एकदा मुंबईत विमानतळावर भेट झाली तेव्हा मी शंकराराव चव्हाणांना विनंती केली तेव्हा शंकरराव चव्हाण त्यांच्या स्वभावाप्रमाणे म्हणाले , ‘मी तुम्हाला मुलाखत नक्की देईन . पण , तुम्हाला हे माहिती आहे नं की, मी शरद पवार आणि स्वतंत्र विदर्भ याच्या संदर्भात काही बोलणार नाही .’ मी होकारार्थी मान डोलावली . पुढे जवळजवळ वर्षभर फॉलोअप करत होतो ; परंतु आधी देशाची परिस्थिती सांगितली त्यामुळे शंकरराव चव्हाणांवर केंद्रीय गृहमंत्री म्हणून कामाचा खूप बोझा होता आणि वेळ मिळत नव्हता .
येथे आणखी एक हकिकत नमूद करायला हवी . ती फार मनोरंजक , पश्चिम महाराष्ट्राच्या नेतृत्वाच्या प्रशासकीय कौशल्याची व राजकीय बिलंदरपणाचीही आहे . मे ९८ ते २००३ मी औरंगाबादला होतो . त्या काळातली ही घटना आहे . राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यावर औरंगाबादला आमखास मैदानावर राष्ट्रवादीची खूप मोठी सभा झाली . अर्थातच शरद पवार प्रमुख पाहुणे होते .. श्रोत्यांमध्ये खूप मंत्रीही बसलेले होते . मंत्र्यासोबत मीही होतो . त्यात अजित पवार ,दिलीप वळसे पाटील, आबा उपाख्य आर . आर . पाटील , दिग्विजय खानविलकर होते आणि त्या सर्वाच्या सोबत बसून मीही गप्पा मारत ती सभा कव्हर करत होतो . मी विकासाच्या अनुशेषाच्या संदर्भात नुकत्याच दिलेल्या बातमीचा उल्लेख निघाला तेव्हा आबा म्हणाले , ‘अहो , बर्दापूरकर तुमचे मराठवाडा आणि विदर्भातले जे लोक आहेत न त्यांना आमची क्षमता माहीत नाही . आम्ही आमच्या भागाच्या विकासासाठी इतके आग्रही असतो की , तुमच्या दोन्ही भागासाठी विकासाचा अनुशेष दूर करण्यासाठी ज्या रकमेची तरतूद करण्यात आलेली आहे , ती रक्कमसुद्धा आम्ही पळवलेली आहे . तुमच्या लोकांना कळलंच नाही .’
अर्थात वरील प्रतिपादनाला एक अपवाद आहे . त्याचीही एक हकिकत आहे . अमरावतीचे बी . टी . देशमुख हे अतिशय अभ्यासू असं व्यक्तिमत्त्व . बी .टी . देशमुख विधान परिषदेचे प्रदीर्घ काळ सदस्य होते . १९९५ -९६ मध्ये अस्तित्वात आलेलं सेना –भाजपचं युती सरकार गेल्यानंतर पुढे नितीन गडकरी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते झाले . बी . टी . देशमुख आणि नितीन गडकरी यांनी वैधानिक विकास मंडळाला मिळणाऱ्या निधीचा आणि त्याच्या उपयोग आणि विनियोगाच्या मुद्याची लढाई खूप न्यायालयीन पातळीवर खूप नेटानं लढवली आणि निधी पदरात पाडून घेतला हे खरं पण , हे असे काही अपवाद वगळता वैधानिक मंडळे विकासाच्या संदर्भामध्ये फार काही प्रभावी ठरलेली आहेत असं नाहीये .