हे लोकसंस्कृतीचे पूजाविधी आहेत. यात निसर्गातले दगड, माती, पान-फुल, साल यांचा आपसूक समावेश झालेला दिसतो. माणसाला जगण्याची उमेद देणारे हे विधी असतात. ते संस्कृतीच्या आधारे समाजाला सुख-समृद्धी प्रदान करण्याची परंपरा निर्माण करत असतात. भूमी हीच या विधीमध्ये केंद्रस्थानी असते. तिला स्त्री रूप समजून तिची पुजा करण्याची प्रथा व-हाडातच नव्हे तर सर्वत्र आढळते.

     मराठवाड्यात ती पौष/ माघात ‘नव्याची पुनव’ म्हणून साजरी होते. “चावर चावर चांगभले” म्हणत, भूमीला नैवेद्य नारळ अर्पण करत हा पूजा विधी संपन्न होतो. तर कर्नाटकात नव्या ज्वारी-बाजरीचे पीक घेऊन अंगावर घोंगडे पांघरून, “वलऽघे, वलऽघे” असा उद्घोष करत शेताला प्रदक्षिणा घातली जाते. ओरिसात ‘नुआखाई’ म्हणजे हंगामातील पहिल्या भाताची कापणी करताना कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे. ही नुआखाई भाद्रपदात केली जाते. त्यावेळी भात आणि खीर भूदेवतेला अर्पण करण्याची प्रथा आहे. द. ता. भोसले यांच्या लोकसंस्कृती विषयक पुस्तकात  हे विधी वाचताना मला कुठेतरी ‘सितादही’शी त्याचं साम्य जाणवलं. म्हणून मग मी शोध घ्यायला सुरुवात केली.

किती करावं कवतिक मन हरिकलं बाई

आज माह्या वावरात आहे गड्या सितादही

अशी प-हाटी फुलली आंगोपांगी बहरली

त्यात शोभून दिसते माही ईठाई माऊली

दहीभाताचं हे बोनं वावरात शिपडलं

काया धरतीच्या पायी आज नारय फोडलं

शिरनी वाटताना मन हुरळून जाई

ओटी कापुस येचता याद माहेराची येई

                      – मीराताई ठाकरे

   ही कविता सितादहीचा पूजाविधी सांगत होती. पण त्याचा कार्यकारणभाव मात्र कळत नव्हता. विचार करता लक्षात आलं की, आपल्या कृषी जीवनात भूमीचं महत्त्व आहे तसंच स्त्रीचं सुद्धा महत्त्व आहे. फ्रेझर म्हणतो, स्त्री मनुष्याला जन्म देते, तिच्या ठिकाणी सुफलीकरणाची अद्भुत शक्ती असते.  ‘A fruitful woman makes plants fruitful, a barren woman makes them berren’  हे तत्व कृषी जीवनात महत्त्वाचं मानलं गेलं असावं. म्हणूनच शेतीत काही पूजा विधी हे स्त्रियांकडून, विशेषतः लेकुरवाळ्या स्त्रियांकडून करून घेतले जातात. त्यापैकी एक आहे, सितादही!

शेताच्या मालकिणीनं ही पूजा करायची, असा संकेत आहे. ही पूजा दशमी, बारस, बुधवार किंवा रविवार या दिवशी करतात. ज्या दिवशी कापूस वेचा करायला सुरुवात करायची आहे, त्याच्या अगोदरच्या दिवशी ही घरधनीन गायीच्या दुधाचं छान प्रकारे दही विरजवायला ठेवते. दुसऱ्या दिवशी सकाळी हे विरजलेलं घट्टसर दही आणि मऊसर शिजवलेला भात तसंच, शेतात काम करणाऱ्या स्त्रियांच्या जेवणाची शिदोरी… अशी तयारी करून, हे सगळं घेऊन शेतात जातात. तिथे गेल्यावर सात गोटे (छोटे छोटे दगड) एका रांगेत ठेवले जातात. त्या गोट्यांना न्हाऊ माखू घालून त्यांची पूजा केली जाते. कणकेचे सात दिवे सात नैवेद्य ठेवले जातात. आरती केली जाते. प-हाटीच्या दोन झाडांच्या आधारे झोळीचा, पिवळ्या कापडाचा पाळणा बांधला जातो. त्या पाळण्यात प-हाटीच्या फुलाचा गोपा करून ठेवतात. पिवळ्या कपड्याचे सात छोटे छोटे तुकडे करून त्यात कापसाचे बोंड टाकून गाठोडे बांधतात. ते सात गाठोडे पाळण्याशेजारी ठेवल्या जातात. नंतर प-हाटीच्या झाडाची खणानारळाने ओटी भरली जाते. घर मालकीण आणि शेतात वेचा करायला आलेल्या मजूर बायका ही पूजा करतात. “घर धनधान्यानं भरून जाऊ दे” हे मागणं मागतात. दहीभाताची शितं शेताच्या चारी बाजूला फेकतात आणि त्यावर पाणी शिंपडतात. काही ठिकाणी अशा प्रकारची पूजा एकाच शेतात करण्याची प्रथा आहे.

