गांधी कथा -२
१९२८ मध्ये भागलपूरला सरोजिनी नायडूंच्या अध्यक्षतेखाली एक विद्यार्थी संमेलन झाले. त्यावेळी काही स्वयंसेवकांनी गांधीजींची भेट घेतली. मुलांनी सांगितले ” महात्माजी आता अहिंसेवर आमचा विश्वास नाही राह्यला. कानपूरमध्ये क्रांतीकारकांची पत्रकं आम्ही वाटली. ती पत्रकं आम्हाला गणेश शंकर विद्यार्थी आणि इतरांकडून मिळत होती.”
गांधीजीनी विचारले ” ती माणसं तुम्हाला क्रांतीकारकांच काम कसं शिकवतात?”
एक मुलगा म्हणाला ” चोरून.”
ते ऐकल्यावर गांधीजी म्हणाले ” हे काही शूर शिपाई किंवा शूर देशभक्ताचे काम नाही. तुमचा जर हिंसेवर विश्वास असेल तर मैदानात येउन सांगा.”
” हा तर सरळसरळ फासावर चढायचा मार्ग आहे.”
गांधीजीनी उत्तर दिलं ” तुम्ही फाशी गेल्यावर जर अजून दहा वीस जन फासावर गेले तर आपण म्हणू की हिंसेने काम केले. नाहीतर नाही. मी तर अहिंसेची तलवार घेउन लढतोय. जिला दोन्ही बाजूंनी धार आहे. हिंसेच्या तलवारीला एका बाजूनेच धार असते म्हणून ती ब्रिटीश सरकारच काहीच नुकसान करू शकत नाही.”
————————————————————————————————————–
गांधीजींच्या आश्रमात मुलीसुद्धा रहात होत्या. एक दिवस कुठूनतरी येताना रस्त्यात काही तरूणांनी त्यांना त्रास दिला. मुली घाबरून आश्रमात धावत आल्या. प्रार्थनेनंतर त्यानी महात्माजींना घडलेली घटना सांगितली. महात्माजी त्यांना म्हणाले ” तुम्ही का पळून आलात ? हिंमतीने तिथेच थांबायचे.”
एका मुलीने उत्तर दिलं ” मुलांनी आमची छेडछाड केली असती तर ?”
गांधीजी म्हणाले ” तर त्यांच्या तोंडावर दोनचार गुद्दे हाणायचे.”
ते ऐकून मुली चमकल्या. एका स्वरात सर्वजणी म्हणाल्या ” ही हिंसा नाही का?”
गांधीजी हसत म्हणाले ” हिंसा म्हणजे काय हे तुमच्या गालावर एका थप्पड मारल्यावरच तुम्हाला समजणार का?”
अहिंसा हे शूराचे अस्त्र आहे हे कोणाला समाजात नाही. गांधीजीनी नेहमी सांगितले आहे ” अहिंसेच्या तत्वांनी आपला कमकुवतपणा आणि भीती झाकली जात नाही.”
सौजन्य – विजय तांबे