कोरकू आदिवासी मात्र अशा प्रकारची पूजा त्यांच्या प्रत्येक शेतात करतात. हा सगळा पूजा विधी मला, माझी जाऊ शोभा, नणंद गंगाबाई, सत्यभामा, कामवाली कांताबाई आणि भाच्चे सून रजनी यांनी सविस्तर सांगितला. शोभाला त्यामागचा कार्यकारणभाव माहित नव्हता. पण सत्यभामा म्हणाली की, “हे सात दगड म्हणजे सप्तमातृका शक्तीचे प्रतीक आहेत. आपल्या संस्कृतीत… साती आसरा, मरीआई, म्हसोबा, वेताळ बाबा, सिदोबा अशा देव-देवता कोणत्याही प्रकारचं अरिष्ट निवारण व्हावं, म्हणून  लोकमानसाने स्वीकारलेल्या आहेत. त्यातीलच सात आसरांचे प्रतीक म्हणून हे सात दगड मांडले जातात. त्यांची पूजा केली जाते. त्यांची पूजा म्हणजे जी आसरा माता असते तिचीच पूजा! त्याचंच हे रूप आहे. गंगाबाई म्हणाल्यात की, “ही जी दहीभाताची शितं शेताच्या चारी बाजूला फेकली जातात त्यावरूनच हे शितं व दही असं म्हटल्या जात असावं. “सितला दहीच ते अपभ्रंश रूप होत होत ‘सितादही’ झालं असावं”, असं माझी भाच्चे सून, रजनी म्हणाली. दहीभातच का? तर गंगाबाई सांगतात, “त्याचा रंग पांढरा आहे आणि कापूसही पांढरा असतो. या दही भाताप्रमाणेच शेतभर कापूस दरवर्षी फुलावा, ही मनोकामना या पूजेद्वारे करत असावेत.”

  कारण काहीही असो, पण ग्रामीण भागातला हा एक महत्वाचा पूजाविधी आहे. पूजा झाल्यावर नारळ फोडून त्याची शेरणी म्हणजे प्रसाद वाटला जातो. नंतर कापूस वेचायला प्रारंभ होतो. पहिला वेचा, किलो दीड किलोचा एका पिवळ्या कापडात बांधतात. त्याला ‘लोथ’ म्हणतात. ती ‘लोथ’ जपून घरी आणल्या जाते. घरातला सगळा कापूस विकल्या जाईपर्यंत ती ‘लोथ’ जपतात.  दिवसभराचा वेचा झाला की कापूस घरी आणल्या जातो. पहिल्या दिवशी तागड्या गोट्याची पूजा केली जाते आणि कापूस मोजतात. दिवसभराची मजुरी मजुरांना मिळते. घरी आणलेली ती ‘लोथ’ जपून ठेवल्या जाते. त्यातील कापसाचा उपयोग देवासाठी वाती तयार करण्यासाठी होतो.

संसाराचा गाडा कापसाच्या माथी

उजळती वाटा जळताना वाती

    – लोककवी डॉ. विठ्ठल वाघ

या ‘लोथ’ बद्दल सांगत असतानाच माझा पुतण्या सचिनला एकदम राशीच्या पूजेची आठवण आली. आता ‘सितादही’च मला माहिती नव्हती तर राशीची पूजा कुठून माहित असेल? मग गंगा बाई म्हणाल्या, “पूर्वी थ्रेशर वगैरे नव्हते तेव्हा शेतात खळं तयार करायचे. त्याद्वारे ज्वारी तयार व्हायची. शेतात ज्वारीचा गंज लागला की घरातून पाटी दिवा आणि शेणाचे पाच पांडव व एक धुरपदी करून न्यायची. ते दसऱ्याला आधीच तयार केले जायचे. वाळून तयार असायचे. मग ही पाटी ज्वारीच्या गंजावर ठेवून त्याची पूजा केली जायची. तो दिवा तिथे ठेवून त्या पाटीत पोहरा दोन पोहरे ज्वारी भरून, परत त्यावर दिवा ठेवून ते घरी आणलं जायचं. शेणाचे पाच पांडव आणि एक धुरपदी अंगणात एका बाजूला ठेवून त्यांची पूजा केली जायची आणि पाटी भरून आणलेली ज्वारी, देवाधर्मासाठी आंबील करायला किंवा दान देण्यासाठी उपयोगात आणल्या जायची. दसऱ्यापासून या रास पूजेची तयारी केल्या जायची ते गाई गोंदणाच्या पूजेपूर्वी पूर्ण व्हायची”, गंगाबाई हे सांगत असतानाच आमच्या सचिनला आठवलं की किसन आबा ही ज्वारी धानो-याच्या देवाला पाठवायचे. मात्र आता ते ‘खळं’ ही राहिलं नाही आणि ती ‘रासपूजा’ ही होत नाही. ही प्रथा जरी नामशेष झाली असली तरी ‘सितादही’ मात्र आजही सर्वत्र मनोभावे केल्या जाते.

   नव्याचं आकर्षण आणि जुन्याचा अभिमान हा मानवी स्वभाव आहे. निसर्ग पूजेच्या निमित्तानं तो जपल्या जातो आहे. तसंच या लोकरितीच्या निमित्तानं पूजा अर्चने द्वारे मिळणारे भूमीचे आशीर्वचन लोक मनाला सुखावताहेत. समृद्धी आणि सुजन प्रक्रियेशी निगडीत या लोकरिती म्हणजे पुढल्या पिढीसाठी जगण्याच्या वाटा ठरत आहेत…

(लेखिका अकोला आकाशवाणीला प्रासंगिक उद्घोषिका आहेत)

9422938040

Previous articleअंगावर चिखल उडवून घ्यायचाच कशाला ?
Next articleसुली, दत्त्या, राम्या आणि काशिनाथ
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here